” फरेंड शिप डे “

Written by

” काका हे वाले बँड कितीला दिले ? ”
‘ 5 ला एक ‘
” आणि ते पॅक केलेलं ? ”
‘ ते 15 ला येईल ‘
बाजूला होऊन तो खिशातले चिल्लर मोजू लागला… साठवून ठेवलेले…. 27 रुपये भरत होते… त्याने हिशोब सुरू केला… हातातले पैसे आणि काळजात असलेले मित्र यांची सांगड घालू लागला
” काका , ते 15 वालं एक द्या आणि 5 वाले तीन द्या… 27 मध्ये लावा सर्व ”
‘ हे घे चल ‘
त्याने त्या बॅगेच्या चैनच्या कप्प्यात ठेवले होते… रविवारची शाळेला सुट्टी होती… क्लास सायंकाळी होता… याने मात्र दुपारीच तयारी करून ठेवली होती तेही शक्तिमान बुडवून… एक एक क्षण असा वर्षासारखा भासत होता… अधून मधून बॅगेच्या कप्प्यात हात टाकून तो ते व्यवस्थित आहे ना याची तपासणी करत होता…
क्लासची वेळ झाली होती… त्याची गँग नेहमीप्रमाणे शेवटच्या ओळीत बसली होती… पुढं मास्तर शिकवत होते आणि मागं यांचा खोड्या करण्याचा कार्यक्रम चालू होता… मास्तरांनी हातातला खडू भिरकावला… बरोबर त्याच्या डोक्यात बसला…मास्तर जोंटी ऱ्होडसचे निस्सीम भक्त…. नेम बरोबर लागल्याचा आनंद लपवत मास्तरांनी डोळे वटारले… पोरांनी माना खाली घातल्या… क्लास सुटला… त्याने आपल्या मित्रांना थोडा वेळ थांबायला लावलं…” आज कुछ तुफानी करते है ” ही त्याकाळातली कन्सेप्ट होती…थांबायला लावलंय म्हटल्यावर आज जोरात काहीतरी होणारे याची त्यांना एव्हाना जाणीव झाली होती… त्याने बॅगेमधून बँड काढले… पाच वाले तीन…
” हात करा पुढे ”
‘ काबर ‘
” जेवढं सांगतो तेवढं करा की… कशाला डोक्याची वाट लावताय ”
तिघा मित्रांच्या हातात ते फ्रेंडशिप बँड बांधले….
तिघंही भलतेच खुश…
त्यांनी याला मिठी मारली…
चौथा मात्र शांतच उभा होता…
‘ यायला , यांना बांधले आणि मला मात्र नाही…’
मनातून शिव्यांची लाखोली वाहिली…
जो-तो घरी जाण्याच्या दिशेने गेला… त्या तिघांची घरी जाण्याची वाट वेगळी होती…. याने चौथ्याला थांबवलं…ते स्पेशल वालं स्टिकर चं बँड त्याच्या हातावर बांधलं… आतापर्यंत शिव्यांची लाखोली वाहणारा तो आता त्याचं मनातल्या मनात कौतुक करू लागला ( मित्राचं कौतुक हे मनातल्या मनातच केलं जातं… तोंडावर फक्त शिव्या दिल्या जातात )
‘ भावा…’ ( पुढे त्याला काही सुचलच नाही )
वाल्याचा वाल्मिकी झाला होता…
.
.
.
.
.
.
.
आज व्हॉटअपवर सरासरीपेक्षा जास्तच मेसेज येत होते… रविवार…ड्युटीला सुट्टी….व्हाट्सएप उघडून बघितलं तर फ्रेंडशिपडे चे मेसेज…. मेसेजेसचा पूर बघताच त्याने मोबाईल बाजूला ठेवला….त्याची नजर कपाटाकडे गेली… मित्राने पैसे वाचवुन दिलेल्या खास स्टिकरच्या बँड कडे…
त्याने आठवणी आणि बँड सांभाळून ठेवला होता…
आता ते ज्या दिवशी भेटतात तोच त्यांचा फ्रेंडशिप डे असतो… काळ बदलला , जिव्हाळा अजूनही तसाच आहे…
( फ्रेंडशिप डेचे बँड वैगेरे आज जरी काहींना पोरकटपणा वाटतं असला तरीही लहान वयात याच गोष्टी बहुमूल्य होत्या हे विसरून चालणार नाही… ज्या गोष्टी आजही जशाच्या तशा आठवत असतील आणि आठवल्या तर चेहरा खुलून जात असेल तर आमच्या काळजातला लहान पोरगा अजूनही जिवंत आहे असे समजावे )

Article Tags:
· ·
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा