दिवस वेडे स्वप्न पंखी,…
@स्वप्ना मुळे(मायी)
उंबरठ्यावरच माप तिने ओलांडल तेंव्हा टाळ्या, हस्यकल्लोळ,सनई, आणि उखण्यासाठी केलेला एकच कल्ला(गोंधळ),…अगदी त्याच्याही मागे लागले होते सगळे नाव घे म्हणून,…त्याच नाव घेताना किती लाजलो होतो आपण आणि त्याने घेतलेला उखाणा ऐकून तर फुलून आलो होतो मनोमन,…
“अंतरपाट झाला दुर,… शांत झाले सनईचे सूर,..
सावी नजरेसमोरून हलली तरी,..मना लागते हुरहूर.”
तेंव्हा सगळ्यांनी किती चिडवलं होतं,… सावी आता हा क्षणभरही सोडायचा नाही तुला,….आणि तसंच तर झालं होतं,…आठ एक दिवस पाहुणे आणि आवराआवरीत गेले जसं त्याच्या नोकरीच्या गावी आलो तसं सुट्ट्या संपे पर्यंत सारखं सावी, सावी प्रत्येक खोलीत मागे मागे,…सारखं निरखत हात हातात घेत बसायचा बोलत,…आकाशच ठेंगण झालं होतं आपल्याला,…केवढी काळजी घेत होता,…आणि त्यातच आपली गुडन्युअज मग तर आणखीनच वाढलं आपल्याला वेळ देणं ,…ऑफिसमध्ये जाई पर्यंत आणि आल्यावरही अगदी आपल्याला सुरवातीला उलट्या झाल्या तर तिथेही आपल्या पाठीवर हात फिरवत उभाच असायचा,…पण आता वाटतं ते स्वप्न होतं का,…?मी आई झाले तरी मी त्याची सावीच आहे ना ग मावशी,…डोळ्यातलं येणार पाणी कसंतरी अडवत तिने कालच पुण्याहून आलेल्या मावशीला विचारलं,…मावशी अगदी मैत्रिणीसारखी होती तिला,… मावशी हसली तिला बघुन,… म्हणाली,सावी,…अग सगळे दिवस सारखे नसतात,…..वयानुसार,काळानुसार प्रयोरिटी बदलतात ग,…पहिले फक्ततुझी जबाबदारी होती त्याच्यावर आता बाळाच्या भविष्याची आहे,…आणि सारखं तू वेळच देत नाहीस,तुला आमची किंमतच नाही हे नको ग बोलूस त्याला,…खरंतर तुझाच वेळ आता बाळा कडे वाटल्या गेला,… तो जरी तुझ्यामागे पूर्वीसारखा फिरला तरी तुला वेळ आहे का त्याला द्यायला,…?हा विचार कर,…खरंतर थोडं फार बदलत,… पण तुम्ही मुली तुमच्या निगेटिव्ह विचारांनी जरा जास्तच बदलवून टाकता सगळं,…मग तो आता पहिल्या सारखा राहिलाच नाही,वेळच देत नाही अग तेच तेच दिवस कसे राहतील आयुष्यात,…अजुन बाळ जसं मोठं होईल,…त्याला परत दुसरा जोडीदार येईल,….मावशीच्या बोलण्याला तोडत ती लगेच म्हणाली”,काही नाही येत दुसरं,…इथे त्याला बघायला वेळ नाही,…”मावशी म्हणाली असं म्हणतेस तू,…अग हे नवरा बायकोच नातं सगळ्यात वेगळं यातला अबोला,दुरावा फार टिकत नसतो आणि हे नात टिकवण्यासाठी तो टिकू द्यायचा नसतो,….ह्या फेज आहेत आयुष्यातील,… लग्न ,लग्नानंतरचे फक्त दोघांचे असलेले रेशीम दिवस,…मग चिमुकल्याची चाहूल आणि मग पालकत्वाचा अखंड प्रवास ह्यात आई बाबा महत्वाचे असले तरी,…आपण एकमेकांचे नवरा बायको असतो हे मात्र लक्षात ठेवायला हवं,…त्याच्याशी बोलेलंच मी संध्याकाळी पण तू हे डोक्यातून काढ तो मला वेळ देत नाही म्हणजे त्याच पूर्वीसारखं प्रेम नाही,…
ती बाळाला बागेत घेऊन गेली तेव्हाच तो आला,… मावशीने मस्त चहा केला दोघांना,…जवाईबापू वेळेची फारच टंचाई दिसते तुमच्याकडे,… त्याने मावशीकडे पाहिलं का तक्रार झाली का आमची,…मावशी हसली म्हणाली,…ह्या तक्रारी करायला आपलीच माणसं हवी नाहीतर संसार फाटायला वेळ लागत नाही,…खरंतर तुमच्यात मी बोलू नाही पण एकमेकांना पुरेसा वेळ दिल्याच गेला पाहिजे नाहीतर मग दुरावा हा वाढणारच,….मावशी तुमच म्हणणं पटतंय पण सध्या वर्कलोड आहे,.. आणि नाही जमत हो,…सारख टूमण लावते ती,…वेळ देत नाही,..पूर्वीसारखं प्रेम नाही ,पण मावशी आहो प्रेम कस कमी होईल हो??मावशी हसली म्हणाली,मान्य पण प्रेम व्यक्त करायला हवं आणि त्यासाठी वेळ तर द्यावाच लागेल ना,..अव्यक्त प्रेम नाही हो आजकाल समजत तुमच्या पिढीला,…आणि वास्तविकता,…जबाबदाऱ्या हे सगळं आयुष्यभर आहेच पण ह्या नात्यातली गोडी ते सुरुवातीच्या दिवसांची आठवण आणि कधीतरी एखादया दिवशी त्याची पुनरावृत्ती झाली तर,…नक्कीच ओढ आणि प्रेम दोन्ही वाढवेल ना,…कारण ते दिवस तर वेडेच रेशमाची झुल झालेले नाही का,…?😊
@स्वप्ना मुळे(मायी)

Article Tags:
#Article Categories:
मनोरंजन