प्रोजेक्ट द्वारका ( संपूर्ण )

Written by
  • 1 आठवडा ago

प्रोजेक्ट द्वारका

ऑफिसमध्ये सर्व आधीच हजर होते. मीनल सर्वाना पाहून खुश होते. सर्वांना ती खूप दिवसांनंतर भेटत होती. मानव, चेतना आणि मनीष हि तिला पाहून आनंदी होतात. लग्नानंतर आज मीनल महिनाभरानंतर ऑफिसला आली होती. तेवढ्यात त्यांचे बॉस पण येतात आणि सर्वांना आत बोलावतात. सर्व सरांच्या कॅबिनमध्ये येतात आणि सर बोलायला सुरुवात करतात.
सर : सर्वात आधी तुम्हा सर्वांचे अभिनंदन….. छान काम केलात, राजस्थान मधलं जुना इतिहास समोर आला. आणि आता या साठी मी इंटरनॅशनल लेव्हल ला प्रेसेंट करायला जाणार आहे. Updates द्यावे लागतात बाबा काय करणार… ( हसत )

मनीष : ते आहेच सर पण…….

सर : मला माहित आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला ते… So जस मी प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे तुम्ही प्रोजेक्ट द्वारका हाती घेऊ शकता..

सर्व खुश होतात.
सर : पण ही गोष्ट उघड होऊन ही की समुद्रात एक नगर आहे तरी सरकार कोणताच interest घेत नाहीये. यामुळे महाभारत, रामायण फक्त कथा नाहीत आणि भारत पूर्वी पासून संपन्न होता हे सिद्ध होऊन जागतिक पातळी वर भारताचा सन्मान वाढेल पण सरकारला वेळ नाहीये ना.. असो आपण आता हाती घेतोय so जेवढा जमेल तेवढा या सर्वांची माहिती काढा. ही काही कागदपत्रे, परवानगी आहेत यामुळे तुम्हाला research करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. काही वाटलंच तर मला कॉन्टॅक्ट करा. आणि काय रे मानव स्विमिंग शिकलास की नाही….?

मानव : हो सर… या प्रोजेक्ट साठी काय पण…… ( सर्वजण हसतात. )

सर सर्वांना त्यांच्या टिकेट्स, कागदपत्रे आणि त्याच्यासाठी बुकिंग करून ठेवलेल्या हॉटेल्स च्या details देतात. सर्वजण बाहेर येतात.

मनीष : Last time च्या प्रोजेक्ट शी मीनलचा संबंध निघाला यावेळी कोणाचा निघेल देव जाणे.. ( वरच्या दिशेला बघून )

मीनल : may be तुझाच… ( हसत )

सर्वजण जाण्याची प्लॅनिंग करतात. कोण कोणाला कुठे भेटणार ते ठरवत असतात. सर्व ठरवून ते निघतात.

दोन दिवसांनी……

सर्वजण ठरल्याप्रमाणे स्टेशन ला भेटतात. मुंबई ते गुजरात या प्रवास मध्ये सर्वजण मीनल ला आठवण करून देत तिला त्रास देत होते की मागच्या वेळी स्वप्नील मुळे मीनल चा प्रवास कसा झाला होता ते….

4-5 तासांनी सर्वजण आपल्या स्टेशन ला पोहोचले. सर्वजण एकमताने ठरवतात की हॉटेल वर जाऊन fresh व्हायचं आणि जेवून मग निवांत प्लॅनिंग करून उद्या पासून research ला सुरुवात करायची.

रात्री जेवणानंतर……..

मानव : उद्या आधी आपण इथल्या श्रीकृष्ण मंदिराला भेट देऊ… I mean दर्शन घेऊ आणि तिथून जमेल तेवढी माहिती मिळवू.

चेतना : Right.. माहिती मिळाल्यावर पुढे research ची दिशा ठरवता येईल.

मनीष : हो आणि देवाला सांगू… बाबारे तूला एवढ्या 5 हजार वर्षात भल्याभल्याना समजून घेता नाही आलं, आम्हाला आशीर्वाद दे आणि थोडं का होईना तुझ्या जवळ पोहचण्याचा मार्ग दाखव.

मीनल : हो, उद्या दर्शन घेऊया आणि मग माहिती गोळा करू.

सर्वांची मत जुळली आणि दुसऱ्या दिवशीच्या कामाची आखणी झाली. सर्वजण आपापल्या रूम मध्ये झोपायला निघून गेले. झोपायला गेले खरे पण झोप काही येई ना. त्यांचं dream project जे त्यांच्या समोर होतं. ज्याच्यावर मोठमोठ्या दिगज्यानी आपली हयात घालवली, ज्याला समजून घेण्यासाठी जीवन घालवलं. त्या श्री कृष्णा च्या नगरीच दर्शन ते येणाऱ्या काळात घेणार होते.

दुसऱ्या दिवशी सर्व पहाटे मंदिरासमोर…….

चेतना : Wow……

मीनल : अप्रतिम…
मानव : मनीष कॅमेरा दे पटकन. डोळ्यांमध्ये साठून घेताना pic मध्ये पण ठेवतो.

मनीष : खरंच…. काय सुंदर आहे राव…

सर्वजण जणू मंदिराच्या प्रेमात पडले होते. जगाला प्रेम शिकवणाऱ्याच्या दारात उभे होते ते, त्याच्या साठी असणाऱ्या कलाकृती च्या प्रेमात कसे पडले नसते…?

सर्वजण दर्शन घेताना मंत्रमुग्ध होतात.
मीनल : आज कळतंय या नटखट ला मनमोहन का बोलतात ते.

मानव : हो ना. एक वेगळीच शांती लाभते यार इथे.

मनीष पुढे जाऊन एका पंडित कडे चौकशी करतो. ते का आलेत..? काय काम आहे..? सर्व सांगून ते काही माहिती देतील का म्हणून विनंती करतो. एक पंडित त्यांना माहिती द्यायला तयार होतो आणि एका बाजूला घेऊन जातो. एक बाजूला झाडाखाली बसून पंडित माहिती द्यायला सुरुवात करतो.

पंडित : विचारा जे विचारायचं आहे ते.
मानव : सर, आम्हाला या मंदिरात बद्दल काही माहिती द्या, जेणेकरून आम्हाला पुढे पाऊल टाकता येईल.

मीनल : हो, अगदी तुम्हाला माहित आहे ते सर्व.

पंडित : या मंदिरात विषयी विचाराल तर, हे मंदिर जवळजवळ दोन ते अडीच हजार वर्ष जुना आहे. असं म्हणतात की या मंदिराचे निर्माण श्रीकृष्णाच्या नातवाने, वज्रभ ने केलं होतं.
हे मंदिर 5 मजली आहे. याची सरासरी उंची 235 मीटर आहे जो जवळजवळ 72 खांबांवर उभा आहे. दररोज इथे हजारो भाविक येतात.

चेतना : मंदिरात देवाला नवस वगैरे पण करत असतील.

पंडित : हो करतात ना. मुलं आपलं रडगाणं अजून कोणाला सांगणार..?

मानव : नारळाचे तोरण, सोन्याचा मुकुट वगैरे असंच असेल ना नवस पूर्ण झाल्यावर.

पंडित : इथे येणारे भाविक आपल्या ऐपती नुसार नवस बोलतात आणि फेडतात. पण एक आहे जास्तकरून नवस हा ध्वज चा असतो..

मीनल : ध्वज चा म्हणजे…?

पंडित : अहो, म्हणजे मंदिरावर असणारा ध्वज देणार असा. द्वारकाधीशांच्या मंदिराचा ध्वज हा दिवसातून 3 वेळा बदलला जातो. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ.

मनीष : पण ध्वज…?? म्हणजे अजून काही का नाही…?

पंडित : कसं आहे की हा ध्वज जो कळसावर चढवला जातो तो 52 गज चा आणि जवळजवळ 84 फुटाचा असतो. अर्थात महाग ही असतो. या ध्वजामध्ये वेगवेगळे रंग असतात जे वेगवेगळे गुणांना धरून असतात.शिवाय या ध्वजामध्ये चंद्र आणि सूर्य ही रेखांकित केलेले असतात.
बरं एवढं सगळं असूनही जर तुम्ही आज नंबर लावलात ध्वज साठी तर तुमचा नंबर यायला 2 ते 3 वर्ष लागतील.

चेतना : काय…? ( चकित होऊन )

पंडित : हो, काहींचा नवस असतो तर काहींनाही वासुदेवाची सेवा करण्याची इच्छा.

मनिष : वाह.. ! काय मस्त आहे हे. श्रीकृष्ण इथूच आपला कारभार पाहत असतील ना. विचार करून ही मन पुलकित होतंय.

पंडित : नाही. या द्वारकेचा दोन भाग आहेत एक द्वारका आणि एक बेट द्वारका. जसं आपलं ऑफिस आणि घर, तसं श्रीकृष्ण एका ठिकाणी राहायचे आणि दुसऱ्या ठिकाणी आपलं काम करायचे, राज्यकारभार पाहायचे.

या मंदिराबदल मला माहित असलेलं मी जवळजवळ सर्व तुम्हाला सांगितलं आहे. तरी काही वाटलं तर विचारा मला माहित असेल तर मी नक्की सांगेन.

सर्वजण त्या पंडितजी चे आभार मानून बाहेर पडतात.

मीनल : छान माहिती मिळाली ना. एवढं एरवी कुठे कळलं असतं आपल्याला.
सर्वजण आजूबाजूला विचारपूस करून हॉटेल वर परतले.

मानव : फ्रेंड्स, मी एका अंदाज बांधला आहे आणि त्यानुसार हे काढला आहे. आणि आता या नुसार आपल्याला द्वारकेच्या दिशेने पाऊल टाकायला हवं.
( एका नकाशा काढला होता ज्यामध्ये द्वारका मंदिर, बेट द्वारका आणि पाण्याखाली गेलेली द्वारका point out केली होती. )

चेतना : बरोबर आहे आता हेच डोक्यात ठेऊन आपण आपली research सुरु केली पाहिजे.

सर्वजण उद्या पासून एका महान अध्यायाची जुनी पाळंमुळं शोधायला निघणार होती. ज्याने जगाला भगवद्गीता दिली, जीवन जगण्याची नीती, तत्व दिली, महाभारत युद्ध आणि त्या ने जगाला नवीन दिशा दिली, त्याच्या नगरीचा शोध घ्यायला निघणार होते.

दिवसभर मिळवलेल्या माहिती वरून आता पुढे research ला दिशा मिळाली. आधी ठरल्याप्रमाणे सर्वजण दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी आले आणि स्कुबा ड्राईव्ह करणाऱ्या टीम सोबत या विषयी बोलू लागली.
( वीर स्कुबा ड्राईव्ह टीम चा हेड होता आणि त्याला आणि त्याच्या टीमला मीनल आणि टीम च्या मदतीला पाठविले होते. )

मनीष : वीर आम्ही कालच इथे आलो आणि बरीच माहिती काढली मंदिराविषयी वगैरे पण आता या अथांग समुद्रात द्वारका नक्की कुठे आहे आणि किती खोल आहे याबद्दल काहीच कल्पना नाही आम्हाला.

वीर : हो आम्हीही कालच आलो आणि आम्ही हीच माहिती काढत होतो.  येथील लोकल स्कुबा ड्राईव्ह करणाऱ्यांना आम्ही विचारलं तेव्हा कळलं कि द्वारका जवळजवळ 70-80 फूट खोल आहे आणि तिथे पोहचायला इथल्या लोकल स्कुबा ड्राईव्ह वाल्याना सोबत घ्यावी लागेल कारण नक्की कुठे जायचं ते तेच सांगू शकतील.

मानव : ठीक आहे पण त्याआधी काही पूर्वतयारी करावी लागले का…?

वीर : हो, कृत्रिम ऑक्सीजन कसा घ्यायचा ते शिकावं लागेल.  यासाठी कमीतकमी अर्धा ते एक तास प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला.

चेतना : पाण्याखाली किती वेळ राहू शकतो आपण?

वीर : जास्तीतजास्त एक तास कारण या सिलेंडर मध्ये तेवढंच ऑक्सीजन असतं.

मीनल : या सर्वांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी लागेल म्हणजे  आपल्याला नंतर ही त्यावर अभ्यास करता येईल.

वीर : हो नक्कीच.

सर्वजण कृत्रिम ऑक्सीजन घेण्याची प्रॅक्टिस करू लागले. आणि वीरने सांगितल्याप्रमाणे सर्वजण follow करू लागले. एक तासभर प्रॅक्टिस केल्यावर सर्वजण समुद्रात जायला निघाले.

मीनल, चेतना, मानव, मनिष आणि आता वीर सर्वजण त्या अनोख्या प्रवासावर निघाले होते. प्रत्येक्षात श्रीकृष्णाची द्वारका ते पाहणार होते.  स्वतःला खूप भाग्यवान समजत होते. कधीकाळी स्वतः श्रीकृष्णाचा स्पर्श झाला होता अश्या   वास्तूला ते भेट देणार होते.

एका ठराविक जागी आल्यावर वीरने सर्वांना सांगितलं कि प्रत्येकासोबत एक एक trained स्कुबा ड्राइवर असेल सॅफेटी साठी जे गरजेचं होतं. सर्वांनी पाण्यात उड्डी घेतली, आणि सुरु झाला सुंदर आणि अविस्मरणीय प्रवास.

जसं जसं पाण्याखाली जाऊ लागले तसं तसं पाण्यात लोकांनी सोडलेले कलश, रंगबेरंगी मासे, सुंदर दगड आणि बरंच काही दिसू लागलं. एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. हळू हळू आता एक दूरवर नगर दिसत होतं. सर्वांची कळी खुलली होती.  जसजसं जवळ जातं होते तसतसं अनेक गुलाबी कमल दिसत होते. एवढ्या खाली पाण्यात कमल?  सर्वांना पडलेला मोठा प्रश्न.  जसजसं आणखी जवळ गेले तसा एक मधुर सुगंध जाणवू लागला. एक संपूर्ण नगर आजही दिमाखात उभं होतं.

नक्की काय चालू आहे कोणालाही कळत नव्हतं. समोर मात्र मोठं आणि भारदस्त प्रवेशद्वार होतं.  ज्यावर दोन बैल/ खोंड  एकमेकांना मस्तक / शिंग भिडून उभे होते.  तेव्हाच कोरीव काम पाहून सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं होतं.

समोर मोठमोठे स्तंभ होते जे आजच्या तुलनेत बरेच मोठे आणि मजबूत होते. त्यावरचे कामही अप्रतिम होतं.  मानव, वीर यासर्वांचे व्हिडीओ आणि फोटोज घेत होते.

वीरच्या लक्षात आलं की आता निघायला हवं कारण ऑक्सीजन चं प्रमाण कमी होतं होतं. सर्वांना इशारा देऊन सर्वाना मागे फिरायला सांगितलं.  सर्वजण मागे फिरले.

समुद्र किनारी……………

समुद्रातून बाहेरून आल्यावर सर्वजण शांत समुद्रकिनारी बसून होते.  पाण्याखाली नक्की काय होतं होतं ते कळून घेण्याचा प्रयत्न करत होते.

मानव : पाण्यात एवढ्या खाली कमल आले कसे?

वीर : हो ना generally कमल पाण्यावर असतात.  आणि पाण्यात असूनही टवटवीत होते. कसे….?

मीनल : यापेक्षाही त्या कमल चा सुगंध कसा आला..? पाण्यात जिथे आपण श्वास ही घेऊ शकत नाही तिथे सुगंध?

चेतना : हो खूप आश्चर्यजनक आहे हे सर्व.  आपल्याकडे लिमिटेड ऑक्सीजन असल्यामुळे पुढे पण जाऊ शकलो नाही. आपण परत गेलो तरी त्यापुढे जाऊ शकणार नाही. कारण तेव्हा पण एवढंच ऑक्सीजन असेल आपल्याकडे. मग पुढे कसं जाणार?  Research पुढे कसा नेणार?

मनिष : हो ना.  संपूर्ण नगर पाहिल्याशिवाय आपण report कसा बनवणार ?

वीर : हो मला ही तेच टेन्शन आलंय.  तरी आपण उद्या पुन्हा प्रयत्न करू. अजून काही करता येईल का ते मी बघतो पण ऑक्सीजन सिलेंडर चं वजन ही वाढेल.  ते तेवढं वजन घेऊन तुम्हाला पाण्यात वावरताही यायला हवं.

सर्वजण हॉटेल वर परत आले, जेवून आराम करायला निघून ही गेले. झोप मात्र येतं नव्हती. समोर पाण्याखालच्या द्वारकाचं चित्र येतं होतं. ते टवटवीत गुलाबी असंख्य कमल येत होते.  सुगंध कसा येत होता याची विचार शृंखला तयार झाली होती सर्वांची.

या सर्व विचारांमध्ये सर्वांनी मनातल्या मनात श्रीकृष्णाची मनधरणी केली. देवा एकच लोभ घेऊन आलो आहोत. तुझ्या नगरीच आणि पर्यायाने तुझंच दर्शन मिळावं बस.  तुझ्या मर्जी शिवाय काही शक्य नाही. मदत कर देवा प्लीज….

दुसऱ्या दिवशी वीर दीड तास चालेल असं ऑक्सीजन सिलेंडर घेऊन आला होता. सर्वजण श्रीकृष्णच नाव घेऊन सर्वांनी पाण्यात उड्डी घेतली. कालच्यासारखंच गुलाबी कमल, मंद सुगंध आणि प्रचंड प्रवेशद्वार.  पण काय झालं कळलंच नाही आणि trained स्कुबा ड्राइवर सोबत असलेला संपर्क सर्वांचाच तुटला. सर्वजण मीनल, मनिष, चेतना, मानव आणि वीर इतरांपासून वेगळे झाले.  सर्वजण घाबरले कळत नव्हतं काय चालू आहे. आणि समोर प्रचंड प्रकाश जाणवू लागला अगदी डोळे बंद करावे लागले आणि डोळे बंद केल्यावर बासरीचा मधुर सूर ऐकू येऊ लागला. एका वेगळ्या विश्वात पाऊल ठेवलं होतं त्यांनी.

पुढे नक्की काय होणार होतं….?  हे सर्व संकेत कशाचे होते?     प्रकाशापुढे काय होतं?  कमल आणि त्याचा सुगंध कसा येत होता?  Trained स्कुबा ड्राइवर सोबत संपर्क तुटल्यावर सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न कसा सुटणार होता?  सुटणार होता की नाही ? द्वारका प्रोजेक्ट म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट नक्की काय वळण घेणार होतं…?

Trained स्कुबा ड्रायव्हर्स पासून वेगळे झालेले सर्वजण एका प्रचंड प्रकाशाकडे जाऊ लागले. कोणालाही काहीही कळत नव्हतं. संध्याकाळी सर्वांनी डोळे उघडले तेव्हा ते सर्वजण एका हॉस्पिटल मध्ये होते. Inquiry केल्यावर कळलं की Trained स्कुबा ड्रायव्हर्स पासून वेगळे झाल्यावर त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण काही साध्य झालं नाही, आणि जवळजवळ 6 तासांनी हे सर्व किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना हॉस्पिटल मध्ये आणलं तेव्हा बेशुद्ध होते पण कोणीही गंभीर नव्हतं. रात्री सर्वांना discharge सुद्धा मिळाला. हॉटेल वर आल्यावर सर्व विचार करू लागले.

वीर : कसं झालं हे असं काहीच कळत नाहीये. तुमचं ठीक आहे पण मी एक trained स्कुबा ड्राइवर आहे. मेडल्स आहेत माझ्याकडे यासाठी.

मनिष : हो काहीच कळत नाहीये. नक्की काय झालं काहीच आठवत सुद्धा नाहीये.

चेतना : आपण द्वारका पहिली खरी पण दरवाजामधून आत आपण काही जाऊ शकलो नाहीये.

मीनल :  हो काल पण आपण प्रवेश द्वाराजवळून परत आलो. आज पण प्रवेश द्वार काही उलांडु शकलो नाही.

वीर : पण मी वेगळाच विचार करतेय. आपल्याकडे ऑक्सीजन सिलेंडर होतं त्यात फक्त दीड तास पुरेल एवढंच ऑक्सीजन होतं, आणि आपण किनाऱ्यावर 6 तासांनी सापडलो. मग आपण श्वास कसा घेऊ शकलो पाण्यात?  बाकी वेळ काय झालं?

सर्वांना ते लक्षात आलं पण उत्तर कोणाकडेही नव्हतं.
ही गोष्ट main ऑफिस ला कळली होती म्हणून सरानी कॉल  केला. सर्वजण कॉल स्पीकर वर ठेऊन ऐकू लागले.

सर : एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे, कॉल करून सांगायचं ना हॉटेल मध्ये आल्यावर.

मनिष : सॉरी सर,  पण एवढ्या घाई गडबडीत लक्षात आलं नाही.

सर : काम थांबवा आणि परत या. काम तुमच्या जीवापेक्षा जास्त नाहीये.

वीर : सॉरी सर,  या वेळी थोडा प्रॉब्लेम झाला पण Next time आम्ही Careful राहू नक्की सर.

सर : नाही, एवढं सगळा झाल्यावर तुम्हाला मी कशी परवानगी देऊ काम पुढे नेण्यासाठी.

चेतना : प्लीज सर, एकदा संधी द्या प्लीज. यासाठी खूप wait केलाय.

मीनल : हो सर,  Dream प्रोजेक्ट आहे हे आमचं, एकदा चान्स द्या, आणि तसं पण थोड्या साठी माघार घेणे चुकीचं आहे.

सर : ठीक आहे, पण या वेळी काही प्रॉब्लेम झाला तर लगेच परत निघा.

सर्वजण : Ok सर.

सर्वांना आज झालेल्या घटना आठवत होती पण पूर्ण नाही. यात चेतना म्हणाली. ‘ आपण उद्या एकदा मंदिरात जाऊन दर्शन घेऊया.’

वीर :  हो,  आपण परवा परत एकदा प्रयन्त करू. उद्या दर्शन घेऊन या आणि आराम करा. मी काही काम करतो परवाची तयारी.

सर्वजण आजचा सर्व प्रसंग आठवत झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी……..

सर्वजण मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि मनोमन पुन्हा पुन्हा श्रीकृष्ण देवाला विनवणी केली या पावन द्वारकेच्या दर्शनासाठी.

वीरने दुसऱ्या दिवसासाठी तजवीज केली आणि सर्वजण परत हॉटेल वर परतले. प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भीती होती कारण यावेळी जर ते fail झाले तर परत मागे फिरावं लागणार होतं. झोप कोणाच्या डोळ्यापर्यंत येतच नव्हती, तरी कोणी एकमेकांशी बोलत नव्हतं. आपआपल्या विचारांमध्येच होते सर्व.

दुसऱ्या दिवशी सर्वजण पुन्हा एकदा द्वारका दर्शनासाठी तयार झाले. आणि बोट मधून उडी घेतात.

पाण्याखाली पुन्हा मनोहारी दृश्य दिसू लागतात. आणि थोड्यावेळाने द्वारकेच प्रवेश द्वार दिसू लागतं. पण प्रवेश द्वाराजवळ पोहोचण्यापूर्वी आधी सारखा  दुसऱ्या स्कुबा ड्रायव्हर्स सोबतचा संपर्क तुटला.

यावेळी प्रचंड प्रवेश द्वार आपोआप उघडले गेले आणि सर्वांचा प्रवेश द्वारका नगरीत झाला.प्रवेश केल्यावर प्रखर प्रकाश जाणवू लागला. प्रकाशापुढे त्यांना गुलाबी कमल त्यांना त्यांच्याकडे मोहीत करून स्वतःकडे बोलत होते.

हा अनुभव आजवरच्या अनुभवांपासून फारच वेगळा होता. Tranied स्कुबा ड्रायव्हर्स पासून वेगळे झाल्यानंतर आतापर्यंत वाटणारी भीती आता वाटेनाशी झाली. पाण्याखाली टवटवीत  कमल पुष्पाचा सुगंध अंगात नवचैतन्य भरत होते.

द्वारका मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रचंड खांब दिसू लागले त्यावर सुंदर नक्षीकाम होतं. जस जस ते पुढे जात होते एक अद्भुत नजारा डोळ्यासमोर होता. एक संपूर्ण नगर……
भरावलेले सर्वजण डोळ्यांमध्ये तो सुंदर देखावा भरत होते.

थोडं खाली जाऊन शेवाळे आणि माती बाजूला केल्यावर यात त्यांना सोन्याची काही नाणी, तबक ( मोठे ताट ), सूरई, मातीची काही भांडी वैगेरे मिळाली. वेगवेगळे शोधात असताना चेतना, मानव आणि वीर यांनी एकच वेळी वेगवेगळ्या खांब ना हात लावून वर उठायचा प्रयन्त केला आणि एक तरंग उठल्यासारखं सर्वाना जाणवलं. म्हणून त्यांनी परत तेच केलं यावेळी पुन्हा तेच जाणवलं. यावेळी मीनल आणि मनिष ही दुसऱ्या खांब जवळ जाऊन इशारा केला आणि सर्वानी एकाच वेळी खांब ला हात लावला. आणि पायाखालची जमीन कोणीतरी काढून घेतली असं वाटलं आणि सर्वजण खाली ओढली गेली.

सर्वांनी एकाच वेळी सर्व खांबांना स्पर्श केल्यामुळे ते उभे असलेली जागा सरकली आणि सर्वजण खाली आले. पाण्यात असल्यामुळे कोणाला लागला नाही. पण समोरच दृश्य पाहून मात्र सर्वजण आपण कोण?  का आलोत?  कुठे आहोत?  या सर्वच गोष्टींचा काही क्षणासाठी विसर पडला.

एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटलं. इतकं शांत, हलक आणि नशीबवान असल्याचे आज पहिल्यांदा जाणवलं त्यांना. निळ्याशार पाण्यात ते होते, समुद्रात असलेल्या प्रदूषणाचा लवलेशही नव्हता तिथे. समोर कधीही  न पाहिलेले मासे अगदी रंगेबेरंगी, जवळ येऊन गुदगुल्या करत होते. एक वेगळाच प्रकाश होता ज्यात चेतन्य होतं. त्या निळ्याशार पाण्यात उंच झाडे होती आणि त्यावर असंख्य रंगांच्या फुलांचे बांधलेले झोपाळे. आणि चुहूबाजूला कमळांची फुले. शांतता, समाधान, आनंदी, उत्साही सर्व भाव एकत्रच जाणवत होते. धन, संपत्ती, पैसा या ने मिळणाऱ्या सुखापेक्षा खूप मोठे धन सापडल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता. अशी ही जागा असू शकेल अशी कल्पनाच त्यांनी केली नव्हती.

या सर्वात दंग असताना गुलाबी कमल पुष्पांमधून एक आवाज येऊ लागला. सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले.
कमलाने बोलायला सुरुवात केली आणि आपण परिकथेच्या दुनियेत तर नाही आलो ना क्षणभर सर्वाना असंच वाटलं.

कमल बोलू लागले,
काल तुम्ही मुलांनी मनापासून माझ्या आराध्याची, नारायणाची प्रार्थना केली. आजवर इथे येणारे कमीच, पण कोणीही माझ्या आराध्याच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नाही आलं. आले ते फक्त प्रसिद्धी आणि धन मिळवण्याच्या हेतूने. काल तुम्ही इथं पर्यंत आलात पण मी आत येऊ दिलं नाही. माझ्या परवानगी शिवाय तुम्हाला इथे येता ही येणार नाही. काल तुम्हीसर्वानी मनापासून प्रार्थना केलीत म्हणून आज या सर्व इथे आहात आणि मी तुम्हाला माझ्या आराध्यांविषयी सांगू शकतो. त्या कमल पुष्पांमधून येणाऱ्या मधुर आवाजाकडे सर्वजण पाहत राहिले. त्या गुलाबी कमल पुष्पाकडे पाहताना सर्वजण विसरून गेले की ते समुद्रात आहेत.

मनीषने त्या कमल पुष्पाला प्रश्न केला ” आपण कोण हे आधी कळेल का कमल पुष्पा? “

कमलपुष्पाही म्हणतोस आणि कोण आहात असा प्रश्न ही विचारतोस?

सर्वजण एकटक त्याच्याकडे पाहत होते. तोच मनिष ने प्रश्न केला. येथे हे झोपाळे?  आणि हे वातावरण?

कमळ : श्री येतात इथे त्यांच्या सखिनसोबत, पण 36 वर्षातून एकदा.

मीनल : असं का???  म्हणजे 36 वर्षातूनच का???

कमळ : महाभारत युद्ध संपल्यावर 36 वर्षानंतर ही द्वारिका पाण्यात विलीन झाली म्हणून. 36 वर्षांनंतर ते श्रापातून मुक्त झाले म्हणून प्रत्येक 36 वर्षाने इथे येतात रास, थट्टामस्करी, आनंद, सर्व भरभरून असतं तेव्हा इथे. हे वातावरण अजून चैतन्याने भरून जातं. स्वर्ग लाभल्याचा आनंद मिळतो आम्हांला.  ( सर्व कमळ, आणि मासे, झोपाळे, फुले इ. )

सर्वजण त्याकडे पाहत राहिले पण पुढे काही विचारावं असं सुचत नव्हतं की धाडस होतं नव्हतं. पुढे कमल पुष्प बोलू लागलं.

या नगरीला जलसमाधी मिळणार हे माझ्या नारायणांनी आधीच जाणलं होतं. तसे शापही होते ते तुम्हाला माहित असेलच. एकदा ते नयनरम्य तलावाजवळ बसून या नगरीला जलसमाधी मिळण्यापूर्वी काय कार्य पूर्ण करायची आहेत आणि येथील प्रजेला सुरक्षित बाहेर नेण्यासाठी माझ्या आराध्याचे परम मित्र धनुर्धर अर्जुनाला बोलावणं पाठवण्याबाबत मसलत चालू होती. मी त्या तलावातील एक कमल पुष्प. मी मसलतीनंतर श्री कृष्णा महाराजांना विनंती केली, ” हे नारायणा, मला तुमच्यात विलीन करून घ्या. मला स्वर्गप्राप्तीच सुख मिळालं अशाने. ”
त्यावर देवानी उत्तर दिले, ” मी प्रत्येक अंशात आहे, तुझ्यात मी आणि माझ्यात तू. त्यासाठी माझ्यात विलीन होण्याची वेगळी गरज नाही. ”
मला कायम यांच्या सहवास लाभावा म्हणून मी त्यांची विनंती केली. तेव्हा त्यांनी मला या नगरीत कायम स्थान दिलं. म्हणून जलसमाधी नंतरही मी आजपर्यंत या नगरीत आहे, तो ही जसा मी श्रीना भेटलो होतो अगदी तसाच. या नगरीत त्यांचा अंश अजूनही आहे. त्यांच्या सहवासात अजूनही आहे मी, अगदी त्यांनी सांगितलं होतं तसंच.

चेतनाने प्रश्न केला. ” आपण खूप नशीबवान आहात. आपण आम्हाला या नगरीबद्दल सांगा आणि देवांबद्दलही. आम्ही नाही तुमच्या एवढे भाग्यवान पण तुमच्याकडून मिळणाऱ्या माहितीमुळे कदाचित त्यांच्या जवळ जाऊ शकू. “

या नगरीबद्दल सांगण्याआधी या सर्वांची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल. असे म्हणून त्या कमलने आदी काळापासून ची माहिती द्यायला सुरुवात केली.

पाच हजार वर्षांपूर्वी द्वापारयुग संपले व  कलियुग सुरु झाले, त्याच्याही पूर्वी त्रेता युग व त्याच्या आधी कृत युग व त्याच्या आधी सत्य युग अशी ही अतिप्राचीन काळातील गोष्ट. काळ प्राचीन असला तरी वैभव पूर्ण होता. माणसे देवाच्या तोडीची होती, ऋषीं – मुनींच्या तपःश्चर्येने देवांनी भयभीत व्हावं, कुलीन स्त्रियांकडून देवींनी धडे शिकावे असा तो काळ होता.

आर्याचे दोन प्रसिद्ध वंश त्या काळात होते.  एक सूर्य वंश व दुसरा चंद्र वंश. सूर्य वंशात नारायण श्री राम हा सातवा अवतार झाला पण पुढे सूर्यवंश क्षीण झाला व चंद्रवंश बलशाली बनला. परशुराम,  विश्वामित्र असे मोठमोठे तपस्वी या वंशात झाले. परशुराम अवतार, वशिष्टांच्या शब्दालाही देवादिकांत ही मान असे. विश्वामित्र क्षत्रिय असूनही तपोबलाने महर्षी पद मिळविले सृष्टिकर्त्यालाच आव्हान देऊन, प्रतिसृष्टीच वसविले. असे विश्वमित्र या चंद्रवंशात जन्माला आले. तसेच भीष्म व कौरव – पांडव या चंद्रवंशात जन्मले. वेदव्यासांनी लिहिलेल्या महाभारतात या चंद्र वंशातील राजांची नामावली दिलेली आहे. म्हणजेच महाभारत हा चंद्र वंशाचाही इतिहास आहे.

हजारो वर्षांपूर्वी देवगुरु बृहस्पतीची पत्नी चंद्राला पाहून मोहीत झाली. तिने बृहस्पती शिष्य वचनात गुंतवून त्याला आपली इच्छा पूर्ण करायला लावली या मधून बुधाचा जन्म झाला. बुधही चंद्रासारखाच सौंदर्यवान व तेजस्वी होता.  तो मोठा होताच इष्कवाकु राजाही बहिणी इला हिने त्याला वरले. त्यांचा पुत्र पुरुखा. चंद्रापासून विस्तारलेला वंश म्हणून त्याला चंद्रवंश किंवा सोमवंश असे नाव मिळाले. पुरुखा हा इंद्राचा मित्र व सहायकर्ता होता. इंद्र दरबारातील अप्सरा उर्वशीचे हरण एका राक्षसाने केले असता पुरुरव्याने तिची सुटका केली. उर्वशीचे मन पुरुरव्यावर बसले. दोघांचा विवाह  झाला. त्यांचे पाच पराक्रमी पुत्र होते. त्यातील आयूचा नहुष त्याचा ययाति असा पुरुवंश वाढला. पुरुरव्याच्या पुत्रापासून संपूर्ण चंद्रवंशाची वृद्धी झाली. याच चंद्रवंशी राजांची कथा महाभारतात आली आहे. भारतीय युद्धांत हे सर्व चंद्रवंशीच राजे कौरवपांडवांच्या बाजूने लढले ब्रम्हदेवाचे पुत्र भृगु त्यांचे पुत्र शुक्राचार्य. शुक्राचार्यांनी कन्या देवयानी. संजीवनी मंत्र शिकण्यासाठी बृहस्पती पुत्र कच शुकाचार्यांकडे शिष्य होऊन राहिला. कारण देव दानवांच्या युद्धांत शुक्राचार्य संजीवनी मंत्राने मृत दैत्यांना जिवंत करीत.ती विद्या शिकण्यासाठी कच शुक्राचार्यांकडे आला.त्याच्यावर देवयानीचे प्रेम जडले. दैत्यांना ही गोष्ट पसंत नव्हती.त्यांनी कच ला अनेक वेळा ठार मारले, पण देवयानीने शुक्राचार्यांकडून त्याला पुन्हा पुन्हा जिवंत करी. दैत्यांना ही कच ला मारून दारूत मिसळून शुक्राचार्याना पाजले.  शुक्राचार्यांचा मंत्र असा अनायासे कच ला मिळाला.  शुक्राचार्यांनी मंत्र जपताच कच त्यांच्या उदरातून बाहेर आला. शुक्राचार्यांनी जिवंत केल्यावर कच स्वगृही जाऊ लागताच देवयानीने आपले मन प्रकट केले. पण कच गुरुभगिनी म्हणून विवाहास तयार होईना. शेवटी देवयानीने कच ला त्याची विद्या निष्फळ होण्याचा श्राप दिला. कचने ही तुला ब्राम्हण कुमार वरनार नाही असा उलट श्राप दिला. कच आपल्या घरी गेल्यानंतर काही काळानेच दैत्यराज कन्या शर्मिष्ठा व देवयानी यांच्या भांडणात शर्मिष्ठेने देवयानीस एका पडक्या विहिरीत ढकलले.  दैव योगाणे शिकारीस आलेल्या ययाति राजाने देवयानीस बाहेर काढले. अशारितीने देवयानी ययातिशी प्रेमबद्ध झाली. तिने शुक्रच्यामार्फत शर्मिष्ठेला आपली दासी बनविली. विवाहात देवयानी बरोबर शर्मिष्ठाही दासी म्हणून ययातिकडे आली. ययातीपासून दोघीना पुत्र झाले.  शर्मिष्ठेला पुत्र झालेले देवयानीला आवडले नाही. तिने शुक्राचार्याकडून ययातीस श्राप देवविला. या श्रापामुळे ययातीस अकाली वृद्धत्व आले. ययाती च्या विनवणीवरून शुक्राचार्यानी उपशाप दिला की,  तुझे वृद्धत्व कोणी स्वखुशीने घेतल्यास तुला यौवन मिळेल. ययातीने आपल्या प्रत्येक मुलास वृद्धत्व घेण्यास विचारले.  चार मुले कबूल झाली नाहीत.  फक्त शर्मिष्ठाचा मुलगा पुरु कबूल झाला. ययातीने त्यालाच युवराज बनविले. बाकीच्या राजकुमारांनी इतरत्र जाऊन आपली राज्ये स्थापन केली.

ययातिचा मोठा मुलगा यदूपासून यदुवंश ( यादव ), अंधक ( महाभोज ) वृष्णि हे वंश तयार झाले.  कंस -देवकी हे अंधक वंशात,  तर वृष्णि मध्ये वसुदेव – बलराम –  कृष्णा झाले. ययातिचा दुसरा मुलगा तुर्वसपासून यवन झाले. तिसरा पुत्र द्रुन्हास पासून भोज वंश सुरु झाला.  चौथा अणूपासून म्लेंछ वंश तयार झाला व शेवटी पाचवा मुलगा पुरुपासून पौरव वंश सुरु झाला. पुरुचा 16 वा वंशज दुष्यन्त. 17 वा भरत. ज्याचे नाव आपल्या देशाला मिळाले.  23 वा वंशज हस्ती.  याने हस्तिनापूर शहर वसवले.  32 वा वंशज कुरु याच्या पुढील वंशाला कुरु व  कौरव म्हणू लागले. 47 वा वंशज शांतनू.

येथून धर्म आणि अधर्म याची सुरुवात झाली होती आणि द्वारपाल युग संपून नवीन सुरुवात करण्याची ही वेळी झाली होती. नारायण आपल्या नवीन श्रीकृष्ण अवतार मध्ये गोपीका कडून लाड करून घेत येणाऱ्या भविष्यातील लीला ची आखणी करत होते.

श्रीकृष्ण यांचा या अवतार मागे मुख्य 4 कारण होते.
पाहिलं म्हणजे कंस चा वध करून अत्याचार करणारा कितीही बलशाली असला तरी त्याच सत्य आणि कर्म यापुढे त्याच काही चालत नाही हे सांगणे.
दुसरं या जगाला निर्मळ आणि बंधन न घालता समोरच्याला सुटून जाऊ नये असं वाटणार प्रेम शिकवण देणे. त्यामुळे आपण राधेकृष्ण उल्लेख प्रेमाचा विषय निघाला कि करतो.
तिसरं म्हणजे महाभारत युद्ध मधून या जगाला ज्ञान, धर्म, भागवत गीतेच दान देणं.

आणि चौथा म्हणजे दुखी मनाने दिलेल्या श्राप मधून देवही सुटू शकत नाही. त्यामुळे आपल्या जीवनात कोणाच मन दुखेल असं वागू नये.

( कमलपुष्प पुढे बोलतात…… )

श्रीकृष्ण देवांना या अवतारात अनेक कार्य आणि अनेक वचन पूर्ण करायचे होते. यशोदा माताला देवाची आई होण्याचं, त्यांचं पालनपोषण करण्याचं सुख मिळेल असं वचन देवांनी आधीच दिलं होतं. पुंडलिकाची भेट, कलीची सुटका ( यामुळे पुढे कलियुग सुरु होणार होतं. ) अश्या अनेक कामांची यादीच होती म्हणा ना. देवांचा जन्मच कारागृहात झाला. देव असून जन्मापासूनच मृत्यू आणि संकट त्यांच्या मागे होती तरी आपण थोड्या थोडक्या अडचणींमध्ये देवाला म्हणतो असं माझ्याच सोबत का झालं ? हे खरंच योग्य आहे ? असो….

संकटांवर मात करत वासुदेव बाबांनी त्यांना सुखरूप गोकुळात सोडलं. भगवान श्रीकृष्ण गोकुळात वाढू लागले. ते वाढत होते सोबतच त्यांच्या लीला आणि खोड्यासुद्धा. रागांयला लागले नि सांड-लवंड सुरु झालं. सकाळी दूध- धारा काढताना तर त्यांना धरून ठेवावं लागे. ते गाईच्या वासरालाही मागे ओढून सरळ गाईचं दूध चोखू लागत. पण कोणत्याही गाईने कधीही स्वतःच्या वासरात आणि त्यांच्यामध्ये फरक केला नाही. मोठे होऊ लागले नि त्यांना ते दूध कमी पडू लागलं आणि त्यांनी मित्रांची टोळी करून इतर स्त्रियांची मटकी फोडायला सुरुवात केली. घरी रोज तक्रारी येऊ लागल्या. यशोदा माता देवांना बांधून ठेवत. तक्रारी नंतर त्या गोपिकेशी देव नाराज होऊन बसत आणि बोलत नसत. हा अबोला मात्र गोकुळात कोणालाही सहन होत नसे. मग गोपिका त्यांना लाडीगोडी लावत. बरं या लीला, खोड्या सर्व भरभरून जगले देव. त्यांनाही बालपण अनुभवण्याचा मोह आवरला नाही. ( हसून ). देव मटकी फोडायचे, लोणी चोरांचे, त्यांना माखन चोर नाव पडलं आणि त्यांनीही ते हसून स्वीकारलं कारण त्यामागचा त्यांचा हेतू शुद्ध होता. गोकुळातील अर्ध्याधिक दूध, दही, लोणी कंसाकडे अवाजवी कर स्वरूपात जायचं. कष्ट करणार्यांना आणि त्यांच्या मुलांना ते मिळत नव्हतं. मग देव स्वतः असे पराक्रम करून त्यांना खाऊ घालत. कंसाच्या जाचाला कंटाळलेल्या लोकांना रास करून आणि त्यांना रास नृत्य करायला भाग पडून त्यांच्यात नवं चैतन्य भरत. त्यांच्या बासरीवर सर्व धुंद होऊन नाचत. राधा राणी तर त्यांच्या हृदयाच्या आणि बासरीचा सूरच होत्या. देव राधाराणी पेक्षा वयाने लहान पण दोघांना एकमेकांचा संग फार आवडे. त्यांच्या डोळ्यात निस्वार्थ प्रेम दिसे ज्यात वासनेचा, मोहाचा लवलेशही नसे. राधारानीचे यजमान मात्र फार कोपिष्ट होते. पण ज्यावेळी देवांनी गोकुळ सोडलं त्यावेळी त्यांच्या डोळ्यातही पाणी तरळलं. कंसाचा वध करून, त्याच्या अत्याचाराचा अंत करून देव शिक्षा ग्रहण करण्यासाठी गुरू आश्रमात राहू लागले. बघा आयुष्यात गुरू असणे किती महत्वाचं आहे. देवांनाही ज्ञान घेण्यासाठी गुरूमार्गाची आवश्यकता पडली.

पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर भगवान मथुरेला परत आले. जरासंघ ला कृष्ण मथुरेला परत आल्याचे कळताच आक्रमणं सूरू केली. यासर्वात यादवांची फरफट होतं होती. जरासंघाला संपवणं , त्याचा वध करणं देवांना कठीण नव्हतं पण ते त्यांनी बनवलेल्या योजनेत नव्हतं. म्हणून यादवबांधवांच्या रक्षणासाठी मथुरा सोडण्याचा निर्णय देवांनी घेतला. गोड पाणी सोडून , खऱ्या समुद्रकिनारी जाऊन राहणं नको होतं पण पर्यायही नव्हता.

ओसाड पडलेली जमीन पाहून सर्वांचे चेहरेही पडले. पण भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झाली आणि जणू स्वतः विश्वकर्मा नगरीच निर्माण करतायत असा भास होऊ लागला. भव्य, दिव्य आणि अद्भुत नगर रचना होऊ लागली. यादवांमध्ये आता उत्साह आणि आनंद दिसत होता. संपूर्ण द्वारकेभोवती भरभक्कम तटबंदी बांधली जात होती. मुख्य प्रवेशद्वार प्रचंड मोठा होता त्यावर दोन मोठे खोंड ( बैल ) एकमेकांच्या शिंग भिडवलेल्या रूपात कोरले होते शिवाय खाली एका ठराविक उंचीपर्यंत प्रवेशद्वाराला मोठमोठे अणकुचीदार खिळे उलटे बसवण्यात आले होते. जेणे करून कधी शत्रूने हल्ला केला तरी त्याला प्रवेशद्वार उघडता येऊ नये. त्याकाळी असे मोठे प्रवेशद्वार हत्तीच्या मदतीने तोडून आत प्रवेश केला जायचा त्यामुळे असे उलटे खिळे बसून घेतले होते जेणे करून हत्तीने धडक मारली तरी जखमी हत्ती पुन्हा धडक मारणार नाही. कर्ण दिग्विजयासाठी ( चारही दिशांवर दिग्विजय करण्यासाठी )निघाला होता तेव्हा त्याने निघण्यापूर्वीच जाहीर केलं होतं. सीतामातांची जन्मभूमी /राज्य आणि श्री कृष्णाची द्वारका सोडून सर्व राज्य आपल्या प्रभावाखाली आणणार.( कारण यांवर कर्णाची श्रद्धा होती. )असाच प्रवेशद्वार अजून एका राजाने बनवून घेतला होता.पण यावर ही कर्णाने उपाय काढला होता. त्यावेळी कर्णाचा एकहत्ती जखमी झाला होता.तेव्हा कर्णाने काही सैनिकांना त्याची चिलखत काढून त्यांना त्या खिळ्यावर उलटी लावलेला सांगितलं आणि बघता बघता चिलखतनें प्रवेशद्वारवरील खिळे झाकले गेले आणि त्यानंतर हत्तीच्या मदतीने प्रवेशद्वार तोडण्यात आला होता. हे झालं प्रवेशद्वाराविषयी, आत प्रवेश केल्यावर मोठमोठ्या हत्तीच्या आणि सिंहाच्या मुर्त्या होत्या.अद्भुत रचना होतं होती.प्रत्येकाला आपलं एक हक्कच आणि मजबूत घर मिळत होतं. राजप्रासाद भव्य होता आणि राजा, तो तर त्यांच्यातच राहिला खेळलेला त्यांच्यातलाच एक होता. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, रस्ते सर्वांची रचना सुखसोई लक्षात ठेवून करण्यात आली होती.जागोजागो गोशाळा होत्या. झाडे , प्राणी पक्षी आनंदी होते. देवांच्या राजप्रासादाला १०८ पायऱ्या होत्या,ज्या चढताना जपमाळ पूर्ण केल्याचा भास होई. देवांच्या राज्यात सर्व सुखी होते. ( सर्व प्राणिमात्र) अर्जुन जेव्हा प्रथम द्वारकेला आले तेव्हा ते द्वारकानगरी पाहून आश्चर्यचकित झाले. प्रवेशद्वार ते राजप्रासादापर्यंत सर्व गोष्टी कुतूहलाने निरखित होते आणि द्वारकेचं भरभरून प्रशंसा करत होते.”अशी नगरी मला ही बसवावीशी वाटतेय माधवा” असं ते म्हणाले होते. आणि देव नेहमीप्रमाणे खट्याळ हसून” तथास्तु” म्हणाले होते. देवांच्या अश्या हसण्याचं अर्जुन आणि युधिष्ठीर यांना नेहमी अप्रूप वाटे. पुढे इंद्रप्रस्थ वसवताना पांडवांनी देवांचाच सल्ला घेतला होता ते यामुळेच. आणि इंद्रप्रस्थ पाहून गृह्प्रवेशावेळी सर्व राजा महाराजांनी प्रशंसा केली होती. आजही या सागरात असलेल्या या द्वारकेत जिथे कधीकाळी देव स्वतः वावरले होते,त्यांच्या असण्याचा भास आणि त्याचा आनंद तेव्हासारखाच आहे. याचं द्वारकेत अभिमन्यू लहानाचा मोठा झाला, युद्धकला शिकला. या द्वारकेने अनेक योद्धे पहिले, अनेक साधू महात्मे पहिले, अनेक वरदान आणि श्राप ही झेलले. एका उंच जागेकडे लक्ष देत कमलपुष्प बोलले, जेव्हा महाभारत युद्धावेळी अर्जुन आणि दुर्योधन देवांना मदत मागण्यासाठी आले होते तेव्हा देव याच ठिकाणी फुलांच्या झोक्यावर आराम करत होते. पुढे एक दालन आहे ज्यात अभिमन्यूचा जन्म झाला होता. इथे तूम्ही या पहा आणि अनुभव घ्या.देवांची अनुभूती प्रत्येक पाऊलावर होईल तुम्हाला. महाभारत युद्ध संपलं आणि एक पर्व संपलं. या युद्धानंतर अपेक्षित होती शांती, सुख, संपन्नता पण एका काळानंतर सुखही उपभोगणं जमलं नाही यादवांना. सुख मिळत होतं, स्वतंत्रता होती, सर्व होत म्हणून अहंकार आणि मीपणा प्रत्येकात डोकावू लागला होता. या द्वारकेत भांडण -तंटे, वादविवाद, भावंडांमध्ये मतभेद होऊ लागली. देवपुत्रांनी सांबाने साधूची थट्टा केली. साधू गर्भवती स्त्रीला पुत्र होणार की पुत्री हे अचूक सांगत. त्यांची थट्टा करण्यासाठी सांबा आणि त्यांचे मित्र सांबाला साडी नेसून त्यांच्या समोर उभं केलं आणि विचारलं ,” सांगा महाराज या स्त्रीला पुत्र होणार की पुत्री ?” साधूंच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी श्राप दिला, ” सांबा त्याच्या हाताने उखळ ( नांगरासारखा अस्त्र )बनवेल आणि त्यानेच सर्वाचा नाश होईल.”

माता गांधारीने दिलेला श्राप आता फळाला येणार हे देवांच्या लक्षात आलं होतं. देवांचा या धरेवरून निरोप घ्यायचा,अवतारकार्य संपवण्याचा काळ जवळ आला होता. देवांनी हस्तिनापूरला अर्जुनसाठी द्वारकेला येण्यासंबंधी निरोप पाठवला. इकडे सांबाने दुसऱ्या दिवशी इच्छा नसतानाही उखळ बनवला … की बनवला गेला ? असो पण उखळ तयार झाला आणि जेव्हा ही गोष्ट यादवांना कळली तेव्हा त्यांनी मिळून तो तोडला आणि समुद्रात फेकून दिला. त्यानंतर मद्य ( दारू ) पियायल्यानंतर यादवांमध्ये भांडण झाले आणि समुद्रकिनारी तलवारी भिडलेल्या असताना सांबाच्या हाती त्याने बनवलेला तोच उखळ लागला जो तोडून यादवांनी समुद्रात फेकला होता,आणि आता यादवच यादवांचं कूळ संपवू लागले. अर्जुनाने द्वारकेतले हे दृश्य पहिले आणि त्यांचेही डोळे पाणावले. किती परिश्रम, त्याग आणि प्रेमाने उभारली होती ही द्वारकानगरी. देवांनी अर्जुनाचं स्वागत केलं आणि त्याला द्वारकचं भविष्यही सांगितलं. देव म्हणाले, ” पार्थ, आता सर्व संपवण्याची वेळ झाली. तेव्हा सर्व स्त्रियांना, मुलांना आणि वृद्धांना तू हस्तिनापूरला घेऊन जा.” अर्जुनाने त्यांची आज्ञा मान्य केली. देवांनी यासंदर्भात द्वारकेत दवंडी दिली.” सर्वजण ७ दिवसात सर्व सामान घेऊन अर्जुनसोबत जातील.”

 ठरल्याप्रमाणे सर्व द्वारकावासी अर्जुनसोबत जायला निघाले परंतू देवांचे वडील वासुदेवजी आणि त्यांच्या पत्नीने जाण्यास नकार दिला. भगवान श्री कृष्ण हें जंगलाच्या दिशेने निघून गेले. एका मोठ्या वृक्षाखाली निवांत झोपले. एका पारध्याने सावज समजून बाण देवांच्या पायावर मारला. जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्याला आपला गुन्हा लक्षात आला आणि तो रडू लागला तेव्हा देवांनी त्याला सांगितलं कि त्यांचं अवतारकार्य त्याच्याच हाताने संपणार होतं आणि ते योजनाबद्ध आणि नियतीने ठरवल्याप्रमाणे होतं. इकडे अर्जुन सर्वांना घेऊन द्वारकेबाहेर गेले. आणि द्वारका जणू यांच्या जाण्याच्याच प्रतीक्षेत असल्याप्रमाणे अधीरतेने सागरास जवळ करू लागली. पुढे सर्व तुम्हाला कमी – अधिक फरकाने माहित आहेच.

आपण समुद्रात आहोत याचा विसर पडलेली टीम सर्व अवाक होऊन ऐकत होते. आणि भानावर आल्यावर मानवाने प्रश्न केला ,” एक विचारू कमलपुष्पा ?”

कमलपुष्प : नक्की विचार ……

मानव : तुम्ही आता या ठिकाणी जवळजवळ ५ हजार वर्षांपासून आहात. अजून किती वर्ष असणार इथे ? म्हणजे इथे असंन देवांच्या सहवासातच असण्यासारख आहे पण कधी ना कधी हे पण संपणारच ना ?

कमलपुष्प : हो संपणार ना नक्की संपणार. निसर्ग नियम आहे तो

चेतना : पण कसं ? आणि कधी ?

कमलपुष्प : त्याला अजून फार अवकाश आहे. प्रत्येक युगाचा कालखंड आधीच ठरवला जातो. त्यानुसार कलियुग संपल्यावर पुन्हा एकदा सत्ययुगाला सुरुवात होईल. पण त्यापूर्वी संपूर्ण विनाश होईल. संपूर्ण विनाशानंतरच एक नवी सुरुवात होते. त्यावेळी हे सर्व पण संपेल. आणि मी वैकुंठाला देवांच्या पायाजवळ जाईन. यावेळी कलियुगाचा कालखंड हा ४ लक्ष ३२ हजार वर्षांचा आहे. त्यांतली ५ हजार वर्षाचं सरली आहेत आतापर्यंत. म्हणजे अजून ४ लक्ष २७ हजार वर्ष माझं आणि या द्वारकेचं अस्तित्व असेल. त्यानंतर जग कसं नवं – करकरीत असेल. तुमच्यासारखं कोणी देवांच्या दर्शनाचा / भक्तीचा भुकेला असेल तरच इथंपर्यंत पोहचेल नाहीतर नाही.

मीनल : हे कमलपुष्पा , आम्ही नक्कीच भाग्यवान आहोत म्हणून आम्हाला तुमच्याकडून अशी मौल्यवान माहिती मिळाली. आमची अजून एक विनंती होती आम्हाला इथली छायाचित्रे घेण्याची परवानगी द्यावी. कारण जग अजूनही रामायण , महाभारत कथाच समजतात आणि आम्हाला जगाला सांगायचं आहे, या फक्त कथा नाहीत तर गौरवशाली इतिहास आहे आपला .

कमलपुष्प परवानगी देतात परंतु इथे पुन्हा कोणी येऊ शकणार नाही असेही सांगतात . पूर्ण टीम ते नगर डोळ्यात साठवत असतात आणि कॅमेरा मध्ये कैद करत असतात. नगर फिरत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांना देवांच्या त्यावेळच्या लीला दिसतं होत्या. पण एका ठिकाणी वीरचा पाय अडकतो आणि तो सोडवण्याचे अनेक प्रयत्न करूनही पाय अडकलेल्या जागेतून सुटत नाही ते पाहून बाकी सर्व त्याची मदत करायला पुढे येतात पण तरीही उपयोग होत नव्हता. हळूहळू सर्वांचे श्वास जड होऊ लागतात आणि भान हरपू लागतात. वीर जोर लावून पाय खेचतो आणि एक एक छोटी पेटी वर येते, सुंदर नक्षी केलेली. वीर ती पेटी हातात घेतो आणि त्याचीही इतरांप्रमाणे शुद्ध हरवते.

संध्याकाळची कातरवेळ मावळतीचा सूर्य आपली विविध रंगांची उधळण मागे ठेवत परतीच्या वाटेवर असतो. आणि दुसऱ्याकिनाऱ्यावर वीरचे डोळे हळूहळू उघडत असतात. त्याला जाग येते त्याच्या बाजूलाच मानव , मीनल, चेतना आणि मनीष बेशुद्ध असतात . वीर सर्वाना उठवतो. सर्वजण मावळत्या सूर्याच्या रंग उधळणीत आपला अनुभव खरा कि भास ते ठरवत असतात. आणि तेवढ्यात मानवच लक्ष त्या छोट्या पेटीकडे जातं . आणि तो सर्वाना दाखवतो. तेव्हा वीर त्यांना तो प्रसंग सांगतो.

मानव : आपण कोणतीही वस्तू आपल्या मनाने तिथून आणू शकत नव्हतो . जर हि पेटी इथे आहे म्हणजे या मागे नक्की काही कारण असणार.

मीनल : जर हि पेटी खरी आहे म्हणजे आपला अनुभव खरा आहे. म्हणजे आपण काढलेले फोटो ही कॅमेरा मध्ये असणार .

सर्वजण कॅमेरा तपासून बघतात आणि त्यांनी घेतलेले सर्व फोटो त्यात असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा भाव आणि कृतज्ञता दोन्ही असतात. सर्वजण ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतात पण पेटी उघडत नाही. तिकडे आपण नसल्यामुळे गोंधळ उडाला असेल म्हणून ते तिथून निघतात आणि हॉटेलवर येतात.

सकाळी टीमशी संपर्क तुटल्यामुळे स्कुबा टीमने ऑफिसला कळवलं होतं. त्यामुळे Sir लगेच तिथे पोहचले होते सर्वांना समोर पाहून Sir सुटकेचा निःश्वास टाकतात . सर्व सांगतात , ” सर , संपर्क तुटला खरा पण आम्ही व्यवस्थित तिथे पोहचलो आणि आमचं काम केलं , शिवाय वीर आमच्यासोबत होताच. पण नंतर दिशा कळली नाही म्हणून आम्ही दुसऱ्या किनाऱ्यावर पोहचलो त्यामुळे आम्हाला यायलाही उशीर झाला एवढंच. “

टीमने काढलेले फोटो सरकारने खरे आहेत , edit किंवा photoshop केलेले नाहीत . याची खात्री करून ते जगप्रसिद्ध केले. संपन्नता या भारतात पूर्वीपासून होती . शिवाय रामायण आणि महाभारत फक्त कथा नाहीत तर सत्य आहे हे जगासमोर आलं. या प्रोजेक्ट मुळे अनेक देशांच्या टीम या टीम सोबत काम करू इच्छित होत्या .

समाप्त……

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.