प्रेम पर्जन्य # प्रेमकथा

Written by
  • 1 महिना ago

प्रेम पर्जन्य # प्रेमकथा © आरती पाटील

( काळ 3500 वर्षांपूर्वीचा. )

विंध्य पर्वताच्या रांगांमध्ये उंचावर भव्य राजवाडा, असंख्य दालने, उंच कमानी, तिथे आभाळ जमिनीला टेकल्यासारखं चित्र, सर्वत्र हिरवी दुलई पांघरलेली झाडे, आणि हजारो -लाखो रंगीबेरंगी फुले, काही लहान , काही मोठी , अनेक जातीची, वासाची , बिनवासांची. त्यातील एका झाडावर सुगंधी फुलांचा झोका. आणि त्या झोक्यावर उंचच उंच झोके घेणारी भार्गवी. टपोऱ्या डोळ्यांची , मखमली अंगाची, कापसासारखे मऊ केसांची, केशर दुधासारखा रंग, ओठ जसे गुलाबाची पाकळी, गुलाबी, मधुर आवाजाची, नुकतंच १६ व्या वर्षात पदार्पण केलेली,विंध्य पर्वतावर राज्य करणाऱ्या शार्दूल राजाची राजकन्या भार्गवी.

आजही भार्गवी तिच्या मैत्रिणींसोबत झोके घेत होती. संध्याकाळची वेळ, शांत , गार वातावरण आणि फक्त भार्गवी अन तिच्या सखीचा किलबिलाट. अचानक ढगांचा गडगडाट होतो आणि पावसाला सुरुवात होते. तिच्या सख्या महालाकडे पलायन करतात आणि भार्गवीला सोबत यायला सांगतात, परंतु भार्गवी झोक्याचा वेग वाढवते आणि पावसाचा आनंद घेत असते. त्या पावसात तिची केशर- दुधाळ कांती अजूनच उजळून निघते. थोड्या वेळ पावसात भिजल्यानंतर तिला बोलवायला महाराणीची खास दासी येते. ( वेणू – महाराणींची खास दासी )
वेणू : राजकुमारी तुम्हाला महाराणीसाहेबानी लगेच बोलावलं आहे महालात.
भार्गवी : आलेच. थोड्या वेळात .
वेणू : राजकुमारी, राणीसाहेबानी तुम्हाला लगेच बोलावले आहे.
भार्गवी : बरं . चल .
( भार्गवी वेणूच्या मागोमाग चालू लागते. महालचं प्रचंड प्रवेशद्वार ओलांडून त्या दोघी महाराणींच्या दालनाकडे निघतात. महाराणींच्या दालनात राजकुमारी येण्याची सूचना दिली जाते. आणि काहीच क्षणात राजकुमारी दालनात प्रवेश करतात. )

महाराणी : काय हे  भार्गवी पाऊस सुरु झाल्यावर महालात यायला सांगावं लागतं तुम्हाला?
भार्गवी : मातोश्री, छान पाऊस पडत होता तर त्याचाच आनंद घेत होते मी.
महाराणी : आता लहान नाहीत तुम्ही. पावसात भिजलात आणि आजारी पडलात तर ? तुमच्या बाबांना उत्तरे कोण देणार ? तुम्हाला माहित आहे ना तुम्हाला साधा खोकला झाला तरी राज्यभरातले सर्व वैद्य महालातच वस्तीला ठेवतात तुमचे बाबा तुम्ही बऱ्या होई पर्यत.
भार्गवी : क्षमा करा मातोश्री, पण या भव्य वनराई भटकावं, झर्याचं पाणी प्यावं, या पावसात मनसोक्त भिजावं असं वाटत. माझ्या सख्या जातात. फार गंमतीजमती होतात तिथे, खूप खेलतात त्या तिथे. त्या येऊन मला सांगतात ना. मला पण जावंस वाटत.
( लाडात येऊन) मातोश्री जाऊ द्या मला एकदातरी. ते सर्व अनुभवायला.
महाराणी : नाही. जे हवं ते, जी वस्तू हवी ती तूला मिळेल पण बाहेर जायचं नाही. राजकन्या आहेस तू. उद्या लग्न व्हायचं तुझं. त्यामुळे नाहीच. आणि आता जाउन आणि कपडे बदला.

( हे सर्व ऐकून काहीही न बोलता भार्गवी मान खाली खालून दालनातून निघून आपल्या दालनात येते. कपडे बदलून ती आपल्या शय्येवर केस मोकळे सोडून झोपली आणि दालनातल्या मोठ्या खिडकीतून पडणारा पाऊस पाहत होती. तेवढ्यात तिची सखी शर्मिला आली. )

शर्मिला : भार्गवी, जेवायचं नाही का तुम्हाला?

भार्गवी : जेवीन गं नंतर.

शर्मिला : नंतर कधी? आपल्याकडे नियम आहे ना सूर्यास्ताआधी जेवण करायचं. मग?? थोड्या वेळात सूर्यास्त होईल त्यापूर्वी जेवून घेऊ चल.

भार्गवीची इच्छा नसताना ती शर्मिला सोबत गेली आणि थोडं खाऊन शर्मिला ला तू आज माझ्यासोबतच झोप असं म्हणून तिला स्वतः बरोबर परत घेऊन आली.

( रात्री ढगाळ वातावरणात ही चंद्रप्रकाश होता. ज्यामुळे अजून गारवा जाणवत होता. )

भार्गवी : शर्मिला, मी राजकन्या असून काय उपयोग गं?

शर्मिला : असं का बोलताय तुम्ही राजकुमारी.

भार्गवी : हेच हेच, तू माझी सखी आहेस ना, मी तूला सांगितलं होतं ना निदान आपण दोघी असताना तरी अहो जाहो नको करुस. म्हण भा….. र्ग ……. वी…..

शर्मिला : बरं भार्गवी…… आता बोल काय झालं असं का म्हणालीस.

भार्गवी: शर्मिला, तुम्ही सर्वजणी किती छान फिरता,  खेळता,   वनात जाता. मला पण जायचं आहे गं.

शर्मिला : अगं पण राणीसाहेबानी तर नाही सांगितलंय ना.

भार्गवी : तेच तर…… माझ्यासाठी तू काहीतरी कर ना गं.

शर्मिला : काय??  ( आश्चर्याने ) मी??

भार्गवी : हो तूच…. माझी जवळची सखी आहेस ना. तूच कर काहीतरी.
( भार्गवी लटक्या रागाने ) माझ्यासाठी एवढं पण नाही ना.  जाऊ दे.

शर्मिला पेचात पडली पण राजकन्या आणि सखी सुद्धा म्हणून भार्गवीला बाहेर नेण्यासाठी तयार झाली. दुसऱ्या दिवशी  दुपारची जेवण आटोपल्यानंतर भार्गवीने आराम करायचा आहे कोणीही व्यत्यय आणू  नये असं बजावलं.
इकडे दरवाजा बंद करून आपले सुवर्णालंकार उतरवले,  राजवस्त्रे उतरवून, साधे कपडे परिधान केले. फुलांचे अलंकार घातले. आणि दालनाच्या खिडकीतून उडी मारून जंगलाच्या दिशेने जाते, जिथे शर्मिला आधीच तिची वाट पाहत असते. भार्गवी शर्मिला ला भेटते आणि त्या दोघी वनविहारला निघतात. दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे वेळ होता. पाऊस रिमझिम चालूच होता.  दोघीही खूप फिरतात, खळखळ वाहणाऱ्या झऱ्यात पाय बुडवून बसतात. गप्पा मारतात. आज पहिल्यांदा भार्गवी हे सर्व अनुभवत होती. राजवाड्यात जे अनुभवलं होतं त्यापेक्षा खूप वेगळा आणि छान होतं. संध्याकाळची चाहूल लागली आणि आभाळ भरून आलं आणि रिमझिमणारा पाऊस आता धो -धो  बरसू लागला. शर्मिला धावत एका मोठ्या झाडाखाली गेली तर भार्गवी पावसाचा आनंद घेत ओढ्याच्या दिशेने जातं होती. शर्मिलाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण अगं इथेच आहे लगेच येते असं म्हणून ती पुढे जाते. शर्मिला पासून दूर गेलेली भार्गवी ओढ्याच्या पाण्यात पाय टाकून बसण्याचा आनंद घेण्याच्या विचारात असताना तिचा पाय घसरला. भार्गवी ओढ्यात पडणार तेवढ्यात एका युवकाने तिचा हात धरला आणि स्वतःकडे खेचलं. भार्गवी त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे क्षणभर एकटक पाहत होते. दोघेही चिंब भिजले होते. भार्गवी साध्या कपड्यातही अप्सरेला लाजवेल अशी दिसत होती. पावसात तिची काया पावसात भिजलेल्या गुलाबाप्रमाणे दिसत होती. तर तो युवकही बलदंड, उंच आणि देखणा होता. त्याचा पेहराव ही सामान्य युवकाप्रमाणे होता. मात्र तेज एखाद्या वीर योध्याप्रमाणे होतं.भार्गवीच्या मागे शर्मिला येते तिच्या येण्याची चाहूल लागताच दोघे बाजूला होतात. शर्मिलाला ती पाण्यात पडणार होती आणि त्या आधी त्या युवकाने तिला वाचवलं हे कळतं. ती त्याचे आभार मानते आणि संवाद सुरु होतो.

शर्मिला : आपण कोण?  आणि नाव काय आपलं?
युवक : माझं नाव राम. आणि तुम्हा दोघींचं?
( शर्मिला काही बोलणार तेवढयात भार्गवी मध्ये बोलते.

भार्गवी : माझं नाव मैथिली आणि ही माझी सखी शर्मिला.
( शर्मिला हे ऐकून चमकून तिच्याकडे पाहते.) आम्ही इथंच राहतो. आज जरा लांबचं आलो. तुम्ही कुठे राहता?

राम : मी इथून काही कोस दूर राहतो. राहतो म्हणजे आलोय माझ्या मामाकडे काही दिवसांकरता.

भार्गवी : आम्ही दोघी नेहमी येतो इथे फिरायला.

मध्येच शर्मिला म्हणते आता आपण निघायला हवं. संध्याकाळ संपायच्या आत. हे ऐकून भार्गवीला वेळेची जाणीव होते. आणि ती राम कडे एकटक पाहून निघते.
इकडे संध्याकाळच्या जेवणासाठी दासी भार्गवीच्या दालनाचे द्वार वाजवत असतात.पण आतून कोणताच प्रतिसाद नसतो.
भार्गवी धावत -पळत खिडकीतून आत येते आणि तिच्या लक्षात येतं दरवाजा सारखा वाजवला जातं आहे. ती घाई घाईत कपडे बदलते. तो पर्यंत बराच वेळ वाजवूनही राजकुमारी दरवाजा उघडत नाही ही गोष्ट कळल्यामुळे राणीसाहेब स्वतः दरवाजा जवळ येऊ आवाज देतात. भार्गवी दरवाजा उघडते. महाराणींनी विचारल्यावर आपण गाढ झोपेत होतो आणि पावसाच्या आवाजामुळे दरवाजा वाजवल्याचं लक्षात आलं नाही असं सांगितलं.

कालप्रमाणे आजही शर्मिला ला रात्री झोपण्यासाठी येण्याबाबत सांगावा पाठवला. शर्मिला सांगावा मिळाल्याबरोबर येते. आणि भार्गवीला विचारते..
शर्मिला : भार्गवी तू त्या युवकाला तुझं खोटं नाव का सांगितलंस ?
भार्गवी : ( जरा चाचरते आणि काहीतरी सुचल्यासारखी बोलते.) अगं मी कोणाला न सांगता बाहेर पडले, त्यात तो अनोळखी. मी राजकन्या असल्याचं कसं सांगायच होतं. त्यात दुसरं कोणी ऐकलं असतं आणि मातोश्रींपर्यंत गेलं असतं तर ? म्हणून मी खोटं नाव सांगितलं.
शर्मिला : नक्की असंच आहे ना भार्गवी ? नाही म्हणजे मी आले तेव्हा तुम्ही एकमेकांत हरवला होतात म्हणून विचारलं.
भार्गवी : ( घाबरून, चोरी पकडल्यासारखं ) नाही नाही असं काही नाही.
शर्मिला : तसं काही नसावच.
भार्गवी : का ????
शर्मिला : का म्हणजे ? तुम्ही राजकन्या आहात आणि तो सामान्य युवक. बरोबरी नाही शिवाय महाराज्यांना किंवा राणीसाहेबाना कळलं तर संकट उभं राहिलं.

भार्गवी : ह्म्म्म …….

 येथे संभाषण संपत आणि दोघी झोपतात, पण भार्गवीला मात्र झोप येतं नसते. सारखा रामचा चेहरा समोर येतं असतो. आणि ती विचार करत असते की नक्की आपण आपली ओळख का लपवली ? खरंच किती छान दिसत होता तो. बराच वेळ विचार केल्यावर तो आपल्याला पाहताच क्षणी आवडला आणि आपण राजकन्या आहोत हे कळल्यावर तो आपल्याशी राजकन्येप्रमाणेच वागला असता आणि कदाचित परत कधी भेटला नसता, म्हणून तिने तिचं नाव त्याला खोटं आणि रामच्या बायकोच अर्थात सीतेचंच नाव सांगितलं. ( सीतेला जानकी, मैथिली, जनकदुलारी अशी अनेक नावे आहेत. ) आता बाहेर पाऊस कोसळत होता आणि इकडे भार्गवी राम नावाच्या पावसात चिंब भिजत होती. भार्गवीने ठरवलं होतं उद्या पुन्हा रामला भेटायचं. आणि  रामची स्वप्ने पाहत झोपी गेली.

सकाळी उठल्यावर तिने सकाळची दिनचर्या आटोपून दुपारचं जेवण लवकर करून आराम करणार असं सांगून ठेवलं होतं. दुपारचं जेवण लवकर उरकून तिने आपल्या दालनाचा दरवाजा बंद केला आणि निघाली रामला भेटायला. इकडे रामलाही रात्रभर झोप नव्हती म्हणून तो ओढ्याजवळ सकाळपासून येऊन बसला होता मैथिलीची वाट पाहात. मैथिलीला येताना पाहून त्याची कळी खुलली. यानंतर हे रोजचंच झालं. रोज दोघे त्या रिमझिमणाऱ्या पाऊसात भेटत. गप्पा मारत, ओढ्यात पाय सोडून बसत. एकमेकांच्या चेहऱ्यावर हसू पाहून सुखावत. आता जवळजवळ ४ महिने होतं आले होते आणि एक दिवस मैथिली रामला भेटायला आली आणि राम बोलू लागला.
राम : मैथिली, मी आता परत जाणार आहे माझ्या घरी. या वेळची ही आपली शेवटची भेट.
मैथिली : काय ?

मैथिली : ( थोडी गोंधळते ) काही नाही . ( लटक्या रागाने )
राम : काही नाही का ? मला वाटलं प्रेम आहे तुझं माझ्यावर जसं माझं तुझ्यावर आहे.
हे ऐकून भार्गवी त्याच्याकडे चमकून पाहते आणि नंतर लाजेने मान खाली घालते.
राम : पण नाहीय तसं काही हे आता स्पष्ट झालं.
मैथिली : ( गोंधळून ) नाही नाही माझं ही आहे तुझ्यावर प्रेम. ( असं बोलून ती जीभ चावते आणि लाजते. हे पाहून राम जोरात हसतो. )
राम : चोरी पकडली मी तुझी. ( हसत )
मैथिली : पाऊस सुरु झाला आणि तू माझ्या आयुष्यात आलास आणि तो जाण्याच्या मार्गावर असताना तूही जातोय.
राम : तूला माहितीय मैथिली पावसाला पर्जन्य असंही म्हणतात. आणि पर्जन्य विविध असतात जसं की जल -पर्जन्य, पुष्प- पर्जन्य, सुगंध-पर्जन्य आणि ( तिची हनुवटी हळूच वर करून ) प्रेम- पर्जन्य.
( हे ऐकून मैथिली अर्थात भार्गवी खूपच लाजते. )
राम : मैथिली मी पुन्हा येईन आणि तुला माझी करून घेऊन जाईन. त्या नंतर कायमच या प्रेम-पर्जन्यात चिंब भिजत राहू.
मैथिली : तू आज सांगतोयस तेही जाताना. ( लटक्या रागाने )
राम : अगं जावं तर लागेलच ना. पण मी काही महिन्यांनी परत येईन तुला भेटायला.
मैथिली : नक्की ना ??? मी वाट पाहीन तुझी.
राम : हो, मी नक्की येईन.

पावसात आणि प्रेमात चिंब भिजलेले दोन जीव जड मनाने एकमेकांचा निरोप घेता. त्यानंतर अवखळ भार्गवी शांत होते. ती दिवस-रात्र राम परत येण्याची वाट पाही. अधूनमधून नेहमीच्या ठिकाणी बसून तासन्तास त्याची आठवण काढी. दिवसांचे आठवडे झाले आणि आठवड्यांचे महिने राम परत आला नाही. आता तर ८ महिने लोटले होते आणि कोणत्याही क्षणी पुन्हा पाऊस सुरु होण्याची लक्षणे दिसू लागली आणि भार्गवी पाऊस येणार आणि याच पावसात आम्ही भेटलो म्हणजे आता तरी राम भेटायला येणार म्हणून सुखावली. पहिल्या पावसाने आपलं आगमन केलं आणि भार्गवी धावतच ओढ्याजवळ पोहचली. आणि सर्वत्र नजर फिरवू लागली. परंतू राम  काही दिसला नाही. कित्येक तास ती तशीच बसून होती. पुढे -पुढे तर रोजच झालं तीच वाट पाहणं आणि त्याचं न  येणं. याला आता जवळजवळ २ महिने लोटले. या दरम्यान शर्मिला जी तिच्या आजोळी गेली होती ती आली.
शर्मिला : भार्गवी, काय ऐकते मी.  तू खूप दिवसांपासून शांत झाली आहेस. आणि हल्ली कोणातच नसतेस.

भार्गवीला शर्मिला ला पाहून भरून येतं आणि तिचा बांध फुटतो. आणि भार्गवी तिला सर्वकाही सुरुवातीपासून सांगते.

शर्मिला : भार्गवी तरी मी तूला आधीच सांगितलं होतं. तरी तू अशी वागलीस. बाकी जाऊ दे पण हे सर्व राजवाड्यात कळली असती तर…???

भार्गवी : मला ते काही माहिती नाही पण मला काही झालं तरी रामला भेटायचं आहे. ( रडत )

शर्मिला : अगं हो हो…. रडतेस काय…. आपण करू काहीतरी… बरं मला सांग तो नक्की राहायला कुठे आहे? इथे त्याच्या मामाचं घर कुठे आहे?

भार्गवी : ( चमकून वरून तिच्याकडे पाहते आणि म्हणते ) नाही माहित मला.
शर्मिला : काय?  तुम्ही जवळजवळ 4 महिने भेटलात आणि तूला तो नक्की कुठे राहतो हेच माहिती नाही?

भार्गवी : अगं कधी वेळच नाही आली आणि कधी विचारायचं लक्षातच नाही आलं.

त्यांच्यात हे बोलणं चालूच असतं की तेवढ्यात वेणू लगबगीने आत आली. तिला असं आलेलं पाहून दोघीना आश्चर्य वाटत कारण ती या आधी कधीच दालनात पूर्व सूचना न देता आली नव्हती.

वेणू : राजकुमारी भार्गवी आपण मुख्य प्रवेश द्वाराजवळ चला लगेच.

भार्गवी : हो, पण झालंय काय नक्की?

वेणू : महाराज युद्धावर निघालेत.

भार्गवी आणि शर्मिला ( एकत्रच ): काय?  ( आश्चर्याने )

वेणू : हो म्हणून त्यांना तिलक करताना तुम्ही तिथे असाव्यात म्हणून बोलवायला पाठवाय मला राणीसाहेबानी.

शर्मिला : पण अचानक युद्ध?
भार्गवी : हो ना.  कारण पावसाळ्यात युद्ध होतंच नाहीत.  हे युद्धनीतीच्या विरुद्ध आहे.

वेणू : हो राजकुमारी पण शत्रूनेच हल्ला केला तर काय करणार?  युद्ध करायला जावंच लागेल ना. तुम्ही चला माझ्यासोबत.

भार्गवी आणि शर्मिला वेणू सोबत निघाल्या. तिलक करताना त्या दोघी तिथेच असतात. निघताना महाराज म्हणतात : भार्गवी बेटा, आम्ही लवकरच परत येऊ. पण आम्ही येई पर्यंत तुमचं हसूही परत यायला हवं. तुम्ही प्राण आहात आमच्या. भार्गवी त्यांना निरोप देते.

रोज शिपाई युद्धभूमीवरून संदेश घेऊन येई. हालहवाल सांगे.  आणि 15 दिवसांनंतर महाराज विजयी होऊन आले. त्यांच्यासोबत मगध चे राजाही होते. महाराज ओळख करून देतात. संध्याकाळी जेवण झाल्यावर सर्वजण गप्पा मारत असताना मगध चे महाराज भार्गवीला आपल्या मुलासाठी राजकुमार शरद साठी मागणी घालतात. शरद युद्ध संपल्यावर सैन्याची तजवीज करून येणार होता. महाराज शार्दूल ने शरद ला पाहिलं असल्यामुळे आणि त्याचा पराक्रम युद्ध भूमीत पाहिल्यामुळे त्यांना तो पसंद असतोच ते लगेच होकार देतात.
इकडे आपल्या दालनात रामच्या स्वप्नात रममाण असणाऱ्या भार्गवी ला वेणू येऊन ही बातमी देते. वेणू गेल्यावर भार्गवी शर्मिलाच्या कुशीत शिरून रडत असते आणि म्हणते मला फक्त माझ्या रामची मैथिली हवायचं आहे बस. शर्मिला खूप समजावण्याचा प्रयत्न करते पण भार्गवी आपल्या निर्णयावर ठाम असते. उद्या आपण महाराजांना सर्व सांगणार असे ती सांगते.
दुसऱ्या दिवशी भार्गवी सांगण्यासाठी महाराजांच्या दालनात येते तिथे महाराज मगध च्या महाराजांसोबत बसले असतात. ती काही बोलणार त्यापूर्वी दालनात सूचना येते राजकुमार शरद येतं असल्याची.  इकडे राजकुमार शरदला ही परस्पर लग्न ठरवल्याबद्दल कळलं असतं त्यामुळे तेही नकार कळवण्यासाठीच लगबगीने आत प्रवेश करतात. भार्गवी आणि शरद एकमेकांना पाहतात आणि क्षणभर थबकतात.  ते पाहून महाराज शार्दूल म्हणतात : भार्गवी हे राजकुमार शरद, यांच्याशीच आम्ही तुमचा विवाह ठरवला आहे. हे ऐकून भार्गवी लगबगीने आपल्या दालनाकडे पलायन करते.  राजकुमारी लाजल्या असं म्हणून मगधराज आणि महाराज शार्दूल विवाहाची जंगी तयारी करण्याचे आदेश देतात.

भार्गवी धावत पळत आपल्या दालनात येतात जिथे शर्मिला आधीच बसलेली असते. भार्गवी शर्मिलाला घट्ट मिठी मारते आणि आपल्या दालनाचे दरवाजे बंद करते आणि राजवस्त्रे व सुवर्णालंकार उतरवायला सुरुवात करते. हे पाहून शर्मिला विचारते आता कुठे..?  त्यावर भार्गवी उत्तर देते बाहेर बघ पाऊस धो धो सुरु झालंय.  आता मला ओढयाकडे जायला हवं. असं म्हणून ती खिडकीतून उडी मारून निघते.

ओढ्यावर……………….

भार्गवी पोहचते आणि तिची नजर कोणालातरी शोधू लागते. तोच मागून आवाज येतो. आता काय म्हणून आवाज द्यायचा तूला मी?  मैथिली की भार्गवी?
भार्गवी : हाच प्रश्न मी तूला ही विचारू शकते राम म्हणू की राजकुमार शरद?  ( दोघेही खळखळून हसतात. )

राजकुमार शरद : खबरीं कडून कळत होतं की ईशान्य कडची राज्य आपल्या राज्यांवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. मगध, विंध्य आणि अजून दोन राज्य जोडून आहेत. त्यामुळे कोणावर हल्ला होणार हे माहिती नव्हतं.  म्हणून मी वेष पालटून या राज्यांमधून फिरत होतो. म्हणजे त्यांची माणसे सामन्यांमध्ये सापडणार म्हणून. आणि तसंच झालं विंध्य आणि मगध वर ते हल्ला करणार होते तेही पावसाळ्यात. कारण पावसाळ्यात आपण युद्ध करत नाही.   पण इथे आलो आणि तूझ्या प्रेमात पडलो. मला वाटलं तू एका सामान्य मुलगी आहेस म्हणून मी राजकुमार असल्याच नाही सांगितलं.  मला वाटलं तुला मी गमावेन. पण या युद्धांनंतर येऊन खरं सांगून लग्नाची मागणी घालणार होतो.  म्हणूनच माझा विवाह बाबांनी ठरवल्याचं ऐकताच मी आलो नकार द्यायला. पण इथे एका नवीन आणि सुखद धक्का बसला मला.

भार्गवी : मला ही वाटलं की मी राजकुमारी असल्याच कळल्यावर तुझं वागणं बदलेल म्हणून मी पण लपवलं.

दोघांचीही मने आणि विचार निरभ्र झाली होती,  पण पावसाने पुन्हा एकदा जोर धरला होता. दोन मने पुन्हा या पावसात एकमेकांच्या मिठीत चिंब होतं होती.  आणि शरद म्हणजेच राम म्हणाला :
म्हणालो होतो ना, प्रेम पर्जन्यात भिजवेन पुन्हा आल्यावर आता कायम हा पर्जन्य सुरूच राहील अनंत आणि अखंड……………………. प्रेम पर्जन्य……

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत