पहिलेपणा दरवर्षीच्या पावसाचा..

Written by
  • 8 महिने ago

दरवर्षी येणारा पाऊस. नवा नसूनही पहिलेपणाचं सुख देणारा. दरवर्षी.. खरंच इतकी वर्षे पाऊस पडतोय तरीही प्रत्येकवर्षी पडणाऱ्या पहिल्या पावसाचं नातं काही वेगळचं असतं. प्रत्येक वर्षी त्याच्या येण्याने मनात कुठेतरी ओलावा आपसूकच जागतो. तिच्या मनात विचार चालू होते.

या मोसमाचा पहिला पाऊस चिंब बरसत होता. तिला राहून राहून कुणाचीतरी आठवण येत होती. अशा नात्याची जे अजून साकरच झालं नव्हतं. कोणीतरी आपलं असावं.. आपण कोणाचं तरी व्हावं.. ही जाणीव करून देणारं नातं. एरव्ही काही अडत नाही या नात्यावाचून पण पहिला पाऊस पडला ना की त्या नात्याच्या नसण्याची हुरहूर अधिकच ठळक होते. वाटतं आता कुणी असतं आपल्या हक्काचं तर तासनतास बाहेरच्या पावसात झोकून दिलं असतं त्याच्याबरोबर.. चिंब गार पावसात सुद्धा त्याच्या स्पर्शाने उबदार होता आला असतं त्याच्यासोबत.. एकाच छत्रीत छेडता आला असतं त्याला मिश्किल पणे. एक ना दोन कित्ती स्वप्नं पहिली तिने त्याच्या सोबतची..

काही गोष्टीतला राजकुमार नव्हता तिच्या स्वप्नांत. होता एक सरळ साधा चेहरा, सरळ साधी वागणुक असलेला. भरपूर हसवणारा. तीच्याबद्दची काळजी तिलाच न दाखवणारा. स्वतःच्या आयुष्यावर तिला कोरणारा. चारचौघां सारखाच. पण तिला पटणारा. खरा वाटणारा. ज्याच्यावर आपोआपच विश्वास बसावा असा. डोळे उघडे असो वा बंद ज्याचा चेहरा न बोलवताच मनासमोर यावा असा कुणी.

ज्याच्या प्रेमावर आपलं प्रेम बसावं. ज्याच्या नुसत्या संदर्भाने किवा आठवणीने हि ओठांवर हसू उमटावं आपोआप.. जो नसतानाही त्याची जाणीव असावी आपल्याबरोबर अखंड. आणि ज्याला पाहिल्यावर जग जिंकल्याचा आनंद व्हावा. वाटावं त्याच्याशिवाय काहीच नकोय आपल्याला.

खरंच असेल का असं कुणी माझं.. तिला नेहमीच कोडं पडे. प्रेमाचं काही वेगळचं असतं. त्याची चाहूल सुद्धा गोड हुरहूर लावून जाते मनाला. काही नाती इतकी खास असतात की त्यांची स्वप्नं सुद्धा मोहरुन टाकतात मनाला. खासमखास ??

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा