नेत्यापेक्षा नातं महत्वाचं … कार्यकर्त्यांनो विचार करा …!

Written by

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. प्रत्येक शहरात, गावगावात कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या प्रचारासाठी कंबर कसून कामं करत आहेत. ज्याला त्याला आपला नेता प्रिय, दुसऱ्याच्या नेत्यापेक्षा वरचढ, आपलाच नेता एक नंबर वाटतो इथं पर्यंत ठीक आहे. पण कार्यकर्त्यांनो कधी विचार केला का ? तुमचे दादा,नाना,अप्पा,मामा,भैय्या,साहेब खरंच इतके महत्ववाचे आहेत का ? जितके तुम्ही मानता.

आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की असा प्रश्न का आणि तसे ही आमचं उत्तर जवळपास होच आहे. पण हा मुद्दा आणि प्रश्न उपस्थित करण्याचं कारण ही तसेच आहे. काल आपल्या तालुक्यातील एका गावामध्ये दोन सख्या भावात तुंबळ हाणामारी झाल्याचे कळाले. बरं वादाचा विषय जमीन, पैसा, किंवा इतर वैर असते तर योग्य होते. परंतु वादाचा विषय होता दोघांची नेते मंडळी. दोघे दोन वेगवेगळ्या नेत्यांचे समर्थक आणि आपापल्या नेत्याला श्रेष्ठ किंवा लई भारी ठरवण्याच्या नादात दोन सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी होऊन जीवावर उठले होते.
( ©खादीम सय्यद)
दूर कोठून तरी आपल्या एअरकंडिशन ऑफिस मध्ये बसून आपली राजकीय पोळी भाजणारे पक्षश्रेष्ठी तसेच स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकून राहावं म्हणून त्यांच्या मागे पुढे करणारे स्थानिक नेते हे महत्वाचे असतील ही, पण या सर्वांच्या आधी आपली रक्तातील नाती, मित्र परिवार हे त्यांच्या पेक्षा कितीतरी पटीने महत्वाचे आहेत.

राजकारण आणि नातेसंबंध दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत आणि त्यांना त्या पद्धतीने हाताळता आले पाहिजे. राजकारण करा एकमेकांना हवं ते बोला मात्र या सोबतच नातेसंबंध जपा, दूर असलेल्या नेत्या पेक्षा जवळ असलेले आई वडील, भाऊ,मित्र नातेसंबंधातील लोक खूप जास्त महत्वाचे असतात हे विसरू नका. (©खादीम सय्यद)

स्व.गोपीनाथ मुंडे आणि स्व.विलासराव देशमुख दोन वेगवेगळ्या पक्षाचे मुख्य नेते होते. त्यांनी आपापला पक्षधर्म निभावला पण सोबतच दोघांनी एकमेकांवर जीव ओतून देणारं मैत्रीधर्म ही निभावला. त्याच प्रमाणे स्व. बाळ ठाकरे आणि शरद पवार यांची देखील मैत्री तितकीच घनिष्ट होती. तसेच ते नातेवाईक ही आहेत. धनंजय मुंढे आणि संभाजी पाटील निलंगेकर हे दोन्ही नेते दोन वेगळ्या पक्षाचे कट्टर समर्थक आहेत पण तितकेच जवळचे मित्रही आहेत. या सर्वांनी वेगवेळ्या पक्षाचे नेतृत्व केले.राजकारण केले पण कधीच राजकारणाला आपल्या नातेसंबंधामध्ये आणले नाही.(©खादीम सय्यद)

कित्येक वेळा नेता रात्रीतून पक्ष बदलतो, पक्षाचा झेंडा बदलला जातो मात्र दांडा तोच राहतो. गावात पक्षांसाठी नेत्यांसाठी एकमेकांचे वैरी झालेल्या दोन गटांना एकत्र येऊन काम करावे लागते आणि एखाद्याला नेत्यांसाठी आपल्याच सहकारी मित्र किंवा बंधू पासून लांब व्हावे लागते. कधी कधी तर सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. कितीतरी कार्यकर्त्यांना आपल्या आई वडिलांना काय हवं या पेक्षा नेत्याला काय काय हवं असत हे पक्के ठाव असते. या वरून तुम्हीच विचार करा जन्म देणारे आई वडिलांना पेक्षा नेता किती महत्वाचा वाटतो. नेता महत्वाचा वाटावा पण नेत्यापेक्षा नातं कितीतरी पटीने महत्वाचं असतं हे विसरून चालणार नाही. म्हणूनच म्हणतो कार्यकर्त्यांनो विचार करा….!
(©खादीम सय्यद)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा