पैसे फेकले की सारं मिळत…..!!

Written by

 

उषाताई आणि सुरेशराव यांचं चौकोनी कुटुंब. ते दोघे आणि एक मुलगा, एक मुलगी.
दोन्ही मुलं चांगली शिकली, आणि नोकरीलाही लागली.
दोघांनी आपापलं जमवलं आणि उषाताई आणि सुरेशरावांनी काहीशा नाराजीनेच का होईना, पण दोघांचीही लग्न एकापाठोपाठ लावून दिली.
दोन्ही पोरांनी जमवलेली स्थळ त्यांना अजिबात आवडली नव्हती.
ते मुलांना सारखे ऐकवून दाखवायचे, आम्ही याहून छान जोडीदार निवडले असते तुमच्यासाठी.
मुलगा वैभव, अन् त्याची बायको आरती. आरती स्वभावाने खरंतर खूप चांगली होती. पण या दोघांच्याही मनात तिच्याबद्दल आकस असल्याने, त्यांना तिचं काहीच आवडायचं नाही.
प्रत्येक गोष्टीत तिला नावच ठेवायचे. तिने बनवलेल्या स्वैपाकात, तिच्या वागण्यात प्रत्येक गोष्टच खटकायची त्यांना तिची.
आरतीला खूप वाईट वाटायचं. तरी ती तिच्या परीने त्यांचं मन जिंकायचा प्रयत्न करायची. पण सासू सासरे दोघही तिला उपरीच समजायचे.
आपल्या जावयाबरोबरही त्यांची तिच ट्रिटमेंट असायची. वास्तविक पाहता, सगळं चांगलं होतं. त्यांच्या मुलीच्या, अनघाच्या सासरचं.
देवमाणसं होती सगळी. तिचे सासू सासरे देखील तिच्याशी खूप चांगले वागायचे. राहुल त्यांचा एकुलता एक मुलगा. मुलगी नाही, म्हणून ते अनघाशी अगदी पोटच्या मुलीप्रमाणेच वागायचे.
आणखी काय हवं होतं??
पण अनघाने कधी आई वडिलांच्या चौकशीसाठी फोन केला, की हे बाकीचं सारं सोडून आमच्या मर्जीप्रमाणे लग्न करायला हवं होतंस, हेच ऐकवायचे.
घरी आली की लेक्चर असायचाच तिला. ती म्हणायची, आता माझं लग्न झालय ना? का मला सारख तेच तेच ऐकवता.
असं केलत तर मला इकडे यावसं वाटणार नाही, जरा समजून घ्या ना.
धुसपुस वाढली तर उषाताई सरळ म्हणायच्या, नका येऊ, काही गरज नाही कोणी येण्याची, बघू आमचं आम्ही. तसंही पैसे फेकले की कोणीही मिळेल करणारं. हा टोमणा सुनेलाही असायचा.
अनघाला अशा बोलण्याने खूप रडू यायचे. आरतीलाही वाईट वाटायचे.
दोघही सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले असल्याने, दोघांनाही पेन्शन होती. गाठीला बराच पैसाही होता. त्यामुळे नकळत ते माणसांशी तोडले जात होते. काहीही झालं तरी गाठीला असणारा पैसा त्यांना सुखरूप तारेल, अशी त्यांना खात्री होती.
त्यामुळे एवढंस खटकलं तरी ते वैभव आणि आरतीला अगदी धारेवर धरायचे.
त्यांच्या अशा वागण्याने आरतीची मनस्थिती बिघडू लागली. तिची सतत चिडचिड होऊ लागली. नोकरीतही धड लक्ष लागेना. मानसिक ताणामुळे पाळणाही हलेना. तेव्हा त्यांनी खूप विचाराने बाहेर पडायचा निर्णय घेतला.
वेगळे राहत असले तरी एकाच शहरात होते. दर आठवड्याला किंवा सुट्टीच्या दिवशी या दोघांना भेटायला यायचे ते.
उषाताई आणि सुरेशरावांना एकटेपणा टोचू लागला होता खरा. पण दोघाही मुलांना ते जाणवू द्यायचे नाहीत. अनघाला, त्यांच्या मुलीला गोड बाळ झालं होतं. ती बाळाला घेऊन कधीतरी जायची त्यांच्याकडे. नात आली की खूप छान वाटायचं त्यांना, पण अढीमुळे ते तिच्यातही जास्त गुंतायचे नाहीत.
विशेष काही छंद नसल्यामुळे त्यांचा दिवसातला बराच वेळ याच्या-त्याच्या नावाने बोटं मोडण्यात जायचा.
सर्वच वाईट होते त्यांच्या दृष्टीने.
कधी कोणी नातेवाईक आले तर हे दोघे त्यांच्यासमोर आपल्या मुलांना नावं ठेवत बसायचे. मग काही सुज्ञ नातेवाईक, त्या दोघांना समजवायचे, शेवटी कोण आहे तुम्हाला सांगा, तुमच्या म्हातारपणी तेच आहेत तुम्हाला बघायला. तुमची पोरंच तुम्हाला बघणार, तोडू नका त्यांना असं.
यावर त्यांचं उत्तर ठरलेलं असायचं, काही गरज नाही आम्हाला
कोणाची. आम्ही कोणाचे मोहताज नाही. हल्ली पैसे फेकले की सारं मिळतं!!
वय वाढत चाललं तसं, दोघांच्याही अगोदर असणाऱ्या व्याधींमध्ये आणखी भर पडायला लागली.
उषाताईंना स्मृतिभ्रंशाने ग्रासले. नेहमीच्या सवयीच्या गोष्टी करणे त्यांना त्रासाचे होऊ लागले. सतत एक माणूस लागायचा बरोबर. सुरेशरावांनाही वयामुळे त्यांचं करणं झेपेनासं झालं. वैभव आणि आरती घरी घेऊन जाण्यासाठी आले तर, त्यांनी घर सोडायला ठाम नकार दिला.
हळुहळु उषाताईंचा नैसर्गिक क्रियेवरचाही कंट्रोल सुटू लागला. सुरेशरावांनी तिच्या देखरेखीसाठी भरपूर पैसे मोजून बाई नेमली.
बाई करायची पण सारं आपल्या तालाप्रमाणे. सुरेशरावांचं अन् तिचं काही पटेना. सुरेशरावांनी दुसरी बाई नेमली. तिचंही काम त्यांना पटलं नाही. अशा बऱ्याच बायका बदलून झाल्या, सुरेशरावांच्या मध्ये मध्ये करण्याच्या आणि प्रत्येक गोष्टीत त्यांच्यावर संशय घेण्याच्या स्वभावामुळे कितीही पैसे फेकले तरी कोणी टिकेना. नंतर तर कोणी त्यांच्या घरी यायला इंटरेस्टच दाखवेना झालं.
सुरेशरावांनाच करावं लागत होतं सर्व. इकडे वैभव आणि आरतीला त्यांचं कसं होणार ही काळजी वाटत होती. त्यापायी त्यांनी लगेचच एक निर्णय घेऊन टाकला. अनघाला फोन करून त्यांनी आता आपणच त्या दोघांची जबाबदारी घेतली पाहिजे, असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी आरती त्यांच्याकडे गेली, आणि तुम्हाला चांगली बाई मिळेपर्यंत मी सासूबाईंचं सर्व बघेन असं म्हणाली.
आणि खरोखर ती मनापासून कामाला लागली. अगदी आपल्या आईप्रमाणे ती उषाताईंची सेवा करत होती. त्यांचे जागीच होणारे नैसर्गिकविधीदेखील न कुरकुरता साफ करत होती.
तिच्या एकटीवर भार नको म्हणून, अनघा देखील काही तास येऊन आईकडे पाहू लागली.
दोघीही उषाताईंशी सतत गप्पा मारत बसायच्या. अनघाचा नवरा संध्याकाळी मुलीला घेऊन यायचा. त्या चिमुकलीच्या बागडण्याने घर अगदी भरलेलं वाटायचं.
आरती तर रजा काढूनच यांच्याकडे मुक्कामाला होती. वैभव गरजेला तत्पर असायचा.
आता पडल्या पडल्या उषाताईंचे डोळे भरून येत होते. इतक्या बायका ठेवल्या पण आरती आणि अनघा सारखं कोणी मायेने काही केलं नाही. या दोघीचा स्पर्श त्यांना उभारी देत होता. नातीच्या चिवचिवाटात जीव गुंतू पाहत होता.
वेळेला आपली माणसं धावून आली होती, पैसे न फेकताही!!
सुरेशरावांनाही आपली चूक उमगली. एक गोष्ट काय मुलांनी त्यांच्या मनाप्रमाणे केली, आपण त्यांचं नावच टाकून दिलं. पैसे होते, वाटलं कशाला लागतायत कोणी माणसं!!  पैशाने फक्त अहंकार गोजारायचं काम केलं होतं!!
पैसे फेकून जमणाऱ्या माणसांत तो मायेचा ओलावा नव्हता.
कितीही पैसे फेकून तो मिळाला नाहीच, आणि कधी मिळालाही नसता.
सुरेशरावांनी पहिल्यांदा मुलाची, सुनेची, लेकीची आणि जावयाची क्षमा मागितली. आम्हा दोघांनाही अहंकारपुढे काही दिसले नाही. खरंच कितीही पैसे फेकले तरी तुमच्यासारखी गरजेला धावणारी माणसं मिळू शकणार नाहीत. ती आपलेपणाच्या ओढीनेच येणार, हे आता समजलं आम्हाला.
ही कथा खरी आहे. माझ्याच एका परिचितांच्या तोंडी सदैव असायचं, पैसे फेकले की सारं मिळतं; पण जेव्हा वेळ आली तेव्हा ज्या माणसांना त्यांनी दूर लोटलं, तिच माणसं त्यांच्या सेवेला निस्वार्थ भावनेने मायेपोटी धावून आली, तेव्हा पैशापेक्षा माणसं सांभाळणचं जास्त महत्वाचं आहे नाही का??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना मात्र नावासकटच करा.
Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा