“पुरुषांचं हे एक बरं असतं…” ©दिप्ती अजमीरे

Written by

“पुरुषांचं हे एक बरं असतं…

हा केवळ एक प्रतिकात्मक प्रसंग आहे…

पुरुषांच्या आवडी निवडी जपताना मन आणि घर सांभाळताना स्त्री वर आपसूक कितीतरी जबाबदाऱ्या येऊन पडतात…
मग ती ही यातून सहज निघू शकत नाही… मात्र पुरुषांचं असं होतं नाही…

बघूया या प्रसंगातून…

“हॅलो…
हा बोल…
अरे हो का?
हो.. हो.. मी पण येतो लगेच… अंघोळ करून… तोपर्यंत तुम्ही पोहचा मी आलोच…
हो.. हो… चल बाय भेटू….”
—राघव फोनवर बोलत उठला.

“काय रे… कुठे?”–वैदेही आश्चर्यकारक नजरेने बघत.

“अग, येतो जरा…
हे सगळे ईट्टू, बिट्टू बसणारेत… मग त्यांना म्हटलं, मी पण येतो…
चल, आंघोळीला जातो…”
असं म्हणतच राघव बाथरूम मध्ये गेलाही.

“अग, मला जरा टॉवेल देते का?”
“अरे, माझा टि-शर्ट कुठे आहे?”
“मी जेवणार नाही ग… तुम्ही जेऊन घ्या आणि आराम करा…”
“चल, येतो मी.. बाय…”

राघव फोनवर बोलतो काय आणि निघून जातो काय!!!

वैदेही मात्र विचारात पडते…

सकाळपासून मी म्हणतेय की, अंघोळ कर तर हो.. हो.. करून गेलाच नाही आणि आता कसा??

आज रविवार.. सुट्टीचा दिवस.. जरा आराम करावा म्हटलं, तर उगीच पडीक काम आठवतात आपल्याला…

सुट्टी म्हणून जरा कपाट आवरायला घेतलं आज.. तर त्यात ही याने आपलं काम काढून, “मला जरा मदत कर, मग आवर तुझं तू..” म्हणून मला गुंतवून च ठेवलं…

मग काय पोटाची खळगी भरण्याची वेळ झालेली… म्हणून स्वयंपाक, जेवणं, मुलाला भरवणे, आणि ईतरआवराआवर…

पाणी टेबलवर आणून ठेवण्यापासून तर ताट वाढेपर्यंत सारं काही आपणच करा…
परत एक आवाज लावा…
“चला ताट वाढलं, या जेवायला…”

स्वारी येणार.. जेवणार…
मग मोबाईल घेवून, आरामात बसणार…
सुट्टी ना.. आज!

वैदेही तोंडात घास टाकणार, तोच पिलूचं “मम्मा”

“राघव, अरे, बघ रे जरा, काय म्हणतो..”

“ए, काय ग! एक तर सुट्टी मिळते.. त्यात तुझं हे बघ ते बघ! –राघव.

“काय चाललं रे! चल, इकडे खेळ, मम्मा समोर..”—राघव पिलूला.

“मी झोपतो ग जरा.. पाठ दुखतेय… थकल्यासारखे वाटत आहे…”–राघव.

“हम्मम, झोपा..”—वैदेही.

आम्ही आहोत.. पोर सांभाळायला…
आज सुट्टी ना तुमचा आरामाचा दिवस..”–(मनात).

जेवण झाल्यावर,भांडी वगैरे करून पोराला झोपवून वैदेही जरा पाठ टेकवत नाही तर परत फर्मान सुटतं…
“काय मॅडम, आवरलं का??”
“हो रे , पडते आता जरा..”
“अग, जरा पाठ दाबून देते का??”–राघव लाडात येत म्हणाला.

विचारातच डोळा लागतो वैदेही चा… पण लगेच जाग येतो…

“चला… दूध गरम करून घेऊ.. म्हणजे पिल्लू उठेस्तोवर, थंड होईल, मग त्याला देता येईल…”(वैदेही मनात)

“किती वाजलेत ग्…”–राघव.
“4 वाजलेत.. उठत नाही का?”–वैदेही.

“हो..”
“जरा डोक्याला मालिश करून देना… मग आंघोळीला जातो…”–राघव.

“अरे वाह…”
“निघाला का मुहूर्त आंघोळीचा!!”–वैदेही.

“काय ग तुझं, आज सुट्टी ना…
करतो आरामात… कुठे जायचं तर नाही ना!! मग कशाला घाई??”–राघव जरा चिडून.

“तू दे मालिश करून..”–राघव.

तेवढ्यात पिलू उठलं… “मम्मा…”
“राघव, त्याला पण घेऊन ये… मी जरा तेल गरम करतेय…”–वैदेही.

“अग, त्याला उठल्या उठल्या मम्मा लागते… माहिती न!! येत नाही तो…
आणि माझी पाठ पण दुखतेय…
घे ना… रडतोय तो… येत नाही आहे माझ्याजवळ…”–राघव.

गॅस बंद करून, पिलूला घेत ती परत कामाला लागली…

“तू मालिश करून देतेय ना!”–राघव

“हो रे… जरा पिलूला फ्रेश करून दूध देते आणि येते…”–वैदेही.

ती मालिश करायला राघवजवळ येते न येते तोच राघव म्हणतो, “आणि आमच्या चहाचं काय??”

“हो… एवढी मालिश करते आणि ठेवते चहा…
तोपर्यंत तेल मुरेल नीट… मग आंघोळीला जा…”

“हम्मम, झालं का आंघोळ पुराण परत सुरू…”

“बरं.. नको जाऊ, राहू दे…”

“हा, पाणी घे..”
“चहा, आणू का ?”
“हो.. आण..”
“हम्मम्म, चहा..”

मध्ये मध्ये पोराला सांभाळत ती पण चहा घेते.
मग संध्याकाळची झाडझुड, कपडे आणून ठेवणे, दिवाबत्ती, एक ना अनेक काम तिचा पिच्छा पुरवत असतात…

आणि…
राघव मात्र आपला रविवार एन्जॉय करत असतो…

तेवढ्यात राघव चा फोन वाजतो…
तो मित्रांसोबत बोलतो काय अन् आंघोळ करून ready होतो काय आणि निघून जातो काय…

“पुरुषांचं हे एक बरं असतं… नाही का!!”

किती बिनधास्त आयुष्य असतं नाही पुरुषांचं…
लग्ना आधी किंवा नंतर काय…

मनात विचार करत वैदेही आपल्या मुलासोबत खेळण्यात मग्न होते…

सारं काही घरच्या स्त्री वर सोपवून बाहेर पडणे किती सोपं जातं नाही का पुरुषांना…

आई, बहीण, बायको कोणत्याही रुपात स्त्री ला मात्र अनंत जबाबदाऱ्या सोपवल्या जाणे पुरुषांना फार सोपं जातं…

पण बायकोला किंवा घरातल्या स्त्री ला जर एखाद्या मैत्रिणीचा फोन आला आणि वेळेवर काही प्लॅन बनवला तर ते निभावणं खरंच एवढं सोपं जाईल का ???

मुलं, जेवण, kitchen, कपडे, घर, दिवाबत्ती असे कितीतरी प्रश्न डोक्यात डोकावून मग उत्तर येतं, “नको ग् बाई, आज राहू दे… नंतर जाऊयात कधीतरी.”

पण पुरुष कधी असं उत्तर कदाचीत च देत असतील नाही का??

(Note:- याचा अर्थ ती फार सोशिक आहे किंवा राघव वैदेहीला फार छळतो वगैरे असं नाही बरं का…
काही पुरुष अपवाद ही असतील पण कधीतरी हा प्रसंग प्रत्येकाच्या घरात घडतोच…)

दिप्ती अजमीरे.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत