प्रेरणादायी माय… एकाकी लढणारी आई

Written by

आजची स्टोरी ही बरीच जुनी आहे म्हणजे ज्यांच्या विषयी लिहीत आहे त्याच वयच आज 70वर्षाचं आहे.. आई प्रत्येकाचीच प्रेरणास्रोत असते… .. आज माझ्या अगदी जवळच्या माणसाची गोष्ट लिहितेय… आई ही कशी ही(शिक्षित /अशिक्षित ) असली तरी ती मुलांसाठी आदर्शच असते…

रवी ची कहाणी… ?©®जयश्री कन्हेरे -सातपुते

आज रवी काका  भूतकाळात शिरले ..अगदी त्यांच्या आईने सांगितलेल्या गोष्टीपर्यंत… म्हणजे त्यांच्या जन्माच्या आधी पासूनच्या काळात… कसे दिवस होते ते नाही, आईला किती खडतर आयुष्य काढावं लागल, त्याकाळी बाल विवाह व्हायचे.. त्याच प्रमाणे तुळसाबाईचा (म्हणजे रवी काकांची आई )बालविवाह झालेला.. माहेरी गरीबच आणि सासरी देखील काम करणे आणि पोटाची खळगी भरणे आयुष्याला लागले होते. अशा परिस्थितीत तुळसाबाईला एका पाठोपाठ एक अशी 5 मुले व 4 मुली झाल्या.. जमाना ही तसाच होता तो.. “मुलं म्हणजे देवा घरची फूल असतात” त्यानुसार झालीत त्यांना तितकी.. पण तुळसाबाईच दुर्दैव की मुलं व्हायची व मरून जायची… रवी काकाचा नंबर 8 वा.. व मुलीचा 9वा.. त्यानंतर त्यांना मुलं झाली नाही.. मुलगी 5 वर्षाची असेल व रवी काका 6 वर्षाचे चे तेंव्हा त्यांची बहिन छोट्याशा आजाराने गेली देवाघरी.. आता फक्त रवी काका एकटेच उरलेलं त्याला सुखी ठेव इतकीच प्रार्थना तुळसाबाई देवाजवळ करत होत्या.. अशातच रवीच्या बाबांना जेवण जातं नव्हतं.  घशात काय झालं कळलंच नाही खेड गाव.. डॉक्टर कडे दाखवायला इतका पैसा नाही.. हळू हळू त्यांचा त्रास वाढत गेला. फक्त पातळ पदार्थच ते घेऊ शकत होते. .. बाबांचा पाय उघडा आहे म्हणून मेल्यावरही गोधडी त्यांच्या पायावर झाकून देणारे  रवी काका वडिलांच्या छत्रछायेला सहा महिन्यात पोरके झाले..

आणि इथून झाली तुळसाबाईच्या संघर्षाला सुरुवात.. जी प्रत्येक स्त्रीला प्रेरणादायी ठरु शकते… नवरा गेला एकच मुलगा पदरात… घरी शेती ना वाडी… मोलमजुरी करून पोराला सांभाळायचं की दुसर लग्न करायचं हा प्रस्ताव ठेवला माहेरच्यांनी.. लग्न केल तरी म्हातारा मिळेल व तोही असच एखाद लेकरू पदरात टाकून मरून जाईल म्हणून.. त्यांनी याच मुलाला एकटीने मोठ करण्याचा निर्णय त्या काळात घेतला.. 

त्या स्वतः अशिक्षित होत्या पण मुलाने आपल्यासारखी मोलमजुरी करू नये.. नोकरीं करावी मोठ बनाव असं त्यांना वाटत होतं व त्यासाठी आवश्यक  तेव्हडी मेहनत करायची त्यांची तयारी होती.. आजही ज्यांनी तुळसाबाईला काम करताना बघितलं ते सांगतात.. “थे बाई म्हंजी वाघीण व्हती, दोन मानसायले उचले नाई एव्हढा गवताचा भारा बाई एकटी आणे डोस्क्यावर,  भारा बांधे अन उचलाले मानसायले बोलवे त माणसं बी इचार करे. इची पितर हे बाई होये का कोण? “

इतक काम करणारी बाई.. पण मुलाला मात्र काम  करू द्यायची नाही म्हणायची “शिक लेका. चार पुसतक शिकशीनं तवा कुठं ह्या नरकातून सुटका होईन तुही.. माय काय हाये… माई जिंदगानी गेली कामात… पर तुहा जीव सुखात रायला पाहिजे… तू फकसत लिवणं शिक पोरा…” असं म्हणतं कधी डोळे ओले व्हायचे पण त्या वाघिणीने अश्रु डोळ्याबाहेर काढले नाही.. मी कमजोर आहे हे दाखवलं नाही…

रवी काका देखील आईला मदत व्हावी म्हणून चोरून कामाला जायचे. हेतू चांगलाच होता त्यांचा पण आईला पटायचं नाही… परिणाम 10वीला नापास झाले ते… त्याच्या मायचा पारा चढला (आईला मायचं म्हणायचे तेंव्हा ).जाम बदडलं मायने त्यांना.. नको नको ते बोलली..

“वाटोळं केल लेका तुन, काय साठी म्या एव्हडे कष्ट उपसते. तुले मोठा माणूस झालेला पाहाचा हाये मले ह्या डोयान. लोकाले सांगाच हाये एकली माय पोराले साहेब बनू सकते.  तू नापास झाला महालेका.. मायी सारी मयनत पाण्यात टाकली. हासतींन न लेका मायावर लोक ” आणि आज पहिल्यांदा मायच्या डोळ्यातले अश्रू मुलाने बघितले.

खुप वाईट वाटलं त्यांना.. मनात निश्चय करूनच रवी काकानी पुन्हा 10विचा फॉर्म भरला व राहिलेला विषय काढला… पै अन पै जमा केलेले 100रुपये घेऊन कृषि विद्यालयात ऍडमिशन घेतलं.. शिक्षक होणं खुप सोपं होतं त्या वेळी पण… रवी काकाला मास्तर नाही, तर मायसाठी साहेब बनाच होतं… 

दोन वर्षाचा डिप्लोमा केला… आता गावात नाही जायचं म्हणून मिळेल ते काम शहरात केल.. सुरुवात केली किराणा दुकानात नोकरीची… मायच शिक्षण होतं न इमानदारी त्यामुळे त्यांना दोन महिन्यात दुकान मालकाने.. माल मोजणे व हिशोब सांभाळायला लावला.. यात वर्ष गेल… एका मित्राने सांगितलं प्रायव्हेट नोकरीं आहे.. “साहेबाचा भाजीपाल्याचा मोठा व्यवसाय आहे तिथे मजुरांवर लक्ष ठेवायला व त्यांचा पगार द्यायला शिकलेला मुलगा पाहिजे. ” पगार त्यावेळेनुसार 100रुपये मिळणार होता.. मग काय गेले हे व पहिली नोकरी सुरु झाली..

मायले सांगितलं तेंव्हा मायले वाटलं खरंच “माया पोरगा साहेब झाला.. आपण मजुरी करतो आज मायवाल पोरग मजुरायवर नजर ठिवते.. अन त्यायले पगार बी देते ” लय खुश झाली माय…. पण रवी काका विसरले नव्हते मायचे शब्द “तुले साहेब झालेलं पहाच हाये या डोयान ” सरकारी कृषी खात्यातल्या जागा निघाल्या की हे फॉर्म भरायचे.. इंटरव्यूला जायचे व निराश होऊन परत यायचे.. अशातच लग्न झाल.  दोन मुलं पदरात पडली त्यांच्या.. सरकारी नोकरीं व मायची इच्छा ते विसरले नाही.. आईच्या कष्टाची जाणीव ठेऊन.. त्यापासून प्रेरणा घेऊन ते सरकारी नोकरीच्या शोधात होते.. इकडे त्यांच्या बरोबरचे मास्तर म्हणून लागले देखील नोकरीवर, यांचा अजून सरकारी नोकरीसाठी संघर्ष सुरूच होता..

आज तो दिवस उगवला… आज त्यांचा 31 वा इंटरव्यू होता.. आज ते विचार करूनच गेले होते की “आज जर परत निराशा झाली तर बाहेर निघताच सगळेच कागदपत्र फाडून फेकायचे “ त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला होता.. म्हणतात न देवही अंत बघतो तसच काहीस झालं… आणि इंटरव्यू मधे आज त्यांच्या बाजूने कौल आला…. कृषी सहाय्यक म्हणून ते सरकारी नोकरीवर रुजू झाले… आज खऱ्या अर्थाने त्यांनी मायचं स्वप्न पूर्ण केल होतं..  मायच्या संघर्षाची चीज झाली होती… मायन 10विले नापास झाल्यावर मायचा पडलेला मार व त्यावेळी पहिल्यांदा वाघिणी सारख्या मायच्या डोळ्यातुन पडलेल्या अश्रूपासून घेतलेल्या प्रेरणेच आज फलित झालं होतं.. 

मायला जेंव्हा सांगितलं तेंव्हा आज पुन्हा एकदा त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू गालावर ओघळले.. साऱ्या गावात तीन साखर वाटली… एका अशिक्षित आईने.. नवरा मेल्यावर एकटीने वाढवलेल्या लेकरान आज त्या मायचं पांग फेडलं होतं... अडाणी मायचं पोराले साहेब बनवाच स्वप्न पूर्ण केल होतं…

नोकरीत सेटल झाल्यावर रवी काकांनी पैसे जमवून काही वर्षानंतर आपल्या मायच्या नावान गावात शेत घेऊन दिल… ज्या शेतात दोन बायाच काम ती करायची आज त्या शेताच्या सातबाऱ्यावर तिचं नाव होतं… 

समाप्त….. ?©®जयश्री कन्हेरे

आईला मदत व्हावी म्हणून शेतात कामाला जाणारा मुलगा… नापास झाल्यावर मायचे अश्रु बघून.. त्यापासून प्रेरणा घेणारा मुलगा.. व आईच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करणारा मुलगा आजकाल बघायला मिळत नाही…

विधवा स्त्री एकटीच्या हिंमतीवर.. माणसासारखं काम करून मुलाला शिकवते व साहेब बनवायचं स्वप्न बघते हे सुद्धा काही कमी प्रेरणादायी नाही…

मला हा आईचा संघर्ष व मुलांनी त्यापासून घेतलेली प्रेरणा खरंच छान वाटली…. आवडल्यास like, कमेंट करा व शेअर करायला विसरू नका.. ??©®जयश्री कन्हेरे – सातपुते 

फोटो साभार गुगल 

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा