नोकरी आणि माझा बा भाग एक

Written by

 

नोकरी आणि माझा बा भाग १

साधारण 1944-45 च साल असेल.आजुनही जातीच्या गुलामीतून बाहेर न पडलेला भारत तेव्हा इंग्रजांच्या सोज्वळ पारतंत्र्यात होता.सम्पूर्ण देशभर स्वातंत्र्याचं वार सुरू होतं. प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याची आग होती.आणि अश्या या वातावरणात या सगळ्यापसून अनभिज्ञ असलेली,रोजच्या एक वेळच्या जेवणा ला महाग असलेली कित्येक माणसं भारतातल्या खेडेगावात भुकेची गरिबीची,बहिश्कृत्याची लढाई लढाई लढत होती.वझरे हे त्यातलंच एक गाव जिथे आज ही गावातला एखादा पांडबा, बंडबा,इष्णू प्रत्येक ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रगीत सुरू असताना म्हशी हाकत जाताना दिसतो.
महादेव शिवा महार हे 12-13 वर्षाच पोरगं ,ज्याच्या मनात ही सुरू होत एक युद्ध.घरची पिढीजात गरिबी,पण जन्माने मिळालेली हुशारी आणि महार जात,या सगळ्याची सांगड घालत जुनी चौथी पास झालं आणि आपल्या बा कडं पुढं शिकण्यासाठी पुस्तकांचा हट्ट धरू लागलं.शिवाचे तीन भाऊ .एकाच घरात तीन चुली मांडून आपापलं आयुष्य रेटत होते.
रात्री सगळ्यांची जेवण झाली .जेवण कसली ज्याच्या त्याच्या बायकांनी गावातून मागून आणलेलं शीळ पाक .तेच जेवण,त्यातल ही दुसऱ्या दिवसासाठी राखून मग खाल्लेलं.
सगळे लगी (पडवी/ओटी)वर आले.
शिवा महार म्हणाला
‘दादा…!पोरगं चौथी पास झाल
पोरगं पुढं शिकायचं म्हंणतंय.
पाचवी झालं तर मास्टर नोकरी बी लावतो म्हंटलाय..कस करायचं..?
उद्या बाजाराला काठ्या इकुन येताना पुस्तक आणायचं म्हणतोय”

“तुझं पोरगं नोकरीला लागुण तुझं घर बघिल आमचं काय..?”…थोरला भाऊ

“पर मग शाळा शिकतो म्हणतंय ते तरी …?”

“याद राख उद्या येताना पुस्तक घेऊन आलास तर…!
भांडणं व्हईल…सांगितलं नाही म्हणशील”…थोरला भाऊ

“आर पर दादा…?”

“ते काय नाही..”
त्या रात्री दोघांचं कडाक्याच भांडण झाले..
लहानगा महादू सगळं बघत होता
त्याला समजत नव्हतं त्याच्या शाळे न नेमकं काय होणार होतं..
शिवा सगळ्या भावात लहान..आणि थोडा भित्रा ही..त्याला कळणा काय करायचं..?पोरा ची शाळा बघायची की भावा संग भांडण करायाच.
त्यानं अंथरुणावर अंग टाकलं.पण डोक्यातला ईचार काही झोपू देत नव्हता.,महादू येऊन बा च्या शेजारी पडला.

“बा उद्या मला पुस्तक आणायची हा…!”

आणू म्हणून शिवा महारानं त्या च्या तोंडावरून हात फिरवला.पण त्याच्या डोक्यात मात्र चक्र फिरत होती,गरिबी,जात,भूक,शिक्षण…चिखलातला जन्म..,भांडण करीन म्हणणारा भाऊ.
रात्र भर त्याच्या डोळ्याला डोळा नव्हता.
सकाळ झाली.शिवा उठला.काठ्यांच वज्ज डोकीवर घेतलं आणि बाजाराकडे निघाला.तेव्हड्यात महादू न परत हाळी केली
“बा पुस्तक….?”
पोरांचं तो निरागस चेहरा बघून त्याला काय बोलव सुचेना.त्यानं मान हलवली आणि तो बाहेर पडला.
25-20 किलोमीटर ची पायपीट करत बाजारात पोचायला त्याला 2 वाजले.
त्यानं काठ्या इकल्या. थोडा बाजार केला.आणि पुस्तकांच्या दुकानाकडे वळला.आणि त्याला थोरल्या भावाचे शब्द आठवले.
उद्या जर पुस्तक घेऊन घरात आलास तर भांडण…
काय करावं समजेना,शिकायची इच्छा असलेल्या पोरकड बघायचं की भावाकडे…?भुकेकड बघायचं की भविष्याकड…?
डोक्यात विचार फिरू लागले.
शेवटी अडाणी भूक आणि आंधळी माया आणि त्या आड दडलेली भती वरचढ ठरली.त्याची पावलं माघारी फिरली.पाठीमागे जातं(पीठ दळायच)इकरणार बसला होता .त्यानं ते जातं इकत घेतलं .हातातलं पैस त्याला दिल आणि ते जातं डोकीवर घेऊन घरचा रस्ता धरला.
पाय भाजत होत,प्रत्येक पावला गणिक घर जवळ येत होतं आणि दारात उभ्या असलेल्या महादू ला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न त्याच्या मनात घोळत होता.
डोक्यावर असलेल्या जात्यात जणू त्यानं पोराच शाळेचं स्वप्न दळून दळून अगदी बारीक कण करू नाहीस केलं होतं.
सूर्य मावळतीला यायला तो गावात पोचला.म्हारोड्यात आला.दाराला टेकून हातात पाटी बाबाची वाट पाहणारा महादू बा ला बघून हरखला.पाटीवर लिहिलेलं नाव दाखवायला आणि आणलेली पुस्तक आणायला तो पुढे धावला.

“बा पुस्तक….?”

आपल्या निरागस पोरांचं ते निरागस बोल ऐकून शिवाच काळीज कापल्या वाणी झालं.डोळ्यात पाणी होत .त्यानं पोराच्या तोंडावरून हात फिरवला.आणि थरथरत्या आवाजात म्हणाला

“पोरा शाळा सुटली लेका तुझी आज पासनं….!”

महादू च डोळ पाण्याने डबडबल.डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं.सुटणारी शाळा दिसत होती…रडणारा बा दिसत होता..विस्कटणार स्वप्न दिसत होतं…तो रडत होता..
आणि त्याच्या डोळ्यातून ओघळणार्या अश्रूंनी पाटीवर लिहिलेलं नाव निम्मं अर्ध पुसत आलं होतं……

क्रमशः…

✍️अजित

हा लेख पप्पा,आणि माझे आजोबा यांच्या शिक्षणाबद्दल असलेल्या ओढ,त्याग ,जिद्द याला प्रेमाने,आणि आदराने अर्पण

Article Categories:
शिक्षण

Comments are closed.