प्यार मे कभी कभी ऐसा हो जात है….

Written by

©सरिता सावंत भोसले

सारंग आज ऑफिसधून जरा लवकरच आला. दरवाजा उघडाच होता. आई भजनी मंडळात गेली वाटत असे स्वतःशीच पुटपुटत आत आला. बॅग सोफ्यावर भिरकावून दिली, शूज काढून सॉक्स काढून तिथेच टाकले. एक नजर घरात फिरवली. ग्रीष्मा किचनमध्ये काहीतरी काम करत होती. नऊ महिन्याचा छोटू बेडरूममध्ये झोपला होता म्हणून निरव शांतता घरात होती. फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसला. चहाची तलाप झालेली पण ग्रीष्मासोबत कालच झालेल्या भांडणानंतर दोघांमध्ये संभाषण नव्हतं.

काल सुट्टी होती म्हणून सारंग उशिरा उठलेला. आंघोळीपासून नाश्त्यापर्यंत सगळं कसं आरामात चाललेलं साहेबांचं. इकडे ग्रीष्माला नाश्ता,जेवण,छोटूला सांभाळणं,त्याची आंघोळ,त्याच खाणं पिण सगळं वेळच्यावेळी बघावं लागायचं. यातून तिला स्वतःला नाश्ता करायलाही वेळ मिळत नव्हता. सासूबाई होत्या पण त्याचंही वय झालेलं. फारसं काम त्यांना जमतं नव्हतं. त्यात सारंग घरी असला की खाण्याच्या वेगळ्याच फर्माईशी. आधी ती ते आनंदाने करायची पण आता  छोटुमधून फार कमी वेळ मिळायचा तिला सारंगकडे लक्ष द्यायला.

अर्धा तास झालं सारंगची आंघोळच चाललेली,छोटू रडत होता. ग्रीष्माच जेवण अर्ध राहिलेलं. तिच्यापुढे कामाचा पसारा वाढतच होता पण कमी नाही . सारंग घरी आहे म्हणजे थोडीफार मदत होईल आणि आराम मिळेल अस वाटलेलं तिला पण याला स्वतःमधूनच वेळ मिळत नव्हता. आंघोळ होऊनही आवरायला अर्धा तास मग ग्रीष्मा चिडलीच,”किती वेळ अरे, छोटू रडतोय निदान ते तरी ऐकायला येत की नाही तुला? उशिरा उठलास, आंघोळ उशिरापर्यंत करतोस आणि आता तरी त्याला घे. मी पण कामच करते.”

सारंग:”एक दिवस सुट्टीचा तोही नीट राहून देत नाहीस बघ. रोजतर तुझी चिडचिड ऐकत असतोच ऑफिसमधून आलं की आणि त्यात वरून तुझ आज काय हातच दुखतो,पाय दुखतो,कंभर दुखते सांगत असतेस. इतक्या दिवसात कधीतरी हसून आधीसारख स्वागत केलयस का माझं आठवतंय का? कधी प्रेमाने एकत्र बसूया म्हंटल तरी म्हणतेस काम आहे. कधी मिठीत यायला तरी वेळ असतो का ग तुला पण कामाची यादी सांगायला बरोबर वेळ मिळतो.”

“कामच तेवढी असतात की माझी यादी संपत नाही. सकाळी उठून तुझा  नाश्ता,डबा, आमचं जेवण की छोटूला खाऊ ते त्याची आंघोळ इथपर्यंत लगेच बघायचं. तोपर्यंत बाकीची काम घरातली आवरायची. तोवर छोटूला झोपवायच आणि काही राहिली असतील काम तर ती करायची. परत छोटू उठला की त्याला खेळवण, खाऊ देणं परत जेवण हे सगळं चक्र चालूच असत. यात मला स्वतःला आरश्यात बघायलाही वेळ नाही मिळत. माझा असा वेळ राहीलाच नाही. रात्रंदिवस मशीन सारखी फक्त चालू असते आणि यात तुझ्यासमोर तक्रारीच्या सुरात सगळं नसते सांगत पण माझही कुणी ऐकावं या भावनेतून सांगत असते. या सगळयात तू माझं बोलणं शांतपणे ऐकावं आणि प्रेमाचे चार शब्द बोलावं एवढीच अपेक्षा असते रे. सांभाळाव तर सगळं मलाच लागणार पण तुझा आधार असावा असं वाटत ज्याने या कामाचा क्षीण निघून जाईल. तू थकतोस तस मी ही थकते….किती काही झालं तरी मी हसतच तुझ्या स्वागतासाठी तयार असावी असच वाटत तुला…. तू माझ्याकडूनच अपेक्षा करतोस…माझ्या अपेक्षा मात्र मनातच विरून जातात मग”

ग्रीष्मा बिचारी त्रस्त होऊन बोलणंच सोडून देते सारंगशी. नेहमीचच होत त्याच वागणं ते.

आज लवकर आला तरी ग्रीष्माने त्याच्याकडे दुर्लक्षच केलेलं.थोड्या वेळाने वातावरणाचा अंदाज घेऊन सारंगने किचन मध्ये जाऊन स्वतःच चहा बनवला.दोन कपात ओतला. मोबाईल वर गाणं लावलं ‘प्यार मे कभी कभी ऐसा हो जाता है,छोटीसी बात का फसाना बन जाता है”

चहा घेऊन ग्रीष्माकडे गेला. ग्रीष्मानेही आता फार आढेवेढे न घेता चहा घेतला आणि दोघांना एकमेकांकडे बघून हसू आवरलं नाही. गाण्यासोबत चहाचा आस्वाद घेत दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून गेले?.

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा