पक पक पकाssक

Written by

मी बऱ्याचवेळा वाचलंय की मुलं जेव्हा आपल्याशी बोलतात तेव्हा आपण अगदी लक्षपूर्वक ऐकले पाहिजे, म्हणजे तरुणपणी (विशेषत: टिनेजमध्ये ) देखील ते प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगतात, त्यांची गुपितं share करतात. मान्य आहे मला हे आणि खूप खूप इच्छा सुध्दा आहे गुपितं जाणून घ्यायची, अहो पण practically हे करताना किती पटीने बेजार व्हायला होतं माहित आहे ?

सातवीतल्या माझ्या ठमीला तिचं शाळेत शिकत असलेलं सारंकाही माझ्या डोक्यात ठासून ठासून भरायचं असतं. विशेष करून माझे नावडते विषय जे तिचे आवडते आहेत …इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान ….?????

जिथे मी देखील स्वतःची अक्कल पाजळू शकते, ते माझे आवडते मराठी, हिंदी, इंग्रजी हे भाषा विषय आणि अगदी गणितसुद्धा यावर चर्चा करण्यात तिला अजिबातच रुची नसते.( चर्चेच्या नावाखाली मम्मी उपदेशाचे डोस पाजते असा गोड गैरसमज करून घेतलाय पोरीने?)

तर ……ए मम्मी तुला माहितीये……….पासून जी गाडी सुरू होते ती इतिहास, भूगोल, शास्त्रातील नानाविविध माहित्या माझ्या डोक्यात बकाबका कोंबूनच थांबते.

आणि मला हे सारं माझ्या चेहऱ्यावर उत्सुकतेचे भाव घेऊन ऐकून घ्यावं लागतं. (त्या गुपितांसाठी फक्त ?)

बया, हाताची घडी आणि तोंडावर बोटचं complsion नाही करत तेच माझं नशीब, कारण मोकळ्या वेळची काम आटपता आटपता ज्ञानार्जन केलेल नाही चालत ठमीला, जरा वाटलं आपली मम्मी मनाने भलतीकडेच फिरतीये, तर हा बोल मी काय सांगितलं आत्ता….. तुला ना माझं ऐकण्यात इंटरेस्टच नसतो…. मी तुला आता काही सांगणारच नाही जा (या डायलॉगच तर पेटंट आहे तिच्याकडे)

हे ही कमीच म्हणून यूट्यूब किड्स वर बघितलेल्या साऱ्या ट्रिक्स, 1 मिनिट, 5 मिनिट वाल्या टिपा माझ्यावर येता जाता सोडल्या जातात. मी इकडे माझ्या आमटीत मिठ टाकलं का नाही …… या पेचात असताना, ठमकाई आरामात कट्ट्यावर रेलून मम्मी तुला माहितीये ची गाडी सुरु करते……….

बटाटा हातात असेल तर तो कसा सोलायचा, कसा कापायचा , कसा पटकन उकडायचा, अंड असेल तर ते ताजं की शीळं ओळखण्यापासून, जळलेलं भांड कशाने घासायचं, सुरीची धार कशी वाढवायची, हे खाण्याचे परिणाम, ते न खाण्याचे दुष्परिणाम यावर अजाण मम्मीला यथेच्छ आणि भरभरून मार्गदर्शन केलं जातं . थोडक्यात मी जी वस्तू हातात घेईन त्यावर मला एक टीप फ्री मिळते.?

ऐकून ऐकून ऐकायचं तरी किती आणि काय काय ? कानाच भजं व्हायची वेळ आली आता, डोक्याचं तर झालंच आहे ऑलरेडी…..(जळो मेली ती गुपितं?)

तशी तिची शाळा, माझी सुटका करते पाच तासांसाठी का होईना……..पण शाळेतून आली की पुन्हा ……….. मम्मी तुला माहीत आहे ची गाडी सुरू, हिने असं केलं त्याने तसं केलं, ह्याच्याशी बोलले तिच्याशी भांडले, लिहिताना हात दुखला, खेळताना पाय मुरगळला, आज जाम बोअर झालं……This and that, That and this ची लांबलचक पकपक, पकपक, पक पक पss काक……

आता बस्स……चूपsss एकदम चूपssss ……एक भी शब्द मुँह से निकाला तो तेरी खैर नही …….खरतर हा डायलॉग तोंडातून बाहेर पडायला तडफडत असतो अगदी …….पण मग ती गोड गुपितं सुद्धा डोळ्यासमोर फडफडत उडताना दिसू लागतात.

झेलते कसं बसं मग, सांगते कोणाला……….?

असो………

मी काय म्हणते ठमाक्का…….आता जशी नाचत नाचत येऊन सारंकाही सांगतीयेस, तशीच पुढेही तुझ्या मनीची सारी गुजं सांग हा मला ………..आवडेल मलाही तुला तुझ्या उमलत्या वयात जाणून घ्यायला…………मैत्रीचा हात पुढे करून तुझी वळणं सुकर करायला…….उपदेश नाही; पण अनुभव नक्कीच share करेन मी, बघ तुला पुरेसा पडतोय का शहाणपण शिकायला………….

तू उड बिनधास्त………….

मागे आहेच मी तुला सावरायला………..!!!!

 

©️स्नेहल अखिला अन्वित

 

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा