फिटनेस फंडा

Written by

#फिटनेस_फंडा

बागेतल्या झाडांमध्ये आजकाल फिटनेससाठी काय काय केलं जातं यावर चर्चा सुरू होती . सगळी तरुण झाडं सळसळ करत आपले मुद्दे मांडत होते. ज्येष्ठ वृक्ष मात्र शांत उभा होता. तेवढ्यात सकाळी बागेत फिरायला येणाऱ्यांना आकर्षित करून स्वतःच्या क्लबचे मेंबर बनवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी ” डान्सिंग फॉर फिटनेस” ची फ्री कार्यशाळा आज आयोजित केली आहे असे जाहीर केले. त्यांनी स्पीकर वर गाणी लावली.

सगळ्या झाडांची सळसळ थांबली आणि कान टवकारल्या गेले.

समोर काही मुले उभी राहून हात पाय कसे हलवायचे या बद्दल सूचना देवू लागली. फार काही प्रतिसाद मिळत नाही हे बघून लोकांचे लक्ष वेधून घेत त्यांच्यातील एका गुटगुटीत पोराने माईकचा ताबा घेतला आणि बोलला ,” आपल्या आयुष्यात खूप टेन्शन असतात . त्या सगळ्यांना घटकाभर तरी विसरता आलं पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी थोडा तरी वेळ काढता आला पाहिजे . कसलीही लाज बाळगू नका. नाचता येत नसेल तर आम्ही शिकवू. हसत खेळत , झिंगाट ऐकत फिटनेस मिळवा आणि आयुष्याची गाडी बुंगाट पळवा”.

पुन्हा एकदा नव्या जोमाने गाणी लागली.

” झिंग झिंग झिंगाट”

” कशाचा राग
हा तर रंगाचा डाग
तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक ” .

व्हायचं तेच झालं पार्टी आणि व्यायाम यायला फरक न कळल्याने गाणी ऐकताच रात्रीचा हँग ओव्हर न उतरलेले काही जण त्यांच्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष करत बेधुंद होऊन नाचत सुटले.

गुटगुटीत पोरगा ही सूचना देत देत नाचायला लागला.

दुर बाकावर बसलेल म्हातारं मित्राला म्हणलं ,” माझा नातू बी रोज रात्री पार्टी का काय म्हणत असच गाणं लावून नाचतंय. डोकं उठवतंय . आता सकाळच्या पारी डोकं उठवण्याचे यांना पैसे द्यायचे? घोर कलयुग आलाय …. हरी ओम .. .. हरी ओम “.

“आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ हाय” हे गाणं लागताच उत्साहित तरुण झाडांनीही गाण्यावर ताल धरला. ती सगळी अधिकच सळसळू लागली .

मघाशी माईक हातात घेऊन आयुष्याला बुंगाट पळवा म्हणणारा पोरगा आता कोपऱ्यात जावून धापा टाकायला लागला.

काही चाणाक्ष झाडांनी हेरलच ,” हा स्वतः अजून इतका गुटगुटीत आहे. जरा नाचला नाही तर धापा टाकतो आहे . हा काय लोकांची आयुष्य बुंगाट पळवणार. ”

हा सगळा प्रकार गुपचूप बघणारं जून झाड मात्र संगीत संस्कृतीत प्रत्येक प्रहरासाठी एक विशिष्ट राग आहे याचा आजच्या पिढीला विसर पडला आहे म्हणत खिन्न हसलं . काळासोबत बदलायलाच हवं असं स्वत:लाच समजावत ” तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे ” या स्वतःच्याच फिटनेस फंड्यावर डोळे मिटून घेत गार वाऱ्यासोबत ताल धरून डूलायला लागलं.

©️ अंजली मीनानाथ धस्के

लिखाण आवडल्यास प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका.
इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे.

(या लेखाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या मालकीचे आहेत.)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा