धाडसी किल्लेदार

Written by

#धाडसी_किल्लेदार

सोन्या, चंप्या , डिंकू आणि पिंटू अशी जिगरी मित्रांची चौकडीच होती. सगळे एकाच शाळेत एकाच वर्गातले आणि रहायलाही एकाच सोसायटीत. त्यामुळे शाळेत जायला, यायला, आभ्यास करायला, खेळायला सगळीकडे ते एकमेकांच्या कायम सोबत असायचे.

दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तशी  त्यांनी किल्ला बनवायची तयारी सुरू केली. यावर्षी नेहमीपेक्षाही भारी किल्ला बनवायचं असं त्यांनी ठरवलं . त्यासाठी त्यांना मोठं मोठी दगडं, विटा, माती आणि खराब पोती लागणार होती. सगळं साहित्य गोळा करायला चौघही सायकल घेवून बाहेर पडले. माती आणि पोती तर मिळाली पण संध्याकाळ होत आली तरी दगडं, विटा काही मिळत नव्हत्या. बराच दूर फिरत गेल्यावर एका पडक्या वाड्यापाशी त्यांना विटा आणि दगडं दिसली. त्यांनी सायकल बाजूला लावली. तेवढ्यात तिथे एक म्हातारे आजोबा आले आणि त्यांना ओरडू लागले,” अरे पोरांनो, इकडे काय करता ? हा वाडा झपाटलेला आहे. इथं भुतांच राज्य आहे. इकडे कोणी फिरकत नाही. कशाला उगाच पिडा मागे लावून घेता . निघा इथंन”.

भुताचं नाव ऐकल्यावर चौघांनीही पळ काढला. भीती वाटत असली तरी  त्यांना त्या वाड्याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. घरी आल्यावर मात्र त्यांनी त्या वाड्याबद्दल  चौकशी करायला सुरुवात केली. मोठ्या मुलांनी त्यांना सांगितलं की,” काही वर्षांपूर्वी तिथे एक श्रीमंत कुटुंब रहात होते. एक दिवस अचानक सगळ्यांची कोणीतरी हत्या केली . का केली? कोणी केली ? त्याचा शोध अद्याप लागला नाही. तेव्हापासून तिथे जाणाऱ्यांना रात्रीचे चित्र विचित्र भास होतात.    तो वाडा कोणी विकत ही घेत नाही की तिथे कोणी रहायला येत नाही.  त्या कुटुंबातील लोकांचेच भूत तिथे कोणाला येवू देत नसावे. तो वाडा झपाटलेला आहे अशी इथल्या लोकांची खात्री आहे. तुम्ही सुद्धा चुकूनही तिकडे फिरकू नका.” हे ऐकल्यावर त्यांनी ही तो विषय तिथेच सोडून दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा किल्ला बनवायला घेतला तेव्हा त्यांना त्या वाड्याची पुन्हा आठवण झाली. पिंटू बोलून गेलाच ” दिवसाच्या उजेडात अंगणात पडलेल्या विटा आणायला काय हरकत आहे .” सोन्याला अजूनही त्या वाड्याची भीती वाटत होती. चंप्या त्या वाड्यापर्यंत यायला तयार होता पण फाटकाच्या आत जावून विटा आणायची त्याची तयारी नव्हती. शेवटी डिंकूने आणि पिंटूने आत जाऊन विटा आणायची जबाबदारी स्वीकारली . चौघही त्या वाड्यापाशी पोहचले . सोन्या आणि चंप्या बाहेरचं थांबले तर पिंटू आणि डिंकू विटा आणायला आत गेले . दोघांनी पोत्यात पाच सहा विटा भरल्या होत्या तेवढ्यातच कालचेच आजोबा हातात काठी घेवून ओरडत येतांना पिंटूला दिसले . त्याने डिंकूला,” पळ” असं सांगुन धूम ठोकली. डिंकूला विटांचा मोह सोडता येईना त्याने विटांच पोत घेवून पाळायला सुरुवात केली. मागे बघत धावल्यामुळे त्याचा पाय कशात तरी अडकला आणि तो धपकन खाली पडला . तो उठायला गेला तर त्याच्या अंगाखाली त्याला इलेक्ट्रिकची  वायर दिसली. ती नीटपणे जमिनीत लपवल्यासारखी  दिसत होती. मागून आजोबा काठी घेवून येत असल्याने त्याने जास्त विचार न करता विटांच पोत तिथेच टाकून  पाळायला सुरुवात केली. डिंकूच्या कपड्यावरची माती बघून घरचे रागावतील म्हणून थोड्या दूर गेल्यावर ते एका झाडाखाली थांबले . कपडे झटकत असतांना डिंकूच्या डोक्यात मात्र त्याने बघितलेल्या त्या इलेक्ट्रिकच्या वायरचाच विचार सुरू होता. त्याने त्या बद्दल तिघांनाही सांगितलं तेव्हा तिघांनीही त्याची खिल्ली उडवली ,” त्यांनी वाडा बांधला तेव्हाचीच असेल ,  त्यात येवढं विचार करण्यासारखं काही नाही” .  डिंकू मात्र त्याच्या मतावर ठाम होता कारण ती वायर काल परवाच त्याच्या बाबांनी आकशदिव्यासाठी   आणलेल्या वायर सारखीच नवी कोरी दिसत होती.  “जर वायर जुनी असती तर ती जुनाट दिसायला हवी होती आणि वायर नवी असेल तर ? भुताने झपाटलेल्या वाड्यात कोणीच रहात नाही मग ही नवीन वायर तिथे जमिनीत काय करते आहे? ” त्याने तिघांना त्याच्या मनातला प्रश्न विचारलाच . त्यावर पिंटूलाही शंका आली की एरवी तिथे तर कोणीच जात  नाही मग  ते आजोबा  त्या वाड्याची रखवाली का करतात? त्यांनी परत जावून त्या वाड्याचं निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. सोन्या आणि चांप्याही मदतीला तयार होतेच .

सकाळची वेळ असल्याने त्यांनी वाड्यापासून बऱ्याच दूर सायकली उभ्या केल्या आणि पायीच चालत गेले . दाट झाडीनी वेढलेल्या त्या वाड्याला तारेचेच कुंपण होते . वाड्याला सभोवती खूप मोठे आवार होते . एके काळी त्यात सुंदर बाग फुलत असेल याचा अंदाज सहज करता येत होता. वाडाही छोटाच पण टुमदार बांधलेला होता. कोणीच रहात नसल्याने जागो जागी झाडांची मूळ जावून  बऱ्याच ठिकाणी त्याची पडझड झाली होती. सगळीकडे  गवत वाढलेलं दिसत होतं. डिंकूने त्या गवताचं बारकाईने निरीक्षण केले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तारेच्या कुंपणापाशी गवताची उंची खूप आहे त्या मानाने आतल्या बाजूने , वाड्याच्या भोवतीचे गवत उंचीने फारच कमी आहे. पटकन् पाहिले तर जाणवणार नाही पण लक्ष देवून बघितले तर वाड्याच्या भोवतीचा वावर सोपा व्हावा म्हणून मुद्दाम कोणीतरी ते गवत  कापल्यासारखे दिसत होते.

पिंटूही विटा ठेवलेल्या अंगणाचे निरीक्षण करत होता . अंगणात, विटांच्या अवती भोवती तर गवत फार नव्हतेच जणू तिथे माणसांचा वावर असावा. चंप्याच्याही नजरेनं हेरल की विटाही म्हणाव्या तितक्या जुन्या दिसत नाहीत.

सगळ्यांनी जेव्हा आपापली निरीक्षण सांगितली तेव्हा डिंकूने बघितलेले वायर नक्की जाते कुठे याचा शोध घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी छोटी योजना आखली.

चंप्या आणि पिंटूने त्या आजोबांच्या पाळतीवर राहायचं. ते दिसले रे दिसले की जोरात शिट्टी वाजवायची . डिंकू आणि सोन्या त्या वायरपाशी जावून ती जाते कुठे याचा शोध घ्यायचा. लवकरात लवकर निरीक्षण आटपून परत यायचं .

पिंटू आणि चंप्या वाड्याच्या जवळच असलेल्या दोन उंच झाडावर चढून बसले . आता त्यांना वाड्यावर नीट लक्ष ठेवता येणार होत. त्यांनी त्यांच्या जागा घेतल्यावर डिंकू आणि सोन्या त्या वायरचा शोध घ्यायला निघाले. सुदैवाने मागच्या वेळी डिंकूने पळतांना टाकलेले विटांचे पोते अजूनही तिथेच पडलेले होते. डिंकूने तो पडला होता त्या जमिनीवरून हात फिरवला आणि त्याच्या हाताला ती वायर लागली.  त्या वायर मधे विजेचा प्रवाह असला तर शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यावर उपाय म्हणून सोन्याने लगेच एक मोठी जाड जुड काडी हाती घेतली आणि त्या वयारचा माग काढायला सुरुवात केली . ती वायर वाड्याच्या तळघराला जी खिडकी होती तिच्या आत जात होती. त्या खिडकीची काच जिथे फुटलेली होती तिथून डिंकूने आत काय आहे हे बघण्याचा प्रयत्न केला. त्या खोलीच्या कोपऱ्यात पाणी पिण्याचा माठ ठेवलेला होता . त्यावर पेलाही होता. जवळच एक चटई टाकलेली होती. भिंतीवरच्या हुकांना दोन तीन टी शर्ट लटकवलले होते.

त्याच निरीक्षण सुरूच होतं तेवढ्यात शिट्टीचा आवाज आला आणि ते दोघेही कसलाही आवाज न करता माघारी फिरले.

यावेळी ते आजोबांना दिसले नाही कारण आजोबा मागच्या अंगणातून बाहेर आले होते आणि ही दोघं पुढच्या अंगणात होती. आजोबा मागच्या अंगणात कसे आणि कुठून आले ते काही झाडावर बसून लक्ष देणाऱ्या पिंटूला कळले नाही पण सोन्या आणि डिंकू येईपर्यंत आजोबा मागच्याच अंगणातून वाड्याच्या कुंपणा बाहेर पडलेही येवढं त्याने बघितलं.

काय घोळ आहे काही कळत नव्हतं पण भिंतीवर टांगलेल्या टी शर्ट वरून   त्या वाड्यात इतरही लोक राहतात याबद्दल डिंकूची खात्री पटली होती.

जरी ते आजोबा तिथेच रहात असतील तरी त्यांनी आपल्याला विटा घेतांना बघून येवढं चिडण्याची काहीच गरज नव्हती. उलट त्यांनी स्वतःहुन  त्या विटा आपल्याला द्यायला हव्या होत्या. अनेक शंका , प्रश्न त्या चौघांच्या मनात येत होते .

पिंटू अजून झाडावरच होता . सोन्या कंटाळून सायकलकडे जायला निघाला तेव्हा त्याला दुरून तेच आजोबा हातात मोठी पिशवी घेऊन येतांना दिसले. आजोबांचे त्याच्याकडे लक्ष नव्हते . बहुतेक दूरच त्यांना नीट दिसत नसाव. सोन्या लगेच माघारी फिरला. तिघांनाही सावध केलं. पिंटू झाडावरच लपला तर तिघेही जवळच्याच झाडीत लपून बसले . आजोबांचं झाडाखालीच असलेल्या त्यांच्या सायकलिकडे ही लक्ष गेलं नाही . ते आपल्याच धुंदीत पुढे चालत गेले . डिंकूने तेवढ्यात ही त्यांच्या पिशवी वरचे ” शिवसागर हॉटेल ”  हे  नाव वाचले . आता वाड्यात जावून यापेक्षा जास्त शोध घेणं धोकादायक होत. म्हणून त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला.

घरी जाण्याच्या रस्त्यावरच ‘शिवसागर हॉटेल ‘ होत. डिंकूला त्या हॉटेल मधे जावून चौकशी करण्याची इच्छा झाली. चौकशी करण्यात जर हॉटेल मालकाला शंका आली तरी घोटाळा होवून त्या वाड्यात राहणारी लोकं सावध झाली असती. त्यावर उपाय म्हणून चंप्याने सकाळीच आईने आगरबत्तीचा पुडा आणायला म्हणून दिलेली स्वतः जवळची ५० रुपयाची नोट काढली आणि  सुचवलं की ,” चौकशी करण्यापेक्षा आपल्याला त्या आजोबांच्या हातातले खाली पडलेले हे ५० रुपये  परत करायचे आहेत असं सांगू”.  हि कल्पना सगळ्यांनाच आवडली. ठरल्या प्रमाणे ते आत गेले . काउंटर वर बसलेल्या माणसाला विचारलं ,” आता एक आजोबा इथून पार्सल घेवून गेले ते कुठे भेटतील? ” त्यावर तो माणूस म्हणाला,” तुमचं त्यांच्याकडे काय काम आहे? ” त्यावर सोन्या म्हणाला ,” मघाशी त्यांच्या हातातून  हे ५० रुपये खाली पडलेल तेच परत द्यायचे आहेत त्यांना “. त्यावर तो माणूस जरा वैतागुनच बोलला,” ते आजोबा?? …..  .. जे रोज चार जणांच दोन वेळच जेवण पार्सल नेतात ते ??? तुम्हाला नक्की तेच हवे आहेत का??  ते कुठून येतात काय माहित नाही.  ते कधीच फार  बोलत नाही . आले की ठरलेलं पार्सल घेतात आणि निघून जातात  ” यावर चौघांनी एकमेकांकडे सूचक नजरेनं बघितलं . पिंटू म्हणाला ,” आता हे पैसे त्यांना परत कसे करायचे ? ” त्यावर तो माणूस म्हणाला ,” पैसे परत द्यायचेच असले तर उद्या याच वेळी इथे या , इथेच भेटतील ते तुम्हाला ” .

चौघांनीही त्या माणसाचे आभार मानले आणि त्या हॉटेल मधून बाहेर पडले.

मिळालेली माहिती पुरेशी नव्हती पण शंका येण्यासारखीच होती. भुकेची वेळ होवून गेली होती आणि सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे चौघांनीही आता कडकडून भूक लागली होती . कशाचाही विचार न करता त्यांनी घरची वाट धरली.

घरी उशिरा गेल्यामुळे चौघांनाही ओरडा खावा लागला. जेवल्यावर सुट्टीचा गृहपाठ करण्याच्या निमित्ताने  चौघं  पुन्हा एकत्र जमलीच. पिंटूच्या घरी सगळे जमले होते आणि पिंटूचा मामा त्यांना गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करत होता.

किल्ला बनवण्यावरच लक्ष तर केव्हाच उडून गेलं होत. आता तर त्यांचं आभ्यासातही लक्ष लागत नव्हतं.  डोक्यात फक्त त्या वाड्याचेच विचार सुरू होते.

त्यांचं गृहपाठ करण्यात मुळीच लक्ष नाही हे मामाच्या चटकन् लक्षात आलं. त्याने खूपदा विचारल्यावर चौघांनाही रहावलं नाही . मामाकडून मदत करण्याचं वचन घेतल्यावरच त्यांनी सगळी हकीकत मामला सांगितली. ती माहिती ऐकुन मामालाही शंका आली. त्याने “आपण हे सगळं पोलिसांना सांगायला हवं . जे काही असेल ते शोधण्याचं काम त्यांचं आहे. तुमचे वय बघता यात तुम्ही जास्त सहभाग घेणं धोक्याचाच आहे” असं समजावून सांगितलं.

त्यांना अभ्यासाला बसवून मामा मात्र घराबाहेर पडला. घरा जवळच्याच चौकीत त्याचा मित्र पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काल परवाच रुजू झाला होता. त्याच्या भेटीच निमित्त करून मामा चौकीत गेला आणि बोलता बोलता मुलांनी सांगितलेली हकीकत त्यालाही सांगितली. त्याच्या मित्रालाही अनेक प्रश्न पडले पण त्या सगळ्यांची उत्तर त्या वाड्यातच मिळणार होती म्हणून या प्रकरणाचा छडा लावण्याच त्याने मामाजवळ कबुल केलं.

मामा आणि त्याचा पोलीस मित्र त्या वाड्यात नक्की काय चालतं हे शोधून घेतील याची खात्री असल्याने पोरांनीही पुन्हा तो विषय काढला नाही.

चारच दिवसात मामाचा पोलीस मित्र पिंटूच्या घरी मोठा तयार किल्ला, त्यावर ठेवायचे मावळे आणि इतर  सजवायचे सामान घेवून हजर झाला . सोबत चॉकलेट्स चा मोठा डबाही आणला होता. सोन्या, चंप्या आणि डिंकूच्या आई वडिलांनाही पिंटूच्या  घरी बोलावून घेतले.

सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तेव्हा त्याने सांगायला सुरुवात केली,” मामाने सांगितल्यावर आम्ही लगेच साध्या कपड्यातला एक हवालदार त्या वाड्याच्या पाळतीवर ठेवला. एरवी दिवसा लक्षात येणार नाही पण पाळत ठेवल्यामुळे रात्रीच्या वेळी तिथे संशयास्पद हालचाली जाणवल्या.

दुसऱ्या दिवशी  त्या आजोबांवर लक्ष ठेवलं ,” तर त्यांनी बाजारात बरीच खरेदी केली .  शिव सागर हॉटेल वाल्याला ही बिलासाठी  २००० ची नोट दिली. तेव्हा या गरीब दिसणाऱ्या म्हाताऱ्या कडे येवढे पैसे आले कुठून? याची शंका आली. आम्ही त्याचा पाठलाग केला तर वाड्याच्या मागच्या भागात एक भुयारी रस्ता सापडला . वाड्याच्या तळघरात ते रात्रीचे झोपतात आणि दिवसा त्या तळघराखालीच त्यांनी नकली नोटा छापण्याचा छोटासा कारखाना चालवतात. पावसाळ्यात त्या खोलीला खूप ओल येवुन छापलेल्या नोटा खराब होत होत्या म्हणून त्यांनी त्या खोली च्या भितींना विटा आणि सिमेंटने पक्क केलं होतं. म्हणूनच चंप्याला जाणवलं त्याप्रमाणे विटा फार जुन्या नव्हत्या.

त्या खोलीला एकही खिडकी नाही म्हणून त्या खोलीत उजेडाची आणि हवेची सोय करता यावी यासाठी त्यांनी डिंकूला दिसलेली इलेक्ट्रिकची वायर घेतली होती . आठ दिवसा पूर्वीच्या पावसात  जुनी वायर तुटली म्हणून   तिथे नवीन वायर टाकली होती आणि नेमकी त्या वायरच नवे पणच डिंकूने हेरल होत आणि सोन्याने हातात काठी घेतली तेही उत्तम केलं कारण तिच्यात विद्युत प्रवाह सुरू होताच.

पिंटू ला जाणवलं तस  अंगणातली विटांच्या अवती भवती गवत नव्हतं कारण रात्रीच्या वेळी हवेशीर बसण्यासाठी , पाय मोकळे करण्यासाठी त्याच जागेचा वापर केला जात होता.

चौघांनी हिंमत दाखवून जी माहिती मिळवली आणि आम्हाला दिली त्यामुळेच आम्ही अनेक दिवस झाले ज्या कुख्यात गुन्हेगारांना शोधत होतो ती चौघही त्या वाड्याच्या तळघरात नकली नोटा छापताना आम्ही रंगे हाथ पकडू शकलो. मुख्य म्हणजे याच गुन्हेगारांनी काही वर्षांपूर्वी याच वाड्यावर दरोडा टाकला होता. त्यातच त्या घरातल्या सगळ्यांची हत्या केली होती. तेव्हाही ते आमच्या हाती लागले नव्हते आणि गेली चार वर्षे तर ते याच वाड्यात लपून बसले होते. पोलिस त्यांचा शोध त्यांनी दरोडा टाकलेल्या वाड्यात घेणार नाही अशी त्यांची खात्री होती. ती बऱ्याच अंशी खरी ही निघाली. तिथे हत्या झाल्यामुळे कोणीच रहायला येत नव्हतं याचाच फायदा या गुन्हेगारांनी करून घेतला .  बाहेरची काम करण्यासाठी आणि हा वाडा झपाटलेला आहे हे येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगण्यासाठी च त्या आजोबांना त्यांनी ठेवून घेतल होत. इत का मोठा गुन्हा केवळ  या चौघांच्या बहादुरिनेच उघडकीस आला म्हणूनच मुलांसाठी ही छोटीशी प्रेमाची आणि कौतुकाची भेट . हा किल्ला आणि चॉकलेट्स खास तुमच्यासाठी  ” म्हणत त्याने आणलेलं बक्षिस मुलांना दिले. ” एवढंच नाही तर यावर्षी २६ जानेवारीला या चौघांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल आमच्या डिपार्टमेंट तर्फे त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. त्यांच्या या किल्ला बनवण्याच्या धडपडीची कथा ऐकून डिपार्टमेंट मधे तर या चौघांना ‘ धाडसी किल्लेदार’ असच म्हणतात आहे सगळे ” असं म्हणून त्यांनी त्या सत्कारा संबधीच एक एक  पत्र चौघांच्याही आई वडिलांना दिलं.

आई वडिलांना तर आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मुलांचा आणि त्यांच्या मित्रांचा अभिमानही वाटला. यंदा भारी किल्ला बनवता आला नाही म्हणून चौघं जरा नाराजच  होती पण आता कळलेल्या माहितीने त्यांचे चेहरे उजळून निघाले.

तयार किल्ला सजवून का होईना यंदाची त्यांची दिवाळी नेहमीपेक्षा ही दणक्यात साजरी झाली. किल्ला बनवण्याच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यात एका धाडसाने प्रवेश केला होता म्हणून आता सगळे त्या चौघांना “धाडसी किल्लेदार ” अशी नवीन ओळख मिळाली होती.

©️ अंजली मीनानाथ धस्के

( सदर कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या अधीन असून लेखिकेच्या नावा विना कथा इतर कुठेही प्रकाशित केलेली आढळ्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. )

वयोगट (दोन्ही)

इयत्ता पाचवी ते ईयत्ता  सातवी

इयत्ता आठवी ते ईयत्ता दहावी

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा