पिल्लु मी कुठे,??

Written by

पिल्लु मी कुठे??
©स्वप्ना मुळे(मायी)
मस्त आराम करून झाला सहा महिने,…बाळ रांगायला लागलं,…सुट्टी आता आठ दिवसावर सपंत आली,… ती अगदी अस्वस्थ,…त्याला सांभाळणारी आजी आता गावावरून आली होती,…तिच्या डोक्यावर हात फिरवून सांगत होती,…अग राहील बाळ,…थोडावेळ रडल मग होईल शांत,…तू काही काळजी करू नकोस,..पण तिच्यातली आई मात्र अस्वस्थच,… त्याने हेरलं तिच्या मनातलं,…त्या दिवशी सुट्टी होती त्याला,…म्हणाला चल आपण अंगणात खेळ खेळू,…तू एक काम कर,…छान आवर आणि त्याला टाटा करून निघ,… आणि पलीकडच्या वाडयाजवळ जाऊन लप बघू काय करत पिल्लु,…
ती तयार होऊन त्याची पापी घेऊन निघाली,…त्याचा निरागस चेहरा,…आपण हे नाटक खेळतोय आज हेही ती विसरली आणि रडवेली झाली,…पिल्लु पण रडायला लागलं,…त्याने बाळ लगेच घेतलं तिच्याकडून तिला इशारा केला,…तो बाळाला रमवू लागला,…आजी पण नाटकात सहभागी झाल्या,…अरे ती बघ मनीमाऊ,.. अस म्हणत त्यांनी त्याला त्याच्या बाबाकडून घेतलं,…त्याला खिडकीजवळ नेलं,…ह्याने तिला जवळ घेतलं,…तसा तिला आणखीनच हुंदका फुटला,…तो म्हणाला ,अरे आई तर वेडीच आहे ही,…नुसती रडते बाळासाठी,…ती म्हणाली,तुला काय जातंय असं म्हणताना,….माझं चिमण मला किती शोधेल मला,…आणि नाही दिसले तर किती रडेल,..?तो म्हणाला,… अगदी मान्य असं होईल पण आता पर्याय शोधावा लागेल ना,…तुला आता सुट्टी वाढवून मिळणार नाही,…तू सरकारी नोकरी सोडू पण शकत नाहीस,…आणि बाळाचं म्हणशील तर सुरवातीला रडेल ग पण नंतर मात्र होईल तुझ्या वेळेची सवय,…बघ आताच त्याला बाहेर नेलं तर झाला शांत,…
तो दिवस उजाडलाच तिच्या नोकरीचा,…मागच्या दोन दिवसात ते नाटक बऱ्याच वेळा करून झालं होतं,…ती लपून बघायची तिच्या पिल्लुला,… ते आधी रडायचं मग खेळत बसायचं,…पण मधूनच आठवणीने कवर बावर होऊन बघायचं,…आपल्या चिमण्या डोळ्यानी भोवताली आईला शोधायचं,…मग ही भो करून समोर यायची,..तेंव्हा आंनदी होऊन खूदुखुदु हसायचं,…अगदी दोघांच्या डोळ्यात भेटीने पाणी यायचं,… आज मात्र आपण लपणार नाही हे तिला माहीत होतं,…ती जड पावलांनी निघाली,…त्याच आकांड करत रडणं तिच्या कानापर्यंत येतच होत,…पण मनाचा हिय्या करून ती गेलीच,…ऑफिस सुटताच सैराट होऊन घरी आली,…पिल्लु अंगणातच आजी सोबत खेळत होत,…ती परत आपल्या ठरलेल्या जागी जाऊन लपली आणि म्हणाली,”पिल्लु मी कुठे,???”
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा