प्रत्येक गोष्टीला तीच जबाबदार???

Written by

कचेरीतलं काम न झाल्याचं खापर पुन्हा एकदा तीच्यावर पडलं.. अरुंधती मुळे घरातून निघायला उशीर झाला म्हणून काम झालं नाही असा बिनबुडाचा आरोप लावून अप्पा मोकळे झाले.वयाच्या ४८ व्या वर्षीही अरुंधती हेच सहन करत होती. कुठलीही वाईट गोष्ट घडली कि घरात फिरून फिरून ते तिच्यावरच यायचं. कचेरीतल्या कामामुळे अप्पा घरात चिडचिड करत, म्हाताऱ्या सासूबाई कोपऱ्यात बसून अरुंधती काय इतका त्रास देते म्हणून माझं लेकरू असं वागतं ? हा नेहमीचा टोमणा मारायच्या.. मुलांना कमी गुण मिळाले… अरुंधती मुलांकडे लक्ष देत नाही…. मुलं जरा काही चूकीची वागली… आईवर पडलीत.. घरात कोणी आजारी पडलं.. अरुंधती खाण्या पिण्याची काळजी घेत नाही, अप्पा घरी उशिरा आले.. अरुंधती काहीतरी बोलत असणार म्हणून तिच्या कटकटीला कंटाळून अप्पा घरी येत नाही… घरातली एखादी वस्तू सापडली नाही…अरुंधती घर नीट आवरत नाही…

एकदा तर कहरच … अप्पा एका रात्री दारू पिऊन पेंगत घरी आले, अरुंधती ला वाटलं सासूबाई आता तरी अप्पांना खडे बोल सुनावतील… पण झालं काय.. “कसलं टेन्शन आहे माझ्या लेंकरुला?? लग्ना आधी कधीच पित नव्हता.. कोण इतका त्रास देतं घरात माझ्या लेकराला काही कळत नाही.. ” अशी मुलांचीच बाजू घेऊन पुन्हा एकदा अप्रत्यक्षरीत्या अरुंधती वरच खापर फोडले गेले…

अरुंधती ने आता बोलायचं ठरवलं… अप्पांना तिने सुनावलं.. ” प्रत्येक गोष्टीला मीच का जबाबदार असते? मलाच का दोषी ठरवलं जातं ?? तुमच्या चुका तुम्ही भोगतात आणि चुका मान्य न करता खापर माझ्यावर का फोडतात? ”

अप्पांना हे असलं ऐकायची सवय नव्हती, अरुंधती पुढे काही बोलायच्या आत अप्पानी अरुंधतीच्या कानशिलात लगावली, रात्रभर रडत अरुंधती चे डोळे सुजून गेले, दुसऱ्या दिवशी घरात अरुंधती ला डोळे का सुजले म्हणून विचारलं , तिने सांगितलं कि अप्पांनी तिला मारलं.. आता हे ऐकून आपल्या मुलाला जाब न विचारता सासूबाई ” असूदेत, तुही काही कमी नाही.. ” असं म्हणत मुलाच्या चुकांवर पांघरून घातलं…

गेली कित्येक वर्ष अरुंधती हेच सहन करत राहिली, अगदी रस्त्यात गाडी बंद पडली तरी अरुंधती मुले माझं गाडीच्या सर्व्हिसिंग च लक्षात आलं नाही आणि म्हणून गाडी बंद पडली इथपर्यंत आता तीच सगळ्या गोष्टींना जबाबदार होती…

मुलं शिकायला बाहेरगावी होती… आपल्या आईची बाजू घेत घेत तीही प्रयत्न करून थकली होती.. इतकी वर्ष संसार सांभाळूनही आईला अशी वागणूक मिळते हे समजून घेणारी ती मुलं समजदार होती.. पण आता ती बाहेरगावी असल्याने अरुंधती एकटी पडली होती..

एकदा दुपारी अप्पांचा फोन वाजला.. “बाबा, मी युनिव्हर्सिटीत पहिला आलोय” राकेश आनंदाने सांगू लागला.. अप्पा आनंदाने वेडे झालं, घरात सर्वांना राकेश बद्दल सांगितले.. ” माझ्या पोराने इतका पैसे ओतून पोरांना शिकवलं म्हणून इतकी मोठी झाली पोरं .. आणि पहिला येणार नाही तर काय … आपल्या बापावर पडलाय ना.. ” सासूबाईंनी सुरु केलं..

राकेश दुसऱ्या दिवशी घरी आला.. घरात अगदी कौतुकाच वातावरण पसरलं होत.. त्याचा मुलाखतीसाठी एक वर्तमानपत्राचे संपाद्क घरी आले.. राकेश ने त्यांना सांगितले..

“आमच्या घरात प्रत्येक गोष्टीला.. म्हणजे अगदी गाडी बंद पडण्यापासून ते कुणी आजारी पडलं.. तर त्याला आईच जबाबदार असते… पण आज मी अभिमानाने सांगतो.. माझ्या या यशालाहि माझी आईच जबाबदार आहे.. तिने घेतलेल्या काळजीपासून ते कठीण प्रसंगाला धीराने समोर जाण्याचं बळ तिनेच दिलं आहे.. आणि असं म्हणतात ना की आई वडिलांपासून मुलांना हुशारी मिळते, माझ्या आई पासून मला ही हुशारी मिळाली.. माझ्या आईचे शिक्षण माझ्या वडिलांहून जास्त आहे पण तिने कधीही या गोष्टीचा गवगवा केला नाही.. म्हणून माझ्या या यशाला जबाबदार फक्त माझी आईच.. दुसरे कोणीही नाही… ”

अरुंधती सार्थ आणि डबडबलेल्या डोळ्यांनी राकेश कडे पाहत होती…

अप्पा आणि सासूबाई शरमेने नजरा चुवत होते…

 

असेच सुंदर लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमचे फेसबुक पेज लाईक करा

https://www.facebook.com/irablogs

Article Categories:
नारीवादी

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा