पोस्टपार्टम डिप्रेशन- एक सर्वसाधारण समस्या

Written by

मुलाच्या जन्मानंतर आठ वर्षांनी पुन्हा मुलगी हवी म्हणून चान्स घेतला आणि जुलै मध्ये दिवस राहिल्याचे समजले.खूप आनंद झाला. आता देवाच्या भरवश्यावर राहिले मुलगीच पाहिजे म्हणून .रोज देवाकडे एकाच मागणे होते मुलगी दे म्हणून. माझ्या आईचा तर नवसही बोलून झाला माझ्या मुलीला मुलगीच होऊ दे  म्हणून. सगळ्यांच्या आशिर्वादाचे फळ म्हणून 29 एप्रिल ला रात्री 12वाजून 27 मिनिटांनी माझी परी, माझ गोड पिल्लू, माझी सोनुली मला झाली.तिच्याकडे पाहिल्यावर मला आनंदाश्रु आले.इतकी गोड इतकी सुंदर माझी मुलगी तिच्याकडे पाहतच रहावेसे वाटे. नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने डॉक्टरांनी दुसऱ्याच दिवशी घरी सोडले आणि आमची स्वारी घरी आली. मी आईच्या घरी आले होते.घरी आईने आणि माझी भावजय हिने स्वागताची जंगी तयारी केली होती. बिल्डिंगच्या गेट पासून ते अगदी घराच्या दारापर्यंत फुलांचा सडा घातला होता, घरभर गुलाबी रंगाचे फुगे लावले होते. आईने माझे व माझ्या लेकीचे औक्षण केले. माझा नवरा, माझा मुलगा कौतुकाने बाळाला पाहत होते. खूप आनंदी होते सगळे. दुसऱ्या दिवसापासून मालीश करायला मावशी आल्या बाळाचे व माझे मालीश सुरू झाले. वेगवेगळ्या खिरी, डिंकाचे लाडू, आळीव लाडू सगळे साग्रसंगीत सुरू झाले. आठ दिवस मजेत गेले आणि अचानक मला थोडेसे वेगळे वाटायला लागले. हा अनुभव नवीनच वाटत होता. मी काही पहीलटकरीन नव्हते. एका मुलाचा अनुभव होता पण हे काही वेगळेच वाटत होते. एक विचित्र हुरहूर, अस्वस्थता किंवा शब्दात सांगता येणार नाही असे काहीतरी. माझी भूक अचानक कमी झाली एरवी आवडणारे डिंकाचे लाडू सुद्धा नकोसे झाले, झोप लागेना, मन कशात रमेना.सारखे रडावे असे वाटत होते आणि रडत देखील होते त्याचे कारण कळत नव्हते. आई बाबांशी बोलले ते म्हणाले कधी कधी जबाबदारी वाढल्याने असे होते दुर्लक्ष कर. आपले रूटीन बदलते म्हणून होत असावे. पण मग मला प्रश्न पडला पहील्या खेपेला मला असे वाटले नव्हते मग आत्ताच का? दिवस जसे जात होते तसा माझा त्रास देखील वाढत होता. जेवण जात नसल्याने दूध कमी झाले. बाळ किरकिर करू लागले त्या कीरकिरीचा देखील त्रास होत होता. बाळाला घ्यायचे म्हणजे टेंशन यायचे. तिने शी शु केली की टेंशन यायचे तिची लंगोट बदलणे, कपडे बदलणे ही कामे डोंगराएवढी मोठी वाटायची. मला अगदी आश्चर्य वाटायचे खर म्हणजे मी खूप आनंदी असायला हवे होते सगळे माझ्या मनासारखे झाले होते मला मुलगी हवी होती मुलगी झाली. छान चौकोनी कुटुंब एक मुलगा एक मुलगी छान प्रेमळ नवरा सगळ्या सुखसुविधा आणि मग हे काय वाटतंय आपल्याला काही समजत नव्हते. माझा नवरा दर आठवड्याला आम्हाला भेटायला माझ्या माहेरी यायचा सकाळी येऊन तो रात्री परत जायचा तो जाते वेळी मी खूपच रडायचे सगळ्यांना ते फारच विचित्र वाटायचे. साधारण वीस बावीस दिवसांनी मी या बाबतीत माझ्या नवऱ्याशी बोलले पण त्याचे देखील हेच मत पडले की तुझे रूटीन बदलले आहे त्यामुळे हा त्रास होत असावा तुझ्या आवडीचे काहीतरी कर पण मला काहीच करावेसे वाटत नव्हते टीव्ही बघणे, गाणी ऐकणे, पुस्तक वाचणे कशातही मन रमत नव्हते की कोणाशी बोलावेसे वाटत नव्हते. दिवसेंदिवस माझी तब्बेत खराब होत होती. शारिरीक थकवा खूप येत होता. आता मात्र मी घाबरले माझा कडेलोट होतो की काय वाटायला लागले.मग मात्र मी या त्रासाचा शोध घ्यायचे ठरवले आणि गूगल वर सर्च केले तेंव्हा मला माझ्या या त्रासाचे नाव सापडले मेडीकल टर्म मध्ये याला प्रसूती नंतर येणारे नैराश्य म्हणजेच पोस्टपार्टम डिप्रेशन असे म्हणतात हे समजले आणि यावर उपचार देखील आहे हे ही समजले. बाळाला आता सव्वा महिना होत होता आणि मी माझ्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. माझे माहेर थोडे गावात असल्या कारणाने तिथे योग्य उपचार मिळाले नसते पण सासर शहरात असल्याने तिथे चांगले डॉक्टर उपलब्ध होते. मी माझ्या घरी आले. नवऱ्याने अगोदरच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती.दुसऱ्याच दिवशी मी आणि माझा नवरा आम्ही डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितले की जवळपास 60% बायकांना हा त्रास होत असतो पण दुर्दैवाने या आजाराबद्दल अजूनही फारसे कोणी जागृत नाहीत. हॉर्मोन्स चे असंतुलन, अनुवंशकता किंवा कोणत्याही प्रकारचा ताणतणाव ही या डिप्रेशनची कारणे आहेत पण योग्य औषधोपचार घेतल्याने हा त्रास कमी कमी होत जाईल हे ही सांगितले. औषधं सुरू झाली.दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा ऑफिस ला जायला निघाला आणि मी वेड्यासारखी रडायला लागले.तो ऑफिस ला गेल्यावर मी कसं करू काय करू हे कळेनासे झाले, मला काहीच जमणार नाही असे वाटायला लागले. आत्मविश्वास खूपच कमी झालेला. शेवटी त्याने तीन आठवड्याची सुट्टी घेतली.तो ऑफिस चे काम घरी लॅपटाॅप वर करू लागला. या काळात त्यानेच मुलीची, मुलाची आणि माझीही काळजी घेतली. हळूहळू औषधांचा परिणाम दिसायला लागला.मला बरे वाटायला लागले. मी या फेज मधून बाहेर यायला लागले. मला भूक लागायला लागली, झोप लागायला लागली, माझे जे छंद माझ्यावर रुसले होते ते माझ्यावर परत प्रसन्न झाले. एकूण मी परत माणसात आले. मी माझ्या मुलीची जबाबदारी घेतली, नवरा परत ऑफिसला जायला लागला सर्व पूर्वपदावर आले. सहा महिने औषधे चालू होती त्यानंतर हळूहळू डोस कमी कमी करत बंद केला आणि मी या त्रासातून कायमची बाहेर पडले. योग्य वेळेत योग्य उपचार घेतल्यामुळे माझा त्रास वेळेत कमी झाला.या वेळेस खरी गरज असते ती औषधोपचार आपल्या माणसाचे प्रेम, आपुलकी आणि मदतीची. खरे म्हणजे या विषयावर खूप कमी लिहिले गेले आहे. खूप लोकांना या विषयी माहिती नाही त्यामुळे हा लेखप्रपंच. या लेखामुळे एका महिलेला जरी याचा उपयोग झाला तरी लेख लिहिल्याचे समाधान मला मिळेल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये कळवा.

अश्विनी रितेश बच्चूवार.

 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.