निर्णय चुकलाच माझा.. ?

Written by

निर्णय चुकलाच माझा…?✒️जयश्री कन्हेरे -सातपुते

          श्वेताने घरचे काम आवरले व निवांत पेपर घेऊन बसली. पेपर उघडताच पहिल्या पानावर MPSC टॉप केलेल्याची फोटो व पोस्ट दिलेलं होतं. सर्व नावे वाचताना एका नावावर येउन तिची नजर खिळली…ही तिचं का याची शहनिशा करून पुन्हा श्वेता त्या फोटोकडे बघू लागली…. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि पेपर ओला करू लागले..

        त्यानंतर आतील पानावर काही मुलाच्या MPSC टॉपरच्या मुलाखती होत्या..त्या बघताना पुन्हा तीला हवं असलेलं नाव दिसलं आणि ती वाचू लागली…

  ” माझ्या या यशाचे श्रेय मी माझ्या आईला देते माझी आई सौ. रेखा वरद कपले.  माझ्याघरचे सगळेच बाबा, आजोबा, आजी  यात सामील आहेत. शिक्षक मार्गदर्शक म्हणून मला ज्यांनी मदत केली प्रोत्साहन दिले त्या सर्वांची मी आभारी आहे. माझी मेहनत तर होतीच या DC च्या पोस्ट साठी. पण जी जिद्द हवी होती ती मला माझ्या आईने दिली. आज मला सर्वांसमोर आईला धन्यवाद म्हणायची संधी मिळते आहे तर ती मी गमावू शकत नाही. Thanks आई & I love you so much.. आई “

      ही मुलाखत होती वैष्णवी वरद कपले ची. जी आज DC (Deputy Collector ) झाली होती.

     हे वाचून तर श्वेताला आणखीच रडायला आलं.. आणि ती 22वर्ष मागे विचारांच्या, भूतकाळाच्या गाभाऱ्यात गेली.आणि स्वतःच्या खाणाखुणा शोधू लागली सुरुवात झाली ती  वरसंशोधनापासून

(श्वेता स्वतःच आपला पाढा गिरवू लागली तो पुढील प्रमाणे… तिच्याच तोंडून )

      “वरद एक साधा सरळ पण रग्गड शेतकरी. मी जरा सावळी त्यामुळे वरदच्या घरचे नाही नाही म्हणत होतें. वरदला मी आवडली म्हणून सगळ्यांनी होकार दिला. आमच्यात  10….12 वर्षाचं वायाच अंतर होतं. माझ्या  बाबांना वाटलं श्रीमंत घर आहे काय फरक पडतो, मला  विचारलं तर मीही होकार दिला.. सगळ ठरलं व पार पडलं लग्न एकदाच. आणि मी  वरद च्या घरी नवीन स्वप्नांसोबत गृहप्रवेश केला.

    नवीन सुन आली म्हणून वरदच्या आईने सर्व जबाबदारी सुनेला देऊन दिली. एकुलता एक मुलगा व सुन, त्यांनीच सगळं करावं ही माफक अपेक्षा होती  माझ्या  सासू -सासऱ्यांची. (आता वाटत काय चुकलं होतं त्यांचं )

मला माहेरी जाण्याची व फिरण्याची भारी हौस होती. माहेरी जाताना आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला खुप आवडायच मला.. मग कधी कपडे, गिफ्ट, खायचं सामान न्यायचे. सुरुवातीला वरद पण यायचे…शेतीची कामे वाढली त्यामुळे त्यांना ही वेळ मिळत नव्हता.. आणि त्यातच माझी good news आली त्यामुळे प्रवास कमी झाला..

    दोघांन मधे वयाच अंतर जास्त होतं… त्यामुळे की काय हळू हळू  काही गोष्टी त्याला खटकायला लागल्या होत्या  (वरदला वाटायचं आपलीच पसंत आता काय करायचं.)

    म्हणून वरद मला नेहमी समजवायचा.. पण इकडे माझा स्वार्थीपणा वाढत होता. सासू -सासरे नको.. राजा -राणीचा संसार करायचे स्वप्न मी रंगवू लागले होतें .. “एकदाच बाळ झालं की आपण वरदला वेगळं राहण्यासाठी तयार करू “असं ठरवलंच होतं मी . वाट होती बाळ होण्याची.

बाळ झालं “चार महिन्याचं ”  आणि माझं झालं सुरु “सगळे वेगळे राहतात आपणही वेगळं राहूया.. माझ्यानी इतक्या लोकांचे काम होतं नाही “

माझं हे बोलणं ऐकून वरदला रागच आला.तो मला दिसत होता पण मला तो काहीच बोलला नाही कदाचित त्याने विचार केला असेल मनात  “कुणापासून वेगळं व्हायला लावते ही मला.. आई -बाबांपासून? या वयात त्यांना एकटं सोडायचं?  मुलगा हा म्हातारपणात आपल करायला पाहिजे असं म्हणतात आणि मी त्यांच्यापासून वेगळं कस राहू.. ” (त्यांच बरोबर होतं हे आता पटतंय )

   हाच वेगळं होण्याचा मुद्दा घेऊन कितीदा वाद केला मी.. किती भांडले.. घरातील वातावरण दूषित केल.. आणि एकदिवस वरदनी माझ्यावर हात उचलला.. रागाच्या भरात.. झालं माझा ego आडवा आला मी जेवनच बंद केल.. आजही स्पष्ट आठवत सासूबाई कितीदा आल्या मला “जेवण कर ग. बाळ दूध पीत. चक्कर येईल तुला ” 

मी मात्र माझ्या रागात होती, कुणाच ऐकलं नाही.. शेवटी यांनी माझ्या माहेरी फोन करून सांगितलं “ही अशी वागतेय, जेवण करत नाही तुम्ही तिला जरा समजवता का? “

  वरदनी साधेपणाने फोन केला व माझे बाबा.. पाच पंच घेऊनच आले.. नको -नको ते बोलले वरद व माझ्या सासरच्याना. शेवटी मला माहेरी न्यायचं ठरवलं पण आलेल्यापैकी एक जण म्हणाला “यांना चांगला धडा शिकवूया  चला पोलीस स्टेशनला ” मग काय खोटे आरोप करून रिपोर्ट करायला गेलो तर मेडिकल चेकअप शिवाय रिपोर्ट लिहिणार नव्हते.. माझा मेडिकल चेकअप झाला त्यात काहीच निघालं नाही… कारण काही त्रास नव्हताच न. त्यामुळे रिपोर्ट दाखल झाली नाही.. तिथून सरळ मी 10 महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी आले..

मधे -मधे वरद फोन करायचा, “अग राग शांत झाला असेल तर ये परत घरी ” म्हणायचा.. माझा igo जरा जास्तच मोठा झाला होता न. मी एकच म्हणायचे ” वेगळ राहत असाल तर मी येते नाहीतर नाही “ असं करता करता दोन महिने झाले.. बाळाचा पहिला वाढदिवस इकडे करूया असं वरद म्हणाले.. माझी अट तिचं होती.. मुलीच्या प्रेमासाठी इकडे वरद आई -बाबाला, बहिणीला एकत्र बोलावून सांगत होता.

“मी आता  वेगळं राहतो.. आणि मला बाबांच्या संपत्तीतला हिस्सा नको. श्वेताला कळलं पाहिजे की सासू-सासरे नाही तर त्यांची संपत्ती पण नाही “

   अशांनी तरी मी एकत्र राहायला तयार होईल असं सगळ्यांना वाटत होतं.. वरदचा कॉल आला.. “मी वेगळा राहायला तयार आहे तू परत ये.. मी बाबांच्या संपत्तीमधला हिस्सा घेणार नाही. आपण आपला संसार नव्याने उभा करू.. ते जर आपल्याला नको तर त्यांचे शेत/संपत्ती  घेऊन काय उपयोग.. तू लवकर ये आपण बाळाचा वाढदिवस इकडे अपल्या नवीन घरी करूया “

     मी हे घरी सांगितले.. तेंव्हा घरच्यांचे हावभावच बदलले. मला माहेरी आणताना जे पाच लोकं बाबा घेऊन आले त्यांना बोलावून विचारले तर.. ते म्हणाले आता “दोन हातावर बायको पोरीच कस काय भागेल..”

दुसरा म्हणाला  “तुमची मुलगी आहे तुम्ही बघा “.

तिसरा म्हणाला ” त्यांचा इतका अपमान केला आता परत त्या घरी जायचं नाक राहील का ” असं बोलून ते निघून गेले..

     घरी मग त्यावर विचार सुरु झाला.मी म्हंटल “मला जायचं आहे परत “

बाबा -“तुला जायचं असेल तर तुझ्या भरवशावर जा.. इथून पुढे भांडण झाले व मला फोन आला तर मी येणार नाही तुझ्या घरी “

भाऊ – ” किती अपमान केला तुझ्या सासरच्यांचा. त्यांच्या समोर जायची लाज नाही का वाटणार मी तर कधी येणार नाही तिथे. “

आई -“पोरी आधी विचार करायचास न आता तू परत गेलीस तर तुझ्या बाबांचा पण मान जाईल न.”

बाबा – “तुला जायचं तर जा परत माहेरी येऊ नकोस “

    सर्वांचे बोलणे ऐकून मी गोंधळले होतें यात बाळाचा पहिला वाढदिवस झाला तरी मी सासरी गेले नाही. विचार सुरु होता… “सासरी गेले तर माहेर तुटेल. माहेरी राहिले तर नवरा सुटेल ” काय करू..?

  जेंव्हा मला राग आला तेंव्हा का नाही समजावलं यांनी मला.. हे लोकं सरळ माहेरी घेऊन आले.. आणि आता तुझं तू बघ म्हणतं आहेत. मी जरा जास्तच केल का वेगळं राहण्यासाठी? मी मूर्खपणा केला का?  या विचारात होतें तोच भाऊ म्हणाला काय ठरवलंस… जातेस स्वताच्या भरवंशावर की वकील बघायचा. माहेर मला महत्वाचे होतेच.. घरच्यांनी आणलं आता त्यांच्याच मताने वागायचं ठरवलं व वकील बघून वरदला घटस्फोटाचा नोटीस पाठवला.

  नोटीस मिळताच घरचे (सासरचे )हादरले.. वेगळं राहायला तयार असूनही ही अशी का वागतेय.. सगळे(सासरचे ) पुन्हा समजवायला आले.पण मी कुणाचाच ऐकलं नाही (आता वाटत ऐकलं असत तर…परिस्थिती वेगळी असती  )

 वरदने नोटीसला उत्तर दिले. “मी तुला नांदवायला तयार आहे तुझ्या सर्व अटी मान्य करून. तू परत ये “

मी.. मी म्हंटल्या पेक्षा माझ्या घरचे घटस्फोट घेण्यावर जोर देत होतें. या नोटीस च्या प्रकरणात तीन वर्ष निघून गेली. केस जागच्या जागेवर… शेवटी वकिलांच्या मध्यस्तीने घटस्फोट घेण्यावर शिक्कामोर्तब झाली. घरच्यांनी मुलीची दुसऱ्या लग्नात अडचण होईल म्हणून तिला वडिलांकडे देण्याचं ठरवलं मला मान्य करावं लागल… शेवटी त्या घटस्फोटच्या कागदावर दोघांनीही सह्या केला.. त्यात मुलीला भेटण्याची तरतूद पण केली नाही वकिलाने.. म्हणजे माझं बाळ तुटलं मला नेहमीसाठी. बाळाला वरदला सोपवून मी जे निघाले ते पालटून एकदाही मागे बघितलं नाही. किती रडत होती वैष्णवी.. आता पर्यंत आईला बघितलं.. आणि 3 वर्षानंतर अनोळखी चेहरे दिसलें तिला म्हणून ती खुप रडत होती. मी कसलाही विचार केला नाही… तेंव्हा.. सही करण्याआधी जरी मी माझा निर्णय घेतला असता तर….?  आज खरच काहीतरी वेगळीच परिस्थिती असती…

     आज 22वर्षांनी ती वैष्णवीला फोटोत बघतेय व मुलाखती मधे ऐकतेय.. “तिच्या यशाचे श्रेय तिच्या आईला जाते… ” मला नाही जन्मदात्रीला नाही तर पालनकर्तीला… आज माझी चिमुरडी DC झाली त्यात आनंदच आहे.. पण… त्या वेळी 22वर्षाआधी जर मी योग्य निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती काही वेगळीच असती… हे शंभरदा डोकयात आलं पण आता..   वेळ निघून घेल्यावर

इतक्यात…. आत्या..कितीवेळचा आवाज देतेय कुठे हरवलीस म्हणून तनुजा (माझ्या भावाची मुलगी ) आली.. आणि मी भूतकाळातून निघून भानावर आले…. श्वेता…

समाप्त…..

   खरच वेळ निघून जाते व निर्णय चुकत जातात..

रागाच्या भरात नाते तुटत जातात…

    “साप गेल्यावर काडी मारण्यात काय अर्थ आहे ” या म्हणी प्रमाणे लोकांचं जीवन होतं.. जसं श्वेताच… अशा बऱ्याच श्वेता आहेत ज्या विभक्त झाल्या व काहींची केस अजूनही सुरु आहे… 5वर्ष.. 6वर्ष झालीत बऱ्याच जणींना.   अशा स्त्रियांच्या मनातलं श्वेताच्या पात्रातून सांगण्याचा प्रयत्न केला. लिहिताना “मी ” हा शब्द खास वापरला तो यासाठी की ज्यांच्यावर ही परिस्थिती आहे त्यांना ही स्टोरी स्वतःची वाटावी… आजूबाजूच्या घटनेवरून प्रेरित होऊन लिहिण्याचा प्रयत्न केला मी…

ही स्टोरी वाचून जर कुणाचे चुकलेले निर्णय योग्य होईल तर फारच छान व कुणी चुकत असेल व वेळीच सावध होतील तर आणखीनच छान….

    तर वाचकांनो… वाचण्यासाठी धन्यवाद ?… Like करायला विसरू नका…. तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत… आणि शेअर करायचा असेल तर नावासकट शेअर करा… ?जयश्री कन्हेरे -सातपुते.. ?

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा