फुलवेडी हरवली..💐

Written by

फुलवेडी हरवली,….
रस्त्याच्या कोपऱ्यात एक नवीनच
गजरेवाला बसायला लागलाय,..
फक्त टपोऱ्या मोगऱ्याचे गजरे हिरव्या गार केळीच्या पानात सुंदर पुडी करून देतोय,…..
त्याने ज्या दिवशी दुकान थाटलं त्या दिवशी माझ्या मनातली तिच्या
आठवणींच्या अत्तराची कुपी उघडल्या गेली,…ह्या मोगऱ्याच्या सुगंधानं त्याला पार 20 वर्ष मागे नेलं,…त्या 20 वर्षांपूर्वी उन्हाळा सुरू होताच घमघमणाऱ्या मोगऱ्याची जाणीव करून देणारी तिची ती लांबसडक वेणी,…
ज्यावर हा मोगरा निवांत झोके खात असायचा,…तिच्या वर्गात येण्याची चाहूलही त्याचा गंधच करून द्यायचा,..काय प्रसन्न वाटायचं त्यामुळे वर्गात,…
तिची माझी ओळख करून देणारा हा मोगराच,.. कॉलेजच्या रस्त्यावर मावशीकडे मी अधून मधून जायचो तर मावशीच्या अंगणात गेटजवळच पांढऱ्याशुभ्र
मोगऱ्याने लगडलेले झाड,…
एके दिवशी कॉलेजमध्ये एक पिरेड बुडवून मी मस्त मावशीच्या अंगणातल्या बंगाईवर बसून चहा पित होतो तर ती फुलवेडी आणि तिची मैत्रीण समोरून जात होती,
तिची नजर मोगऱ्यावर पडली आणि ती ओरडलीच,”अय्या,किती सुंदर मोगरा ,अगदी टपोरा आणि सुगन्ध तर बघ रोडवर येतोय,”
चल फुलं तोडू…
मैत्रीण म्हणाली नको ग ,”तुझं फुलवेड एक दिवस लोकांचा मार खाऊ घालेल आपल्याला.”
“ए प्लिज दोन तरी फुलं घेऊ या,..”
मी गम्मत बघत होतो,आणि मुद्दाम पेपरमध्ये तोंड खुपसून बसलो होतो,..तेवढ्यात मावशी आतून ओरडत आली,”ए पोरींनो
कशाला तोडताय ग फुलं??”
तसं मी म्हणालो,”आग मावशी माझ्या मैत्रिणी आहेत त्या,त्यांनी विचारलं आहे मला”..
त्यावेळी तिने(फुलवेडी) जो कटाक्ष माझ्यावर टाकला होतास,..आजही मोरपीस
फिरवतो अंगावर…
मग दुसऱ्या दिवशी तिने गाठलंच मला,..माझ्याशी मैत्री केली आणि अट मला रोज फुलं आणून देशील,मग काय मला रोजची ड्युटी लागली फुलं तोडण्याची,
मावशी म्हणायची,” अरे कशाला एवढी फुलं तोडतोस,??”
त्यावर माझं उत्तर असायचं अग आई रोज देवीला हार नेते ग,..म्हणून तिने सांगितलंय…
एक दिवस तर आईच अली होती मावशीकडे,..तेंव्हा मावशीने माझं कौतुक केलं किती गुणाच पोर ग तुझं,..आठवणीने फुलं तोडून नेत रोज तुझ्या देवीसाठी,…पण मध्ये चार-पाच दिवस तू नव्हती तेंव्हा घरीच गेली होती ती फुलं त्यामुळे आईला वाटलं या चार दिवसांचच मावशी सांगतीये,..वेळ धकली कारण आईला कुठं माहीत 2 महिन्यापासून कोणत्या देवीकडे फुलं जात होती,…
त्या फुलांनी त्यांच्या सुगंधान अडकवलं होतं एकमेकात,.. तू माझी फुलराणी झाली होतीस आणि मी तुझा फुलवेडा,..दोन वर्षात आपलं प्रेम मोगऱ्यासारख बहरल होतं,…
मोगरा संपला की किती दुःखी होत होतीस,..मग किती ठिकाणी झाड झाड शोधून,..मोगऱ्याची वेल असली तर उंच चढुन,ती छोटीशी कळी हट्टाने घ्याचीसच तू,एकदा असंच धडपडलो होतो मी चांगलं फ्रॅक्चर,..मग महिनाभर घरी तेंव्हा तर माझा हा मोगरा पार सुकला आणि न राहवून आलाच होता घरी,..तेंव्हाही तुझी लांबसडक वेणी आणि त्या मोगऱ्याने तिची चाहूल दिली होती,..
मन घाबरून गेलं होतं ,..आता आईला कशी ओळख करून देऊ,पण आई पण हुशार माझी, तुझ्या गजऱ्याकडे पाहून म्हणालीच,”मावशीकडची फुलं या देवीला जातात होय,….
माझी फुलवेडी आईला पण आवडली,..आई म्हणायची,”फुलासारखीच टवटवीत,आणि आनंदी आहे माझी होणारी सुन….”
आज संसाराला 15 वर्ष झाली,..पण ती मात्र आता पहिल्यासारखी राहिली नाही,लग्नानंतर छान होतं दोन वर्षे ,..आमच्या संसारवेली वर जुळी फुलं उमलली होती,… छान हसरी बाळं,… चांगली 10 वर्षाची झाली आहेत पण ती,..ती मात्र हरवून गेली या संसाराच्या रहाट गाड्यात,.. आणि आपणही तिच छोटसं वेड जपलं नाही,…
आज तिला गजरा न्यायचाच,..त्याची पावलं पटकन वळली गजरेवल्याकडे,…गजरे वाल्याने विचारलं,”किती मोठा गजरा देऊ साहेब,….डोळे मिचकावत म्हणाला वहिणीचे केस मोठे की छोटे,…😢आणि त्या क्षणी मला आठवलं ह्या दुसऱ्या केमोथेरपीत तर तिचे सगळे केस गेले,…
मी पटकन म्हणालो,”देवी साठी पाहिजे”.
त्याने पटकन आपली जीभ चावली व छोटा पुडका माझ्या हातात दिला,…
माझं मन भूतकाळातून निघून परत वर्तमान काळात आलं,…
मी घरात आलो आणि पुडी टेबलावर ठेवली ,तिने ती न उघडताच घट्ट धरली नाकाशी,भरभरून तिचा सुगंध घेतला,..त्या क्षणी तिच्याही डोळ्यातून आठवणी वाहात होत्या,.. आईने येऊन तिला घट्ट धरलं आणि म्हणाली,”तू पूर्ण बरी होशील,..फुलं बघ किती अडचणीत असली तरी आपली सुगंधाची लायलूट करणं सोडत नाहीत ,…..”
आईच्या बोलण्याचा आणि मी पण रोज गजरा नेण्याचा दिनक्रम चालूच ठेवला,.. ती लवकर बरी झाली,..केसही छान आले आता मोगऱ्याची वाट आहे बस,…..
@ स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा