प्रश्न संस्कारांचा नाही…आत्मसन्मानाचा आहे….

Written by

प्रश्न संस्कारांचा नाही, आत्मसन्मानाचा आहे….

नेहा ला आपल्या सासरच्या मंडळींच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करता करता नाकी नऊ आले होते. लग्नाआधी एका मोठ्या कंपनीत नोकरी करणारी नेहा…स्थळ आलं आणि आई वडिलांनी घाईने लग्न उरकून टाकलं. लग्नानंतरही जॉब चालू ठेवण्याचं वचन तिने विशाल कडून घेतलं..

लग्न झालं आणि पहिला 1 महिना जॉब न करण्याचा निर्णय तिने घेतला..कारण नोकरी आधी नव्या घरी आपल्या लोकांना समजून घ्यायचं आणि पूर्ण वेळ घरकामात द्यायचा असं तिने ठरवलं…नंतर सगळं रुळलं की नोकरीवर परतायचं असं तिने ठरवलं…

1 महिना तिने उत्कृष्ट असं घर सांभाळलं…उत्तम जेवण बनवण्यापासून घराची स्वछता तिने नीट पहिली…

नोकरीवर जायचा दिवस जवळ येऊ लागला…पण ती जेव्हाही तो विषय काढत असे तेव्हा घरातली मंडळी दुर्लक्ष करत…त्यांना नेहा ने परत नोकरीवर जाणे मान्यच नव्हते…विशाल ला सुद्धा आता तेच वाटू लागलेलं..

“नेहा, खरंच गरज आहे का नोकरीची? म्हणजे बघ, पैशांची काहीही कमी नाही, मग कशाला नोकरी वगैरे?”

“विशाल हे तू बोलतोय? अरे फक्त पैशासाठी नोकरी नाही करत कोणी, आपलं शिक्षण, आपली हुशारी चारचौघात कामी यावी, जगाच्या शर्यतीत आपणही आपल्या परीने धावत राहावं म्हणून करतो रे आपण नोकरी…”

“ठीक आहे, बघ मग तुझं तूच…”

आदल्या दिवशी नेहा ला कंपनीतून फोन आला, नेहा ला अनपेक्षित अशी बढती दिली गेली होती..आता ती मॅनेजर म्हणूनच नोकरीवर परतणार होती…

जसा फोन कट झाला तशी ती धावत दिवाणखान्यात गेली, सासू, सासरे, विशाल आणि दीर बसले होते..

“एक आनंदाची बातमी आहे,मला प्रमोशन मिळालंय.. आता मी मॅनेजर म्हणून कंपनीत जॉईन होणार आहे…”

तिला अपेक्षित होतं की सर्वांना खूप आनंद होईल…पण एकाच्याही तोंडावरची माशी हलली नाही…कोणी काहीच बोलेना…मग विशाल हळूच उत्तरला…”अरेवा, अभिनंदन.”

विशाल च्या उत्तराने तिला बरं वाटलं…पण इतरांच्या वागण्याने ती बैचेन झाली..

तिने आई वडिलांना प्रोमोशन ची बातमी सांगितली….आई वडील खुश झाले, तिच्या आईने देवाजवळ साखर ठेवली….वडिलांनी पेढे आणले….माहेरी आनंदी आनंद झाला होता….

नेहा च्या घरी असण्याला सर्वांनी गृहीत धरलं होतं… तिने कायम घरात राहून घरकाम आणि सासू सासर्यांची सेवा करावी अशी सर्वांची अपेक्षा बनली होती…तिच्या या कामाचे कौतूक तर नाही पण तिचं तेच कर्तव्य आहे असा सर्वांचा भाव होता…

शेवटी तिला समजलं की या घरातून तिला काही प्रतिसाद मिळणार नाही, तिने दुर्लक्ष करायचं ठरवलं….आणि आपल्या नोकरीवर लक्ष केंद्रित केलं…

नोकरीवर जायला लागली तशी घरातली काही कामं तशीच राहू द्यावी लागणार होती…तिने सासुशी याबद्दल बोलायचं ठरवलं… पण त्यांनी अबोलाच धरला…
नेहा ने शेवटी सांगायचं सोडून दिलं…
नेहा नेहमीपेक्षा लवकर उठून कामं करत असे…
मग तयारी करून नोकरीला जाई..

ती गेल्यानंतर सासूला घरातलं पाहायला जीवावर येई…

सासूबाईंवर लोड येतोय हे लक्षात येताच नेहा ने घरकामासाठी 2 बाया कामावर ठेवल्या…पण तरीही सासूचे समाधान होईना….त्यांचा मते त्या बाया गरम गरम पोळ्या थोडीच वाढणार? पाहिजे तेव्हा हातात आयता पाण्याचा ग्लास थोडीच देणार?? त्यांना तोंडातून शब्द पडल्या पडल्या जागेवर आयती वस्तू मिळण्याची त्या एका महिन्यात सवय झाली होती….त्यामुळे आता त्यांना सर्वच गोष्टी जीवावर येऊ लागल्या होत्या….

काही महिने लोटले आणि सासूचा संयम सुटला…नेहा संध्याकाळी किचन मध्ये स्वयंपाक करत असताना त्यांनी मोठं तोफांड सुरू केलं…

“काय उपयोग पोरींनी शिकून, असं सासवा ना कामाला लावायला नोकरी करायची? सोडा म्हणा आता ते…घरात काही कामं होत नाही म्हणा…माझ्यावर लोड येतो..वाटलं होतं मुलाचं लग्न झालं की चांगले दिवस येतील….पण हे पहा काय आलं आमच्या वाट्याला….”

सुनेला टोमणे मारताना सासू अजिबात थकत नव्हती….इकडे नेहा सगळं ऐकत होती…आपण काही बोललो तर घरात उगाच वाद व्हायचे म्हणून ती शांत बसली….पण शेवटच्या एका वाक्याने तिचा संयम सुटला…

“सगळे आई वडिलांचे संस्कार, दुसरं काय….”

आता मात्र नेहा चा संयम सुटला..किचन मध्ये पोळ्यांचा गॅस बंद करून ती दिवाणखान्यात आली…

सासू, सासरे आणि दीर तुछ नजरेने तिच्याकडे पाहत होते…

“काय बोललात? संस्कार?? यात संस्कार कुठून आले?? मी शिकले, नोकरी केली… यात तुमचं असं काय नुकसान झालं?? राहिली गोष्ट घरातल्या कामाची…तर सकाळी सर्व आवरून मी जात असते आणि उरलेली कामं मोलकरणी करून घेतात…यात काय अडचण वाटते तुम्हाला??? तुम्ही मला प्रोत्साहन देऊ शकत नसाल तर निदान खच्चीकरण तरी करत जाऊ नका…मीही माणूसच आहे, माझी काही स्वप्न आहेत, माझं एक आयुष्य आहे…माझं आयुष्य तुम्ही तुमच्या अपेक्षांच्या खुंटीला बांधून ठेऊ शकत नाही…”

सासू हे ऐकून लालबुंद झाली…

“बघा बघा…तोंड वर करून बोलतेय…हेच का संस्कार….”

“आई इथे प्रश्न संस्कारांचा नाही तर आत्मसन्मानाचा आहे….एका विशिष्ट पॉईंट पर्यंत मी सहन करू शकले…पण नंतर नाही…तुम्ही माझ्या व्यक्तिविकासावर आणि व्यक्तिस्वातंत्र्यावरच घाला घालू पाहताय…एक आदर्श सून म्हणून आजवर मी सर्व करत आलीये…प्रसंगी खूपदा तुमच्या समोर झुकली आहे…पण तुम्ही मला अगदी गुलाम बनवू पाहत असाल तर सॉरी….माझा आत्मसन्मान मला जास्त महत्वाचा आहे….”

इतक्यात सासऱ्यांचे एक मित्र घरी येतात…त्यांना घरात काय चाललंय याची कल्पनाही नसते..त्यांची एक स्वतःची कंपनी असते….

ते घरात येतात, नेहा त्यांना चहा पाणी देते…

“तुम्ही नेहा प्रधान का??”

“हो…”

“काय??? माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये…अहो तुमच्या सारख्या एक्सपर्ट व्यक्तीच्या शोधात माझी कंपनी होती…तुमचा पत्ता मिळू शकला नाही…आम्ही खूप शोध घेतला पण तुम्ही सोशल मीडिया वरही नाही….तुम्ही सादर केलेल्या बिझनेस प्रोपोजल ची चर्चा मार्केट मध्ये होती….”

घरात सर्वजण अवाक होऊन पाहत होते…

सासू ते ऐकून तडक बेडरूम मध्ये पळाली, कारण ते ऐकण्याची शक्ती तिच्यात उरलीच नव्हती….

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा