नकार

Written by

नकार

कर्ली गावात एका झोपडीत रामू व त्याची घरवाली एका बांबूच्या झोपडीत रहात होती.त्यांना एक लहान मुलगा होता,प्रकाश नावाचा.त्या दोघांचं सारं विश्वच जणू प्रकाश होता.प्रकाशच्या बाललीलांनी ती झोपडी व्यापून जाई.त्याचे ते बोबडे बोल,छुमछुम वाजणारे पायातले वाळे..खरंच याहून दुसरं सुख ते काय!
रामूची स्वतःची शेती नव्हती म्हणून तो मजुरीसाठी सावकाराच्या शेतात जाई.झोपडीच्या अवतीभवती रामूची घरवाली, जानकी भेंडी,गवार,घेवडा,पालेभाज्या लावी व आठवड्याच्या बाजारात जाऊन विके.एकंदरीत ते कुटुंब खाऊनपिऊन सुखी होतं.
पण..पण त्यांचं हे सुख सावकाराला बघवेना.तो रामूच्या नावे कर्जाची मोठी रक्कम दाखवून त्याला छळू लागला.रामूच्या वडिलांनी थोडं कर्ज सावकाराकडून घेतलेलं पण ते एवढंही नव्हतं.अशिक्षित रामूला सावकाराची लबाडी लक्षात येत होती पण तो हतबल होता.सावकाराविरुद्ध जाण्याची त्याची हिंमत नव्हती.
असंच एकदा रामू सावकाराचं खळं करत होता.सावकाराने त्याला साद घातली..रामू धावत गेला व सावकारापुढे उभा राहिला. सावकार म्हणाला,”राम्या,मी तुझं कर्ज माफ करेन ..पण तु तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठवीत जा.”हे शब्द आगीत तेल ओतावे तसे रामूच्या कानात घुसले व डोळ्याचे पापणे लवते न लवते तोच रामूने सावकाराच्या श्रीमुखात एक सणसणीत लगावली.आजुबाजूला बरेच गावकरी बसल्याने,सर्वांसमोर झालेला हा अपमान सावकाराच्या
जिव्हारी लागला.

रामू तिथून झपझप पावलं टाकीत घराकडे निघाला.रखमाला म्हणाला,”रखमे,आपण हे गाव पहाटेच सोडायचं.लांब कुठंतरी जाऊ.”
रखमा म्हणाली,”असं झालं तरी काय?”..पण रामू एकटक छताकडे बघत राहिला.जेवूनखाऊन तिघंही झोपी गेले.
इकडे सावकाराने त्याचा डाव साधला.त्याने गड्याला घासलेट,काडेपेटी घेऊन रामूच्या झोपडीकडे पाठविले.गड्याने झोपडीजवळ येताच तिथली गवताची पेंडी घेतली.तिच्यावर घासलेट ओतलं व पेटवलेली पेंडी झोपडीच्या दिशेने भिरकावली.झोपडीने पेट घेतला.गडी मागच्यामागे पसार झाला.आजुबाजूची लोकं धावत गेली..बदाबदा पाणी ओतू लागली.प्रकाशच्या आईने लहानग्या प्रकाशला बाहेरील एका माणसाकडे फेकलं.झोपडीचं छत मोडलं व त्या नवराबायकोवर पडलं..दोघंही आगीत भस्मसात झाली.एवढासा प्रकाश हे आगीच तांडव डोळे न मिटता पहात होता.आगेचे लोटच्या लोट निघत होते.

दिवस वगैरे झाल्यावर प्रकाशचे मामा त्याला त्यांच्या घरी घेऊन गेले.मामीच्या दोन मुली होत्या.त्यात प्रकाशची भर पडली.प्रकाशचा मामा कामावर गेला की त्याची मामी त्याच्याकडून भांडी घासून घेई,लादी पुसून घेई.त्याला किराणा आणायला सांगे मात्र जेवण अगदी थोडसंच देत असे.प्रकाश हे सारं सहन करायचा.रात्री आईवडलांची आठवण काढून पांघरुणात खूप रडायचा.

प्रकाश आठवीत होता तेंव्हा त्याच्या मामीने मामाच्या खिशातले पैसे गुपचूप प्रकाशच्या दप्तरात ठेवले व मामाच्या नजरेत प्रकाशला खाली पाडले. हा चोरीचा आळ मात्र प्रकाशच्या जिव्हारी लागला.एके रात्री त्याने मामाचं घर सोडलं.हायवेवर आला.तिथे काही ट्रक उभे होते.सरदारजी बाजूच्या धाब्यावर जेवायला बसले होते.
प्रकाश गुपचूप एका ट्रकच्या मागील भागात जाऊन बसला.सरदारजीने खाणं झालं तसा ट्रक सुरु केला.
गाणं लागलं होतं,’मैं निकला ओ गड्डी लेके,रस्तेपे ओ सडक पे एक मोड आया मैं उथे दिल छोड आया..’
सरदारजीने गाण्याबरोबर ताल धरलेला.गार वारा वहात होता.प्रकाश तिथेच अंगाच मुटकूळं करुन निजला.

सकाळी सामान उतरवताना सरदारजीला प्रकाश दिसला.त्याने प्रकाशला म्हंटले,”ओय पुतर उठ जा”
प्रकाश उठला पण सरदारजीला बघून घाबरला.सरदारजीने त्याला तोंड धुवायला लावले व त्याला जवळच्या दुकानात पुरीभाजी व लस्सी खाऊ घातली.पोटाला ऊब मिळाल्यावर प्रकाशला थोडं बरं वाटलं.त्याचा धीर चेपला.प्रकाशने सरदारजीला त्याची कहाणी सांगितली.सरदारजीला फार वाईट वाटले.त्याने प्रकाशला आपल्या घरी नेले असते पण वयाची पन्नाशी उलटली तरी तो अविवाहित होता.मग सरदारजीने हॉटेलवाल्या अण्णाला त्याची कहाणी सांगितली व त्याला तिथे राहू देण्याची विनंती केली.अण्णा आनंदाने तयार झाला.

टेबल पुसणे,पाणी देणे, ऑर्डर घेणे ,पदार्थ वाढणे अशी कामे प्रकाश करु लागला. थोड्याच दिवसांत प्रकाशने हॉटेलमालकाचा विश्वास संपादित केला.तो इतर मुलांबरोबर भटारखान्यात निजे, शाळेची पुस्तके आणून दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करी.
हॉटेलमालकाच्या ध्यानात त्याची अभ्यासाची आवड आली.त्याने पक्याला रात्रशाळेत प्रवेश मिळवून दिला.पक्याने मन लावून सलग दोन वर्ष अभ्यास केला व उत्तम गुणांनी दहावी पास झाला.
प्रकाशच्या लाघवी स्वभावामुळे मालकाचा पक्यावर जास्तच जीव बसला होता.त्याने प्रकाशला सकाळच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला.

प्रकाश दुपारी कॉलेजमधून आला की हॉटेलात काम करी.कॉलेजमध्ये तर तो शिपायांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांचा लाडका होता.कॉलेजमध्ये प्रकाश अभ्यासासोबत विविध खेळांमध्येही अग्रेसर होता.रोज डे ला बरीच लाल गुलाबं मिळत त्याला.अण्णा मग त्याला ‘गोपिकांचा कान्हा’ असं बोलून चिडवे.प्रकाशच्या कॉलेजमध्ये कुसुम नावाची मुलगी होती . ती त्याला फार आवडे. कुसुम प्रकाशपेक्षा दोन वर्ष ज्युनियर होती.प्रकाशचे वक्तृत्व तुफान होते.कॉलेजमध्ये विविध वक्तृत्व, कथाकथन,एकांकिका स्पर्धांत तो भाग घेई.अशाच एका एकांकिका स्पर्धेदरम्यान त्या दोघांची ओळख झाली.कुसुमचा फुलपाखरासारखा हसरा ,अल्लड स्वभाव त्याला आवडू लागला.ती त्याच्या स्वप्नांची राणी बनली.रोज रात्री त्याच्या स्वप्नांत येऊ लागली.मैत्रीला प्रेमाचे कोंदण बसू पहात होते.त्याने हॉटेलमालक अण्णाला सारे सांगितले.अण्णा म्हणाला,”प्रकाश तिला विचार.उशीर करु नकोस.”

एकेदिवशी कॉलेजमध्ये प्रकाशने,कुसुमला शेवटचा पिरिअड बंक मारुन जवळच्या बागेत ये म्हणून सांगितलं..कुसुम बागेत गेली,तेंव्हा प्रकाश तिथे बसला होता.कुसुम त्याच्याशेजारी जाऊन बसली व त्याला बंक मारण्याचं कारण विचारु लागली.प्रकाशने तिच्याजवळ आपलं मन मोकळं केलं व त्याच्या आईची एकमेव आठव, मोतियाची नथ तिला देत म्हंटलं,कुसुम माझ्या संसाराची राणी होशील का?कुसुम जोरजोरात हसली,म्हणाली,”अगदीच हा कसा रे प्रकाश तु.असं लगेच कोण विचारतं का? अन् अंगठी देऊन,गुलाबाचं फुल देऊन मुलीला मागणी घालतात.”
प्रकाश म्हणाला,” मी हा असाच आहे.अन् नथीचं म्हणालीस तर..मी पाहिलंय जळताना माझ्या आईवडलांना ,माझं अख्खं घर जळत होतं.ही नथ मात्र आईच्या पेटीत शाबूत राहिली.या नथीमागे माझ्या भावना आहेत.”कुसुमने त्या नथीचा स्वीकार केला.पुढचे बोलणे डोळ्यांनीच झाले.दुसऱ्या दिवशीही शेवटचे लेक्चर बंक..
दोघं बागेत झाडाखाली..आज प्रकाशने कुसुमसाठी अबोलीचा वळेसर आणलेला..त्याची आई माळायची तसा..पुरुष प्रेमात पडला की प्रेयसीमध्ये कुठेतरी आपली आई शोधत असतो..प्रकाशची आई त्याला सोडून गेल्याने त्याचं ते आईपण शोधणं थोडं अधिक होतं..कुसुमच्या वेणीत प्रकाशने तो वळेसर माळला व तिला निरखून पाहू लागला..असेच दोघे फिरत राहिले.कधी समुद्रकिनारी हातात हात घालून फिरत..तर कधी समुद्राकडे एकटक पहात ..सुंदर भविष्याची स्वप्ने रेखाटत ..

एकदा अकाऊंट्सच्या तासिकेला वर्गात एक गोरापान उंच,भरदार शरीरयष्टीचा तरुण शिक्षक आला.मोहन नाव होतं सरांच.बघताक्षणी सगळ्या मुली मोहित व्हाव्यात असं देखणं व्यक्तिमत्त्व.सरांनी मुलांना आपली ओळख करुन दिली व शिकवू लागला.प्रभावशाली वक्तृत्व.. विषयावर प्रभुत्व.. मधुनच हलकेफुलके विनोद..त्याच्या तरुणपणीचे किस्से..तासिका कशी संपली कळलेच नाही..

दुसऱ्यादिवशीही तसेच.मोहन सरांच्या तासिकेला नो बंक..शंभर टक्के उपस्थिती..सर बरेच अनुभव जिवंत करुन सांगायचे.मुलं गपगार होऊन ऐकत बसायची..मुलं सरांच्या घरी ट्युशनला जाऊ लागली.कुसुमनेही ट्युशन लावली.शेवटचं मोहन सरांच लेक्चरही बंक मारेनाशी झाली..हळूहळू कुसुम मोहन सरांच्या जवळ जाऊ लागली..महिन्याभरात तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराची जागा प्रकाशऐवजी मोहन सरांनी घेतली..जरा अधिकच नटूनथटून ट्युशनला जावू लागली..तिचं सौंदर्य होतचं मादक..मोहन सरांनाही तिने भुरळ घातली..मोहन सर कुसुमची स्पेशल शिकवणी घेऊ लागले..

ही गोष्ट उडत उडत प्रकाशच्या कानावर गेली.त्याने एकदा कुसुमला समुद्रकिनारी बोलावलं..कुसुम गेली पण सोबत मोहन सरांना घेऊन..कुसुमने प्रकाशने तिला दिलेली नथ त्याला परत केली व तिने त्याला सांगितलं की तिचं आत्ता फक्त मोहनवर प्रेम आहे.पाठमोऱ्या त्या जोडीकडे प्रकाश भरल्या डोळ्यांनी पहात राहिला..त्याने वाळूत बांधलेला किल्ला कुसुमने लाथाडला होता.प्रेमाच्या आणाभाकांचं निर्माल्य झालं होतं.वाळूत कोरलेली नावं पुसून गेली होती.

प्रकाशने अण्णाला सारं सांगितलं व त्याच्या मिठीत प्रकाश हमसाहमशी रडला.अण्णालाही फार वाईट वाटलं.मनात म्हणाला बिचाऱ्या पोराच्या नशिबी प्रेम नाही..प्रकाशने स्वतःला पुस्तकांत झोकून दिलं.पुस्तकांच एक बरं असतं.ती कधीही दगा देत नाहीत.विश्वासघात करीत नाहीत.हवी तेंव्हा उपलब्ध असतात.प्रकाश पदवीपरीक्षा पास झाला..आत्ता अण्णाने हॉटेलची जवाबदारी त्याच्यावर सोपवली.अण्णाचही वय झालं होतं.त्याच्या मुलाला या धंद्यात आवड नव्हती.मोटरसायकली उडवणे,वडलांच्या कमाईच्या पैशात ऐश करणे यातच धन्यता मानायचा.

प्रकाशने मात्र संधीचं सोनं केलं.प्रकाश गिऱ्हाईकांना अगदी मायेने जेवण वाढी.त्याने हॉटेलचा चेहरामोहरा बदलला.ठिकठिकाणी फुलांच्या कुंड्या .धबधब्याच्या लहान डिझाइनस लावल्या.रंगीबेरंगी माशांचा मोठा टेंक ठेवला.

खास मराठी पदार्थ ठेवले.नाश्त्याला खमंग भाजणीचं थालिपीठ,घावणघाटले,शिरापुरी,भजीपाव..जेवणात चटकदार चटण्या,मसालेभात,रुचकर भाज्या,वाफाळलेला वरणभात वरती साजुक तुपाची धार अन् चविष्ट आमट्या जोडीला विविध कोशिंबीरींची जत्रा व ठसकेदार मिरचीचा खर्डा,मुरलेलं लोणचं..आलेलं गिर्हाईक अगदी समाधानी होऊन बाहेर पडे.सुट्ट्यांच्या दिवशी तर सहकुटुंब जेवायला जात. प्रकाशने हॉटेलसमोरची मोकळी जागा घेतली व तिथे लांबलचक हॉल बांधला.त्यात लग्नकार्य,डोहाळजेवण,बारसे, मुंज,साठी..अशा अनेक समारंभांच्या ऑर्डरी घेऊ लागला. पन्नासएक माणसांची फौज त्याच्या हातीखाली कामाला होती.मालकाने आत्ता ते हॉटेल त्याला विकले..व त्याच्या लग्नासाठी खटपट करु लागला.

अण्णाची मुलगी पद्मा लग्नाच्या वयाची झाली होती.अण्णाने विचार केला,प्रकाशपेक्षा सालस जावई आपल्याला मिळणार नाही. त्याने प्रकाशला पद्माबद्दल विचारले..प्रकाश अण्णाच्या शब्दाबाहेर नव्हता पण त्याने पद्माला त्याच्या लग्नाआधीच्या गतप्रेमाची कल्पना देऊन ठेवली.पद्माही लग्नाला तयार झाली.
छान थाटामाटात प्रकाश व पद्माचे लग्न झाले.प्रकाशने पद्माला त्याच्या आईची मोतियांची नथ घालायला दिली.तिनेही ती आनंदाने घातली.त्या मोत्याच्या नथीत प्रकाश त्याचं हरवलेलं बालपण शोधी.पद्मानेही त्या नथीतल्या मोत्यांसारखा उजेड प्रकाशच्या जीवनात आणला.त्याच्यावर सुखांची बरसात केली.

त्यांच्या संसाररुपी वेलीवर दोन फुलं फुलली..पार्थ व प्रिया..
प्रकाशचं घर आत्ता छान हसू खेळू लागलं.अण्णा व अण्णांची पत्नी यांना आताशा फार दगदग सहन होत नव्हती व त्यांचा मुलगाही लग्न झाल्यावर वेगळीकडे रहायला गेला होता.म्हणून प्रकाशने त्यांना आग्रहाने आपल्या घरी रहायला लावले.नातवंडांसोबत अण्णांचा वेळ छान जाई.अशीच वर्षे सरत गेली..मुलं मोठी झाली. प्रियाने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला तर पार्थने हॉटेल मेनेजमेंटचा कोर्स पुर्ण केला व वडिलांना व्यवसायात मदत करु लागला.

प्रकाशच्या साठीनिमित्त जंगी सोहळा आयोजित केला होता.साऱ्या नव्या जुन्या गिऱ्हाईकांना आमंत्रण दिलेलं.शहरातल्या महत्त्वाच्या आसामींनाही आमंत्रण दिलं होतं. पार्थ व प्रियाने त्यांच्या मित्रमैत्रिणींनाही बोलावलेलं.निशिगंधा,मोगऱ्याच्या फुलांनी हॉलची सजावट केली होती.वातावरण सुगंधमय झाले होते.
केक कापून झाला.सर्वांनी अभिष्टचिंतन केले.पार्थ व प्रिया आपल्या मित्रमैत्रिणींशी वडिलांचा परिचय करुन देत होते.पार्थ म्हणाला,”पप्पा,हा तन्मय व ही त्याची मम्मा.”
प्रकाशने तन्मयला हस्तांदोलन केले व त्याच्या आईला नमस्कार केला मात्र ..प्रकाशच्या डोक्यात प्रकाश पडला.तो मनानं कॉलेजच्या वयात गेला.प्रकाशसमोर त्याचं पहिलं प्रेम कुसुम उभी राहिली.आत्ता तिच्या चेहऱ्यावरचं तेज पार नाहिसं झालेलं,केस अर्धेअधिक पांढरे झालेले,डोळे खोलवर गेलेले..वयाच्या मानाने जास्तच थकली होती.

मुलं तिथून डांस करायला निघून गेली.हे दोघेच उरले टेबलापाशी.प्रकाश म्हणाला,” जरा लॉनमध्ये चल.”तो पुढे चालू लागला तशी तीही त्याच्यामागे गेली.कारंज्याच्या सभोवताली कठडा बांधला होता तिथे बसली.वेटर कोल्ड ड्रींक घेऊन आला.प्रकाशने घेतलं दोघांसाठी.थंड पेय पिता पिता कुसुम बोलू लागली..”प्रकाश, खूप पुढे निघून गेलास तु.खूप यशस्वी झाला आहेस.मी मात्र कपाळकरंटी..तुला नाकारलं तेंव्हा.त्या मोहनच्या सुंदरतेच्या मुखवट्याला बळी पडले..तुझं प्रेम लाथाडून,आपण वाळूत रेखाटलेली नावं विस्कटून तुझ्या मनाचा क्षणाचाही विचार न करता निघून गेले.तु दिलेली एकमेव प्रितीची निशाणी..ती मोतियाची नथही धुडकावून लावली मी.कसली कुबुद्धी सुचलेली मला.मनोजच्या घाऱ्या डोळ्यांनी गोऱ्या कांतीने ठार वेडं केलं मला.मी तुमच्या दोघांत तुलना केली तेंव्हा सावळ्या वर्णाचा किडकडीत असा तु मला मोहनच्या तुलनेत खुजा वाटला होतास.लग्न झालं आमचं.

प्रकाशच्या आईवडिलांना मी पसंत नव्हते.त्यांची जात उच्च होती म्हणे.चार वर्ष त्याच्या आईचं हगणंमुतणं सारं काढलं मी पण मायेने नाही हो कर्तव्य म्हणून..अरे असा का बघतोयस खरंच सांगते.मला पहिल्यांदा दिवस राहिले तेंव्हा मोहनच्या आईने व मोहनने माझी गर्भजलचिकित्सा करुन घेतली.त्यात मुलगी होती रे माझी.तिचा एका भोंदू डॉक्टराकरवी गळा दाबला रे त्या नराधमांनी.जीव घेतला माझ्या बाळीचा.कुणाला सांगणार होते मी माझी व्यथा.आईवडलांनी दूर केलेलं मला,प्रेमविवाह केला म्हणून.माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लहान बहिणीलाही भोगावी लागली.तिचं लग्न जुळलंच नाही.मोठी बहीण पळून गेली म्हंटल्यावर हिला बघायला स्थळंच येईनात.
दोन वर्षांनी पुन्हा मला दिवस राहिले.माझ्या नकाराला न जुमानता पुन्हा त्या मायलेकरांनी माझी गर्भजलचिकित्सा करुन घेतली.गर्भ मुलाचा होता म्हणून ते बाळ वाचलं.तोच हा माझा मुलगा, तन्मय.पण रुप तुझं घेतलंय बघ.तो होणार होता..तेंव्हा नऊ महिने तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर असायचा. सासुबाई म्हणायच्याही,”पोराने अजिबात बापाचा रंग घेतला नाही की आयशीसारखंही झालं नाही.कुणासारखं दिसतं देव जाणे.” हा सात वर्षांचा होता तेंव्हा गेल्या त्या.मोहनचा क्लास उत्तम चालू आहे.क्लासमधल्या मुलींचे मोहन सर अगदी फेवरेट आहेत.चिरतरुणतेचं वरदानच मिळालंय त्याला जणू.पण माझ्या लेकीचा बळी घेतलाय त्या नराधमांनी. असो माझे भोग आहेत ते.माझ्या कुकर्माची शिक्षा मला देवाने दिली.”

तितक्यात तिथे पद्मा आली.ती मागेच उभी होती.तिने बोलणं ऐकलं या दोघांचं.प्रकाशला कळलेलं, ती आली ते पण पद्मानेच खुणावलं त्याला की कुसुमला बोलूदेत..मोकळं होऊदेत.मोरपिसी रंगाची पैठणी ल्यालेली,मोजकेच दागिने अंगावर घातलेले,कपाळाला ठळकसं कुंकु,टपोरे डोळे व नाकात ..नाकात ती मोतियाची नथ..ती नथ आज कुसुमला,तिने दिलेल्या नकाराला हसत होती.पद्माने कुसुमला आत नेलं व खणानारळाने तिची ओटी भरली.येत जा अधनंमधनं असं प्रेमाने सांगितलं तेंव्हा कुसुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.तिचा कंठ दाटुन आला.✍️ गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत