पहिला मुलगा झाला.. आता टेंशन नाही…

Written by

घरात तान्ह्या बाळाचे आगमन होताच सर्वत्र आनंदाने आनंद पसरला. मुलगा झाला…पेढे हवेत…बाळाला पाहायला ये जा सूरु झाली, नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र मैत्रिणी… बहुतांश लोक हेच म्हणत, “मुलगा झाला, टेंशन मिटलं”…याउलट माझ्या सासरी मात्र मुलीची अपेक्षा होती, मुलगी न झाल्याने हिरमोड होणारं असं माझं सासर…
पण ज्या लोकांची मुलगा झाल्याने टेंशन मिटतं अशी मानसिकता असते त्यांची खरोखर कीव करावीशी वाटते.. म्हणजे मुलगा होणे म्हणजे “गरज”, आणि मुलगा मग मुलानंतर मुलगी हवी ती “हौस” म्हणून. 
“वंशाला दिवा” हवा, खरोखर मुलांनी जन्म घेऊन काय काय दिवे लावलेत हे आपण बघतोच. कल्पना चावला, सायना नेहवाल, मेरी कोम यांसारख्या मुली जेव्हा जन्माला येतात तेव्हाही त्यांचा जन्मावेळी अशीच वाक्य बोलली गेली असतील का??
माझ्या ओळखीतलं एक जोडपं, 2 मुलीनंतर मुलगा हवा म्हणून तिसरा चान्स घेतला, मुलगा झाला. मुलाचे आत्यंतिक लाड, हवे ते हट्ट पुरवले… आमचं नाव पुढे हा मोठं करणार म्हणून अपेक्षेने त्याच्याकडे ते पहायचे. पहिल्या 2 मुली सुसंस्कृत होत्या, शिकल्या, नोकरी केली आणि चांगल्या घरात लग्न झालं. कुठेही नाव ठेवायला जागा नव्हती त्यांना, त्या कायम इतरांना सांगायच्या, आपल्या आई वडिलांची इज्जत खूप मोलाची असून तिला तडा जाता कामा नये… याउलट मुलगा मोठा झाला, चुकीची संगत जोडली, व्यसन लागले, मुलीचा नाद लागला, पाय गुन्हेगारीकडे वळले..ही प्रकरण सोडवता सोडवता आईला आपले सगळे दागिने विकावे लागले..इतकं होऊन सुद्धा आपल्याला मुलगा असल्याचा अभिमान काही सोडवत नव्हता, एक वेळ अशी आली की मुलाच्या कर्तुती मुळे घरदार विकून रस्त्यावर यायची पाळी आली, त्यावेळी दोन्ही मुली आई वडिलांचा आधार बनल्या. 

आता कुठे त्या जोडप्याला जाणीव झाली की 2 मुलींवर खुश असतो तर आज इज्जत आणि घर चव्हाट्यावर आलं नसतं. 

माझ्या सर्वेक्षणात ज्यांना मुली आहेत ती जोडपी जास्त आनंदी दिसून येतात. 

“अगं आई, काय अवतार झालाय तुझा, चल माझ्यासोबत पार्लर मध्ये, स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीस तू”

“आई माझा वन पीस ट्राय करून बघ ना, आपण गपचूप फोटो काढू, कधीतरी घाल हौस म्हणून”

“आई लग्नाआधी कशी होतीस ग तू? तुला मित्र मैत्रिणी असतील ना? काय काय धमाल केलेली तुम्ही?”

माझ्या मुलाकडे पाहून विचार आला, वरील वाक्य बोलेल का तो? तरुण वयात तर पाय घरात टिकणार नाही त्याचे, आणि मुलांना काय, बाहेरची हवा जास्त लागते…खरंच मुलगी हवी होती. 

अर्थात ज्यांना मुलं आहेत ती दुर्दैवी असं मी मुळीचं म्हणणार नाही पण मुलीमुळे जे चैतन्य घरात असतं ते वेगळचं असतं आणि मुलामुळे जो आनंद असतो तोही वेगळाच असतो.

आमच्या आईने आम्हाला कधीच घरातली कामं किंवा स्वयंपाक शिकवला नाही, याउलट ४ पुस्तक वाचायला दिली, ४ श्लोक तोंडपाठ करून घेतले, वडिलांनी मुलगा मुलगी भेद न करता हिरो होंडा शिकवली, इलेक्ट्रिक ची कामं शिकवली, पण काहींची मानसिकता असते, मुलगी आहे, घरातलं यायला पाहिजे सगळं, शिकून करणार तरी काय…

मुली झाल्यावर नाक मुरडायला कारणीभूत हा समाज आणि आपण स्वतःहून ओढवून घेतलेल्या काही परंपरा…

“आपण मुलीचे आई बाप, आपला मान लहान..”

का?? मुलीला जन्म देऊन गुन्हा केलाय का? स्वाभिमान नावाचा प्रकार विकून आलात काय??

“मुलगी झाली म्हणजे तिच्या लग्नाचा खर्च …”

शिकवा ना मग मुलीला, स्वतःसोबत 4 मुलींचे लग्न स्वतःच्या बळावर काढून देईल ती…

” हुंडा द्यावा लागणार”…

जे मागतात त्यांना भीक द्या, मुलगी नाही…

“मुलीने ७ च्या आत घरात हवं”…

मग मुलांनाही हाच नियम लागू करा.

“मुलीच्या जातील स्वयंपाक यायला पाहिजे”

मुलाच्या जातीने केला तर पाप घडते काय?

जेव्हा आपण मुलगा किंवा मुलगी म्हणून आपल्या अपत्याला न वाढवता, एक माणुस म्हणून परिपूर्ण बनवलं तर लिंगभेद खरोखर एक दिवस संपुष्टात येईल…


Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा