पिरियड्स

Written by

#पिरियड्स

खर तर चार चौघात हा शब्द वाचला, ऐकला… तरी थोडं संकोचल्या सारखं वाटतं. टी. व्हि. वरची जाहिरात बघून माझ्या मुलाच्या मनात अनेक प्रश्न घोळ घालत होते. त्याच वयच असं आहे की प्रश्न पडला…. की उत्तर हवेच. निरीक्षण करून बऱ्याच गोष्टींची नोंद घेवुन मगच तो प्रश्न विचारतो…… त्यामुळे त्याने काय काय नोंदी घेतल्या हे आधी माहिती करून घ्यावे लागते. उत्तर द्यायचे म्हणून दिले की पुढे अनेक प्रश्न अंगावर येतात.
” मम्मी पिरियड म्हणजे काय ग ?”…… इथून सुरुवात झाली. मी कामात होते…. ” नियमित आणि ठराविक वेळेसाठी एखादी गोष्ट करणे म्हणजे पिरियड… याचं उदाहरण म्हणजे… गणिताचा, इंग्रजीचा पिरियड असतो न रोज तुझ्या शाळेत.” त्यावर वैतागुन लगेच तो, ” अग … हे माहिती आहे….. ऍड मधे ते जे सांगतात त्या बद्दल विचारतोय मी.” ( आता मात्र त्याला काय काय माहीत आहे हे जाणून घेणे आवश्यक होते. )…. नको त्या विषयावर इतक्या लवकर बोलावे लागणार ही अस्वस्थता लपवत, वरवर शांत असल्या सारखे भासवले. अगदी निरागस पणे विचारले, “कोणती जाहिरात रे?” त्यावर तो “अग ती मोठ्यांच्या हगीस ची ऍड येते न ती ” मी हसल्या सारखे केले ” मोठ्यांच हगीस?” … त्यावर लगेच तो…. ” अग बेबी हगीस ची ऍड येते, आजोबांच्या हगीस ची ऍड येते…. आणि एका मुलीच सिलेक्शन का काय असतं… आणि तिची आई म्हणते आता कसं करायच…. आणि ” पिरियड्स की चिंता छोडो ” अशी काही तरी ऍड येते न…. तू नाही बघत का?” “अच्छा ती…..होय “… मी (साळसूदपणा दाखवण्याचा अभिनय केला ) . ” मम्मी बेबीला टॉयलेट ट्रेनिंग देता येत नाही म्हणून त्यांना हगीस घालतात. आजी आजोबा आजारी असले की त्यांना हगीस घालतात. ( मी….लो….बी.पी. मुळे ऍड्मिट झाले तेव्हा माझ्या शेजारच्या बेडवर आजी होत्या. आजीला ऍडल्ट डायपर (हगीस )घालायच्या आहेत. सगळ्यांनी बाहेर थांबा असं नर्स म्हणाली होती. अरे देवा त्याचीही नोंद घेतली का ह्याने.) पण मोठ्यांना टॉयलेट ट्रेनिंग देता येत मग त्यांना कशाला पाहिजे हगीस? आपल्या घरातही ते हगीस मी बघीतले आहे? ते कशाला? ” ( देवा…. याच्या नजरेतून काहीच कसं सुटत नाही.) आता मात्र खर सांगणं भाग होतं. ( मुलगी असती तर सोपं गेल असत सांगायला….. असं वाटून गेलं …. दोघींचे शरीर सारखेच……. याला अजून गर्ल आणि बॉय मधला नेमका फरक माहीत नाही. कसं सांगू आता?…. आवघड आहे सगळं )
तेवढ्या त्याचं अजून एक निरीक्षण ” त्या ऍड्मधे फक्त मुलीच का असतात ग?. ”
आता बोलण्याची…… समजावून सांगण्याची माझी वेळ….. मन घट्ट केलं आणि शक्य तितकंच तरी खरं सांगण्याचा निर्णय घेतला…… ” त्या हगीस मुलीं ( बायकां )साठीच असतात म्हणून ऍड्मधे त्याच असतात . बेबी कोणाला होतं?…. गर्ल्स ला…. म्हणून त्या खूप स्पेशल असतात. त्यांची शरीर रचनाही तशीच खास असते. मोठ झाल्यावर स्वतःच्या शरीरात अजून एक जीव त्यांना सांभाळता यावा म्हणून त्याच्या शरीरात ( पोटात )एक स्पेशल जागाही असते. माझ्याही आहे…. म्हणून तर तू आला न माझ्या आयुष्यात. ” त्यावर तो “बेबी तर लग्न झाल्यावर होतं न?.. मम्मी आणि पप्पा दोघे “आम्ही बेबी सांभाळाय तयार आहोत” असं देवाला सांगतात… मग देव ठरवतो न…. बेबी द्यायचं की नाही त्यांना. ” (हे फार पूर्वी सांगितलं होतं मी त्याला…. त्याच्या वयाला ह्या पेक्षा चांगल सांगणं मला तेव्हा तरी शक्य नव्हतं.)
“हो रे….. पण बेबी हवय अस नुसता सांगून होतं नाही. त्यासाठी मम्मी आणि पप्पा फीजिकली स्ट्रौंग असायला हवे. त्याची तयारी आमचं शरीर खूप आधी पासून करतं. बेबीची खोली आईच्या पोटात असते. ती खोली कशी आहे? यावर पण खूप काही अवलंबून असते. आपण आपले घर कसे स्वच्छ ठेवतो…. तशी ही खोलीही स्वच्छ ठेवावी लागते आणि ही स्वच्छता आमचं शरीर स्वतः करतं , स्वतः ठरवतं….. स्वच्छतेची सुरूवात कधीपासून करायची . आमच्या हाती काहीच नसतं. आम्ही फक्त सुदृढ राहण्याचा प्रयत्न करायचा. बाहेरून स्वच्छ होण्यासाठी आपण आंघोळ करतो पण आतली स्वच्छता….हे आमचं शरीर ठरवतं. नक्की कधी हे काम सुरू होणार याचा पक्का अंदाज आम्हाला नसतो. बाहेर जायच आहे, नोकरीवर जायच आहे….. अनेक काम असतात. म्हणून मग या हगीसचा शोध लागला. त्यामुळे आमचे बरेच त्रास कमी झाले. ” त्यावर तो…. ” त्रास होतो म्हणजे नक्की काय ग? तुलाही त्रास होतो? ” मी…. ” त्रास म्हणजे चीडचीड होते, हात पाय दुखतात, कंबर दुखते…असंच काही होत…. मलाही होतच की… मी काही वेगळी थोडीच आहे. ” त्यावर तो… “आतून स्वच्छ कसं करत ग तुमच शरीर तुम्हाला?” ( चार दिवसापूर्वी माझा घोलाणा फुटला होता…. नाकातून रक्त आले….. तो हे बघून घाबरला होता…. तेव्हा घाण रक्त आहे… उष्णता वाढली की ते आपोआप येते असं समजावून सांगितलं होतं. त्याचाच आधार घेतला )… ” अरे…. शरीरातल्या भागांना नको असलेले घाण रक्त शरीराबाहेर टाकले जाते. परवा तू बघीतलं अगदी तसंच “….. त्यावर तो…. ” पण मग ते हगीस का लागते ? ते कसे वापरता? त्रास वाटतो का त्याचा? ”
त्यावर मी ” पिण्याच्या भांड्याला तोटी कुठे असते?” तो…. ” सगळ्यात खाली.” मग मी….. “का?”…. त्यावर तो…. ” भांड्यातले सगळे पाणी आपल्याला मिळावे म्हणून “. त्यावर मी…. ” अगदी बरोबर…. आमच्या शरीरालाही अशीच रचना दिलेली असते, चांगल्या प्रकारे शरीर आतून स्वच्छ होण्यासाठी . दर महिन्यातल्या चार-पाच दिवसच ही स्वच्छता चालते बाकी दिवस आराम असतो. स्वच्छता सुरू झाली की थांबवणं आमच्या हातात नसतं. म्हणून मग आम्ही हे हगीस त्या चार-पाच दिवसात वापरतो. त्यामुळे रोजची कामे करणं आम्हाला सोपं जातं . या चार-पाच दिवसांच्या कालावधिलाच पिरियड्स असे म्हणतात. त्यासाठीच आम्ही या हगीस वापरतो. त्याचा त्रास होतो पण शरीर आतून स्वच्छ राखण्यासाठी सहन करतो.असे अनेक त्रास मुली, आम्ही बायकां आनंदाने सहन करत असतो. म्हणून मुलींचा ,
स्त्रियांचा नेहमी आदर करायचा असतो . ” बेबीसाठी जास्तीत जास्त त्रास तुम्हालाच का आहेत . बॉइजला काहीच नाही का? ” अशी निरागस हळहळ व्यक्त करून तो खेळायला गेला आणि माझा जीव भांड्यात पडला.
( ठरवून काहीच संगीतलं नाही…. तेव्हा जे सुचलं… योग्य वाटलं .. तेच सांगितले. त्याच्या शब्दकोशात जे शब्द आहेत तेच वापरले आहेत. )
आता सनी लीओनी ची ऍड तर त्याने बघितली नसेल ना? असा विचार मनात आला आणि धस्स झालं. पुढे काय प्रश्न येणार आहेत…. त्या परमेश्वरालाच माहीत.
देव मला ( समजावून सांगण्याची ) सद्बुद्धी देवो.

इवल्याश्या रोपा प्रमाणेच बालमनही कोवळे असते . त्यांना योग्य संस्काराचे खत, विचारांची मशागत…. शिस्तीचे ऊन…. आणि मायेची फुंकर घातली तरच रोपाचे वृक्ष होईल.

©️अंजली मीनानाथ धस्के

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा