नियती आणि शेतकरी

Written by

आज एका मित्राच्या कामानिमित्त त्याच्या बरोबर बाहेर निघालो. कळंब शहर ते डोळा पिंपळगाव येथे जाऊन तेथील काम उरकून मंगरूळ मार्गे प्रवास करून खामसवाडी बोर्डा हे गाव करत परत कळंब कडे यायचे होते. डोळा पिंपळगाव येथील काम संपून मंगरूळ मार्गे खामसवाडी येथे निघालो असता, मंगरूळ जवळील रस्त्याच्या बाजूने एका शेतात एक शेतकरी जोडपं स्वतःला नांगराला जुंपून पेरणी करताना नजरेस पडलं काहीतरी विचित्र असा प्रकार डोळ्यासमोर होता जो मनात काहूर माजवत होता कारण आजपर्यंत मी पेरणी करण्यासाठी नांगराला फक्त बैल जुंपलेली बघितली होती. मनात प्रश्न उभे राहिले नेमके असे काय घडले असेल जे ह्या शेतकरी जोडप्याला स्वतः नांगर ओढत पेरणी करण्याची वेळ आली असेल ? मित्राला गाडी थांबवण्यास सांगून गाडीवरून उतरलो आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्याच ठरलं त्यांच्या जवळ गेल्यावर कळाले फरताडे नावाचे हे कुटुंबीय आपल्या दोन एकर शेतीत उदरनिर्वाह भागवतात मागील काही वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यात असलेला दुष्काळ आणि नापिकीचा फटका त्यांना बसला होता. दुष्काळी परिस्थिती पुढे हतबल होऊन ह्या जोडप्याला आपली बैल जोड विकण्यास नियतीने भाग पाडले होते. जनावरांना चारा देण्यास त्यांचे पालन पोषण करण्यास ते अपुरे पडत होते म्हणून त्यांनी आपली बैलजोडी विकली होती एक मुल आणि चार मुली आणि हे दांपत्य असा असा त्यांचा परिवार त्यातील मुलींचे लग्न झालेले बैलजोडी विकून त्यांना फक्त 20000 रुपये इतका मोबदला मिळाला होता, तोही मुलीच्या लग्नाच्या वेळेस झालेल्या कर्जाची रक्कम फेडण्यात गेला. मागील दोन-चार दिवसात जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या वर्षी तरी नियती साथ देईल आणि आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. अशीच अपेक्षा घेऊन हे जोडपं ही स्वतःला नांगराला जुंपून पेरणी करत होता.
सर्व प्रकार पाहून मनात देवाने आपल्याला थोडेफार का असेना यांच्यापेक्षा सुखद आयुष्य दिले आहे. या गोष्टीचे आभार मानावे की या जोडप्याला कठीण परिस्थितीचा सामना करण्यास भाग पाडले म्हणून त्याची निंदा करावी असे अनेक प्रश्न काहूर माजवत राहिले पण त्या एकाही प्रश्नाचं उत्तर देण्यास माझं मन असमर्थ राहिलं….
(खादीम सय्यद ©)

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा