निसटलेल्या क्षणांची आठवण- लहानपण देगा देवा

Written by

लहानपण म्हणजे कडु गोड आठवणींचा मेळा. लहानपण म्हणजे निरागसता. लहानपणापासुन साठवलेल्या खजिन्यात नात्यांची गुंफण कशी सुरक्षित असते याचे समाधान वाटते. या आठवणींनी भरुन येणारे आपले मन आपल्याला भूतकाळात नेऊन एक एक पदर उलगडत जाते आणि आपले मन सुखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागते.
या सुखाची सुरवातच होते मुळी कुटुंबा पासुन. घरात असणारे आजी-आजोबा यांचा दरारा आणि धाक असायचा. त्यांच्या खालोखाल आई-बाबा, काका-काकू या सर्वांचा प्रेमाचा वरदहस्त मुलांवरती राहायचा.
आई कधी गावाला जरी गेली तरी कधीच उणीव भासायची नाही, कधीच असुरक्षितता जाणवायची नाही. सर्वजण एकत्रितपणे, आनंदाने राहात असल्यामुळे माझे-तुझे असं काही नव्हते.
त्यावेळी प्रपंच मोठा म्हणजे घरात एकुण सात आठ मुले असायचीच. त्यामुळे नुसता गोंधळ, मजा , मस्ती, रुसवा-फुगवा, छोटी छोटी भांडणे व्हायची. त्या नंतर ,
कट्टी बट्टी बाल मट्टि,
लिंबाचा पाला तोडू नको,
बारा महिने बोलू नको, जा जा जा.
असे गीतही म्हणून व्हायचे. पण त्या बालमनावर कधीच इतका वेळ राग रहायचा नाही. परत जैसे थे!
कुटुंबा सोबतच आपल्याला जोडुन ठेवणारी, नात्यांची ओळख करून देणारी, आपल्याला सुरक्षित ठेवणारी आपली वास्तु. जुन्या घरांच्या मातीचा सुगंध देऊन मन प्रफुल्लित करणारी जागा. थंडगार माळवदाखाली उत्स्फूर्तपणे हुंदडणारे बाल गोपाल, झोपाळ्यावर बसून उंच झोका घेतांना म्हटलेले पाढे, एकमेकांच्या कविता तोंडपाठ असत. उंच झोका घेतांना मध्येच धक्का लागून कोणी पडले तर आईच्या हातचा धम्मकलाडू तयार असायचा. तो आठवला तरी अजूनही…..
चटकन डोळ्यांच्या कडा लावतात. नको गं मारू त्याला!असे म्हणत चटकन जवळ घेणारी आजी आणि काकु.
निरागसतेच्या ओढ्यात चिंब होऊन थरथरणार आपलं भाबडे मन…. गावाकडे राहात असल्याने दर रविवारचा नियम असायचा. आजोबा आणि वडिलांसोबत शेतात जाऊन काम करणे, विहिरीचे पाणी शेंदणे, झाडावर चढणे, नदी मध्ये पोहायला जाणे, डोंगर चढून परत खाली येणे, दमल्यानंतर आईने सोबत बांधून दिलेली ठेचा भाकरी आणि कांदा याची मेजवानी चाखायची आणि संध्याकाळच्या आत घरी परत यायचे. मनोसोक्तपणा,उनाडपणा करायचा, निसर्गाच्या सानिध्यात, मोकळ्या हवेत श्वास घेणे काय असते याचा अभूतपूर्व आनंद घेण्यासाठी मला वाटते परत “लहानपण दे गा देवा “.
पहाटे उठण्यासाठी आजोबांनी लावलेला चाबीच्या घड्याळाचा गजर अजूनही आठवतो. झोपण्याआधी गजर होण्यासाठी घड्याळ्यात चाबी भरायची म्हणजे नेमके काय याची उत्सुकता मात्र ताणुन राहायची. सगळ्यांच्या आधी आजी उठायची. सडा-सारवण आणि सुरेख काढलेली रांगोळी बघून मन प्रसन्न व्हायचे. थेंबांच्या रांगोळीतून एकसमानता, एकसंघता आणि रेषेद्वारे एकमेकात गुंफण्याची, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याची सुंदर कला लहानपणीच शिकायला मिळाली.
उठल्यानंतर दात घासायची मज्जा काही वेगळीच. हातावर काळे मंजन घेऊन तेही बोटांनी थोडे थोडे घेऊन दात घासायचे. कोणाचे दात पांढरेशुभ्र कोणाचा, कोण पहिले दात घासणार यावर जणू छोटीशी स्पर्धाच असायची. ज्याचे लवकर आवरले तो मात्र इतरांना चिडवायला मोकळा होत असे.
जरासा उठायला उशीर जरी झाला तर चहा मिळायचा नाही. त्यामुळे नाश्त्या पर्यंत वाट बघावी लागायची. त्यानंतर चुलीवर मांडलेलं तांब्याच्या हंड्यातील गरम पाणी. हाता पायाला तेल व बेसन लावून देणारी आई, पहिले कोण अंघोळ करणार यावरून घातलेल्या वादात ऐकू येणारी बाबांची डरकाळी…. मग ज्याची शाळा लवकर त्याचा पहिला नंबर हे माहित असूनही लुटुपुटूची लढाई व्हायची.
शाळेचीही वेगळीच मज्जा. कोणाची शाळा सकाळी सातला तर कोणाची दुपारी बारा वाजता. तरीही सर्वांनी मात्र सोबतच आवरायचे असे. त्यातल्या त्यात अभ्यास अपूर्ण राहिला किंवा खोड्या केल्या तर शाळेत मिळालेली शिक्षा किंवा त्याला कोंबडा कसं बनवलं हे मात्र घरी आल्यावर न विसरता सांगून पोटभर हसत असणारे चेहरे अजूनही आठवतात.
शाळेतून येताना शाळेपाशी मिळणारे चिंच, बोर, आवळे, तळलेले पोंगे, खोबरा गोळी, भिंगरी हे सर्व चाखायची गंमत लहानशा मनावर आनंद देऊन जात होती.
घरून मिळणारे पाच पैसे ,दहा पैसे आणि पंचवीस पैसे त्यातच आमची खरेदीची दुनिया काही न्यारी असायची. काय घेऊ आणि काय नको असे होऊन जायचे आपण स्वतः खरेदी करत असलेल्या आणि तोंडाला पाणी सुटणाऱ्या या वस्तू मिळाल्या तर तब्येत एकदम खुश होऊन जायची. त्यातल्या त्यात जी मैत्रिणींमध्ये वाटाघाटी चालायची त्याचा आनंद मात्र अनुभव घेतल्याशिवाय कुणालाच मिळणार नाही.
त्यावेळी मनोरंजनाचे साधन म्हणजे दुरदर्शन संच आणि रेडिओ. चित्रहार, रंगोली, विक्रम वेताळ, रामायण, महाभारत, एक शुन्य शुन्य अशा अनेक कार्यक्रमांची ठराविक वेळेत रेलचेल असायची. इतर वेळी मात्र टिव्हीवर मुंग्याच दिसायच्या. त्यामुळे एकत्र कुटुंबासोबत घालवलेला थोडासा वेळ समाधान देऊन जायचा.
राहिलेल्या वेळेत अभ्यास पूर्ण झालाच पाहिजे नाहीतर उपाशी राहण्याची शिक्षा तयार असायची. मध्येच कधी विमानाचा आवाज ऐकू येई त्यामुळे मनातील अधीरता ओठांवर यायची.
” किती मौज दिसे हि पहातरी
जे विमान फिरते अधांतरी “, कधी मित्र मैत्रिणींनी मारलेली आरोळी ऐकू येई. मग काय टाईमपास….
संध्याकाळी न चुकता खेळायला जाणे हा दिवसातला आवडता विषय. संखल, नदी का पहाड, लपाछपी, लघोरी, काचापाणी, मोक्षघट अशा अनेक खेळांमुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज भासत नसे.
खेळुन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून देवाला नमस्कार आणि प्रार्थना.
पावसाळ्यात तर शाळेला मारलेली बुट्टी… पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या …जवळ छत्री असुनही पावसात मनसोक्त चिंब भिजणे… उड्या मारणे…. ऊन पावसाच्या या खेळात निसर्गाने मुक्तपणे उधळलेले इंद्रधनू बघत बसणे… मित्र मैत्रिणींची चेष्टा मस्करी करणे…. यामुळे वेळेचे भान नसायचे. मग ओरडा खाऊ नये म्हणून आई आणि आजीच्या पदरामागे लपायचे.
उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात तर मात्र मीठ लावलेली कैरीची फोड, आंब्याची गोडी, टरबुजाचा गोडवा, कच्चा चिवडा ,माठातील थंडगार पाणी, घुसळलेल ताक, तर शेवट कुरडया, पापड ,शेवया यांनी व्हायचा. मध्ये मध्ये एक ब्रेक असायचा, ओसरीत भाजीचे दुकान सुरू व्हायचे .तर मध्येच एखादी रिक्षा चालायची तर कधी झुकझुक गाडी…असा न थकणारा प्रवास कधी मामाचे गाव तर कधी आत्याचे गाव फिरुन व्हायचा.
साध्या टेबलफँनची हवा मात्र कधी गरम जाणवलीच नाही. रात्री मात्र थंडगार झालेल्या गच्चीरूपी पत्र्यावर कधी पत्यांचा डाव रंगायचा तर कधी निरभ्र आकाशाकडे बघुन चांदण्याचा अभ्यास करायचा. सरते शेवटी मात्र आजीची सागितलेली गोष्ट ऐकूनच निद्राधीन होत असत.
सुखाने हुरळून न जाता आणि दुःखाने गांगरून न जाता प्रत्येक परिस्थितीवर मात कशी करायची याचे बाळकडू लहानपणा पासूनच मिळते.
असे हे न विसरता येणारे बालपण पुन्हा नव्याने जगायला मिळु दे अशी देवाकडे प्रार्थना आहे.

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा