निखाऱ्यांचे इंद्रधनू

Written by

आज सोसायटी मध्ये मानसी चा सत्कार होणार होता..राष्ट्र स्तरावर नृत्यकलेत घसघशीत यश मिळवणाऱ्या मानसी चा आज सोसायटी ने सत्कार आयोजित केलेला…
चेहऱ्यावर प्रचंड कष्टांनी आलेले तेज, बारीक अंगकाठी,अंगावर ब्रँडेड कपडे, चमकणारी तिची त्वचा आणि महागड्या कार मधून येणं जाणं.. असा तिचा थाट होता…नवऱ्यासोबत कायम बाहेर फिरायला जाणं, अगदी राजा राणीप्रमाणे त्यांचा आनंदी आनंद होता…मुलंही मोठ्या शाळेत,जितके श्रीमंत तितकेच संस्कारी…
मानसी सोसायटीत फार कोणाशी बोलायची नाही, सोसायटीतल्या बायका मात्र तिच्यावर फार जळायच्या… तिचं उंची राहणीमान, लग्न झालेलं असूनही कुठलंच काम नाही, घरात कपड्यांच्या घड्या घळण्यापासून ते हातात पाणी देण्यापर्यंत नोकर कामाला होती..सोसायटीतल्या बायका कुजबुजयच्या…
“काय बाई तो थाट, आम्हाला असा थाट राहिला असता तर आम्हीही मिळवलं असतं हो यश, आम्हीही पुढे गेलो असतो..आमचाही झाला असता सत्कार….आणि काय करायचंय तो सत्कार …घरात काही कामं नाही, नुसतं बाहेर हिंडायचं, बाईचं आयुष्य काही असं असतं का….”
वास्तविक सोसायटीतल्या बायका तिच्यावर मनोमन जळायच्या, तिला मिळालेलं यश आणि तिचं राहणीमान, नोकर चाकर बघून त्यांनाही वाटायचं तिच्यासारखं बनावं, पण
“आमच्या यांनी करू दिलं नाही, घरात सासू सासरे खूप रागीट आहेत, मुलं काही करू देत नाहीत”
वगैरे काहीतरी कारणं सांगून आणि तिचं एवढं असून काही उपयोग नाही याचा भंपक गप्पा ठोकून त्या अप्रत्यक्षपणे स्वतःची समजूत काढत समाधान मानत असायच्या…
तिचा सत्कार होणार म्हणून सोसायटीतले सगळे जण जमले, ती स्टेज वर एखाद्या राजकुमारी सारखी ऐटीत बसली होती…इकडे बायकांचा नुसता जळफळाट व्हायला लागला…

आपल्यालाही तिच्यासारखा मान मिळाला असता तर? आपल्यालाही तिच्यासारखं श्रीमंत होता आलं असतं तर??या विचाराने बायका आतल्या आत कुढत समोरच्या खुर्चीवर बसलेल्या…
तिचा यथोचित सत्कार झाला, आयोजकांनी मानसी ला तिच्या प्रवासाबद्दल बोलण्याची विनंती केली…
मानसी ला पहिल्यांदाच असं कोणीतरी विचारलं…
ती उठली आणि तिने एक मोठा श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली…
” माझ्या सत्कारासाठी तुम्ही हे आयोजन केले आणि तुम्ही सर्व इथे जमला याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे..
माझ्या प्रवासाबद्दल ऐकणार असाल तर मन घट्ट करून ऐका.….
लहानपणापासून नृत्याची आवड, पण घरात त्याला प्रचंड विरोध, आई वडिलांना साधे गाणे लावलेले चालायचे नाही…मग मैत्रिणीकडे जाऊन गपचूप ही हौस पूर्ण करायची…एकदा वडिलांच्या कानावर हे पडलं…त्यावरून त्यांनी मला बेदम मारलं…माझं लग्न ठरवून टाकलं….माझ्याकडे पर्याय नव्हता…कारण घरची परिस्थिती अशी की वडील गवंडी आणि आई धुणी भांड्याची कामं करायची…माझं लग्न झालं आणि मी एका खेडेगावात आले…नवरा शेतीकामात व्यस्त…मी घरातली कामं सांभाळायची…पण नृत्याची आवड शांत बसू द्यायची नाही…एक दिवस नवऱ्याने खायला भत्ता आणला तेव्हा त्याला गुंडाळलेल्या पेपर वर मी आमच्याच गावात नृत्य स्पर्धेची जाहिरात पहिली…मन थाऱ्यावर नव्हतं..काहीही झालं तरी भाग घ्यायचा..घरी सांगितलं तसं घरात एकच तमाशा झाला.. घरातली सून अशी नाचायला लागली तर काय इज्जत राहील म्हणून घरच्यांनी घराबाहेर काढायची धमकी दिली….

जे व्हायचं ते होउदे, मी जाणार..चांगले कपडे नाही, मेकप नाही…तश्याच अवतारात स्पर्धेला गेले…तिथे 50 रुपये एन्ट्री फी होती…आता काय करावं?? घरात गरिबी…हाताशी 10 रुपयेही नाही…मग बाहेरच ताटकळत बसले…रस्त्यावरून काही माणसं गाडी तुन सामान उतरवत होते, माणसं कमी पडत होती…मी पळतच तिकडे गेले आणि 50 रुपयांच्या मोबदल्यात ओझी उतरवायचे काम केले…तू बाई आहे,जड काम नाही जमणार म्हणून मला डावलले जात होते, पण मी हट्ट केला… सगळं बळ एकटवून ओझी उतरवली…50 रुपये डोळ्यांसमोर फिरत होते… ओझी उतरवून झाली, ती माणसं अवाक झाली..मला 50 रुपये दिले…जीव दमला होता.. पोटात प्रचंड भूक….समोर एक दुकानात बिस्कीट विकायला होते..भूक भागवायला तिकडे गेले पण तितक्याच वेगाने परत फिरले…कारण पैसे स्पर्धेसाठी लागणार होते…

तश्याच भुक्या पोटी स्पर्धेत पैसे दिले, जीव ओतून नृत्य केले….ईच्छा पूर्ण केल्यानेच माझे पोट भरले…निकाल लागला…50 मुलीत मी पहिली आले…परीक्षक खुश झाले..त्यांनी मला बोलवून काय हवे ते माग विचारले…मी फक्त जेवायला 2 घास मिळावेत म्हणून विनंती केली…परीक्षकांना माझी सर्व हकीकत समजली…त्यांनी पोटभर जेवणाची व्यवस्था केली…एक कष्टाचे आणि समाधानाचे जेवण मी आयुष्यात पहिल्यांदाच केले होते….

त्यांनी मला पुढची संधी दिली…मोठया शहरात प्रशिक्षण घायची… पण याला परवानगी घरून थोडीच मिळणार?? गाशा गुंडाळला आणि घर सोडून पळून आले…इथे प्रशिक्षण घेतले…नवऱ्याने मला शोधुन काढले…पण तो आता नरमला होता. मला साथ देण्याचे त्याने वचन दिले..

मी गर्भार राहिले…4 महिन्याची गर्भार असताना नृत्य करत गेले…जिंकत गेले…

बाळ झालं…आता स्टेज वर परफॉर्म करण्यासाठी आमंत्रण येऊ लागली…5-5 तास बाळाला सोडून कसे राहणार?? मग मार्ग काढला..बाळाला नवऱ्यासोबत द्यायची…स्टेज च्या मागे एक आडोसा लावून घ्यायची…दोन काठ्या रोवून एक झोळी बांधायची…बाळाला पाजून नवऱ्यासोबत तिथे त्याला ठेवायची…असं करत माझा प्रवास चालू राहिला…आणि आज त्याचं स्वरूप तूम्ही पाहतच असाल…आज जे यशाचे आणि समृद्धीचे इंद्रधनू तुम्हाला दिसत आहे त्या मागे निखाऱ्यांचे जळजळीत वास्तव आहे”

तिचं बोलणं संपलं… समोरच्या प्रत्येक बाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांचे डोळे उघडले…

हे यश सहजासहजी मिळालं असंच त्यांना वाटत राहायचं, मात्र त्यामागे इतकी मोठी कसरत होती, इतकी जीवाची घालमेल आणि इतकी संकटं होती हे त्यांनी कधी पहिलच नव्हतं…

समोर जो यशाचा डोंगर असतो तो सर्वांना दिसतो, मात्र त्यामागची करण्यात आलेली काट्यातून सफर, लागलेल्या ठेचा आणि रक्ताळलेल्या जखमा कोणालाच दिसत नाहीत…

“घरी सपोर्ट नाही, हे करू देत नाही, घरचे करू देत नाही..नाहीतर आम्हीही केलं असत…”असं म्हणणाऱ्या सोसायटीतल्या बायका आता आपण देत असलेल्या करणांनावर पश्चाताप करत होत्या…

असेच सुंदर लेख वाचण्यासाठी खालील फेसबुक पेज ला लाईक करा

https://m.facebook.com/irablogs/

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत