“नेक दिल” बनण्याची धडपड….

Written by

कधीकधी आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, त्यामुळे आपल्याला जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो.

मी उशीराने माझं डाॅक्टरकी शिक्षण केलं. लग्नाआधी नर्सची डिग्री होती पण डाॅक्टर मुलाशी लग्न केल्यानंतर मला त्याप्रमाणे शिक्षण घ्यावं लागलं आणि मग सुरू झाली माझी जगण्यासाठीची खरी लढाई…..

आतापर्यंत मला खुप वेगवेगळे अनुभव आले पण त्यातलाच एक अनुभव अजूनही माझ्या स्मृतीपटलावरून जात नाही.

साधारण नऊ वर्षापूर्वी मी माझं शिक्षण केल्यानंतर क्लिनिकला  प्रॅक्टिस करायला सुरूवात केली. माझे मिस्टर दुसरं क्लिनिक करायचे आणि मी नविन क्लिनिकला प्रॅक्टीस करत होते.

माझ्या क्लीनीक मधे एखादाच पेशंट यायचा कारण माझं क्लीनीक नवीन होतं आणि आजुबाजूला आधीच जम बसलेले खुप क्लीनीक होते. माझ्या लाईफचा वेटिंग पिरेडच होता तो म्हणूनच  पेशंट येऊ अगर न येऊ तिथेच बसून राहणं मला भाग असायचं.

एकदा मी क्लीनीक बंद करून निघायच्या वेळी साधारण एक ५६/५७ वर्षाची बाई आली अाणि मला म्हणाली,

” माई ! बहुत तकलीफ है । दवा दो गी क्या”॥….

मला तिचं बोलणं ऎकून अगदीच कसंतरी झालं. माई म्हणजे ‘आई ‘, ती बाई झारखंड साईडची, बिल्डिंग कन्स्ट्रंक्शनवर बिगारी काम करणारी होती. कामावरून तशीच इकडे औषधांसाठी ती आली होती ….

मी तिला बघितलं आणि काही औषधं दिली.  ती जाताना म्हणाली,

‘माई ! अभी खोली हो का डाक्टरी ‘? …. मी होकारार्थी मान हलवली ……मग ती म्हणाली “माई तेरी बरकत होगी” म्हणत तीने तिच्या  कळकटलेल्या सिमेंट-मातीच्या हाताने मला मायेने गालावर हात फिरवला आणि ती गेली.

नंतर ती नेहमी माझ्याकडे औषधांसाठी यायची. शेवटी मी तीची फॅमीली डाॅक्टरही झाले. तिच्या ओळखीनेही बरेच पेशंट येत गेले. कधीतरी कामावरून जाता-येता ती मला आवर्जून भेटायची. साधारण तिन महिन्याच्या आतच क्लिनिकमधे माझा चांगला जम बसला.

सगळंकाही एकदम छान चालू होतं आणि त्यातच एक दिवस त्याच पेशंटला तिचा मुलगा माझ्याकडे घेऊन आला.

मी तीला पाहिलं तर तीला दरदरून घाम फुटला होता. श्वास घ्यायलाही खुपच त्रास होत होता. बिपी पाहिला तर २०० पर्यंत तिचा बिपी वाढला होता. ती कार्डिआक अरेस्ट मधे होती. थोडक्यात तिला हार्ट अॅटॅक आला होता. हाॅस्पीटल सेट अप सहीत तीला व्हेंटीलेटर लागणार होता. सगळे डिसीजन पटापट घ्यायचे होते. मी एकीकडे अॅम्बुलन्सला फोन लावला आणि मग तिच्या मुलाला सगळी परिस्थीती समजावून सांगितली.

पण ती मात्र ऎकायला तयारच नव्हती. इतका त्रास होत होता तरी ती माझ्या एक्झामीन टेबलवरून उठतंच नव्हती,फक्त एकच म्हणत म्हणत होती….

“माई तू ठीक कर दे , अब हम ना बचब “

पहिल्यांदा मी स्वतः ला खुप हतबल समजत होते.

एकतर माझ्याकडे तेवढी डिग्री नव्हती तरी इमर्जन्सीमधे जे काही करावं लागतं ती सगळी ट्रीटमेंट मी तिला देत गेले. पण तीला ज्या गोष्टींची गरज होती ते माझ्या क्लिनिक मधे नव्हतंच. आणि तिला चांगली ट्रीटमेंट मिळून तिचे प्राण वाचावे यासाठी माझी धडपड चालू होती. अॅम्बुलन्स लगेच पाच मिनिटांतच आली. आम्ही तीला अॅम्बुलन्समधे घालण्यासाठी जबरदस्तीने उचलत होतो. माझी बेचैनी वाढतच होती.

“आपला पेशंट आपल्याकडून बरा व्हावा हे ख-या डाॅक्टरांना वाटतच असतं”. …..माझी हतबलता वाढत होती तरी ती कोणाचंही ऎकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

माझ्या पेशंटचा तिच्याच हट्टापाई हकनाक बळी जात होता. तिलाही माझी हतबलता जाणवत होती पण तरीही तीला हाॅस्पीटलला जायचं नव्हतंच …..

तिने मला पहिल्या भेटीसारखंच तिच्या त्या कळकट हातांनी गालावर हात फिरवला अन् म्हणाली,

माई तू बहुत “निक दिल हो, बहूत बरकत करबू ……याचा अर्थ असा की, तू  खुप छान ह्रदयाची आहेस तुझी खुप भरभराट होईल. त्रासातही तिच्या चेहऱ्यावर एक अजबच हसू होतं. अन् इतक्या त्रासातही तिला असं बोलणं का बरं सुचावं  हे मला काही केल्या समजत नव्हतं.

इतक्या दिवसांत तिचं आणि माझं न जाणे असं कुठलं नातं जुळलं होतं की, मला तिच्या अशा वागण्याचा त्रासच होत होता. कदाचित तिला समजलं असावं की, आता तीची अखेर आहे म्हणून ……ती इतकं बोलली आणि मला का कोणास ठाऊक तिच्या डोळ्यात वेगळीच चमक जाणवली. आणि आता मी ही  समजून गेले की, ती आता शेवटच्या प्रवासाला निघालीये.

अॅम्बूलन्स समोरच होती, डाॅक्टरही होते आणि तरीही तिने शेवटचा श्वास  घेतला. माझ्या हातात तिचा तोच कळकट हात होता.आणि ‘माई’ ची हाक माझ्या कानात घुमत होती.

ती तिच्या कळकट हाताने मला आशीर्वाद देऊन गेली होती. फारतर पंधरा मिनिटांचा हा सगळा खेळ होता आणि मला आयुष्यभराचा माणूसकीचा धडा शिकवून गेला. तिला अॅम्ब्यूलन्समधे घेऊन पुढची ट्रीटमेंट जरी सुरू केली असती तरी ती कदाचित वाचली नसती पण तरीही तिने ट्रीटमेंटसाठी हाॅस्पीटलला जावं यासाठी माझी धडपड होती.

“एक डाॅक्टर आणि सोबत ‘माणूस’ बनून राहणं एवढंही अवघड नसतं हे मी ह्यातून शिकले होते”.

त्यानंतर मी कधीच मागे वळून बघितलं नाही. गडगंज संपत्ती नाही पण खाऊन पिऊन सुखी आहे आणि इतरांना मदत करू शकते एवढी सक्षमही मी झाले. रोजच्या कामातूनही समाजसेवा करत मी “नेक दिल” बनण्याचा प्रयत्न अजूनही करत आहे.

“आपण केलेलं चांगलं काम कोणीतरी बघत असतं असं मला वाटतं म्हणूनच त्याच कामाची पावती म्हणून कुठलीतरी शक्ती आपल्याला नेहमी सोबत करत असते”.

©Sunita Choudhari.

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत