फोडणी संवादी  😁

Written by
ले.©सौं. पूनम राजेन्द्र.
बरंय रे,  तुला सुट्टी आहे आज.
पण मला आता पाच मिनिटात निघायचंय रे ऑफिससाठी. स्वैपाकाचं सगळं झालेलं आहे.
वेळेवर उदरभरणाचा यज्ञकर्म आटपून घेणे, काय! 😊
प्रांजल प्रचेतस ला सांगती झाली.
बोलता बोलताच सरकत्या मिनिट काट्याकडे बघत एकीकडे प्रांजल आवरत होती.  निघते वेळीचं  पर्स चेकिंग चालू होतं.
माझं पेन?  !!  हंS…   आहे पर्स मधे लकीली.
एS, माझा चष्मा बघितलायस का रे?
तूच बघ. टेबलावरच्या तुझ्या पुस्तकं आणि पेपर्सच्या पसाऱ्यात दिसतोय का ते !! इति प्रचेतस
ओह,  हो रे. काल रात्री ते पुस्तक वाचत होते नं. मग झोपताना तिथेच ठेवला गेला चष्मा. ग्रेट. मंडळ आभारी आहे जी! 😉
अरे  हो तो रुमाल विसरतच होते बघ.
तू ऊभा आहेस तिथे,  चापावर लटकतोय बघ,  दे ना जरा काढून. मी चप्पल सरकवल्यात आता पायात, उगा काढत बसत नाही.
आणि किल्ली?!!!  हंSs आहे आहे,  कालच ठेवलेली पर्समध्ये. पण परत एकदा खात्री केली. मागच्या वेळी किल्ली विसरलेले घरीच. तर  तू येईपर्यंत शेजारी त्यांच्या आवडीच्या सिरीयल बघत बसलेले.  😊
वेळेसअसं आयत्या  कसं शोधता तुम्ही!
कमाल आहे !!!🤔
माझं बघ कसं सगळं व्यवस्थितच असतं.
मला जे दुसऱ्या दिवशी लागणार आहे ते मी रात्रीच माझ्या बॅगेत टाकलेलं असतं.
असं पायात चप्पल सरकवत निघण्याच्या वेळी कसं आठवतं पर्स चेकिंग !! इति प्रचेतस.
हो ना.  पण आहे हे असंच आहे रे.
तू आहेस ना द्यायला म्हणून तर गंम्मत आहे.
बघ आता तुझ्यासारखं सगळं जागच्या जागी ठेवलं
तर ‘बाय बाय’ संवाद गुळमुळीत होणार नं !
आता कसं नं तुझ्याकडून अशी  ‘कम्माल आहे ‘ची संवादी फोडणी मिळाली म्हणजे दिवस छान जाणार माझा!! 😁
चल, भेटूयात संध्याकाळी म्हणत हसतच प्रांजल खाली उतरली.
रिक्षात बसली आणि अचानक तिच्या मैत्रिणीच्या दाक्षिणात्य  उच्चारातला फोडणीऐवजी चा ‘तडका’ आठवला. मग सख्ख्या गुज्जु शेजारणीकडून ऐकलेला ‘वगार’.
मनांत आलं, घरोघरी अश्या किती रंगतदार प्रेमळ फोडण्या घमघमत असतिल नाही?  वेगवेगळ्या भाषांतून.
ह्म्म्म,   तर….
उगाचच नाही वाटलं त्या ‘एकमेवा द्वितीया’ला ‘बहु स्याम’ व्हावंस.  एकटंच गुमसुम मधुरं मधुर चॉक्लेट होऊन राहण्यापेक्षा अशा संवादी फोडणीस्वादाच्या आस्वादरंगात रंगवून घेणं रुचीकरच नं.
बस एवढीशी गोष्ट !! 😁

Article Categories:
विनोदी

Comments are closed.