बांध

Written by
  • 2 महिने ago

*बांध……आहे तसाच..*

*सगळ्या गावांमध्ये सर्वात मोठी समस्या काय असेल तर….बांध. एकरभर पडीक पडलेली असते ती कसायला मनुष्यबळ नाही. वेळही नाही. पण पठ्ठ्याला शेजारच्याचा बांध कोरायला फार वेळ असतो. मला अजुनही समजलंच नाही की या बांधात काय अडकलेलं असतं. एक पाभर दोन पाभर जास्तीत जास्त एक गुंठा लुबाडली…तर किती उत्पन्न निघत असेल. पण मराठी माणुस तो भावाचा बदला घेतल्याशिवाय चैन नाही. एकाच आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला कट्टर शत्रू बनतो…अन एक भला बांध दोघांमध्ये निर्माण होतो..असे अनेक बांध आयुष्यात असतात. लोकांच्या जमीनी कोरुन करोडपती झाल्याची एकतरी बातमी कधी ऐकलीय का??. पण आम्ही दळभद्री माणसं बांध कोरायचे बंदच नाहीत. माझी दहा एकर…पंधरा एकर…पाईन…नुसत्या बाता ऐकायच्या. या मायभुमीवर किती आले आणि किती गेले ती आहे तशीच जागेवर आहे. आपण फक्त गमजा मारायच्या….याच मायभूमीनं जन्माला घातलं…वाढवलं…पालनपोषण केलं….आणि शेवटी स्वतःमधे सामावुन घेतलं. डोळ्यादेखत मी मी म्हणणारे वाघासारखे डरकाळ्या फोडणारे अक्षरशः धुळीला मिळाले..पण आम्ही मात्र तसेच सांड…काहीच फरक नाही…दोन दिवसाचं तारुण्य ,शक्ती संपली की मग ताळ्यावर येतो..बांध कोरणारांनी बंगले बांधले नाहीत..अलिशान गाड्या घेतल्या नाहीत कारण ज्यांनी बंगले बांधले , अलिशान गाड्या घेतल्या..,त्यांना काहीतरी साध्य करण्याच्या नादात बांध कोरायला वेळच नव्हता…असं म्हणतात की टिव्हीवर , पेपरमध्ये बीएडब्ल्यु , मर्सिडीज , जॕग्वार…अॉडी..अशा गाड्यांच्या जाहीराती का नसतात..कारण ह्या गाड्या खरेदी करणारे जाहीराती पाहत बसत नाहीत. त्यांना वेळच नसतो…ते बीझी असतात ध्येय प्राप्तीसाठी.. पण इथं बांध कोरणारे भाकरीला महाग असतात..नुसत्या शर्टाची बटणं उघडी ठेऊन छाती छप्पन्न इंचाची होत नाही. पानं खाऊन तोंडं लाल केली म्हणून कोणी पाटील होत नाही…रोज दारुच्या बाटल्या रिचवुन राजेमहाराजे होता येत नाही…पत्त्या जुगारांचा आड्डा झिजवुन कोणी शर्यत जिंकत नाही.दररोज लोकांची निंदा नालस्ती..करायची ह्याला नावं ठेव ..त्याला नावं ठेव असं करुन कोणीच प्रशासकीय अधिकारी झाला नाही.थोडक्यात काय तर…..शेणातला किडा शेणातच राहतो..त्या फुलातला मकरंद काय कळणार….शेवटी…आयुष्य मर्यादित आहे. आनंद बिनधास्त घेत जगा…दुःखाचं प्रदर्शन करत जगण्यापेक्षा..प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या…मातीत जन्मलास…मातीत विलिन होणार…मग मिजास काय कामाचा….माणुस म्हणुन जग ना बाबा…..लोकांची वाट लावायच्या नादात…तुझी केव्हा लागेल कळणार पण नाही…बांध कोरण्यापेक्षा आपआपसातील शत्रृत्वाचे बांध नष्ट करुयात….*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा