बहर

Written by

मेघनाला पाळणाघर सुरु करून वर्ष झालं असेल.मस्त चालू आहे.खूप छान वेळ जातो तिचा आणि मंगेशचा.शालिनीची आयडिया.तिने सुचवलं आणि मेघनाने लगेच अंमलात आणलं पण.
खरं तर दोन वर्षपूर्वी जेव्हा सुव्रतला घेऊन शालिनी मेघना कडे आली तेव्हा मेघनाला दिपकच आलाय असं वाटू लागलं.सुव्रतची पावलं त्या घरात पडली आणि मेघनाच्या मनाला सुखासाचे घोस लगडले.दारातील सोनचाफा इतका बहरला होता कि काय सांगावे?   सुव्रत ४ वर्षांचा.छोटुकलं पिल्लू त्या घरात येऊ लागलं आणि मेघना आणि मंगेशच्या जगात जणू परीताईने जादूची  कांडी फिरवली होती.सगळीकडे सुखाची रांगोळी.त्याचं बोबडं बोलणं दुडूदुडू पळणं.त्याला गोष्टी सांगणं यात दोघ  अशी काही रमून गेली की आयुष्यात नियतीने दिलेल्या दुःखावर  खपली चढू  लागली होती.
शालिनीची  म्हणजे सुव्रतच्या आईची बदली पुण्यात झाली. पण  सुव्रतला सांभाळायचा प्रश्न होता.बडोद्याला तिच्या सासूबाई घरी त्याला सांभाळत असत..पण आता पुण्यात हि त्याला घेऊन एकटीच आली होती.नवरा पण पुण्यात ट्रान्स्फर करून घ्यायच्या प्रयत्नात होता. पण अजून काही ते झालं नव्हतं.पण नेमकं ऑफिस मेघनाच्या घराजवळ होतं हे तिच्या लक्षात आलं.पण इतक्या वर्षांनी सुव्रतला घेऊन त्यांच्याकडे जायचं …जावं कि नको? काय म्हणतील दोघे? असे विचार तिच्या मनात येत होते.पण इकडे येऊ नको हि अट तर त्यांनीच घातली होती.आता कदाचित सावरले असतील.तशी तिच्या आईकडून सगळी खुशाली  कळत होती पण आता नेमकं काय करावं  हा प्रश्न होता.ती ऑफिस बघून आली. एक फ्लॅट पण बघितला.शिफ्टिंग करायला तिने ८ दिवस रजा काढली होती.
एक दिवस ती मेघना आणि मंगेशच्या घरी न सांगताच आली.दारातला सोनचाफा निष्पर्ण होता.एकही फुल नाही.बागेतली छोटी छोटी रोपं निस्तेज झाली होती.एखादं फुल उगाच उभं राहायचं म्हणून आल्यासारखं वाटत होतं.तिला बागेतला आंबा दिसला आणि आठवणींचा बांध फुटला.ती तिथेच उभी राहून खूप वेळ आंब्याकडेच पहात होती .इतक्यात मंगेश ने तिला खिडकीतून पहिले.त्याने मेघनाला बोलावले.दोघे बाहेर गेले.शालिनीला आता रडू अगदी  अनावर झालं होत.ती मेघनाला मिठी मारून रडू लागली.मेघनाने तिला हलकेच थोपटलं.मंगेशने पण तिला मायेने कुरुवाळलं.जरा सगळे सावरले तेव्हा सुव्रत अगदी प्रश्नार्थक चेहऱ्याने सगळ्यांकडे पाहत होता.इवल्याश्या चिमुकल्याला काही समजेना.मेघनाने त्याला डोळे भरून पाहून घेतलं.आणि त्याला कडेवर घेऊन ती रडू लागली.
ते पिल्लू बिचारं कावरबावर झालं.”आई आई” करून शालिनी कडे झेप घेऊ लागलं.
शालिनीने त्याला सांगितलं,”अरे हे पण तुझे आज्जी आजोबा आहेत.आपल्या नाना नानीसारखे.”
मंगेशने सुव्रतला आपल्याकडे घेऊन त्याला घट्ट मिठी मारली.सगळं अंगण पाऊस आल्यासारखं भिजून गेलं होतं.कोरड्या पडलेल्या मेघना आणि मंगेशच्या मनावर धो धो पाऊस पडत होता सुखाचा आणि त्याचा  सुवास त्या दोघांनाच   येत होता.सुव्रतच्या त्या घरात येण्यानं अनेक आठवणी परत जाग्या झाल्या.
मेघना आणि मंगेशचा एकुलता  एक  मुलगा दीपक. खूप हुशार होता.मोठ्या फर्म मध्ये जनरल मॅनेजर  होता.सगळं कसं अगदी अलबेल होतं.मध्यमवर्गीय सुखी कुटुंब होतं.आणि मग शालिनीची एन्ट्री झाली.दीपक ने प्रेमविवाह करून   गुजराथी असलेल्या शालिनीला सून म्हणून  घरी आणले.
काही प्रॉब्लेम नाही.मेघना आणि मंगेश अतिशय खुश होते.दीपकच्या सुखापुढे काही महत्वाचं नव्हतं.शालिनीपण विरघळून गेली होती या कुटुंबात.लग्नापूर्वी पण ती खूप वेळा घरी यायची तेव्हा सगळ्यांनी मिळून तो आंबा दारात लावला होता.बंगल्याभोवती खूप सुंदर गार्डन तयार केलं होतं.मेघना आणि मंगेशच्या लग्नानंतर त्यांनी तो सोनचाफा लावला होता.शालिनीच्या घरात येण्याने तोही अजूनच बहरला होता.लग्नानंतरचं गुलाबी आयुष्य सोनचाफ्याने सुंगंधी होत होतं.
सहा महिने झाले होते लग्नाला आणि शालिनीने गोड बातमी दिली.दारातल्या आंब्या बरोबरच मेघना आणि मंगेशला सुद्धा मोहोर आला होता जणू.सगळे जण बाळाच्या आगमनाच्या  प्रतीक्षेत होते.शालिनीला सर आँखोंपर ठेवलं होतं जणू.त्याचवेळी नेमकं दीपकला एका ऑफिशीयल  कामासाठी दिल्लीला जावं लागणार होतं.
मंगेश आणि मेघनाने त्याला सांगितलं “आम्ही  आहोत ना शालिनीजवळ.तू बिनधास्त जा.”
मंगेश  म्हणाला,”तू काळजी करू नको मी रोज तिला गाडीने ऑफिसला सोडेन आणि घेऊन पण येईन.तू निर्धास्त राहा.”
दिपकला २ महिन्यांसाठी जायचं  होत.त्याचा पाय निघत नव्हता पण जाणं खूप जरुरीचं होत.आई बाबांवर सगळं सोडून तो निघाला.शालिनीची पण चलबिचल होत होती पण ती आई बाबांजवळ अगदी   कम्फर्टेबल होती.
तो फ्लाईट ने दिल्लीला पोहोचला.तो पोहोचल्याचा फोन झाला.इकडे सगळे निर्धास्त झाले.शालिनी पण ऑफिसची तयारी करत होती.मंगेश देव पूजा करत होता आणि मेघना स्वयंपाकात होती सगळं सुरळीत चालू होतं. पण कुणाला थोडासाही अंदाज नव्हता कि नियतीने एक क्रूर चेष्टा करण्याचा  डाव आखलेला आहे आणि काही वेळातच  या टवटवीत घरात दुःखाची लाट येणार आहे.साधारण १० वाजता मंगेशचा फोन वाजला.दिल्लीवरून होता तो.त्याने फोन उचलला.”हॅलो कोण?”
“जी हम दिल्ली पुलिस.”तिकडून आवाज आला.
मंगेशच्या मनात एकदम लक्क झालं.आत्ता तासाभरापूर्वी दीपकशी बोललॊ आणि तो सुखरूप पोहोचला आहे.आणि आता पोलिसांचा फोन?.”जी क्या बात है?” त्याने धीर एकवटून विचारले.
“दीपक कर्णिक आपके कौन है?”तिकडून प्रश्न आला.
“बेटा”एवढं म्हणेपर्यंत मंगेशचा कंठ दाटून आला होता.त्याची अवस्था पाहून शालिनी आणि मेघाना  सुद्धा सगळी काम टाकून त्याच्याजवळ  आल्या.काय झालाय म्हणून खुणा करून विचारू लागल्या.दोघींच्या डोळ्यात काळजीचे ढग जमत होते.
“देखिये आपके बेटेका ऍक्सीडेन्ट हो गया है.हमे दुःख है पर उन्हे हॉस्पिटल मे  भरती  किया है.आप जल्दी आजाओ.मैं हॉस्पिटल का पता आपको मेसेज कर देता हू”असं बोलूंन तिकडून फोन कट केला.
मंगेश धप्पकन  खाली बसला.काय बोलावं त्याला सुचेना.काहीतरी वाईट घडलंय हे नक्की होतं,  हे जाणून शालिनी   आणि मेघना पण काळजीने त्याला प्रश्न विचारू लागल्या.मंगेशने कसेबसे स्वतःला सावरले.आणि त्याने सगळं दोघीना शांतपणे   सांगितलं.शालिनीला खूप मोठा धक्का  बसला होता.मेघनाला  पण स्वतःला सावरणं कठीण होतं .पण आत्ता शालिनी आणि तिच्या पोटातलं बाळ यांचा विचार करून तिने शालिनीला धीर दिला. तिला मेघनाने घट्ट कवटाळून   धरले होते.आणि तिला समजावत  होती,”सगळं ठीक होईल आपण सगळे जाऊ लगेच तिकडे.”
मंगेशने भानावर येऊन दिपकच्या मित्राला फोन केला त्यालाही खूप मार लागला असून तो हॉस्पिटल मध्ये असल्याचं कळलं.मंगेशने त्वरित दिपकच्या कंपनीमध्ये सम्पर्क   केला. झालेली घटना कळल्यावर त्यांच्या दिल्ली ब्रॅन्चचे  लोक लगेच त्या हॉस्पिटल मध्ये पोहोचले  .मंगेशच्या मित्राने इमर्जन्सी फ्लाईट बुकिंग केलं आणि  मंगेशला घेऊन तो दिल्लीला रवाना झाला.
इकडे शालिनीची तब्येत खूपच बिघडली होती.तिला मेघना दवाखान्यात घेऊन गेली.शालिनीचे आई बाबा पण लगेच पुण्याला  यायला निघाले.सगळेजण आशा करत होते कि दीपक व्यवस्थित असू देत.पण नियतीच्या मनात काही वेगळंच  चालू होतं .दीपकला खूप जबरदस्त मार बसला होता आणि तो उपचारांना प्रतिसाद देत नव्हता.मंगेश तिथे पोहोचेपर्यंत दीपकने प्राण सोडले  होते .काळाचा हा असा घाला पडेल याची पुसट कल्पना हि नव्हती.मंगेशने टाहो फोडला.सुखाची रंगवलेली चित्रं एकदम फिकी झाली होती.शालिनी आणि मेघनाची त्याला जास्त काळजी वाटत होती.
दिपकचे शव  घेऊन तो पुण्यात  आला.शालिनीला फार मोठा धक्का बसला होता. ती बोलत नव्हती रडतही नव्हती.मेघनाला पण आता सावरण कठीण झालं होतं .आणि त्या कुटुंबावर एक  दुःखाची काळी छाया पसरली होती.
त्या दिवसानंतर आंब्याचा मोहोर गळून गेला आणि परत तो आंबा कधी बहरलाच नाही.सोनचाफ्याने आपली पानं सुद्धा टाकून दिली आणि त्यांचं सुद्धा ओझं त्याला नको झालं.नियतीच्या खेळापुढे मनुष्य नेहमी एक प्यादच असतो हे सिद्ध झालं होत.महिन्या भरात मंगेशने मेघनाला खूप समजावून त्या धक्क्यातून बाहेर आणलं.पण शालिनीची अवस्था पाहवत  नव्हती.तिचे उपचार चालू  होते पण  तिचं हसणं बागडणं सगळंच बंद झालं होतं.
बाळ तिच्या पोटात वाढत होतं .पण तिची मानसिक अवस्था खूप बिघडत होती.रात्री अपरात्री एकटीच बसून ती कुणाशी तरी बोलत असे.मग मेघना आणि मंगेश तिला भानावर आणत. मग ती अचानक रडायला लागत असे आणि थांबतच नसे.तिला या सगळ्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं  निदान त्या निष्पाप जीवासाठी तरी.मेघनाने  मंगेशला याबाबत विचारले.
“मला वाटत आपण तिला तिच्या आईकडे बडोद्याला पाठवू.या घरातून ती बाहेर गेली कि आपोआप तिचं मन रमेल”मंगेश ने सुचवलं.
“मला पण असंच वाटत आहे.पण बाळ?आपल्या   दिपकच बाळ आहे ते.”मेघना ला गहिवरून आलं.
“मेघना आता मन घट्ट कर. दीपकच्या आठवणीच आता आपला आधार  आहेत असं मानू.शालिनीला यातून बाहेर काढणं गरजेचं आहे.तिला बाळ झालं कि आपण बघून येऊ पण त्यानंतर आपण तिच्यापासून  दूरच राहू .दिपकच्या आठवणींपासून  तिला  दूर जाऊ देत.अगं काय वय आहे तिचं?अजून किती लहान आहे ती.  संपूर्ण आयुष्य पडलंय तिच्यासमोर.तिला तिचं आयुष्य नव्याने सुरु करू देत.यात जर तिला बाळाची जबाबदारी नको असेल तर  आपण त्याला घेऊन येऊ आपल्याकडे.पण तिला आपल्या बंधनातून मोकळं  करू” त्या  रात्री दोघांनी निर्णय घेतला आणि शालिनीच्या  आईवडिलांशी बोलून तिला तिकडे पाठवून दिले  .सुरुवातीला शालिनीने नकार दिला पण समजावून तिला तिकडे पाठवले.
हळू हळू दिवस पुढे सरकत होते.शालिनीची डिलिव्हरीची तारीख जवळ आली.आईकडे आल्यामुळे तिच्या तब्येतीत नक्कीच सुधारणा होत होती.मेघना आणि मंगेश दोघेही बडोद्याला गेले.तिच्या डिलिव्हरीवेळी त्यांनी खूप मदत केली.सुंदर राजकुमारासारखा मुलगा झाला.अगदी दिपकच .मेघनाला अश्रू आवरता आले नाहीत.पण शालिनी समोर कोणीही  रडायचं नाही असं ठरलं होतं .दीपकची आठवण काढून मेघना आणि मंगेश बाहेर जाऊन रडून आले.बाळाच्या येण्याने शालिनीच्या तब्येतीत  पडलेला फरक लगेच जाणवत होता.
बाळाचे बारसे करून मेघना आणि  मंगेश परत आले.सहा एक  महिने झाल्यावर मंगेश   आणि मेघनाने घेतलेला निर्णय त्यांनी शालिनी आणि तिच्या आई बाबाना सांगितला.एखादा चांगला  मुलगा बघून  परत लग्न करण्याचा त्यांनी तिला सल्ला दिला.शालीन अजिबात तयार नव्हती आणि सुव्रतला घेऊन पुण्याला परत येण्याचा हट्ट करू लागली.तेव्हा मेघनाने आईच्या हक्काने तिला सांगितले,”हे बघ बाळ जे झालाय ते पण थांबवू शकणार नव्हतो.आणि येणार काळ सुद्धा पण थांबवू शकत नाही.तुला पुढं गेलं पाहिजे.तू परत पुण्यात आलीस तर दीपकच्या आठवणींमध्ये हरवून जाशील.तुला यातून बाहेर काढायला आम्ही सगळ्यांनीच खूप प्रयत्न केलेत.आता नवीन आयुष्य सुरु कर.परत प्रेम कर लग्न कर.हवं तर सुव्रतला आम्ही आमच्याकडे घेऊन जाऊ.पण तू पुन्हा पहिल्यासारखी हसायला लाग.”
पण शालिनीला सुद्धा त्या बाळाचाच आधार होता.”सुव्रतच माझा आता जगण्याचा उद्देश्य आहे आई.त्याला माझ्याकडेच राहू देत.पण तुम्ही पण रहा न माझ्यासोबत.”शालिनी मेघनाला विनवणी करत होती.
मेघना आणि मंगेश ने मन घट्ट केले आणि तिला परत आमच्याशी संपर्क करू नको.आम्हाला आणि दीपकला विसरून जा असे सांगितले.तिथून निघून गेले.
त्यानंतर ३ वर्षांनी शालिनीच्याच एका मैत्रिणीने तिच्या भावाशी अक्षयशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला.आणि आणि तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली.अक्षयने सुव्रतसहित शालिनीला स्वीकरले होते.
आता इतक्या वर्षांनी सुव्रत त्याच्या खऱ्या घरी आला होता. त्याला बघून साहजिकच मेघना आणि मंगेशला दिपकची उणीव भासू लागली. शालिनीने त्याना विचारले  ,”माझं ऑफिस इथेच आहे जवळ.माझी अचानक ट्रान्स्फर झाली आणि काही कळवायला वेळच मिळाला नाही.सुव्रतची शाळा पण जवळच आहे अगदी ओकिन्ग डिस्टन्स.मी नवीन बेबीसिटींग शोधेपर्यंत  सुव्रतला इथे सोडून गेले तर चालेल का? तुमच्या पेक्षा जास्त कोण काळजी घेईल त्याची ? मला सोपं पडेल.पण तुमचा काय शेड्युल  आहे ते सांगा मला. म्हणजे जमेल का तुम्हाला?”
“शालिनी बाळा आम्ही तुझ्या भल्यासाठी   तुझ्यापासून दूर गेलो होतो .तुझं सगळं आता छान झालंय हे बघून   आम्हाला आनंदच वाटत  आहे.आणि अशी परक्यासारखी बोलू नकोस.मुलगीच  आहेस तू आमची.आणि सुव्रत तर आमचाच  आहे. तू बिनधास्तपणे त्याला इथे सोडत जा आणि काही बेबीसिटिंग नको शोधू.त्याचे  आज्जी आजोबा  असताना कशाला पाहिजे ते विकतच प्रेम?.”मंगेशने तिला सांगितले.
आणि त्या दिवसापासून सुव्रत  मेघना आणि मंगेशच्या जीवनाचं टॉनिक बनून गेला.दिवसेंदिवस मेघना आणि मंगेश च्या मनाला येणारा बाहेर त्यांच्या बागेत सुद्धा फुलू लागला.
या वर्षी आंब्याला मोहोर आला आणि सोनचाफा तर   फुलांच्या ओझ्याने वाकला होता.त्यांना असं आनंदी बघून शालिनीला सुद्धा समाधान वाटत होतं.मेघना आणि मंगेशच्या या उतार  वयात त्यांचं आयुष्य असंच बहरत राहावं आणि ताजतवानं राहावं असं तिला वाटत होतं.त्या दोघांनी आपल्या साठी घेतलेला कठोर निर्णय आणि त्यांचा त्याग खूप मोठा होता. तिने छोटंसं पाळणाघर सुरु करण्याची कल्पना मेघनाला दिली. आणि आपल्या अजून एक दोन मैत्रिणींची मुलं तिथे ठेवायला सांगितली.आता मेघना आणि मंगेशचा वेळ खूप छान जातोय,त्यांना जगण्याचं नवं बळ मिळालं जणू.हे करण्यामागे शालिनीचा एकचं उद्देश्य होता, काही वर्षांनी परत तिची बदली होणार आणि मग हा आलेला बहर परत गळुन जाऊ नये.तो फुलत रहावा .टवटवीत रहावा.म्हणून तिने आनंदाची  उधळण करणारा बालपण नावाचा पाऊस सतत त्यांच्या  आयुष्यात शिडकावा  करत राहील अशी  सोय केली.आणि तो पाऊस लहानग्यांच्या रूपात त्यांच्या आंब्याला आणि सोनचाफ्याला सतत बहरलेला ठेवतोय.
-डॉ.योगिनी कुलकर्णी

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा