पैशाच्या लोभावर माणुसकीच्या नात्याची मात!#माझेलेखन

Written by

सफेद रंगाचा मळकटलेला सदरा, पायजमा आणि डोक्यावर नेहरू टोपी, पायात कोल्हापुरी चप्पल जी तिच्या शेवटच्या घटका मोजत होती…काळा सावळा वर्ण,सुरकूतलेला चेहरा,मजुरी करून रग्गड झालेले हात पाय, निस्तेज चेहरा आणि भिरभिर सतत कुणालातरी शोधत असलेली नजर… जणू काही असंख्य अशा वेदनांचे ओझे घेऊन एक ५३-५४ वयाचे गृहस्थ बस डेपो मधे एका बाकावर बसले होते. मोलमजूरी करून मेहनतीने चार पैसे मिळवून पोटाची खळगी भरणारा अगदी साधारण माणूस.. गावापासून थोडा दूर असलेल्या आठवडी बाजारात मजुरी करत होते ते..

संध्याकाळी उशिरा बाजार संपल्याने बस स्टॉपला यायला थोडा उशिराच झालेला.. जे चार पैसे दुपारपर्यंत मजुरीतून मिळाले त्यातून त्याने पोटाला आधार आणि शरीराला ताकद मिळावी म्हणून कसंबसं काहीतरी ढकललं पोटात पण संध्याकाळी बाजार संपेपर्यंत फक्त तीन रुपये जमले त्याच्याकडे…😔डेपोपासून त्यांच्या गावापर्यंत जायला बसचे भाडे दहा रुपये होते, आता मोठा प्रश्न घरी कसं जाणार?? नेहमीच या मार्गाने प्रवास करत असल्यामुळे बरेच लोक ओळखीचे झाले होते. त्यांनी विचार केला थोडावेळ इथेच बसून वाट बघतो ,कुणीतरी ओळखीचे किंवा गावातले भेटले तर उसने पैसे मागुन घरी जाता येईल.. बराच वेळ वाट बघता बघता एकामागून एक त्यांच्या गावाच्या बस जात होत्या पण काही केल्या कुणी ओळखीचं दिसेना.

ते गृहस्थ एवढे थकले होते की बसल्या जागीच त्यांचा डोळा लागला..म्हणतात ना फाटक्या खिशाच्या माणसासारखी शांत झोप श्रीमंताला पैसे देऊनही मिळत नाही तसंच काही..आपण प्रवास करताना चार वेळा चाचपडून बघतो सगळं ठिकाणी आहे ना,अक्षरशः बॅग वगैरे डोक्याखाली घेऊन किंवा हाताला बांधूनही झोपतो पण ज्या माणसाकडे चोरी जायला काहीच नाही त्याला कसलीच तमा नसते..

त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती, बराच अंधार झाला होता. उठल्यावर त्यांना त्यांच्या बाजूला एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेलं एक नोटांचा बंडल दिसला.त्यांनी तो बंडल उचलला.ऐन दिवाळीच्या एक दिवस आधीची गोष्ट, ज्या माणसाकडे घरी जायला पूर्ण दहा रुपयेही नव्हते, त्याच्या हातात आता नोटांचा बंडल होता. एखादा माणसाने लगेच बस पकडून गाव गाठलं असतं पण ह्या गृहस्थांनी आजूबाजूच्या लोकांना विचारायला सुरुवात केली की ही बॅग कुणाची आहे, कुणाचे पैसे हरवलेत का वगैरे वगैरे.. कुणीही बोललं नाही किंवा दावा केला नाही की बॅग त्यांची आहे. त्या गृहस्थाला आता काय करावे समजेना. थोडावेळ तिथेच वाट बघितली जेणेकरून ज्याचे पैसे पडले, तो शोधत येईन म्हणून पण कुणी दिसत नव्हतं. एव्हाना स्टँड वरची गर्दीही बरीच कमी झाली होती शेवटी त्या गृहस्थाची नजर बाजूलाच असलेल्या पोलीस चौकीवर पडली.ते पोलीस चौकीजवळ जाऊन पोलीस येण्याची वाट बघू लागले.

बराच वेळ उलटून गेल्यावर, एक माणूस बस स्टँडवर आला…सैरभैर होऊन सगळ्या बस स्टँड वर तो त्याचे हरवलेले पैसे शोधत होता.जो भेटेल त्याला विचारपूस करत होता मग त्यातल्या एकाने सांगितले,”एक गृहस्थ ज्यांना तुमची बॅग सापडली तेही शोधत होते तुम्हाला.. इथेच कुठे असतील.सफेद कपडे घातलेला कमी उंचीचा माणूस आहे तो”. हे बोलणं होताच त्या माणसाची नजर चौकीबाहेर बसलेल्या गृहस्थांकडे गेली. तो धावतच त्यांच्याजवळ पोहचला, विचारणा केली पैशांबद्दल.. त्या गृहस्थाने पैसे मोजून ठेवले होते चाळीस हजार रुपये होते ते, नोटाही बघून ठेवल्या होत्या जेणेकरून कुणी खोटं बोलून ते पैसे लुबाडू नये. त्या गृहस्थांनी बरेच प्रश्न(जसे की किती रुपये होते, कितीच्या नोटा होत्या वगैरे)करून पूर्ण खात्री करून घेतली की ते चाळीस हजार रुपये त्या माणसाचेच होते.

त्या गृहस्थाचा प्रामाणिकपणा बघून त्या माणसाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. त्याने पुढे माहिती दिली की त्याची बायको दवाखान्यात ऍडमिट आहे,हे पैसे तो त्याच्या बायकोच्या ऑपरेशन साठी घेऊन चालला होता आणि या सगळ्या टेन्शनमध्ये ती बॅग कधी राहून गेली बाकावर समजलंही नाही..तो म्हणाला,”दवाखान्यात पोहचल्यावर बघितलं तर पैसे नाहीत म्हणून पुन्हा इथे आलो शोध घेत..कारण दुसरीकडे कुठे थांबलोच नव्हतो..तरीही पायाखालची जमीन सरकलीच होती की नाही सापडले पैसे तर बायकोचं काय? डोळ्यांसमोर अंधार दिसू लागला होता पण तुमच्यासारखे माणसं आहेत जगात अजून तोवर माणसाचा माणुसकीवर विश्वास राहील, खूप धन्यवाद तुमचे!”

त्याने खूप मनापासून आभार मानून त्यातली हजार रुपयांची नोट काढली आणि त्या गृहस्थांना देऊ लागला की तुमच्या प्रमाणिकपणासाठी हे छोटसं बक्षीस आणि माझी आठवण म्हणून ठेवा तर ते गृहस्थ त्या माणसाला एवढंच म्हणाले,” नको रे बाबा, मी मजुरी करणारा माणूस आहे,एकटा राहतो. आज काहीच काम नाही मिळालं म्हणून इथे बसून रहावं लागलं,बहुतेक तुझ्या मदतीसाठीच देवाने काम नाही दिलं मला आज,मी तुझी परिस्थिती समजू शकतो, माझीही बायको आणि मुलगा दोघेही वारलेले आहे..पैशाअभावी आपली माणसं गमावण्याचं दुःख मी चांगलच समजू शकतो. तुमच्या बायकोचे प्राण वाचवण्यासाठीच देवाने माझी बस हुकवली असेल.. आता तुमच्या बायकोचे ऑपरेशन नीट होईल यातच मला समाधान आहे.माझ्याकडे घरी जायच्या तिकिटासाठी तीन रुपये आहेत,सात रुपये कमी पडताय मला फक्त तेवढे द्या..हे हजार रुपये नको मला!!!”

हे ऐकून तो समोरचा माणूस अवाक झाला. तो विचारच करत राहिला किती तो प्रामाणिकपणा आणि स्वच्छ,नितळ आशा मनाचा हा माणूस!! त्याने त्याला सात रुपये देऊ केले.

ही घटना सत्य आहे मित्रमैत्रिणींनो,त्या गृहस्थांचे नाव आहे धनाजी यशवंत जगदाळे.महाराष्ट्रातल्या सातारा इथल्या माण तालुक्यामधील पिंगळी बुद्रुक इथे ते राहतात.ही बातमी सध्या सगळीकडे खूप पसरत आहे.. अनेक वृत्तपत्र, सोशल माध्यमांनी धनाजी यांच्या कार्याची दखल घेतली. अनेकांनी ही न्युज वाचलीही असेल. वाऱ्यासारखी ही बातमी पसरली, अमेरिकेतल्या एका मराठी बांधवाने बक्षिस म्हणून धनाजी जगदाळे याना त्यांच्या प्रमाणिकपणासाठी पाच लाखाचे बक्षीस जाहीर केले, या पठ्याने तेही नाकारले.. किती ही मनाची श्रीमंती..त्यांच्या नावाला सार्थ असं उत्तुंग व्यक्तिमत्त्व!!

आजच्या कलयुगात रोजच आपण वाचतो, बघतो की परिस्थिती अनेकांना कशी वाईट मार्गाने जायला लावते..पण परिस्थितीचा सामना करत जगासमोर आदर्श ठेवणारे धनाजी यांच्यासारखे धनवान व्यक्तीही दिसून येतात.

आजकाल जिथे पैशाचं पारडं रक्ताच्या नात्यांपेक्षाही जड झालेलं दिसतं तिथे धनाजी जगदाळे सारखेही लोक आहेत, जे आपलं सर्वस्व गमावून बसलेत पण माणुसकीची नाती सुद्धा आपुलकीने निभावताय. जिथे आजच्या जगात सकखे भाऊ-भाऊ, भाऊ-बहिणी एकमेकांशी एवढंच काय तर आईवडील यांच्याशीही पैशासाठी नाती तोडताय तिथे अशाही घटना घडताय.पैसा आणि नाती सांभाळताना अनेकांचा तोल ढासळतो, या तुलनेत नेहमीच पैशाला जास्त महत्व दिलं गेलंय..पैसा बऱ्याच वेळा ही लढाई जिंकतही असेल पण ती लढाई करणारा आयुष्यभरासाठी जिंकूनही हरलेला असतो कारण पैशाने प्रेम,आपुलकी,माया काहीच विकत मिळत नाही. जेव्हा आपल्या नात्यांची,आपल्या माणसांची खरी किंमत कळते, तोवर ती रेतीसारखी हातातून निसटलेली असतात.

खूप लोक पैसा,संपत्तीने श्रीमंत असतात पण मनाची श्रीमंती असणारा गरीब धनाजीची ही कथा खरच किती प्रेरणादायी आहे ..माझा तर विश्वास पटला की माणुसकी आणि प्रामाणिकपणा दोन्हीही अजून जिवंत आहे..विश्वाची निर्मिती करणारा विधाता लोकांची मदत करायला त्याचे देवदूत पावलोपावली या पृथ्वीवर पाठवत असतो याची प्रचिती आली.
मित्रमैत्रिणींनो, लेख आवडल्यास लाइक आणि कमेंट जरूर करा. शेयर करा पण नावसहितच! माझे अजून लेख वाचण्यासाठी आणि नवीन लेखांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मला नक्की फॉलो करा.

©®सुवर्णा राहुल बागुल

#माझेलेखन(पैसा आणि नाती सांभाळताना)

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा