निवांत

Written by

#निवांत

(गजाभाऊ खोलीत विमनस्क अवस्थेत बसलेले..
रमाई (बायको) चहा घेऊन येते.)

रमाई: हं चहा घ्या घोटभर.चहापात टाकलेय हो.जरा तरतरी येईल.

गजाभाऊ: अगं कसली तरतरी येईल म्हणतेस.संभाषण ऐकलंस नं चिरंजीवांच.घराची वाटणी म्हंटलं मी जीवंत असेपर्यत करुन देईन तर ही दोघं आपलीच वाटणी करायला निघाले.तू म्हणे धाकट्याकडे आणि मी थोरल्याकडे.बोलवलं तरी कसं गं यांना असं. हे रहातं घरही विका म्हणताहेत.

रमाई: तरी मी तुम्हांला सांगत होते की वाटणीचा विषय काढू नका म्हणून.माझी पोरं बरी आहेत हो.या सुनांनीच भरी पाडलं असणार त्यांना.माझ्या लेकरांच्या तोंडून बोलतायत.समोरून बोलावं म्हणावं मग सुनवते त्यांना.

गजाभाऊ: अगं एक दमडी घेतली नाही या घरासाठी मी यांची.या थोरल्या राजूला मलेरिया झालेला..आठवतं तुला..तेंव्हा पठ्ठया मला ऑफिसात जाऊ देत नव्हता.महिनाभर मी त्याच्या उशाशी बसून असायचो.तू रात्र रात्र जागायचीस.याला मेडीकलला एडमिशन घेतली तेंव्हा तू तुझं स्त्रीधन गहाण ठेवलंस.ते हल्लीच मी सोडवलं.कशाचीच जाण नाही का गं याला.त्यापेक्षा एखाद्या मुक्या जनावराला लळा लावला असता तर त्याने जाण तरी ठेवली असती.

रमाई: अहो किती त्रास करुन घ्याल.मी डोकं चेपते तुमचं निजा बघू गुपचुप.असा त्रागा करुन का सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहेत.

गजाभाऊ: आणि..आणि अगं हा धाकटा चंदू.ह्याचे का कमी लाड केले आपण.नोकरीत रस नाही म्हणाला.धंदा करतो म्हणाला तर दोघातिघांकडून उसणे पैसे घेऊन याला मदत केली मी.ते धंदयाचंही नीट जमत नव्हतं त्याला. गिर्हाईकही मलाच जमवून द्यावी लागली त्याला.त्यादिवशी त्याच्या दुकानात गेलेलो.दुकान भारी सजवलंय.अजून एक मजला वाढवला आहे.खाली लहान मुलांचे कपडे तर वरच्या मजल्यावर स्त्रियांसाठी दालन..सगळं झाकपाक.पण दोन शब्द बोलायला मागेना गं माझ्याशी,चहाच सोडच.यांनाच आपली किंमत नाही तर सुनांना कुठून असणार.आपलंच नाणं खोटं तर दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग.

रमाई: तुम्ही कशाला काळजी करता.मी आहे नं.मी बघेन सगळं.आणि आपली वाटणी करणारे हे कोण? लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत इनमीन वीसेक दिवस तुमच्यापासून दूर राहिले असेन.कधी माहैरी गेले की रात्री तुमच्या काळजीने जीव धास्तावायचा.तुम्ही काय खाल्लं असेल का,निजला असाल का?अशा चिंतांचा भुंगा भुणभुण करायचा.डोळ्यांतून आईच्या हातावर गरम टीपं पडायची.आई समजून जायची व दुसऱ्या दिवशी दादासोबत माझी पाठवणी करायची.नी आत्ता म्हणे वेगळे रहा.चार दिवस राहिलेत आयुष्याचे आमच्या त्यात दोन टोकाला रहायला सांगत आहेत.कसं कळत नाही या मुलांना देहापासून त्याची सावली वेगळी करु पहाताहेत.लहान असती तर चांगलं बदडून काढलं असतं, कान पिरगाळले असते.नातवांसमोर काय बोलणार यांना.

( साठम आजोबा घरात प्रवेशतात).

गजाभाऊ: अरे अलभ्य लाभ! आज इकडे कशी काय वळली साठमा तुझी पावलं.

साठम: अरे विशेषच आहे थोडसं.तुमची गोष्ट वेगळी आहे.तुमची दोन्ही मुलं गुणी निघाली.आईवडलांवर लक्ष ठेवतात .जवळ जरी रहात नसली तरी तुमची चौकशी करतात.कालच दोघेही खालच्या चौकात भेटले होते.म्हणत होते आईवडलांची तब्येतीची कुरकुर म्हणून दोघांनाही जरा भेटावयास आलो होतो.बरं वाटतं हो असं ऐकून.

(गजाभाऊ व रमाई एकमेकांकडे बघतात.रमाई किचनमध्ये जाते.)

साठम: हां तर ही घ्या निमंत्रण पत्रिका.

गजाभाऊ: अरे साठमा या वयात लग्न परत🤔

साठम: पत्रिका फक्त लग्नाच्याच असतात का रे. आम्ही दहा जणांनी मिळून मित्राच्या बंगल्यावर रहायचं ठरवलंय .ज्यांच्या बायका आहेत ते जोडीने तर माझ्यासारखे एकटेच जाणार आहेत रहायला.स्वत:च बनवायचं अन् स्वतःच खायचं असं ठरलंय सध्या.थोड्या दिवसांनी कुक ठेवू एखादा. पुर्वी नाही का होस्टेलला राहिलो तसंच काहीसं.

गजाभाऊ: अरे पण दिग्या तुझा सांभाळतो नं तुला.

साठम: सांभाळतो रे.सुनबाईही सांभाळते पण दिवसभर दोघं कामावर,नातीचं कॉलेज,ट्यूशन असं सगळं चालू. तिन्हीसांजेला घरी येतात परत आपापल्या कामात नाहीतर त्या मोबाईलमध्ये बुडून जातात.दिवसभर मला घर खायला येतं रे.ही होती तेंव्हा दोचं बोलत बसायचो.हिला विसा लवकर मिळाला वरचा.मी माझ्या विसाची वाट पहात होतो. इतक्यात कुलकर्णी दांपत्यांनी ही संकल्पना आणली.समविचारी,ज्येष्ठ मंडळींनी एकत्र रहायचं. मुलांना सहा महिन्यातून एकदा भेटून यायचं.मला आवडली हो कल्पना.

गजाभाऊ: अरे साठमा, माणसी किती घेतात रे महिन्याला?

साठम: बंगला आपल्या जोगळेकराचा आहे.तो म्हणाला,मला ना मुल ना बाळ.पैशाच्या थप्प्या साठवून शेवटी घेऊन का जाणार आहे?त्यापेक्षा तुम्ही सारे या माझ्या सोबतीला. आयुष्याची संध्याकाळ साजरी करु.इथे पैशाला महत्त्व नाहीए रे.सोबतीला आसुसलेली मंडळी आहोत आम्ही.”
“(रमाई चहा व उपीठ घेऊन येते.)

रमाई: साठम भाऊजी, तुम्हांला उपीठ आवडतंन माझ्या हातचं म्हणून बनवलं हो.

साठम : बरं केलंत वहिनी.तुमच्या हातचं उपीठच काय सगळेच पदार्थ अफलातून असतात. त्या आमच्या ज्येष्ठांच्या नवीन घराचा ग्रुहप्रवेश आहे उद्या.त्याच्याच पत्रिका वाटत फिरतोय सकाळपासून. पण कुणी नाश्त्याचं विचारलं नाही हो. नुसता चहा ढोसतात या म्हाताऱ्याला.तुम्ही आपणहून केलात खायला.हीच आपली माणसं हो.इथे नाती गौण ठरतात.माणुसकीचंच नातं उरतं.

रमाई: नाव काय ठरवलतं भाऊजी नवीन घराचं?

भाऊजी: ‘निवांत असं ठरवलंय सध्यातरी.बाजूला थोडी जमीन आहे.तिथे फुलबाग,फळबाग करणार आहोत.बरेच विचार डोक्यात आहेत.अडगळ बनून जगण्यापेक्षा बरं नाही का.आणि आत्ता ठरवलंय कुणाकडून अपेक्षा ठेवायच्याच नाहीत.अगदी मुलांकडूनसुद्धा.त्मांच्या पंखात बळ भरून दिलं.आत्ता उडूदेत त्यांना.पक्षी नाही का आपल्या पिलांसाठी घरटं बांधत.त्यांना दाणापाणी भरवत.मग त्यांची पिलं मोठी झाली की जातात भुर्र उडून.पक्ष्यांची जोडी नव्याने आयुष्याची सुरूवात करते.आपण या पक्ष्यांकडून काहीतरी शिकलं पाहिजे.

रमाई: भाऊजी, इस्टेट दिग्याच्या व पमीच्या नावावर केलात का हो?

साठम: नाही हो.ती दुर्बुद्धी मला सुचली नाही ते बरं झालं.मी मरेपर्यंत इस्टेट काही त्या दोघांना द्यायचो नाही.मुलं असली म्हणून काय झालं.लहानाचं मोठं केलं.आत्ता त्यांनी कष्ट करून त्यांचं जग निर्माण करावं की.तशी अडल्यानडल्याला त्यांना करतो मी मदत.पण सगळंच देऊन बसलो नाही अजून..अहो वहिनी तो आमच्या कट्टयावरचा बर्वे गेल्या आठवढ्यात बाथरुमात पडला घसरून. तिथेच आटपलनं.सून व मुलगा रात्री आले तेंव्हा कळलं.

रमाई: आम्ही दोघं येऊ का हो राह्यला निवांतमध्ये.

साठम: नक्की या.शुभस्य शीघ्रम.आम्ही वाट पहातो तुमची.

गजाभाऊ: अगदी उद्याच येतो रे रहायला तुमच्यासोबत.रमाई चल आवरुया इथलं बस्तान आपली वाटणी होण्याआधी आपणचं मार्गस्थ होऊया.

——-गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा