दिवाळी-नानकटाईसोबतची

Written by

दिवाळी अगदीच तोंडावर आली तरी पाऊस काय जायचं नाव घेईना. यावर्षी काय झालं त्याला कोण जाणे…पण पावसाने दिवाळीची खरेदी थांबवून कस चालेल. फराळाची खरेदी,कपड्यांची खरेदी सगळंच या पावसामुळे खोळंबलय..तरीही आज मनाने ठरवलेलंच पाऊस असो किंवा सोबत कोणी येवो न येवो खरेदीला जायचंच. पावसामुळे दिवाळी सारख्या सणावर विरजण पडू देऊन कस चालेल..

आवरलं आणि पडले घराबाहेर…जमेल तशी तेवढी खरेदी केली..मुलाला छान कपडे घेतले कारण परत पावसामुळे येणं झालं तर बरं नाहीतर त्याचा हिरमुड नको व्हायला.

पाऊस अजूनही चालूच होता. बसची वाट बघत बस स्टँड वर येऊन बसले. पाऊस न्याहाळत बसणे माझा खूप आवडीचा छंद. अशा पावसातच मन शब्दांचे खेळ सूरु करत आणि मग खूप काही सुचू लागत. यावेळी मात्र हा नकोसा झालेला पाऊस, ती रस्त्यावरची खड्यांची चाळण, त्यातून जीव वाचवत माणसांचं पुढे जाण यानेच मन दुःखी होत होत. तेवढ्यात एक साठ पासष्ठ वयाच्या आजी बाजूला येऊन बसल्या. नारंगी रंगाची जरा कळकट झालेली… त्यावर ठिगळं लावलेली साडी,त्यावर निळ्या रंगाचा ब्लाउज जो त्याच्या शेवटच्या घटका मोजत होता…हातात,पायात,गळ्यात एकही दागिना नाही. कितीतरी दिवस चंदेरी केसांची तेलाशी गाठ पडली नसावी म्हणून ते उजाडलेले,रुखरुख वाटणारे केस..कसतरी त्यांना एकेजागी गुंडाळलेल. रंग गोरा असावा पण उन्हाने की परिस्थितीने तेज उडलेलं..त्यावर चिंतेच्या सुरकुत्यांनी घरटं केलेलं.. आणि खोल गेलेले डोळे..त्या डोळ्यातून पावसाच्या संततधारेसोबत अश्रुधारा वाहत होत्या. मी काळजीने आणि आश्चर्याने बघत होते की आजी का रडतायत.

घरी काही झालं असेल का??घराबाहेर काढलं असेल का की त्यांच्या जवळच कोणी गेलं?? की मनोरुग्ण आहेत की अजून काही…नको नको ते डोकं विचार करू लागल.  न राहवून आता विचारलंच काय झालं आजी? तसा आजींचा हुंदका अनावर झाला…पावसाचा जोर वाढावा तस त्यांच्या अश्रूंचा जोर वाढला. मी पाणी देऊन शांत केलं आणि पुन्हा विचारलं  काही वाईट झालंय का आजी??

आजी म्हणाल्या “वाईट झालं  की अजून काय म्हणावं काय कळत नाही पोरी आता. निसर्ग कोपलाय का एवढा कळत नाही? मधी महापुरात वाहून त्याच मन भरलं नाही म्हणून आता परत कोसळतोय एन दिवाळीच्या तोंडाला.”

मी म्हणाले खर आहे यावेळी पावसाने डोळ्यात पाणी आणलं सगळ्यांच्या…पण म्हणून तुम्ही एवढं का रडताय?

“अग पोरी एवढंच कस म्हणतीस… या पावसानं माझं सगळंच नेलं… मधी पूर आला तवा माझं घर वाहून गेलं, आम्ही माणसं कुठं कुठं वाहून गेलो…या पुरातच माझा लेक आणि सून वाहत कुठं गेली काय माहीत अजून पत्ता नाही लागला बघ..त्यांचा लेक आहे आता माझ्यासोबत…7 वर्षाचा. समदिकड शोधलं पण नाही मिळाली ती दोघ. माझा नवरा आधीच गेलेला सोडून…या दोघांचा आधार होता तो बी नेला या पावसानं.

सरकारनं मदत दिली बघ तवा पण कुणाला ती मिळाली कुणाला नाय. कपडे मिळाली..काही चांगली काही ठिगळं लावलेली..पण अंग झाकायला मिळालं तेच आमचं नशीब बघ. खायला बिस्कीटच पूड,लाडू आणि काय काय मिळालवत पण किती दिस पुरणार ग ते?  पूर ओसरला तस घरी येऊन बघितल तर तिथं घर नव्हतंच. सगळं भुईसपाट. माझी जागा कुठून किती हेही कळत नव्हतं. तिथंच चार लाकड आणून त्यावर पाला टाकून बांधलं झोपड. राहतो आता नातू आणि मी. माझी नाय जगायची इच्छा पण नातवासाठी जगावं लागतंय.

जे मिळालेलं खायला ते संपलं पण पोटाची भूक संपत नाय ना.. त्याला रोज खायला लागतं…नातवाला कोणाकड तरी ठेवून रोज काम शोधायला जायची…येताना लोकांकडे शिळी भाकरी मागायची नातवाला आणि मला. काम मिळेपर्यंत असच काढलं दिस. नंतर शेतात जरा काम मिळू लागली…या वयात नाही जमत पण नातवाकड बघून करते तसच. आता दिवाळी आली…त्याला नवीन कापडं घेण्याइतक तर माझ्याकडं पैसं न्हाईत..लाडू,चिवडा,चकली असलं काय करायला बी पैस न्हाई. नातवाला नानकटाईची बिस्कीट लय आवडतात बघ म्हणून म्हणलं त्याला या दिवाळीला दोन पूड त्याचंच न्यावं. तर या पावसानं पुन्हा जोर धरला. आधीच ही शेतातली काम मिळत न्हाईत आणि त्यात पाऊस. कसतरी देवा देवा करून ही काम मिळालवत. शंभर रुपय मिळालं बघ त्याचं. जाताना आता पन्नास रुपयची दोन नानकटाईच पूड घेऊन जावं म्हणून दुकानात गेले..पूडं घेऊन पैस दिल तर दुकानदार म्हणला नोट भिजले आजी..दुसरी द्या.

काळजात चरर झालं बघ माझ्या…ही एक नोट मिळावी म्हणून किती कष्ट केलं या म्हातारीन आणि दुसरी कुठन आणू?? माझा नातू ती बिस्कीट बघून खुश होईल.. त्याचा हसरा चेहरा सारखा  माझ्या डोळ्यासमोर नाचत हुता..त्याची दिवाळी नानकटाई सोबत साजरी हुईल अस वाटलवत पण या भिजल्या नोटनं ती स्वप्नं पण भिजली. आता त्याला काय घेऊन जाऊ?? कशी होईल त्याची दिवाळी? दुसऱ्या पोरांकडं तो बघत बसलं आणि मी म्हातारी कायच करू शकणार नाही त्याच्यासाठी म्हणून नशीबाला दोष देत रडत बसले बघ इथं. नातवासमोर जाऊन तर हसावं लागतंय. आई बाप कामाला गेलेत.. येतील लवकर असे सांगून त्याला नादवत असती मी.

ती येतील का नाय ते तर माझं मलाच माहीत नाही…पण आता भीक मागून का होईना माझ्या नातवाला नानकटाई खायला देणार बघ”असं बोलून आजी खूपच रडायला लागल्या.

त्यांचं बोलणं ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं..इतके दिवस आवडणारा पाऊस…आता त्याचा राग यायला लागला..त्याला ओरडून सांगावं वाटत होतं. जा ना रे बाबा आता..अजून किती लोकांच्या डोळ्यात तू पाणी आणणार…किती घर, कुटुंब उध्वस्त करशील अजून??

मी  गळ्यापर्यंत आलेला आवंढा गिळून आजींना सावरण्याचा प्रयत्न करत होते पण मीच आतून हादरले होते. इतकं कल्पनेपलीकडच दुःखही कोणाच्या वाटेला येऊ शकत आणि तेही या वयात…माझ्या विचारचक्रातून बाहेर पडले आणि आजींना माझ्या मुलाला घेतलेला ड्रेस दिला..जवळच्या दुकानात जाऊन चकली,चिवडा,लाडूची पॅकेट घेऊन दिली…ज्या नानकटाई साठी त्या जीवाचं रान करत होत्या त्याही  घेउन दिल्या.आजी मात्र इतक्या प्रामाणिक की त्या यातलं काहीचं घ्यायला तयार नव्हत्या. तुझं पैस आणि मी कधी,कशी देऊ म्हणत होत्या पण तुमची लेक समजून हे सगळं घ्या अस म्हणाल्याल्यावरच त्यांनी ते स्वीकारलं. सोबत लाखमोलाचा त्यांचा आशीर्वादही देऊन गेल्या. पुढच्या वर्षी मात्र मी हरणार नाही..नातवाची पुढची दिवाळी मोठी साजरी करेन अस आशावादी बोलूनही गेल्या. त्यांना ती मदत केल्यावर खरतर माझ मन जरा हलकं व्हायला हवं होतं पण तस न होता तो भार अजूनच वाढला. मी केलेली मदतही तात्पुरतीच. पोटाला भूक रोज लागते….पुन्हा जगण्याचा हा संघर्ष त्यांचा सुरूच….आपण फक्त अशा परिस्थितीवर      हळहळू शकतो पण ती लढाई त्यांनाच लढायची असते. आजींसारखी कष्टाळू,प्रामाणिक, ध्येयवादी,प्रेमळ लढून जिंकतातही.

पावसाचा हाहाकार आतातरी थांबावा आणि पुराने ज्यांची जनजीवन विस्कळीत झाली ते पुन्हा लवकर सावरून त्यांच्या घरीही दिवाळीची रोषणाई झळकूदे. त्यांच्याही घरातील,आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन दिव्यांसोबत हास्याच कंदील उजळूदे.

©सरिता सावंत भोसले

 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा