नंदिता❤ #जनरेशन_गॅप

Written by

” काय चाललंय माय लेकीचं देव जाणे !…आमच्या वेळी असं नव्हतं बाबा !!! सोवळं ओवळ पाळायला नको , कुठलं सोयरसुतकच उरलं नाही या दोघीनां…शिक्षण आणि सुधारलेल्याच्या नावाखाली मनमानी कारभार चाललंय नुसता…देवधर्म सगळं वेशीला नेऊन टांगलाय…पण मी निक्षून सांगते सगळ्यांना माझा घरात हे चालणार नाही…”
सुमतीबाईंचा संताप वाढतच चालला होता…

” साक्षी ” सुमतीबाईंची नात तिला काल पहिल्यांदा मासिकपाळी आली होती , आणि हे जेंव्हा त्यांना समजलं होतं तेंव्हापासून त्या त्रागा करून घेत होत्या…काल पासून त्यांची अशीच बडबड चालली होती…

” नंदिता ” साक्षीची आई ती अगदी सोयीस्करपणे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होती…आणि हेच सुमतीबाईंना खटकत होत…काल पर्यंत त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानणारी , त्यांच्या विचाराने चालणारी , नंदिता आज त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होती…

” लेक न्हातीधुती झाली तर तिला बाजूला बसवायचं सोडून काहीतरीच चाललंय हीच…सगळं घर विटाळून टाकलं… आता देव घरात प्रवेश करून माझा देव बाटवू नकोस म्हणजे झालं…घराण्याच्या सगळ्या चालीरीती विसरलेल्या दिसतायत मायलेकी…” नंदिता त्यांना काहीच प्रतिसाद देत नाही बघून त्या जास्तच भडकल्या…

आता मात्र नंदिताच्या सहनशक्तीचा अंत होत चालला होता…

” असा कसा तुमचा देव लगेच बाटतो , आई !!! अहो माझं लेकरू गांगरून गेलंय , तिच्यात अनेक शारीरिक बदल घडतायत , तिच्या मनात नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण झालेत , तिला समजून तिच्या मनातील घालमेल कमी करायची आहे…तिच्या स्पर्शाने घर नाही विटाळलं , आई !!! आपले विचार विटाळलेले आहेत…” नंदिता पहिल्यांदा सासूबाईंच्या विरोधात बोलत होती…

” अगं काय बोलतेयस तू हे , इतक्या वर्षांच्या चालीरीती जुने विचार सगळं चुकीचं आणि तुम्ही करता ते योग्य , आणि तूही इतकी वर्ष हेच करत आलीस की ”

“अहो आई !!! मी तुम्हाला चुकीचं म्हणत नाही , बरोबर आहे इतकी वर्ष मीही हेच करत आले कारण माझ्या आईबाबांनी दिलेले संस्कार त्यांनी लग्न होताना सांगितलेलं मला मोठ्यांच्या शब्दांना मान द्यायचा , त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही मग त्यांच्या गोष्टी तुम्हाला पटो अथवा नाही…पण आता बसं आई इतकी वर्ष मी गुमान तुमचं ऐकत आले तुम्ही म्हणाल ते करत आले…तुम्ही बोलालं ते ब्रह्मवाक्य मानत आले मी , पण आता प्रश्न माझ्या लेकीचा आहे…”

संस्काराच्या नावाखाली चुकीचे विचार तिच्या मनात नाही रुजवायचे मला…अहो आई एकदा डोळसपणे बघा या गोष्टींकडे…विचार करा…” नंदिता पोटतीडकीने सासूला समजावण्याचा प्रयत्न करीत होती…

” म्हणजे आमचे संस्कार चुकीचे , अगं तुम्ही दोघीनीं जे चालवलय ना त्याने पाप लागेल…सुमतीबाई आपला हेका सोडायला तयार नव्हत्या…

” अहो चांगली कर्म म्हणजेच पुण्य आणि वाईट कर्म म्हणजेच पाप या पलीकडे काही नसतं , आई !!!…

” अहो मासिकपाळी ही निसर्गाने किंवा तुमच्या देवाने दिलेली अनमोल देणगी आहे , आणि हे दान देवाने फक्त स्रीजातीलाच दिलयं , आणि देवाने दिलेल्या ह्या दानाचा आपल्याला सन्मान नको का करायला ? ह्यामुळेच तर आपण आईपणाच सुख भोगतोय ना !!! हिच्यामुळेचं तर स्त्रीला पूर्णत्व आहे , आई !!! ”

” ज्या रक्ताला तुम्ही अशुद्ध मानता ना , आई !!! आणि ज्याच्यामुळे तुमचा देव बाटतो त्याच रक्तातुन गर्भ तयार होतो , एक जीव नवीन आकार घेतो , वाढतो , त्याला पोषण देखील त्याचा रक्तातून भेटतं , एक नवीन जीव या जगात जन्माला येतो…तो जीव सुद्धा अशुद्धच मानावा का ? पण नाही आपण त्याचं स्वागत मोठ्या आनंदाने करतो , मोठ्या जल्लोषात करतो , हे अस का ? आई !!!…”

नंदिताच्या प्रश्नाचं उत्तर सुमतीबाईंकडे नव्हतं…

” अगं पिढ्यानपिढ्या चालत आलेले संस्कार आहेत हे वाढवडिलांनी घालून दिलेले नियम ते कसे तोडायचे…मग कितीही त्रास झाला तरी ते पाळावेच लागतात…” सुमतीबाईंना नंदिताच म्हणणं थोडं थोडं पटत होत पण त्या ते मानायला तयार नव्हत्या…

” म्हणजे आई तुम्ही मान्य करता ना की त्रास होतो , तुम्हाला ही झाला असेलच तुमच्या काळात…मग ज्या गोष्टी त्रासदायक आहेत त्या बदलायला नकोत का ? जे आपण भोगलं किंवा जे मागच्या पिढीनं भोगलं असेल ते जसेच्या तसे नवीन पिढीवर लादणे योग्य आहे का ? बदलत्या काळानुसार आपण ही थोडं बदललं तर , नवीन विचार स्वीकारले तर येणारी नवीन पिढी नक्कीच सुदृढ असेल…”

एक आई आपल्या लेकीसाठी तिच्या भविष्यासाठी जुने विचार , जुन्या परंपरा , जुनी कर्मकांड यांना फाटा देऊन जुनी पिढी आणि येणारी नवीन पिढी यातील अंतर कमी करून दोघांना जोडणारा दुवा होऊ पाहत होती…

सुमतीबाईंना देखील तीच म्हणणं पटल होतं , शेवटी त्या ही एक स्त्री होत्या आणि जे काही आता नंदिता बोलली होती ते विचार त्यांच्या मनात आत खोल कुठेतरी दडलेले होतेच…फक्त संस्कार , चालीरीती , कर्मकांडांची झापड त्यांच्या डोळ्यावर पडली होती…ती हटवण्याच काम नंदिताने केलं होत…

इतका वेळ आई आणि आजीचं बोलणं ऐकत चुपचाप बसलेल्या साक्षीला शेवटी सुमतीबाईंनीं आवाज दिला आणि म्हणाल्या ” काय ग छकुले , आज आजीला देवपूजेत मदत नाही करायची का ? चल माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये …” आणि त्या नंदिता कडे पाहून गोड हसल्या…

नंदिताच्या डोळ्यात पाणी तरळलं…❤

जुनी पिढी आणि येणारी नवीन पिढी यातील अंतर कमी करणारा दुवा ठरली होती आजची पिढी…🙏

©® सुनीता मधुकर पाटील.

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा