नात्यांची व्हॅल्यू ठरते तरी कशी….??

Written by
मेघा, माझा कॉल का घेतला नाहीस? कुठे बिझी असतेस ग तू एवढी? मी कधी कुठल्या अर्जंट कामासाठी फोन केला की तू तो उचलतच नाहीस!!
 
अरे, नेमकी त्यावेळी माझी पोळी तव्यावर होती आता ती सोडून कशी येऊ ? 
 
आणि काल? तेव्हाही घेतला नव्हतास?
 
त्यावेळी तुझा फोन वाजला आणि नेमका पोरगा शी आली आली, म्हणून ओरडायला लागला.
मग मला सांग मोहित, मी त्याला बघू की फोनकडे बघू? 
बरं काय काम होतं तुझं एवढं अर्जंट? आत्ता कशाला केला होतास फोन ते सांग?
 
माझ्या फोनचा बॅटरी चार्जर घरी राहिला का बघायचं होतं.
 
हे अर्जंट काम होतं मोहित?
 
मग? मला कळायला नको का, इथे ऑफिसमध्ये नाही, घरी तरी आहे की कुठे हरवला? टेन्शन आलेलं मला.
 
तुला टेन्शन आलं म्हणून तू फोन केलास आणि तू फोन केलास म्हणून मी हातातली काम टाकून तो उचलायचा.
मी काय रिकामीच आहे ना येईल त्याचे फोन घ्यायला?
 
घेतेस कुठे तू मेघा, बघावं तेव्हा नुसता वाजतच राहतो तो.
 
त्यावेळी घेत नसले तरी नंतर कॉल करून विचारते ना, काय झालं? बरेचदा काहीतरी फुटकळच असतं, आणि तुम्हा लोकांचा जीव जात असतो.
 
त्या दिवशी बाबा पण सांगत होते, तू त्यांचाही फोन उचलला नाहीस म्हणून. हे बरोबर नाही मेघा!
 
त्यावेळी नाही उचलला कारण पोरीला शाळेत जायला आधीच उशीर झाला होता, भरभर आवरत होतो आम्ही, आणि नेमका तो फोन वाजला.
नाही उचलला घाईत मी फोन, पण आल्यावर केला की आठवणीने त्यांना कॉल, ते नाही सांगितलं वाटतं तुला?
 
ते सोड ग, वेळेला उचलणं महत्वाचं!!
 
जाऊ दे, कळलं मला मोहित. आणि कशाला केला होता माहिती आहे का, खरंतर ते तुला कॉल लावत होते. तू खूप वेळ उचलला नाहीस, म्हणून त्यांनी मला लावला. तू त्यांचा फोन का उचलत नाही आहेस ते विचारायला? चांगलं पंधरा मिनिटं लेक्चर दिलं मला त्यांनी तुझ्यावरून. 
एकदा फोन केला की ते दहा- पंधरा मिनिटं तरी बोलतच राहतात, मग मी घ्यायचा का तो घाईच्या वेळी, सांग?
 
कारणं देतेस तू मेघा फक्त, लोकं फोन करतात तर तुला त्यांची व्हॅल्यूच नाहीये!!
 
काय आहे ना मोहित, लोकं हल्ली जरा फारच फोन करतात रे. अगदी छोट्यातल्या छोट्या कारणाने सुद्धा.
समोरच्याला गृहीतच धरतात अगदी. मला कधी कधी प्रश्न पडतो हे मोबाईल फोन नव्हते तेव्हा लोकं काय सुखाने जगत नव्हते का? कोणाचं काही अडत होत का त्यावाचून?
नात्यांची व्हॅल्यू नव्हती का तेव्हा कुणाला?
आठवण आली की खुशाली विचारायला पत्र पाठवायचे, अर्जन्सीला तारा ठोकायचे. जवळ राहणारे असतील तर तेवढंच काही महत्वाचं असेल तर घरी येऊन धडकायचे. किती शांत होतं ते जीवन!! उगाच कसलाही डिस्टर्बन्स नाही.
आता सगळे उठसुठ फोन करत बसतात. वरून आपण कुठल्या कामात असलो आणि नाही घेतला तर रागही येतो त्यांना.
त्यातून घरी असणाऱ्या बाईने तर सतत फोन अटेंड करण्यासाठी तत्परच असलं पाहिजे, असंच वाटत असतं सगळ्यांना.
 
हरकत काय आहे मेघा? बरोबरच आहे…..
 
तेच तर ना, एकवेळ बाहेरचे समजून घेतात पण घरचेच समजून घेत नाहीत, घरातच बसलीये आणि फोन घेत नाही म्हणजे काय, इगो दुखावतो लगेच तुमचा, नाही का?
बघ, मी सकाळच्या घाईत असते, एकीकडे स्वैपाक पाणी, एकीकडे पोरांच्या शाळांचं आवरणं, एकीकडे त्यांचा दंगा, त्यांचा ह्या ना त्या कारणावरून चाललेला हट्ट, आणि एकामागोमाग फोन वाजत राहतात, नेमक्या घाईच्या वेळी.
सगळ्यांना माहिती असते माझी सकाळची घाई, तरीही. 
 
कधी माझी आई फोन करते, एकदा उचलला नाही तर पुन्हा दोन वेळा केल्यावर काहीतरी अर्जंट म्हणून उचलावा, तर समोरून उत्तर येतं, काही नाही सहज केला. तसं सहज बोलणं आदल्या रात्रीच झालं असतानाही…….
कधी जाऊबाईंना नेमकी त्याच वेळी कुठलीतरी रेसीपी हवी असते.
कधी सासूबाईना कुठलातरी नंबर हवा असतो. 
कोणाकोणाचे फोन उचलायचे घाईच्या वेळेत ?
काही नाही तर मार्केटिंग कॉल असतातच जीव खायला.
 
म्हणून तू कुठलेच कॉल उचलत नाहीस ना मेघा?
 
नाही घाईच्या वेळी, कशात बिझी असेल तर नाही उचलत मी कॉल.
पण मोकळी झाल्यावर करते नक्की.
मला व्हॅल्यू आहे नात्यांची, पण कधी कधी ही नाती समोरच्याला गृहीत धरून अनावश्यक ताण देतात, त्याचा बरेचदा कंटाळा येतो रे. कुठलीही गोष्ट अती झाली की त्याचं महत्व कमी होतं, म्हणतात ना तसंच झालंय त्या फोनचं.
सतत ह्या ना त्या कारणाने वाजत राहतो म्हणून वैताग येतो, 
कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत होतं, रोज येणाऱ्या पाहुण्याला कुठे कोण एवढं विचारतं?? हो की नाही?
 
मोहितला खरंतर तिचं म्हणणं पटत असतं, कारण खरंतर तोही येणारे सर्वच फोन घेतो असं नाही. बिझी असेल तर कुठलेच घेत नाही, बरेचदा त्यांना परत कॉल करायची तसदीही घेत नाही. पण तरीही तो ते मान्य न करता तिचं सगळं म्हणणं धुडकावून, मी कामाला जातो म्हणून पण घरी असणाऱ्यांना काय हरकत आहे, येईल ते कॉल उचलत बसायला, असं कारण पुढे करतो.
 
काय वाटतं तुम्हाला, खरंच नात्यांंची व्हॅल्यू फोनाफोनी वरून  ठरवायची की अडीअडचणीला हात देण्यावरून??
 
 
©️ स्नेहल अखिला अन्वित
 
फोटो साभार: गुगल

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.