प्रवास एकटीचा…..#कथालेखन

Written by

आई अग थांब ना, का असा हट्ट करतेस, काही चुकले का आमचे, मुलगा निरंजन आणि सून श्वेताली वसुंधरा बाईंना विचारत होते.

खरंच थांब वसू, अग माफी मागतो मी तुझी, पण तुझा हा वृद्धाश्रमात जायचा निर्णय मागे घे. वसुंधरा बाईंचे पती सुधाकरराव त्यांना समजावत होते.

पण वसुंधरा ठाम होती आपल्या निर्णयावर. हे बघ निरंजन, मी माझी सारी कर्तव्य पार पडली आहेत, तुझे व तुझ्या बहिणीचे श्रावणीचे शिक्षण पार पाडले. तुम्हाला छान नोकऱ्या लागल्या, तुमचे लग्न करून दिले. श्रावणी व श्वेताली चे बाळंतपण केले, तुमची मुलं ही आता पुरेशी मोठी झालीत. आता माझे काम संपले. थकले रे आता मी. जाऊ दे मला आता.

पण वसू माझे काय, मला एकट्याला सोडून जाणार तू? सुधाकरराव मोठी आशा ठेवून तिला विचारत होते. वसुंधरा बाईंनी एक नजर त्यांच्यावर टाकली. तुम्ही एकटे पडणार, विषण्णपणे हसून त्यांनी विचारले, तुम्ही तेंव्हाही एकटे नव्हता आणि आत्ताही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत आहेत ना मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे. एकटी तर मी होते, तेंव्हाही आणि आत्ताही.

आई अग,पण बाबा माफी मागत आहेत ना तुझी. निरंजन वसुंधरा बाईंना समजावत होता. काय होणार आहे त्यांच्या माफिने, माझे गेलेले दिवस परत येणार आहेत का? तुझे बाबा एक आदर्श मुलगा होते, पण ते एक चांगला नवरा आणि वडील झाले का? विचार त्यांना.

वसू अग का त्या जुन्या गोष्टी पुन्हा उगाळत आहेस, सुधाकरराव हळूच त्यांना म्हणाले. जुन्या…जुन्या गोष्टी तुमच्यासाठी असतील, पण त्या जुन्या गोष्टींचे सावट अद्यापही माझ्यावर आहे, त्याचे काय करू. वसुंधरा बाई थोड्या चिडूनच त्यांना म्हणाल्या.

सांगा ना मुलांना, का आपल्याला इतकी वर्ष वेगवेगळे राहायला लागले? का आपल्या मुलांना आई वडिलांचे एकत्र प्रेम लाभू शकले नाही. तुमच्यावर असे कोणते दडपण होते की तुम्ही आम्हाला तुमच्यासोबत ठेऊ शकला नाहीत. सांगा…गप्प का बसलात?….

जाऊ दे मीच सांगते.

ऐक निरंजन, तुम्ही लहानपणी मला विचारत होतात ना, बाबा आपल्यासोबत का राहत नाहीत, दर शनिवार येऊन रविवारी लगेच का जातात, बाकीच्या मुलांसारखे आई बाबा दोघेही माझ्यासोबत का राहत नाहीत म्हणून. तेंव्हा तुला नीटसे सांगितले नाही, पण आता सांगते.

माझे व तुझ्या बाबांचे लग्न झाले. तेंव्हा आम्ही सगळे म्हणजे मी, तुझे बाबा, तुझे आज्जी- आजोबा एकत्र राहायचो. तुझ्या बाबांना त्यांच्या आई वडिलांचा फारच लळा. मलाही खूप छान वाटायचे. वाटायचे किती चांगला आहे माझा नवरा, आई वडिलांची किती सेवा करतो. आजकाल कुठे बघायला मिळते असे. मीही मग त्यांच्यासारखे त्यांच्या आई वडिलांची सेवा करायला लागले. शेजारी पाजारी, नातेवाईक तुझ्या बाबांचं खूप कौतुक करायचे. तुझ्या आज्जी आजोबांना म्हणायचे देखील नशीबवान आहात तुम्हाला असा मुलगा भेटला.

मीही त्यांची सेवा करायचे पण माझे नाव यात कुठेच नसायचे. नावासाठी मी करत नव्हतेच, पण कुठेतरी वाटायचे कोणीतरी म्हणावं किती चांगली सून आहे तुमची. असो, बाकीचे जाऊदेत पण तुमच्या आज्जी आजोबांनी देखील कधी असे म्हंटले नाही.

तुमच्या आज्जीचा खूप वरचष्मा होता घरात, त्या म्हणतील ती पूर्व दिशा. ठीक आहे, मी देखील मान्य केले ते, सगळ्या गोष्टी त्यांना विचारून करायचे, शक्यतो त्यांना तक्रार करायला जागा ठेवायचे नाही. पण तरीही कशात काही कमीच राहायचे. तुझ्या आजीला मी आणि तुझ्या बाबांनी बोललेले सहन व्हायचे नाही, आम्ही कुठे एकत्र फिरायला गेलेले सहन व्हायचे नाही, आम्ही काही बोलत असताना तुझ्या बाबांना मध्येच त्या बोलावून न्यायच्या. एकूणच आमच्यात एक छान नातं निर्माणच होऊ नये यासाठी त्या धडपडायच्या. माझ्या येण्याने त्यांना म्हणे असुरक्षित वाटत होत.

हळूहळू माझ्याही हे लक्षात आले. मुलाच्या प्रेमाचा गैरफायदा त्या घेत होत्या.आधी समजाऊन सांगितले त्यांना पण त्यांनी ऐकलेच नाही.नंतर मग मीही विरोध करायला सुरुवात केली. तशी त्यांनी माझ्यात आणि तुझ्या बाबांच्यात गैरसमज वाढवायला सुरुवात केली. नंतर नंतर तर वाद खूपच वाढायला लागले. मला तुझ्या बाबांचा खरंच खूप राग यायचा तेंव्हा, यांना सगळे माहीत असायचे काय खरं नी काय खोटं, पण प्रत्येकवेळी ते आजीची बाजू घ्यायचे आणि  उलट मलाच समजवायचे.

या मधील काळात तुझा व श्रावणी चा जन्म झाला होता आणि तुम्ही शाळेतही जात होतात. दिवसेंदिवस तुझ्या आजीचा खोटारडेपणा, आदळआपट, चुगली लावणे वाढतच होते.  त्याचा प्रतिकार म्हणून मीही बोलायचे, मग घरात भांडण.

एकदिवशी तुझ्या आजीने हुकुमी एक्का टाकला. ती तुझ्या बाबांना म्हणाली माझा तुझ्यावर किंवा माझ्या नातवंडांवर राग नाही. पण या बाईसोबत मला राहायचे नाही. त्यांना चांगले माहीत होते, त्यांचा मुलगा त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. या सगळ्यात माझे मरण झाले. तुझ्या बाबांनी काही दिवस विचार केला.. आणि एक दिवस माझ्याकडे आले नी म्हणाले, वसू मी काय म्हणतो ते नीट ऐक, आपले जे दुसरे घर आहे, जे सध्या भाड्याने दिले आहे,आणि ते येथून दोन तासाच्या अंतरावर आहे तेथे तू नी मुलं राहता का? अगोदर तर मला समजलेच नाही, पण जेंव्हा समजले तेंव्हा पायाखालून जमीन सरकली होती. तुझ्या बाबांनी आजीला न समजावता मलाच या घरातून जायला सांगितले होते.

आजीला तर आनंदच झाला. जोवर मी निमुटपणे सगळं ऐकत होते तिथपर्यंत मी गोड होते, आणि जेंव्हा स्वतःचा हक्कासाठी बोलले तेंव्हा खराब झाले.

तुझे बाबा मला समजावत होते, मी दर शनिवार रविवार तिथे येईन, तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. तिथे शाळा चांगल्या आहेत, मुलांचे काही हाल होणार नाही, मी या वयात आई बाबांना कसे एकटे सोडू, माझ्याशिवाय त्यांचे कोण आहे. लोक काय म्हणतील मला वगैरे वगैरे… माझ्या कानात काही शिरत नव्हते. माझ्या नवऱ्याने मला या घरातून  बाहेर जायला सांगितले होते, यावर माझा विश्वास बसत नव्हता.

शेवटी एका दिवशी ते घर सोडून मला व तुम्हाला बाबांनी इकडे आणून सोडले. आणि स्वतः तिथे राहून आई बाबांची सेवा केली. त्यांनी म्हंटल्याप्रमाणे आपल्याला त्यांनी काहीच कमी पडू दिले नाही, दर शनिवार, रविवार ते इथे यायचे. पण माझ्या मनातून एव्हाना ते उतरले होते. त्यांना समतोल राखता आला नव्हता, खऱ्याच्या बाजूने बोलता आले नव्हते. त्यांच्या आदर्श मुलगा होण्याच्या नादात त्यांनी माझा बळी दिला होता. तुमचा अभ्यास, तुमचे आजारपण, तुम्ही सगळ्या गोष्टीत तरबेज व्हायला हवेत या माझ्या धडपडीत, तुमचे प्रश्न, शेजारी पाजारी यांना पडणारे प्रश्न या सगळ्याला मला तोंड द्यावे लागले. या सगळ्यात ते कुठेच नव्हते.कितीदा मला एकटे वाटायचे…वाटायचे सगळ्या बायकांचे नवरे त्यांच्यासोबत असतात, पण माझाच नवरा माझ्यासोबत नाही किती कमनशिबी मी. कधी कोणत्या नवराबायकोला फिरायला जाताना पाहिले की वाटायचे हे सुखाचे क्षण देवाने आपल्याच ओटीत का टाकले नसावेत. खूप रडायचे मी. असेच दिवस जात होते तुम्ही मोठे झालात तुमच्या कॉलेज च्या ॲडमिशनची धडपड, मग तुमच्या लग्नाची धडपड या सगळ्यात हे कुठे होते. इतकी वर्ष संसाराचा गाडा मी एकटीने ओढला.

आत्ता काही वर्षांच्या अंतराने तुमचे आज्जी आजोबा वयाची नव्वदी पार करून गेले. खूप सेवा केली यांनी. देव सगळ्यांना असा मुलगा देवो. पण असा नवरा…… असो, कुठल्यातरी ज्येष्ठ नागरिक संघात यांचा सत्कार केला असे ऐकले. खरंच खूप बरे वाटले.

पण आता इतक्या वर्षात मला एकटीला राहायची सवय झाली. आयुष्यात खूप दुःख सहन केले, अवहेलना सहन केल्या. पण आता नको वाटते. मी या प्रवासात एकटीच होते आणि एकटीच राहणार. जेंव्हा मला गरज होती तेंव्हा कोणीच नव्हते माझ्यासोबत, यांना वाटले पैसा पुरवला, कधीतरी आले गेले की कर्तव्य संपले यांचे. पण तेवढेच पुरेसे नसते हे नाही कळले यांना कधी. जाऊ दे पण आता मला कोणाची गरज नाही. सवय झाली मला माझ्या अशाच जगण्याची.

सुधाकरराव खाली मान घालून ऐकत होते. जाणीव होती त्यांनाही वसूवर केलेल्या अन्यायाची. पण वेळ निघून गेली होती.. आता वेळ त्यांची होती एकट राहायची.आता वसू निघणार होती त्यांना कायमच एकटं करून. आता बहुतेक त्यांनाही कळणार होते एकटेपणाचे दुःख.

चला येते मी, वसुच्या आवाजाने ते भानावर आले. काळजी घे निरंजन श्वेतालिची व तुझ्या बाबांची. काय आहे मला सवय होती एकटेपणाची पण यांना नाही सवय एकटे राहायची. इतके बोलुन वसू बॅग घेऊन निघाली. आणि तिच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघत राहिले सुधाकरराव भरल्या डोळ्यांनी आणि अगतिक होऊन.

धन्यवाद.

अश्विनी रितेश बच्चूवार.

 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.