पाल🦎

Written by

गीता गजानन गरुड.
आंब्रड.

#पाल🦎

पाल हा प्राणी भिंतीवर पाहिला की मला धडकीच भरते.लहान झुरळ दिसलं तर मी सरळ हाताने चापटी मारते.ते लगेच गतप्राण होतं.मोठं झुरळ आलं तर फुलझाडूने त्याचा खातमा करते.आमच्या घरात झुरळं टिकत नाहीत.दिवसातून दोन वेळ लादी पुसणं असतं त्यामुळे भुकेलं रहाण्यापेक्षा झुरळं आमच्याकडे न येणंच पसंत करतात.

पण पालीला मात्र मी लय घाबरते.ती अशी सरसर जातेना,तिला बघून अंगावर काटाच येतो माझ्या.😰सहसा आमच्या खिडक्या बंदच असतात.जाळीच्या तेवढ्या उघड्या.पण तरीही जरा कुठे खिडकी किंवा दार उघडं राहिलं तर पाल मोकेपे चौका मारतेच आणि आमच्या घरात प्रवेशते.ती भिंतींवर दिसली की तिचे डोळे👀 मलाच रोखून पहात आहेत असं मला वाटत रहातं.

एकदा आठवीत असताना खाटीवर बसून आम्ही तिघं भावंडं घरचा अभ्यास करत होतो.कौलांच घर होतं.कौलांतून एक मोठी पाल🦎 खाली पडली,डायरेक्ट माझ्या फ्रॉकमध्ये.मी चटकन उडी मारली.पण नंतर आईने मला केसांरुन न्हायला लावलं.तुळशीला दिवा लावला.

एकदा माझे यजमान चार पाच दिवसांसाठी गावी गेले होते.उन्हाळ्याचे दिवस..कुठुनतरी पालीने आमच्या घरात एन्ट्री मारली.जसं मी चहा पीत नाही तसा माझा मुलगाही चहा पीत नाही.पालीबाबतही तसंच..मी पालीला घाबरते,तसं तोही घाबरतो.आयांचे बरेच गुणावगुण मुलांत अवतरतात.हे खरंय.त्याने बाबांशी कधी हुज्जत घातली तर बाबा लगेच तयार असतो,अगदी आईवर गेलाय म्हणे.माझा एक गुण घेतला नाही.☺️

हां तर कुठे होते..पाल आमच्या घरात आली.ती हालमध्ये होती.आम्ही दोघं,बाळ व मी बेडरुमला कडी लावून खाली फटीत कपड्याची घडी घालून निजलो जेणेकरुन पाल बेडरुममधे येणार नाही.शाळेत जाताना बाळाने प्रॉमिस घेतलं की तो येईल तोपर्यंत पाल गेलेली असेल.मी मग सगळा हॉल पिंजून काढला.शोकेस,सोफा सगळं धीर करुन ओढून पाहिलं.👀पाल कुठेच दिसेना.किचनच्या ओट्याखाली पाहिलं.मग म्हंटलं एखादवेळेस बाथरुमच्या खिडकीतून गेली असेल,पण खिडकीला जाळी..त्यामुळे तिथूनही जाण्याची शक्यता नव्हती.कसंतरी भितभित स्वैंपाक आवरला.सगळं नीट झाकून ठेवलं. व जरा निवांत पडले..

आणि काय मनात आलं ते उठून किचनच्या पडद्याची गुंडाळी करुन एका बाजूला खिळ्याला अडकवलेली..ती बाजूला सारली मात्र..मला ती पालबाई🦎 दिसली.👀फारमोठी नाही,फार लहानही नाही.अडनिड्या वयाची.तीही मला पाहून अटेंशनमध्ये राहिली.

बाजूच्या गवसांच्या सुनेला हाक मारायला गेले तर तीचं घर बंद..मला तर तिच्याशी दोन हात करण्याची हिम्मत होईना.😱सरळ खाली गेले..तिथे चायनीजच्या गाडीवर एक ओळखीचा नेपाळी मुलगा आहे..त्याला प्राब्लेम सांगितला..तो माझ्या मदतीला धावून आला.त्याला झाडू देऊन मी बेडरुमच्या पलंगावर ..

त्याने झाडूने त्या पालीला हाँलमध्ये घेतलं..मग हळूहळू हाँलच्या बाहेर काढलं..मला बाई त्याचं फार कौतुक वाटलं.मी त्याला पन्नास रुपये बक्षीस म्हणून दिले व परत असा प्रसंग आला तर तुलाच यावं लागेल असं बजावलं.🙅

आमच्या बाजूला गवस रहातात.त्यांची सून पालीला अजिबात घाबरत नाही.🤗हे घरात नसताना जर पाल आली तर मी तिला बोलावते.मीरा झाडूने पालीला शौचालयात ढकलते व फ्लश सुरु करते.त्यांच्यात पालीला कधी मारत नाही म्हणून ती हा पर्याय अवलौबते.तर अशाप्रकारे दोन तीन वेळा पालीला हाकलवण्यासाठी मीरा माझ्या मदतीला धावून आली आहे.😊मोराचा पंख,अंड्याच कवच वगैरे ठेवावी म्हणतात.पण पाली त्यांना घाबरत नाहीत.

एकदा सकाळी दुधवाला आला अन् जरा जास्तवेळ दार उघडं राहिलं..दुधाचं पातेलं आत ठेवून जरा लवंडले.उजाडलं नव्हतं. झिरोच्या बल्बचा मंद प्रकाश हालमध्ये पसरलेला..आणि मला ती दिसली..दाराच्या खाचीतून सरसर हॉलच्या भिंतीवर आली.🦎गवसांचीसूनही नव्हती व तो चायनीजवाला दादाही त्याच्या गावी गेलेला.तिला हाकलवायचा मला धीर होईना.मग मी तिथे जवळच मच्छर अगरबत्ती लावली.खिडक्या उघड्या ठेवल्या,जेणेकरून वासाने ती पळून जाईल.मग बाजारात जाऊन पालींना मारण्याचा स्प्रे आणला..तेवढ्या जागेत मारला.सगळं उचलून पाहिलं..कुठे दिसेना..आई म्हणाली आली तशी गेली असेल.

संध्याकाळी ह्यांना घडला व्रुतांत सांगितला.यांनी मला ओट्याखालचं सारं सामान (नेहमी पालीची शिकार करताना करतो तसं हालमध्ये )घ्यायला लावलं.त्यांच्या हाती झाडू दिली व मी बेडरुममध्ये पलंगावर..अशावेळी मी विजेरी दाखवून मदत करावी अशी त्यांची अपेक्षा..मग मला दोनचार मालवणी ठेवणीतल्या मिळतात..पाल सापडेपर्यंत माझा अस्सल मालवणीत उद्धार..लेकाचाही.😚तर असं करुन बरेचदा त्यांना पालसापडते.

बाथरूममध्ये असली तरी तिथेच तिचा खातमा करतात व कचऱ्याच्या सुपातून बाहेर फेकून देतात व वरती विचारतात..तुला खातेय का ती??🤓अशावेळी मी शरणागती पत्करते.बोल भिडू तेरे दिन है असं मनात म्हणते..पण..यावेळी पाल त्यांना सापडली नाही..ते म्हणाले गेली असेल ती..

असेच तीन दिवस गेले..मला ती कुठे दिसतही नव्हती.एका सकाळी भेंडी कापली व भाजायला घेतली.त्यात कोकम घालायचं म्हणून बरणी काढायला ओट्याखालचं दार उघडलं तर ती🦎 तिथे होती..मी भेंडी तशीच टाकली नी बेडरुमकडे कूच केली💃.दार लावून घेतलं..पण यावेळी हे ऐकेनात..मला बाहेर यायला लावलं..त्यांना कुठे ती दिसेना..तशी लहानच होती..अडनिड्या वयातली.चपळ अशी.

अखेर हाफिसात जायला उशीर होईल म्हणून ते माघार घेणार इतक्यात पाण्याच्या पिंपामागे मी प्रकाशझोत टाकला तर तिथे त्या मला दिसल्या.मग मात्र मी त्यांना पत्ता सांगून परत पलंगावर उडी मारली.💃त्यांना ट्रेस लागताच मग तिची काही खैर नव्हती.त्यांनी तिला बाहेर पिटाळली..काहींची आडनावही पाल असतात..कसंना..

तर असं हे पालपुराण..मी कितीही मोठी झाले तरी या पालबाईंची भिती काही मनातून जाणार नाही.👻✍️

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा