फोटू काढा फोटू

Written by

“अगं असे हातात हात धर, हात वर करा सगळ्यांनीआणि आता असे हात वर करून सगळ्यांनी मस्त उडी मारायची ,एक-दोन-तीन म्हटलं की… नीरज नीट फोटो काढ बर का आणि चांगले चार पाच काढ ,म्हणजे एखाद्या तरी फोटोत आमची ॲक्शन छान येईल.”
राधा मीरा नेहा आरती वैशाली अशा चार-पाच मैत्रिणींसोबत आणि आमच्या मुलाबाळांसह सोबत, आम्ही अलिबागच्या किनार्‍यावर पिकनिक साठी आलो होतो अर्थातच छान पैकी समुद्रात,
लाटा अंगावर घेत खेळणं, हा आमचा आवडीचा कार्यक्रम होता. आणि जोडीला वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढणे.
मोबाईल मुळे फोटो काढण्याची हौस किती मोठ्या प्रमाणावर भागते, हे त्या फोटो काढण्याची आवड असणाऱ्या व्यक्तीलाच माहित .फक्त फोटो काढणे नाही, तर मग ते व्हाट्सअपला स्टेटस लावणं, फेसबुक वर अपलोड करणं ,आणि येणाऱ्या लाईक ,कमेंट ची वाट बघणं, याच्यामध्ये जो आनंद असतो ,त्याचं वर्णन खरच करता येण्यासारखं नाहीच.
नुसतं फोटो काढण्यासाठी, वेगवेगळ्या पोझेस विचार करणं, त्या करणं आणि फोटो काढणे, ही गंमत तर खूपच छान असते. भलेही आपण नंतर ते फोटो पाहत नाही, पण त्यासाठी पोझेस देतानाचा केलेला अट्टाहास आठवला, तरी पण नकळत त्या जागेवरच्या आठवणी जाग्या होतात. आणि त्यावेळची मजा तर वेगळीच.
काहीजण म्हणतात, की असे फोटो काढण्यापेक्षा, ते आपल्या नजरेत मनात साठवण जास्त चांगलं असतं. पण या दृश्य रूपामध्ये बघतांना येणारी गंमत वेगळीच नाही का!
मला माझे लहानपण आठवते. त्यावेळेला फोटो काढणं हा खूप मोठा सोहळा असायचा ,आमच्या गावांमध्ये स्टुडिओ नव्हता, मग कुठेतरी शहरात जायचं ,त्यासाठी ठेवणीतला फ्रॉक, रिबीन आणि छान पैकी बांगड्या ,कानातले ,गळ्यातले असं सगळं घालून तयार व्हायचं आणि मग एखाद दुसरा फोटो निघायचा .
त्या फोटोची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट बघताना, पण आपण काहीतरी खूप मोठं केलं आहे, याचं समाधान असायचं. नंतर बाबांनी तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढण्याचा कॅमेरा विकत घेतला. अगदी बारा फोटो निघायचे. त्याच्यामध्ये त्यामुळे प्रत्येक फोटो काढताना, आधी शंभरदा विचार करायला लागायचा. आता सारखं नव्हतं बरं का की शंभर फोटो काढायचे आणि एखाद दोन ठेवून बाकीचे डिलीट करायचे.
त्यानंतर रोल डेव्हलप करायला देणे आणि नंतर त्या निगेटिव्ह सहित येणाऱ्या फोटोप्रिंट, निगेटिव्ह मध्येही फोटो बघण्याचा आनंद वेगळाच.
पुढे कलर फोटो आले ,त्यात मग 24/ 36 फोटोंचे रोल टाकता यायचे. त्यामध्ये मग पुन्हा थोडा कमी विचार, पण तरी विचार करून करूनच फोटो काढावे लागायचे. त्या रोललाही खूप सांभाळावं लागायचं. रोल बदलताना तो एक्सपोज होणार नाही, नाहीतर गेले सगळे फोटो वाया ,आणि एखाद वेळेस अशाप्रकारे एक्सपोज झालेल्या, वाया गेलेल्या फोटोची आठवण झाली, तरी कितीतरी दिवस त्याची हळहळ वाटत राहायची.
मग डिजिटल कॅमेरे आले, मोबाईलचे कॅमेरे आले आणि आता हवे तेव्हा, हवे तिथे ,हवे तसे फोटो सेल्फी काय काय काढता येतात. एकंदरीत काय फोटो काढण्याची, पुन्हा पुन्हा , काढलेले फोटो पाहताना, त्यावेळच्या आनंदाची उजळणी होते हेच खरं.
मला तर प्रत्येक वेळी छान तयार झालं की, कुठे प्रेक्षणीय स्थळावर फिरायला गेलं की, एखाद्या आनंदाच्या प्रसंगी, लग्न, डोहाळेजेवण, बारसे अशा प्रसंगात ते फोटो काढायला, खूप आवडतं. हसर्‍या चेहर्‍याच्या स्वतःला पहाण्याचा आनंद न्याराच.

भाग्यश्री मुधोळकर

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.