फक्त एक विनंती ?….

Written by

सिरीयाच्या किनाऱ्यावर त्या पाण्यातून वाहून आलेल्या बाळाचा जेंव्हा फोटो पाहिला होता तेंव्हा मनात गलबलून आलं होतं आणि अशी परिस्थिती कोणावरच ओढवू नये म्हणून मनातल्या मनात कितीतरी वेळ प्रार्थना केली होती. त्यावेळेस चुकूनही असं वाटलं नव्हतं की, त्यापेक्षाही भयानक फोटो कधी पहायला मिळेल.

भारतात ब-याच ठिकाणी पावसाने थैमान मांडलंय आणि महाराष्ट्रात तर त्यांचं खुल्या मनाने तांडव चाललय. कधीकाळी हवा असणारा पाऊस एकाएकी क्रुर होतो अन् सगळ्यांना त्याच्यात सामावून घेण्यास अधीर होतो. कसं गिळावं अन् कसा नाश करावा हेच चालवलंय ह्यावेळी पावसाने. आज जिथे अजूनही पावसाचा टिपूसही नाही तिथे अनेक जण पाण्याशिवाय तळमळत आहेत, कसंही करून पावसाच्या येण्याची वाट ते अधीरतेने करताएत तर त्याच्या विरूध्द एकीकडे पावसाने रौद्र रुप धारण करून नक्की कुठल्या पापाची शिक्षा देतोय हेच कळत नाहीये.

पावसाच्या पुराने बघता-बघता हसतखेळत आयुष्य एका क्षणात उध्वस्त केलं. उभं आयुष्य जात, धर्म मिरवत कधी देवाला पुजलं तर कधी अल्लाह् ला नमाज अदा केला पण खरे देव आणि अल्लाह् दिसले ह्या पुरात अडकलेल्यांच्या मदतीला धावून येणा-या फक्त आणि फक्त सामान्य माणसांमधेच.

आज जेंव्हा हा फोटो पाहिला तेंव्हा त्या माय माउलीची काय हालत झाली असेल ह्याची कल्पनाच करवली नाही. पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी काय – काय केलं असेल न् तिने? पण शेवटी आयुष्याला ती मुकलीच पण एक माय म्हणून ती जिंकली. आपल्या लेकराला कुठल्याही परिस्थितीत न सोडणारी ती आई शेवटपर्यंत तशीच राहिली, आणि ह्या माय-लेकरांनी एकमेकांच्या मिठीत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या दु:खाची आपण कल्पनाही करू शकत नाही. कुठून वाहत आले आणि कितीवेळ वाहिले असतील कोण जाणे, पण त्या आईची मिठी बाळासाठी जराही सैल झाली नाही. मरणानंतरही दोघं एकमेकांच्या मिठीतच विसावले आहेत.

अशीच कितीतरी मायलेकरं ह्या पुरात हा-हा म्हणता वाहून गेली. माणसं तर आहेच पण मुकी जनावरंही ह्या थैमानात सुटली नाहीत. सगळं गेलं अन् हाती मोकळं आकाश राहिलं.

पण पावसा आता बस् कर अन् थांबव हा आता तुझा खेळ. फक्त एकच विनंती आहे तुला, आता झालं तेवढं खुप केलंस खुप पसारा मांडून ठेवलास भोवताली अन् मनातही. आता त्या पसा-याला आवरू दे अन् पुन्हा जगण्यासाठी खंबिरपणे उभं राहण्याचं बळ मिळू दे. सर्वस्व तर गेलंय पण तरीही जगण्याची एक नवीन पालवी उमलू दे. उद्याला नक्की एका उमेदीची पहाट उगवेल अशी भाबडी आशा आहे आणि त्याचं सत्यात रूपांतर होऊन आम्हाला जगण्याची एक संधी दे.

©Sunita Choudhari.

(मित्रमैत्रिणींनो आज मी फक्त ब्लाॅग लिहिला नाहीये, मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. आता गरज आहे आपण सर्वांनी मिळून एकत्र येत माणूस बनून रहायची. ह्या संकटात खारीचा वाटा का होईना प्रत्येकाने उचलावा आणि उगाच मी हे केलं मी ते केलं म्हणत वेळ न घालवता संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. धन्यवाद .)

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा