देवीचा नेवैद्य आणि म्हातारी भिकारीण ……

Written by

अबब! काय ही गर्दी …..

“काय ग् हे प्रिया, एवढ्या गर्दीत मंदिरात एवढ्या मोठ्या रांगेत उभं राहून दर्शन घेतलं तरच तुझा उपास सुफळ होणार अाहे का”?

प्रियाचा नवरा अभी तीला तक्रारवजा सुरात बोलत होता पण प्रियाला त्याचं बोलणंच ऎकू येत नव्हतं तीला फक्त रांगेतून कधी एकदा मंदिरात पोहोचून दर्शन घेते असं झालं होतं.

मंदिराबाहेर भिका-यांची रांग लागली होती. आणि एका कडेला एक म्हातारी भुक लागली म्हणत मला खाऊ घाला म्हणून विनवत होती.

सगळ्यांनी दुर्लक्ष केलं तसंच अभीनेही तिला पाहत तिच्याकडून तोंड फिरवलं.

अभी गर्दीत आपल्या चार वर्षाच्या मुलाला अथर्वला आणि देवीसाठी आणलेला नेवैद्य सांभाळत एका कोपऱ्यात बसला होता.

रांगेतून प्रियाचा नंबर आला की लगेच जाऊन तो तिला नेवैद्य तिच्या हातात देणार होता. कारण गर्दीमुळे हातात कोणतंच सामान तिला पकडता येत नव्हतं.

“काय बछड्या , आज तर तुझी स्वारी जाम खुष दिसतीये रे”…..म्हणत,अभीने अथर्वचे गालगुच्चे घेतले.

“बाबा अले, किती गल्दी आहे ही, आई कधी येनाल? …… तोपल्यंत आपन झाडाला गोल- गोल खेलायचं का”? म्हणत अथर्वने उत्तराची प्रतीक्षा न करता खेळायला सुरूवात केली.

आरे अथू थांब म्हणत अभी त्याला अडवत होता इतक्यात अभीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला.

अभीने वळून पाहिलं तर मंदीराबाहेरची तीच भिकारी आजी काहीतरी खायला मागत होती.

“काय ग् म्हातारे!  असं अचानक पाठीवर हात ठेऊन काय भिक मागते तू”? म्हणत अभी तिच्यावर खेकसला.

“भुकेने पोट अन् पाठ एक झाली रं बाळा , कायतर खायाला देतो का”?  म्हणत म्हातारीची आर्जव चालू होती.

एका भिकारणीने आपल्या पाठीला हात लावत भिक मागण्याने अभीला राग आला त्याने लागलीच एक दोन रुपायचा ठोकळा काढत तिरस्कारानं तिच्याकडे बघत तिला दिला.

म्हातारी एक वेळ त्या ठोकळ्याकडे बघत, या पैशात आपलं पोट कसं भरेल या विचारात ती तिथून निघून गेली. 

अभी अथर्वसोबत खेळण्यात गुंग झाला. हळूहळू गर्दीचं प्रमाण अजूनच वाढत गेलं तसं अभीने खेळणं बंद करून अथर्वला बसायला सांगीतलं.

पण शांत बसेल ते मूल कसलं? ….

बाबा आपल्याशी खेळत नाही असं पाहत अथर्वने हळूच नेवैद्याची पिशवी उचलली आणि जोरात ओरडत म्हणाला “ये बाबा मला पकड ,घे माझ्या हातातली पिशवी “…..म्हणत तो गर्दीच्या दिशेने पळाला.

अथर्वssss, अथर्वsssss आवाज देतच अभी त्याच्या मागे गेला पण कितीही पळाला तरी गर्दीतून त्याला वाट काढता येत नव्हती.

धाय मोकलून अभी रडायला लागला, पटापट धापा टाकत आपल्या चिमुकल्या जिवाला तो आसूसलेल्या नजरेने तो शोधत होता.

प्रियाही, अभी का पळाला म्हणून त्याच्या मागे आली आणि अथर्व कुठे दिसेना म्हणून रडतंच मटकन् खाली बसली.

बराच वेळ शोध घेऊनही अथर्वचा काहीच पत्ता नव्हता. गर्दीत अथर्व हा हा म्हणता हरवला होता आणि अभी- प्रियाच्या हाती निराशा पडली होती.

अखेर शेवटी त्यांनी पोलिसात जायचा निर्णय घेतला.

“अभी आरे, देवीला नेवैद्य पोचला नाही म्हणून ती कोपली असेल का रे, म्हणत प्रिया ने परत हंबरडा फोडला”. 

निराश अभी काहीच बोलू शकत नव्हता.

पोलीस चौकीत आल्यावर सैरभैर होत त्यांनी पोलिसांना अथर्वचा फोटो दाखवत घडलेला वृत्तांत सांगितला आणि फोटो बघताच पोलिसांचे डोळे चमकले. हसतच त्यांनी प्रिया – अभीला शांत राहण्यास सांगीतले.

“एका म्हातारीला तुमचा मुलगा सापडला म्हणून ती त्याला घेऊन आमच्याकडे आली आहे पण अथर्व मात्र घाबरला अाहे आणि म्हातारीच्या कुशीतच बसला आहे”. असं म्हणत त्यांनी पोलिस चौकीच्या मागच्या बागेकडे त्यांना जायला सांगितले.

आपला बछडा मिळाला म्हणून दोघांनी बागेकडे धाव घेतली.

बागेत पोचल्यावर त्यांनी पाहिलं की,

देवळातली म्हातारी भिकारीण अथर्वला मिठीत घेऊन आपल्या कळकट ,मळलेल्या हाताने देवीसाठीच्या नेवैद्याच्या पिशवीतला, नेवैद्य भरवत होती आणि अथर्व “आजी तू पण खा ना ! म्हणत, तीला घास भरवत होता”.

म्हातारीचं खापटाला गेलेल्या पोटात हळूहळू घास सरकत होता. शेजारीच तिच्या भिकेच्या वाटीत अभीने दिलेला दोन रुपायचा ठोकळा चमकत होता आणि देवीला खरा नैवेद्य मिळत म्हातारीच्या रुपात खरीखुरी देवी पावली होती. 

फोटो साभार गुगल …..(फोटोला एडिट केले आहे याची कृपया नोंद घ्यावी)

©Sunita Choudhari.

(मित्र- मैत्रीणींनो आणि माझ्या वाचकांनो नमस्कार ….. आजचा हा देवीच्या नेवैद्याचा अनोखा सोहळा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवाल ….. माझ्या कथा वाचायला मला फाॅलोही करा. धन्यवाद .)

 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा