नोकरी आणि माझा बा भाग 3

Written by

नोकरी आणि माझा बा भाग

कृष्णा जसा जसा मोठा होत होता तस महादूला त्याचं दुःख,दारिद्र्य दूर पळताना दिसत होतं.आपल्या हसणार्या पोरकडं बघून त्याला अजून हुरूप येत होता.रोजचा कष्टचा एक दिवस मागे पडला म्हणजे आपला भोग एक दिवसांन कमी झाला अस तो मनाला समजावत होता.आणि दुसऱ्या दिवशी परत जोमानं कामाला लागत होता.वर्ष सरत गेली कृष्णा कळतेला झाला आणि महादूनं त्याला शाळेत घालायचा निर्णय पक्का केला.पण गावात शाळा नव्हती.गावापासून काही 6-7कोस दूर चिमणे गावात शाळा होती.त्या शाळेत कृष्णा ला पहिल्या वर्गात घातलं.महादू जवळ जवळ 15-20 वर्षांनी शाळेची पायरी परत एकदा चढला.आपलं पोरगं शाळेत जाताना बघून त्याला भरून आल्यासारखं झालं.त्यानं पोराच्या तोंडावरून हात फिरवला आणि म्हणाला

“पोरा आपल्याला या चिखलात न्हाई राहायचं…!
मला तुला माझ्यावानी चिखलात काम करतेल न्हाई तर मास्तर झालेलं बघायचं आहे…”

खूप मोठा अर्थ दडला होता या शब्दात .अर्थात लहानग्या कृष्णा ला तो तेव्हा समजला नसावा कदाचित.
कृष्णा ची शाळा सुरू झाली आणि महादूच्या गरिबीला ग्रहण लागलं.पण महादूच्या खानदानातला शिक्षणाचा हा अध्याय ही काही सुलभ नव्हता.आज जरी आपल्या दारात गाडी ,रोजचा डबा,शाळेत जेवण,डीजीटल शिक्षण सगळं आलबेल जरी असलं तरी 65 च्या त्या कालखंडात महार जातीच लेबल घेऊन जन्माला आलेल्या एका अति सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या या पोरासाठी मात्र हे खूप कठीण होतं
रोज सकाळी पांदि च्या वाटणं शाळेला जायचं..दोन्ही बाजूने लोकांची शेती…ती तुडवली जाऊन नये म्हणून दोन्ही बाजूने केलेले काटेरी कुंपण..मध्ये गुढगाभर चिखल..काटे मोठाली दगड हे सगळं तुडवीत तुडवीत कृष्णा आणि त्याची बाकीची मित्रमंडळी शाळेत जात.पण खरी गम्मत तर पुढे असे
हे महाराच पोर असल्यामुळे शिवाशिव होईल म्हणून बाकीची पोर जरा फटकून च वागत.पण त्यातून ही कृष्णा न दोस्त बनवले होते.पण किती केलं तरी ती लहान पोर,त्यांच्या मनात काही नसलं तरी त्या बालमनावर घरातून झालेले संस्कार कसे पुसले जातील..?घरच्यांच्या भीती पाई किंवा मोठ्यांच अनुकरण करून म्हणा पण त्यांच्या वागण्यातला फरक कृष्णा ला जाणवत होता.आनि तो ही त्यांच्या पासून थोडा घाबरून किंवा दचकून वागत होता.
महादूनं पोराला शाळेत तरी घातलं पण शाळा ही त्याच्या पोराला च शिकावी लागणार होती.आणि महादूचा आपल्या पोरावर विश्वास होत.त्यामुळे तो निशिंत होता.
शाळेत पोरांची वागणूक ही त्याकाळी साहजिकच होती पण कृष्णाची खरी धांदल उडे जेवणाच्या सुटीत.कोणालाच कळायचं नाही हा पोरगा जेवणाच्या सुटीत कुठे गायब व्हायचा.म्हणजे त्याच्या मित्रांनाही माहिती नसायचं.
कुठे जायचा तो..?
जेवणाच्या सुटीत सगळी पोरं आपापला डबा घेऊन जेवायला बसत.पण कृष्णा कडे डबा कुठून येणार.आणि आणणार तरी काय..?त्याची आई कधी कधी मागून आणलेल्या तला भाताचा एखादा हेंडा नाही तर अर्धी चोक भाकरी देई.पण ती वळून दगडा सारखी झालेली भाकरी घश्याखालून उतरत नसे.त्यामुळे जेवणाची सुटी झाली की कृष्णा शाळेच्या बाहेर पडी आणि काय करें..?
त्या कोरड्या भाकरी संग खायला कोरड्यास कुठून तरी भेटलं तर भेटलं म्हणून तो गावात जाई.. अखंड गावात मागे.. हिंडल्यावर कोणी तरी काही तरी वाडे… कोणी हाकलून देई..
एक दिवस हे त्याच्या गुरुजींनी पाहिलं.
थांब काय करतोस..?

कृष्णा घाबरला..
गुरुजीनि त्याला जवळ बोलवलं
म्हणाले,
इथून पुढे जेव्हा केव्हा जेवणाला काही नसेल तेव्हा माझ्याकडे यायचं…
कृष्णाचा चेहरा खुलला..तो आपल्या जागेवर जाऊन बसला.बाकीची पोर आपापला डबा खाण्यात गुंग झाली होती.त्यानं आपला डबा उघडला.आईनं दिलेली भाकरी होती.जी वळून कधीच दगड झाली होती.पण मास्तरांनी दिलेल्या आधाराने जणू त्या दगडी भाकरीला ही मऊ कोमल पालजी फुटल्या गत झालं होतं.
त्यानं ती भाकरी हातात घेतली आणि एक तुकडा मोडून त्यानं तोंडात घातला. आज ती कोरडी भाकरी ही त्याला गोड लागू लगली होती…!

क्रमशः..

✍️डॉ अजित सुगंधा कृष्णन

Article Categories:
शिक्षण

Comments are closed.