नोकरी आणि माझा बा भाग 2

Written by

वयाच्या 12 व्या वर्षी महादू च्या हातातली पाटी गेली आणि ढोर हकायची काठी आली.घरच्यां च्या पुढं हात टेकलेला त्याचा बा त्याच्या शिक्षणासाठी काहीच करू शकला नाही.तेव्हापासून त्याच्या कष्टाची मालिका सुरू झाली ती त्याच्यां शेवटच्या घटिकेपर्यंत तशीच सुरू राहिली.पण जुनी चौथी शिकलेला माझा आजा जेव्हा वयाच्या 80 व्या वर्षी गणितातली पावकी,निमकी, अडीजकी,30 पर्यंतचे पाढे तोंडपाठ म्हणे तेव्हा त्या तल्लख बुद्धीची कल्पना येई.
काळ लोटत गेला ऊस तोड,गुळाच्या घाण्यावर, खाणीत सुरुंग लावण्यासाठी वापरल्या जाणार्या ड्रिल मशीनवर काम करत करत महादू मोठा होऊ लागला आणि त्या कष्टातून तावून सुलाखून निघता निघता त्याच्या मनातील शिक्षणाची आस्था अजूनच बळकट होत गेली.त्याला माहिती होत आपली शाळा सुटली आणि आपल्या वाट्याला हे असलं कष्टाचं जीवन आलं.त्याला परिस्थितीचा राग यायचा आणि तो अजून जोमानं कामाला लागायचा,स्वतःला कामात गुंतवून घ्यायचा.
वर्ष सरत गेली, महादूच लग्न झालं.कमळाबाई. माझी आजी.खूप जीव होता तिचा माझ्यावर.दोघाचा संसार सुरू झाला.पहिला मुलगा झाला..आणि त्याच्या मनातील शिक्षणाच्या इच्छेला परत पालवी फुटली.त्या मुलाच्या चेहऱ्याने त्याला त्याच्या गरिबीचा अंत दिसू लागला.पण दुदैव इथेही त्याच्या मागे होत.मुलगा जन्माला तर आला पण जन्मजात अपंगत्व घेऊन आला.महादू वर लय जीव होता त्याचा.
पण काळाने त्याला ही हिरावून नेल. महादूच स्वप्न परत मातीत मिळालं.
तो आतून तुटत गेला.आणि अश्यावेळी त्याला सावरायला त्याच्या पाठी खम्बीर पणे उभी होती कमळा बाई.तिने त्याला धीर दिला आणि तो पुन्हा जोमानं कामाला लागला. पण मनातली शाळेची आग काय स्वस्थ राहू देत नव्हती.अश्यातच कमळाबाईला परत दिवस गेले.परत एकदा मुलगा झाला.महादू परत आनंदून गेला.त्याच्या मनातल्या शाळेच्या आगीला परत एकदा फुंकर मिळाली. आणि त्या आगीत त्याच दारिद्र्य हळू हळू जाळून राख होताना त्याला दिसू लागलं.
महादू न पोराचं नाव कृष्णा ठेवलं.पोरगं मोठं होऊ लागलं.आणि त्याच्या मोठं होण्या सोबत महादू त्याला शाळेत घालण्याची मोठा साहेब बनवण्याची स्वप्न बघू लागला.त्याच्या शाळेसाठी लागणार पैसा गोळा करण्यासाठी अजून मेहनत करू लागला.
आणि त्या पोराच्या जन्मानं महादूच्या घराण्यातील शिक्षणाच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात होत होती..

क्रमशः..

✍️डॉ अजित सुगंधा कृष्णन

Article Categories:
शिक्षण

Comments are closed.