#निसटती_वाट
नेहमीप्रमाणे पुनम साडेपाचच्या गजराला उठली.आंघोळ वगैरे करुन तिने एकीकडे चहा ठेवला तर दुसरीकडे रात्री चिरून ठेवलेली भाजी करायला घेतली.लगोलग कणिक मळून पोळ्याही तयार झाल्या.सगळी कामं यंत्रवत होत होती.दोन्ही मुलं केदार व किर्ती थोडे आळोखेपिळोखे देत उठली.त्यांनीही आपले प्रात:विधी आवरुन घेतले.आईने दिलेले डब्बे बेगेत भरले.दूध प्याली व आपापल्या जॉबला जायला निघाली.दोन्ही मुलं गुणी होती.केदार इंजिनिअरिगचं शिक्षण घेत होता व किर्ती फार्मसी शाखेत शिकत होती.
मुलं गेल्यावर तिने नवऱ्याला ,सागरला उठवलं.तोही आपलं आवरुन ऑफिसला पळाला.तिने घरात केरवारा काढला.कपडे मशीनला लावले.भांड्याने भरलेला सिंक रिकामा केला.सगळी कामं होत आली तशी कॉफी घेऊन फेसबुक उघडून बसली.
हल्ली तिला एक नवीनच मित्र मिळाला होता चाटींग करायला.अगदी तिच्याच वयाचा.प्रविण नाव होतं त्याचं.तिच्याच शाळेत होता तो,तिच्याच वर्गात.तेंव्हा एकमेकांशी बोलायची हिंमत कधी झालीच नव्हती तिची.
मुलं गेल्यावर तिला घर खायला उठायचं नुसतं.सागरही त्याच्या कामात इतका बिझी असायचा की त्याला घरी यायला रात्री अकरा वाजायचे.त्यानंतर जेवण तरी त्याने पुनमला तू आधी मुलांसोबत जेवून घेत जा असं सांगून ठेवलं होतं. केदारने महिन्यापुर्वी पुनमला तिचं फेसबुक अकाऊंट ओपन करुन दिलं होतं.फेसबुक ओपन केल्यावर तिने अधाशासारख्या तिच्या मेत्रिणी शोधल्या पण बहुतांची नावे बदलल्यामुळे तिच्या पदरी निराशाच आली.
प्रविणची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर प्रथम तिने त्याचं प्रोफाईल चेक केलं.’शारदाश्रम’..तिचीच तर शाळा.तिने मग अधाशासारखे त्याचे फोटोज पाहिले.त्यात काही लहानपणीचेही होते.त्यावरून तिला त्याची खात्रीच पटली.मग पुनमने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली.आणि मग बोलणं सुरु झालं दोघांचं.
पहिल्याच दिवशी तो म्हणाला ,’तू अजुनही तशीच दिसतेस पुर्वीसारखी चार्मिंग.”
तिने त्याचं बोलणं हसण्यावारी नेलं खरं पण कुठेतरी मनाच्या आत थंडगार झऱ्यासारखं वाटलं तिला.गेल्या दहा बारा वर्षात मनी रेसमध्ये पुरतं अडकलेल्या सागरला तिच्याशी कधी मनसोक्त भांडायलाही वेळ नव्हता. तो फक्त पैसे आणून तिच्याकडे देत होता अन् ती ते
वापरून शिल्लक बँकेत जॉईंट अकाऊंटमध्ये डीपॉझिट करत होती.मुलांच्या शिक्षणातही त्याचं जास्त लक्ष नसायचं.
घर,मुलं सारं सांभाळताना पुनमला अशी आपुलकीची साद घालणारं कुणीतरी हवं होतं.मेनोपोजच्या वाटेवरून चाललेली ती..तिच्या शरीरात असंख्य बदल घडत होते.कधी अचानक घाम फुटे,तर कधी खूप बैचेनी वाटे,भरपूर रडू येई.हे असं का होतय हे तिला बिचारीला कळतच नव्हतं.त्यात शाळेतल्या जुन्या मित्राशी क्षणिक फेसबुक गप्पा व त्याने तिचं ,तिच्या दिसण्याचं केलेलं कौतुक तिच्या मनाला उभारी देऊन गेलं.
दुसऱ्या दिवशीही छान तयार होऊन पुनम प्रविणशी गप्पा मारायला बसली.जुन्या गप्पागोष्टी, शाळेत केलेली मजा,शाळेतल्या शिक्षकांची नावं,त्याचा शाळेतला द्वाडपणा,कितीतरी गप्पा रंगात येऊ लागल्या.
रोज सकाळी सोमवार ते शनिवार सगळी आपापल्या कामांना गेल्यावर पुनम प्रविणशी चाटिंग करत बसे.प्रविणला तिने घरातल्या मेंबर्सबद्दल सारी माहिती दिली.त्यानेही तिला त्याच्या पत्नी व मुलीविषयी सांगितलं.
प्रविण पुनमच्या कमनीय देहकाठीचं,अजुनही राखलेल्या तारुण्याचं,गोऱ्यापान कायेचं,निळसर डोळ्यांचं फार कौतुक करे. पुनमला ते कौतुक फार आवडतं होतं.त्याचे ते कौतुकाचे बोल ऐकून पुनम दिवसेंदिवस बहरून जात होती.बहाव्याची तोरणं जशी फुलतात तशी तिची काया प्रविण करत असलेल्या स्तुतीने सतेज दिसू लागली होती.तिच्या गालांवर गुलमोहराचा आरक्त लालिमा चढत होता.घरातल्यांना हा बदल जाणवत नव्हता कारण प्रत्येकजण आपल्याच व्यापात होता.आपलं काम ,खाणं,झोप..असं त्यांचं आयुष्य चालू होतं.तर पुनमंचं वय मात्र बाळसं घेऊ पहात होतं.
हळूहळू पुनम प्रविणकडे आकर्षिली जाऊ लागली.पुनम प्रविणच्या प्रेमात पडली होती.तिला कळत होतं आपण जे वागतोय ते चुकीचं आहे पण तरी ती वाहवत जात होती.कौतुकाला,प्रेमाला आसुसलेली ती प्रविणने केलेल्या कौतुकाने न्हाऊन निघत होती.
प्रविण तिच्यावर छान छान कविता करी व तिला वाचून दाखवी.मग तर ती अजूनच लज्जित होई.दिवसेंदिवस त्यांचं ओरल प्रेम बहरत होतं.प्रविण तिच्यातला एकेक बदल टिपे.त्यानेच तिला यु कट करण्याचं सुचवलं.दोन चार जीन्स व आकाशी,गुलाबी टॉप्स,थ्री फोर्थ घेण्याचं सुचवलं.
आपल्या आईतला हा बदल मुलांच्या लक्षात येऊ लागला होता.पण हा बदल कोण घडवतय ते मात्र त्यांना ठाऊक नव्हतं.सागरलाही आताशा त्याची पुनम नव्याने आवडू लागली होती.टिपिकल घरगुती बायकांसारखी दिसणारी म्हणून की काय त्याच्या नजरेने दुर्लक्षिलेली त्याची पुनम..तिचा नवीन हेअरकट,तिच्या रुपात झालेला आमुलाग्र बदल,तिच्या आधुनिक पेहरावामुळे तिच्यात आलेला आत्मविश्वास हे सारं सागरला घराकडे,पुनमकडे आकर्षित करू लागलं होतं.
एकदा सागर ऑफिसातून अंमळ लवकरच घरी आला.मुलं आली नव्हती.त्याने तिला, छान तयार हो फिरायला जाऊ म्हणून सांगितलं.पुनमने बेबीपिंक कलरचा टॉप,स्कायब्लू कलरची जिन्स,एका हातात नाजूकसं घड्याळ,दुसऱ्या हातात ब्रेसलेट, गुलाबी खड्याचे टॉप व गळ्यात तशीच गुलाबी पेंडंटची चैन घातली.सागर या रुपवतीकडे पहातच राहिला.मग दोघंही चौपाटीवर फिरून आले.बाहेरुनच जेवण आणलं.
मुलं जेवून झोपी गेली.आज सागरचा बेत काही वेगळाच होता.आज त्याला मधुचंद्र साजरा करायचा होता.पुनम बेडरुममध्ये येताच त्याने तिला आपल्या बाहुपाशात ओढून घेतलं.तिला हलकेच बेडवर ठेवलं.झिरोच्या बल्बच्या पिवळसर प्रकाशात तिचा देह हळदीने न्हायलासारा वाटत होता.सागर तिच्या देहावर त्याची बोटं फिरवू लागला.
वस्त्रांची अडचण बाजूस सारुन त्याने पुनमच्या अंगांगावर चुंबनांचा वर्षाव सुरु केला.तिच्या ओठांचं मधुर रसपान केलं.तिच्या मानेजवळ,कानांजवळ सगळीकडे त्याच्या प्रेमाचे गुलाबी ठसे त्याने उमटवले.पुनमही त्याला प्रतिसाद देऊ लागली.गुलाबी कांती सागराच्या निळाईत विलिन झाली.कितीतरी वेळ मध्यानरातीपर्यंत ते युगुल प्रेमालाप करत होतं.
सागर कितीतरी वर्षांचं उट्ट बाहेर काढत होता.त्याच्या पुनवेला प्रितीने सजवीत होता.पहाटे पहाटे कुठे त्याचा डोळा लागला.पुनमने मात्र साडेपाचच्या गजराला उठून मुलांचे डबे तयार करून त्यांना बायबाय केलं व परत सागराच्या निळाईत जाऊन पहुडली.
पुनमच्या मनात प्रविणचा विचार आला.प्रविणशी गप्पा मारुन आपण सागरशी प्रतारणा करतोय असं तिला वाटलं.रातीच्या मिलनाच्या सुखाने गाढ निजलेल्या समाधानी सागरच्या माथ्याचं तिनं हलकेच चुंबन घेतलं.ती विचार करु लागली,लग्न झालं तेंव्हा साधा वनरुम किचन तोही भाड्याचा होता याच्याकडे.वडिलार्जितही काही संपत्ती नव्हती.तिच्या सागरने शुन्यातून हे ऐश्वर्य निर्माण केलं त्यात त्याचं तिच्याकडे दुर्लक्ष झालं पण त्याच्या मनात मात्र अजुनही त्याची पुनमच होती.
पुनमला स्वत:चीच लाज वाटू लागली.सागर एवढा एकपत्नीव्रती असुनही ती मात्र प्रविणच्या मधुर बोलण्याने वहावत जाऊन तिच्या सागरशी प्रतारणा करत होती.पुनम हॉलमध्ये गेली व तिने प्रविणशी चाटींग सुरु केलं.प्रविणला सांगितलं.,प्रविण तुझ्या कौतुकाला मी बळी पडत होते.आत्ता असं होणार नाही.मी तुझ्यात वहावत चालले होते.माझ्या सागरने मला मात्र वहावत जाण्यापासून वाचवलंय.मी माझ्या सागरचीच आहे व सागरचीच राहीन.
सागर पाठी येऊन तिचं चाटींग पहात होता. पुनमच्या लक्षात आल्यावर पुनम दचकली.सागरने प्रविणशीही चार महत्त्वाच्या गप्पा मारल्या.त्याला सांगितलं,लेका तुझी बायको संभाळ.तिचं कोडकौतुक कर.लोकांच्या बायकांचं नको रे करुस.
प्रविणला अगदीच थोबाडीत बसल्यासारखं झालं.
पुनम सागरला सॉरी म्हणाली व रडू लागली.सागरने तिला आपल्या कवेत घेतलं व म्हणाला,”चूक तुझ्याइतकीच माझीही आहे.मी तुला ग्रुहीतच धरत आलो.तुझ्या गरजांकडे कधी माझं लक्षच गेलं नाही.आत्ता असं होणार नाही “म्हणत त्याने तिची आसवं पुसली व हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकले.दोघांचं चाळीशीनंतरचं प्रेम बहाव्यासारखं बहरुन आलं.
—— गीता गजानन गरुड.
्