नाही… मला जमणार नाही……

Written by

 

©अर्चना अनंत धवड

मॅडम दोन हजार द्याना उधार… ऑफिस मध्ये आल्या आल्या प्युन नी मागणी केली…. अरे दिले असते रे पण माझ्याकडे सध्या नाहीत….

संध्या तिची मैत्रीण म्हणाली, अग तू कशी काय नाही म्हणू शकते…. मला तर बाई जमतच नाही… माझे याच्याकडे वर्षभरापासून पाच हजार आहे…

अग, मी नाही म्हणायला शिकतेय आता…. हे बघ नाही म्हणणे खुप गरजेचे असते…. नाही म्हणण्याच्या कलेत नैपुण्य मिळविण्याचा मी प्रयत्न करतेय….

माझे बाबा खुप सरळ, साधे होते… कुणीही अडचण सांगितली की पैसे द्यायचे… कित्येक लोकांनी त्यांचे पैसे परत केले नाही…. कित्येक लोकांच्या कर्जावर गॅरंटर म्हणून सही केली आणि बरेचदा त्याचा भुर्दंड बसला…. या अनेक अनुभवातून माझे बाबा फारसे शिकले नाही पण मी मात्र शिकले…. पैशाची मदत करावी परंतु माणूस पाहून एवढे तर मी शिकली……

अग, माझ्या बाबाकडे फोर व्हीलर होती आम्हाला कुठेही जायचे असल्यास आमचे शेजारी म्हणायचे आम्ही पण सोबत येतो… आम्ही चार आणि ती तीन.. खुप अडचण व्हायची….आईची सगळी साडी विस्कटून जायची… बाबांना म्हणायचे तर म्हणायचे.. अग शेजारी आहे नाही कस म्हणायचं……

एकदा मात्र मी म्हटलं, काका खुप अडचण होते… वाटल्यास तुमच्या मुलाला आम्ही सोबत नेतो.. तुम्ही टू व्हीलर नी या…. थोडं वाईट वाटल असेल पण…. ते समजले….. बाबा खूप रागवले हा भाग वेगळा…. पण त्यानंतर ते कधीच सोबत यायचं म्हणाले नाही…. कधी कुणाला स्वतः हुन कळत नाही तेव्हा बोलाव लागत…

लग्न झाले सासरी आले… सासूबाई एकही काम करायच्या नाही… आणि कामवाली बाई पण नाही म्हणायच्या… ह्यांना म्हणायची तर म्हणायचे अग काही दिवस सहन कर…. काही दिवस करता करता सहा महिने झाले…. मग मी मात्र बोलले…

आई, घरची सगळी कामे आणि नोकरी करताना मला त्रास होतोय… आपण बाई लावू या…

त्या नाही म्हणाल्या……

ठीक आहे… पण सगळी कामे जमणार नाही मी फक्त स्वयंपाक करून जाणार…. भांडी धुनी काय करायचं ते बघा…. आठ दहा दिवस बडबड केली. स्वतः काम केले आणि नंतर बाई लावली… तेव्हा वेळीच नाही म्हणणे खुप गरजेचे असते अन्यथा आपल्याला गृहीत धरल्या जाते…

आता ऑफिसचेच बघ… ती रीमा रोज काही ना काही कारण सांगून तीच काम माझ्यावर थोपवायची आणि स्वतः लवकर घरी जायची… सुरवातीला वाटायचं बिचारीची लहान मुलं आहे तेव्हा येत असेल अडचणी… पण नंतर लक्षात आले की ती आपला गैरफायदा घेतेय…. अग, एकदा तर अगदी नवऱ्यासोबत सिनेमाला गेली आणि मला म्हणाली मुलीच्या शाळेत मिटिंग आहे…आणि मी ठरवलं की नाही म्हणायचे…… एकदा स्पष्ट सांगितले… की नाही ग, माझं च काम खुप असत तेव्हा मला नाही जमणार तुझं काम….. थोडा राग आला असेल पण नंतर कधीच तिनी तिचे काम माझ्यावर थोपवले नाही … म्हणजे वेळीच नाही म्हणणे खुप गरजेचे असते…

आपल्याला आपल्या आयुष्यात विविध प्रसंगांत कधी न कधी तरी”नाही”म्हणण्याचे राहून गेले असते. आपले नातेवाईक, शेजार पाजारी समाज काय म्हणेल या भीतीने वेळोवेळी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागत असतात .आणि आपण मनाविरुद्ध त्या गोष्टी करतो..

मन “नाही” म्हणत असेल, तर “हो” म्हणू नका….. नाही म्हणायला शिका

खरं तर नाही म्हणायची सुरवात आपल्या घरातल्या माणसांपासूनच करायला हवी

आपण आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादतो. आपली मुले दहावी झाली कि त्याने डॉक्टर किवा इंजिनियर व्हावे असे वाटते. त्या मुलाच्या आवडीनिवडीचा विचार न करता आपण  आपला निर्णय मुलांवर लादतो . मुलांनी वेळीच नकार दिला तर आपल्या हव्या त्या क्षेत्रात निपुण होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात….

जे गोष्ट शिक्षणाची तीच लग्नाची. मुले उपवर झाली कि त्यांचे लग्न ठरवताना कित्येकदा पालक मुलांच्या मनाचा विचारच करीत नाही. मुलेही नाही म्हणू शकत नाही खास करून मुली… चुकीच्या जोडीदारासोबत आयुष्य घालविणे फार कठीण होते… .हे सर्व वेळीच”नाही”म्हटले तर टाळता येऊ शकत..

तुला बरेचदा असे अनुभव आले असतील..

बँकेत किंवा कोणत्या ऑफिसामध्ये गेलो कि हमखास कोणीतरी पेन मागतो… आपले काम झाले कि गडबडीत ते त्याच्या कडून घ्यायचे राहून जाते किंवा तो तरी आपल्या खिशाला अडकवून लवकर निघून जातो आणि पेन नसल्यामुळे एकतर आपली पंचाईत होते….किंवा महागाचा पेन असला की जीव हळहळतो….. मग वाटत उगीच आपण दिला…. नाही म्हणायला हवं होत…
आपले मित्र, नातेवाईक आपली बाईक किवा कार हक्काने घेवून जातात” आणि पेट्रोल संपवून किंवा ठोकठाक करून आणून देतात… आपल्याला गाडी द्यायची नसते परंतु त्याला वाईट वाटेल…. नाही कसे म्हणायचे म्हणून आपण ती त्याला देतो…

आणि नंतर पश्चाताप करतो की नाही म्हणायला हवं होत…

बऱ्याचदा नवरा बायकोच्या भांडणाचे कारण नवऱ्याचे पार्टीत जाणे, दारू पिणे असत…. पण बरेचदा नवऱ्याला दारू पिणं आवडत नसत तरी … पण मित्राच्या आग्रहास्तव,त्यांना वाईट वाटेल, मित्र काय म्हणतील म्हणुन तो पार्टीत जात असतो.. आणि घरी कलह ओढवून घेत असतो…. किंवा कधी कधी व्यसनाधीन होतो….. आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाही अशा गोष्टीला ठामपणे नाही म्हणायला हवं.

आपले पुस्तक, आपले भारीतले कपडे,साड्या, बांगड्या, चप्पल, बॅग, मागतात

त्याहुन काही जण तर कहर करतात सोन्याचे दागिने मागायला पण त्यांना काहीच वाटत नाही…..

काहीजणी तर लग्नाला जाताना प्रत्येक गोष्ट उधारीवर घेतात…. साडी, चप्पल,इमिटेशन ज्वेलरी.. किंवा सोन्याचे दागिनेसुद्धा…. त्यांना हरवले तर…. अशी भीतीही वाटत नाही हे विशेष .

महागाचे कपडे, साड्या खराब झाल्या की वाईट वाटते… मग असं वाटत की उगीच दिल…. नाही म्हटलं असत तर बर झालं असत……

तेव्हा असे प्रसंग आले तर नाही म्हणायला शिका…

मी तर नाही म्हणण्याचा कलेत नैपुण्य मिळवतेय….. तू पण प्रयत्न कर……

हो ग, मी पण आजपासून नाही म्हणण्याच्या कलेत नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करेल……

ये, संध्या मला थोडं काम आहे…. मी थोडी लवकर निघते…. थोडं माझं टेबलं बघशील……

नाही……. मी पण नाही म्हणण्याच्या कलेत नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करतेय……

हाहाहा….. असं नाही बर ! दर वेळी नाहीच म्हणायला हवं…… वेळप्रसंगी एकमेकांना मदत करावी लागते….. परंतु कुणी आपला गैरफायदा घेत असेल, आपल्याला गृहीत धरत असेल तर नाही म्हणायला हवे….

वरिल अनुभव तुम्हाला आले असतील किवा यापेक्षा काही वेगळे असतील तर जरूर प्रतिक्रिया लिहा.
सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे यर्व हक्क लेखिकेकडे राखीव.कथेत अथवा लेखिकेच्या नावात कोणचाही बदल अथवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो काॅपीराईट कायद्याचा भंग असेल ह्याची कृपया नोंद घ्यावी.नावासकट शेअर करायला हरकत नाही..

“अर्चना अनंत “✍️

मैत्रिणींनो, माझा लेख आवडल्यास मला लाईक, कॉमेंट करा…. माझे लेख वाचण्यासाठी मला फालो करायला विसरू नका

धन्यवाद ???

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा