…..पर हम तुम्हारे रहेंगे सदा

Written by

काल नंदूच्या हट्टापाई आॅफीसला दांडी मारली होती म्हणून गार्गीचं काम अाज डबल झालं होतं. सकाळी आल्यापासूनच ती पटापटा काम संपवण्याच्या मागे होती. तीला दुपारच्या खाण्याचंही भान राहिलं नव्हतं अशातच संध्याकाळचे सात कधी वाजले कळालच नाही अाणि अचानक जेंव्हा तीचं लक्ष घड्याळाकडे गेलं तेंव्हा गार्गीच्या लक्षात आलं की, अारे आज कामाच्या व्यापात नंदूला फोन करायचंच राहिलंय ती मनातच खजील झाली अाणि घरी जाताना तिच्यासाठी एक मस्त गिफ्ट घ्यायचं तिने ठरवलं आणि परत ती कामात बुडून गेली. आणि तेवढयातच तिचा मोबाईल वाजला. घराजवळच्या शेजारच्या काकांचा फोन होता.

“हा हॅलो काका कसं काय फोन केलात”? असं गार्गी बोलताच तिकडून तिने जे काही ऎकलं ते ऎकताच ती घाबरून, घामेघूम होऊन पळत गाडी काढून घरच्या रस्त्याला निघाली. घराच्या पार्किंग मधे पोहोचताच समोरच्या गर्दीला बाजूला सारत ती घराजवळ आली तोपर्यंत शेजारच्या काकांनी दरवाजाचं लाॅक तोडून नंदूला बाहेर काढलं होतं.

        काळंकुट्ट , लालभडक जळालेल्या नंदूच्या शरीराला कुठून आणि कसं धरावं ह्या परिस्थितीत हाॅस्पीटलला आणलं आणि ICU च्या काचेतून गार्गी नंदूच्या त्या तडफडत असलेल्या शरीराला लाचार, हतबल होऊन पहात होती.

कीती वेळ ती तिथेच स्तब्धपणे उभी होती आणि रात्रीच्या बाराच्या रोजचा अलार्मच्या आवाजाने तीची तंद्री भंग पावली. नंदू ह्याच वेळेत रोज रात्रीची उठून दुध मागायची म्हणून गार्गीने मुद्दाम हा अलार्म लावला होता. पण आज नंदू ह्या वेळेत झुंजत होती पण नक्की कोणाशी?  …..जगावं म्हणून जळालेल्या त्या शरीराशी का आतापर्यंत तिच्या मनावर झालेल्या त्या मानसिक अत्याचाराशी! नक्की कोणाशी लढत होती ती?

          आतापर्यंतचं घडलेलं सगळं काही जसच्या तसं गार्गीच्या समोर आलं.

त्यादीवशी गार्गी खुप खुष होती कारण तीच्या आयुष्यात तिची सोबत करायला घरात नवीन मेंबर येणार होता…..पण हे काय बाळ जनमलं आणि आई वडिलांची भांडणं सुरू झाली. का चालली होती भांडणं ?  ती मुलगी होती म्हणून?  छे छे …….ती नाकारली गेली कारण ती ‘ना धड मुलगी होती ना धड मुलगा’ … ती होती समाजाने नाव दिलेला एक हिजडा!

        तीच्या जन्मानंतर लगेचच हिजड्यांचा एक समूह तिला घ्यायला आला कारण बाबांना समाजासमोर हसू नको होतं. पण आईने तीला त्यांच्या स्वाधीन करण्यास स्पष्ट नकार दिला आणि तिथेच तिचं वैवाहिक आयुष्य संपलं. बाबा आम्हाला सोडून नीघून गेले आणि आईच आम्हाला सांभाळू लागली. लोकांचे टोमणे, हसू यांचा सामना करत ती आम्हा दोघींना वाढवत होती.

इकडे गार्गी मात्र जाम खुष होती तीने बाळाचं नाव तिच्या आवडीने ठेवलं ‘नंदीनी‘ अाणि लाडाने नंदू म्हणायची. नंदूमुळे तिचं आयुष्यच बदललं होतं. नंदू कोण आहे का आहे ह्याचा तीला फरक पडत नव्हता कारण ती तीची फक्त मोठी बहीण झाली होती त्यांच्यात वयाचं फार अंतर होतं म्हणूनच की काय गार्गी नंदूची बहीण कमी आणि आईसारखी काळजी जास्त घेत होती. नंदूच्या जन्मानंतर आई पाच वर्षात एका आजारात जग सोडून गेली आणि सगळी जबाबदारी गार्गीवर आली. काँलेज आणि जाँब करत गार्गी नंदूचा सांभाळ करत होती.

पण जशी नंदू मोठी होत होती तसं तिच्यावर सगळे हसू लागले, टोमणे देऊ लागले.

“ए नंदू नंदीनी का नंदकुमार तू ? म्हणत तीला हिणवायला लागले.”  नंदूची चालतानाची अॅक्टींग करत हाताची टाळी वाजवत तोंडाला चित्र विचित्र बनवत तीला दाखवून देत होते की, ती नक्की कोण आहे.

 इवलसं ते निरागस पोर आपल्या ताईच्या मिठीत शिरून हमसाहमशी रडायचं आणि म्हणायचं “दीदी, नक्की मी मुलगा का मुलगी”? 

      गार्गी तीला जवळ घेत तीला समजेल असं तीची समजूत घालायची. बघता बघता नंदू दहा वर्षाची झाली आणि तिच्यातले बदल आता स्पष्ट दिसू लागले आणि ह्याच कारणाने तिच्या शाळेने तीला नाकारलं. त्या जिवाला कळायचच नाही की तीला शिक्षा नक्की कोणत्या गुन्ह्याची मिळतीये.

पण गार्गीने हिम्मत हारली नव्हती तीने तीचं शिक्षण घरीच करायचं ठरवलं आणि तशी सोय केली कारण तिला पक्कं माहीत होतं की ह्या सगळ्यातून जर मार्ग काढायचा असेल तर शिक्षणाखेरीज पर्याय नाही.

         सगळं काही छान चाललं होतं पण नक्की छान चाललं होतं का की, फक्त छान दिसत होतं? का असा स्वतः ला संपविण्याचा निर्णय नंदूने घेतला असावा?  

‘मी कुठे कमी पडले नंदूला समजून घेण्यात’? असा प्रश्न स्वतःच्याच मनाला विचारत गार्गी रडत होती.

      आपण कोणालाच नको आहोत, सगळे आपल्याला हसतात हे असं सगळं नंदूने आजपर्यंत कसं सहन केलं असेल? कीती वेदना झाल्या असतील नंदूला, या विचारानेच गार्गीला शहारे येत होते. 

आता बास् ! काहीही झालं तरी हिम्मत सोडायची नाही आणि नंदूलाही हारू द्यायचं नाही असा निर्धार करत ती परत ICU च्या काचेतून नंदूला बघत होती आणि बघता – बघता कधी पहाट झाली कळालंच नाही.

पण आजची पहाट काहीतरी वेगळीच होती ती आज जगण्याची नवीन उमेद घेऊन आली होती. सूर्य नवीन पहाट घेऊन प्रकाशाने न्हाऊ माखू घालत होता. तेवढ्यात डाॅक्टरांनी आवाज देऊन सांगीतलं की,  

“आता नंदूच्या जीवाला धोका नाही, पण तीच्या शरीराच्या जखमा मात्र खोल आहेत त्या भरून यायला वेळ लागणार, तुम्ही तिला भेटू शकता.”

          गार्गीने डोळे पुसले आणि नंदूजवळ जात, काचेखालून बाहेर आलेल्या डोक्यावरच्या बाहेर दिसणा-या त्या केसांना कुरवाळत,

“ए वेडाबाई, झालं का आता दीदीला सतावून, त्रास देऊन?  मग आता लवकर ब-या व्हा आणि घरी चला नाहीतर तुमचं गिफ्ट तसच राहून जाईल बरं का”.

 काचेखालच्या त्या शरीरातून हळूच एक हुंदका आला आणि खुप कष्टाने आवाज काढत नंदू म्हणाली ‘दीदी  मी खुप वाईट आहे ग् मला माफ कर, मी चुकले’ म्हणत नंदूला तीची चूक समजली होती.

         गार्गी आता पटापटा मोकळा श्र्वास घेत होती कारण तीला माहीत होतं की,आता तीला सुरूवात पुन्हा नव्याने करायची आहे. फक्त काहीही झालं तरी कोलमडायचं नाही जमिनीत पाय घट्ट रोवून ठेवायचे. हे जग नाव ठेवत जिथे हसतय तिथेच आता आपल्या नंदूला सिद्ध करायचय.

ती मुलगी नसूदे, ती मुलगाही नसूदे,…..पण ती एक माणूस आहे. आणि ती ‘माझी’ आहे, कोणीही नसलं तरी मी शेवटपर्यंत  तीचीच आहे , तिच्यासाठीच आहे एवढच खुप आहे माझ्यासाठी बस्… असं मनाशी ठाम करत ती बाहेर आली आणि कुठूनतरी तीच्या कानावर गाण्याचे बोल पडले, 

“कल खेल में हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा

भुलोगे तुम, भुलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा “…..

©Sunita Choudhari.

(टिप :- ही कथा ह्याआधी माॅम्सप्रेसो आणि प्रतीलीपी येथे प्रकाशित केली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

मित्र – मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण इतके पुढारलोय तरीही तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही मागासच आहे. पण ह्यांनाही मन आहे,भावना आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रपंच केला….तुम्हाला हा ब्लाॅग कसा वाटला हे मला आवर्जून सांगा.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत