“बटर चकली…”

Written by

“बटर चकली…”

हिवाळा असल्यामुळे तळलेले पदार्थ खाल्ले तरी त्याचे व्यवस्थित पचन होते, त्यामुळे असे पदार्थ हिवाळ्यात केले जातात. दिवाळी पासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होते आणि थंडीचे स्वागत या तळलेल्या पदार्थानी केले जाते.

या पदार्थातील सगळ्यांच्या आवडीची असेल तर ती म्हणजे “चकली”. या चकल्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत, कुणी भाजणीची करते तर कुणी पीठ वाफवून करते. चकली बनवणं हि एक कला आहे ती जीला जमली ती खरी सुगरण आहे असं खात्रीने म्हणायला हवं असं मला मनापासून वाटतं.

सुरुवातीला माझीही चकली नेहमी बिघडे, त्यामुळे चकली करायची मला फार भीती वाटत असे. कधी मऊ पडे तर कधी विरघळे. एकदा असेच माझ्या बहिणीबरोबर याविषयी बोलणे झाले तेव्हा तिने मला सोपी रेसिपी सांगितली होती… त्याप्रमाणे मी चकली बनवली आणि सुंदर झाली. थँक्स ताई! 😊

यावर्षी दिवाळीत म्हटले चला थोडा चेंज म्हणून बटर चकली करून बघुयात म्हणून मग यात लाल तिखट अगदी नावाला घातले आणि थोडा तिखटपणा यावा म्हणून मिरी पावडर घातली आणि चकली बनवली. अतिशय सुंदर झाली होती, पण थोडीच बनवल्यामुळे लगेच संपली. आता माझ्या मुलीच्या आग्रहामुळे पुन्हा बनवली. हिवाळा असल्यामुळे चालता है बॉस…
तुम्हीही नक्की करून बघा..👍👍

◆ बटर चकली…

● साहित्य :

● तांदूळ पीठ 2 वाटी

● पंढरपुरी डाळे 1 वाटी

● अर्धी वाटी पोहे

● अडीच चमचे (50 ग्रॅ.) अमूल बटर

● पांढरे तीळ 2 ते 3 चमचे

● मिरी पावडर 1 चमचा

● लाल मिरची पावडर अर्धा चमचा

● मीठ आवश्यकतेनुसार

● कृती :

1. प्रथम मिक्सरला पंढरपुरी डाळे बारीक करावेत.

2. पोहे थोडेसे गरम करून मिक्सरला बारीक करावेत.

3. यानंतर एका भांड्यात तांदूळ पीठ, डाळे पीठ, पोहे पीठ एकत्र घ्यावे.

4. यात बटर, तीळ, लाल तिखट, काळी मिरी पावडर व मीठ घालावे…

5. आणि पाणी घालून मळून घ्यावे.

6. यानंतर गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे.

7. तेल तापल्यावर गॅस बारीक करावा व सोऱ्याच्या सहाय्याने चकल्या बनवून मध्यम आचेवर तळाव्यात.

8. आपली खुसखुशीत बटर चकली तैयार !

© सौ. सुचिता वाडेकर…✍

Article Categories:
इतर

Comments are closed.