पुनः एकदा सुरूवात तेही साठाव्या वर्षात!

Written by

कोणाची गोष्ट ऎकणार आज माझे बछडे? म्हणत, ‘साठीच्या’ सुलोचना बाई हसतमुख प्रसन्न चेहऱ्याने मुलांना गोष्टी सांगत चित्र-वीचित्र तोंड करत त्यातच रमून गेल्या आणि त्यांना पहात समाधानी मनाने प्रिया नकळत भुतकाळात गेली.

साधारण वर्षभरापुर्वीची गोष्ट …..

सुलोचना बाई आणि प्रिया दोघे शेजारी होते.

प्रिया आईवडीलांची एकुलती एक मुलगी. हसतमुख अाणि सगळ्यांना मदत करणारी.

सुलोचनाबाईंना एकुलता एक मुलगा होता आणि तो ही परदेशात असायचा इकडे कधीतरी यायचा पण आई-वडिलांसाठी मायेचा ओलावा आता हरवला होता.

सगळ्या गोष्टी तो पुरवायचा पण आई बापाजवळ बसायला वेळ त्याच्याकडे कधीच नसायचा.

सुलोचनाबाईंना मनातून हे सगळं सलत रहायचं तरीही त्या चेह-यावर काहीही न दाखवता सतत हसतमुख असायच्या. आजारी नव-याची देखभाल करत ते दोघं एकमेकांना जपत रहायचे.

प्रिया एका मोठ्या कंपनीत कामावर होती आणि गप्पा मारणं, गोष्टी ऎकणं हा तिचा आवडता छंद म्हणूनच, वयाचं बंधन न येता प्रिया आणि सुलोचनाबाईंमधे निरागस मैत्रीची सुरूवात झाली.

साठीच्या वयातही अगदी तरुणांसारखा सळसळता उत्साह होता सुलोचनाबाईंमधे …..प्रत्येक कामात पटाईत अाणि सोसायटीच्या लहान मुलांमधल्या आवडत्या अाजीबाई होत्या.

सुलोचनाबाई आणि प्रिया मधे सगळ्या प्रकारच्या गप्पा असायच्या, मनमोकळा संवाद असायचा.

पण एकदिवस यातच अचानक प्रियाच्या कामाची पोस्टींग दुस-या शहरात झाली आणि ह्या मैत्रीत नकळत दुरावा आला.

एकीकडे सुलोचनाबाई त्यांच्या नव-यासोबत एकाकीपणात खुष रहायचा प्रयत्न करत होत्या तर दुसरीकडे प्रिया यशाची शीखरं चढूनही सुलोचनाबाईंंच्या आठवणीत होती.

दोघांच्या मैत्रीतल्या खंडाला सहा महीने होत आले…. अाणि अचानक एकदिवस सुलोचनाबाईंचा प्रियाला फोन अाला.

फोन वाजला ….. हॅलो काकू ….. कशा आहात … काका कसे आहेत … पण प्रियाच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न येता समोरून फक्त हुंदके येत होते. आणि फोन बंद झाला.

प्रिया बेचैन झाली आणि दुस-याच दिवशी ती सुलोचनाबाईंच्या घरी पोहचली.

बेल वाजवली….

सुलोचनाबाईंनीच निर्वीकार चेह-याने दरवाजा उघडला , आणि हाॅलच्या कोपऱ्यात जाऊन त्या बसल्या.

प्रिया घरात आली आणि हाँलच्या फोटो कडे पाहत तिला ‘धस्स’ झालं….. समोर काकांचा, सुलोचनाबाईंच्या नव-याचा फोटो होता तो ही हार चढवलेला.

कोपऱ्यात काकू हुंदके देत होत्या …..

प्रिया म्हणाली,

काकू, कसं काय झालं हे अचानक आणि तुमचा मुलगा आला नाही का …

हुंदके रोखत काकू बोलत्या झाल्या ….

ह्यांनी ‘तो’ येत नसण्याचं जास्तच मनाला लाऊन घेतलं होतं आणि त्याला एका नजरेने पाहण्याच्या नादात मला सोडून निघून गेले कायमचे …. माझा विचारही न करता गेले ग् प्रिया ते म्हणत काकू हमसाहमशी रडू लागल्या आणि बोलू लागल्या …….

“आई ,खुप काम आहे … आणि आता बाबा गेलेच आहेत तर मी येऊन तरी काय करू …. आणि आई ऎक …. मी पैसे पाठवतोय काय खर्च येईल तो कर ! …… मी अजून पैसे पाठवेल” म्हणत त्याने फोन ठेवला ग् .

“काय समजतो ग् हा स्वतः ला ….त्याच्या दिलेल्या पैशाच्या तुकड्यांवर आहे का मी? ….इतके दिवस आजारी असताना बापाला बघायलाही आला नाही …. नुसतंच पैसे पाठवतो …..भिकारी होतो का ग् आम्ही ?…..पैसे फेकले अन् सगळे पाश तोडले म्हंटल्यासारखं ….. त्यालाही नुसतं पैसेच पुरवलं का आम्ही ….इतक्या वर्षांचं प्रेम, माया तो कसं विसरला ग् म्हणत काकूने एक जोरदार हंबरडा फोडला”.

प्रिया नकोय ग् मला त्याचे पैसे ….मला माझं कमवायचय ग् ….. मला नकोय हे भिका-याचं जगणं …..म्हणत काकू परत रडू लागल्या …..

सुलोचनाबाईंना ,”आर्थिक स्वावलंबन कीती गरजेचं असतं हे त्या वेळी प्रकर्षाने जाणवत होतं”…..

पण आता ह्या वयात काय काम करणार म्हणून त्या हतबल होत होत्या.

प्रियाला आधिच्या हसतमुख सुलोचनाबाई दिसल्या आणि तिला आठवलं की “आज जशी आईला मुलांची गरज असते तशीच नातवांना आजीची गरज असते”.

ती मनातच हसली आणि तीला समजलं की आता तीला नक्की काय करायचं आहे ते ….. तिने लागलीच एक फोन केला…. आणि सुलोचनाबाईंना म्हणाली,

काकू उद्यापासून नातवांना गोष्टी आणि संस्कारांचे धडे द्यायला तयार रहा बरं का …..

प्रियाने एका पाळणाघरात काकूंना संस्कार आणि गोष्टी सांगण्यासाठीचं काम मिळवून दिलं होतं…….

बघता – बघता वर्ष सरलं …..

आता पाळणाघरात नातवंडं ह्या सुलोचना आजींच्या गोष्टी, गाणी ऎकायला येतात …

‘साठीच्या ‘वयात मोठ्या हिमतीने नव्याने कामाला सुरूवात करणाऱ्या सुलोचनाबाईंना आता त्यांच्या मुलाच्या भरपुर पैशांपेक्षा स्वतः ने मिळवलेला रूपया खुपच मौल्यवान वाटत होता.

आर्थीक स्वालंबन खुप महत्त्वाचं असतं कारण ते आपल्याला “आत्मविश्वास आणि ताठ मानेनं “जगायला शिकवतं.

आजी अजून एक गोष्ट. ……म्हणत मोठा आवाज झाला , आणि प्रिया भुतकाळातून भानावर आली.

समोर पाहिलं तर सुलोचनाबाईंनी अजून एका नवीन गोष्टीला सुरूवात केली होती. आणि साठाव्या वर्षी जगण्याची नवीन कला आत्मसात केली होती.

© Sunita Choudhari.

(मित्र -मैत्रीणींनो आणि वाचकांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून सांगाल कारण ही कथा एका सत्यघटनेवर आधारीत आहे. यावरचं तुमचं मत आवर्जुन सांगाल …..आणि मला असच वाचत रहा …… धन्यवाद …)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा