बाजार व जत्रा

Written by

बाजार व जत्रा

आमच्या बदलापुरात पश्चिमेला स्टेशनजवळ खूप छान बाजार भरतो. सकाळचं गेलं की लाल,पिवळी,गुलाबी गावठी गुलाबं टोपलीत घेऊन आदिवासी बाया बसलेल्या असतात.गजरे ,चाफ्याची फुलं,तसंच देठ गेलेल्या गुलाबांच्या दहादहा रुपयांच्या पिशव्या,सोनटक्क्याच्या जुड्या..शिवाय गावठी भाजी..गवार,चवळी,लाल माठ,हिरवा माठ,सुरण,भोपळा,अळूचे कंद,अळुवडीची पानं,मुळा..सगळ्या भाज्या घेऊन या बाया लायनीत बसलेल्या असतात.

पावसाळ्यादरम्यान सगळ्या गावठी भाज्या बाजारात येतात.तेरं,कंटोळं,भोपळ्याची फुलं,लाल माठाचे देठ,शेवगा,कुरडू,गाभुळीची भाजी,मोठ्या गावठी काकड्या..अशी बरीच रानभाजी म्हणजे चवीने खाणाऱ्याला पर्वणीच असते.आदिवासी स्रिया खेकडे पकडून आणतात.त्यांना मुठे म्हणतात.
काहीमोठे राखाडी कलरचे तर काही अगदी लहानलहान असतात.

सिझननुसार बाजारातल्या विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू बदलतात.थंडीत आवळ्यांच्या टोपल्या घेऊन बसतात .पाणीदार टपोरे आवळे.बघताच क्षणी घेण्याचा मोह आवरत नाही. मी आंबेहळद, आवळे व आलं घालून लोणचं करते.चवीला छान लागतं.शिवाय हे आवळे मिठाच्या पाण्यात घालायचे व ती बरणी फ्रीजमधे ठेवून द्यायची.वर्षभर आवळे खायला मिळतात.यांच्या ऑफिसात कुणी मेडम होत्या त्या आणायच्या.यांनी क्रुती विचारुन घेतली.आत्ता आमच्याही फ्रीजमध्ये बारमाही आवळे असतात.कुणाला चक्कर येत असेल,गरगरत असेल तर एक आवळा खाल्ला की बरं वाटतं.जेवणाबरोबर घेता येतो.तसंच ओल खोबरं, हिरव्या मिरच्या,लसूण व दोन आवळे घालून चटणी छानच लागते.
हां तर बाजारात होतो नं आपण.भरकटते मी मधेच अशी रेसिपीमध्ये. काही बाया रानआवळे घेऊन बसतात.ग्लासभर आवळे दहा रुपयाला देतात. चिंचांचे आकडे..बघुनच तोंडाला पाणी सुटतं.चिंचेचे गोळेही घेऊन बसतात.

उन्हाळा सुरु झाला की गावठी चणे,मुग,मटकी,कडवे वाल,कुळीथ..हे सारं कडधान्य घेऊन बाया बसतात.ही कडधान्य आणून उन्हं लावून बरण्यांत भरुन ठेवली की पावसाळ्याची सोय होते.श्रावणात बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना ताकाची कढी व कडव्या वालाची उसळ अफलातून लागते.

कुळथाची आमटी,आम्ही तिला मोडवणी म्हणतो. तिच्यासाठी मात्र भरपूर पाऊस हवा.बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना मोडवणी आणि भात खाण्याची मजाच वेगळी.जोडीला लाल माठाची भाजी नाहीतर एखादं चुलीत भाजलेलं सुकट.अरे फाय स्टार हॉटेलातलं जेवण झक मारतं अशा जेवणापुढे. त्या ओळी आहेत नं राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या.खरंच चांगलंचुंगलं खाल्लं की मनातही चांगलेचुंगले विचार येतात.

घाटी भाज्या म्हणजे फ्लॉवर,कोबी,सिमला मिरची ,मटार या साऱ्या होलसेल रेटमध्ये मिळतात.म्हणजे पावभाजी करायची असेल तर आदल्यादिवशीच ही सगळी ताजी भाजी आणून ठेवायची.बीटपण घ्यायचा.बीटमुळे रंग छान येतो पावभाजीला.

सोमवारी आठवडा बाजार भरतो.संध्याकाळी सुरु होतो हा बाजार.प्रचंड गर्दी असते.यादिवशी फुटपाथभर विक्रेते दिसतात.लहान मुलांच्या चड्डया,जीन्स,टॉवेल्स,लुंग्या,ब्लँकेट्स,चटया,बेडशीट,उशांची कव्हरं,मुलींचे ड्रेस,साड्या..कपड्यांची जत्राच नुसती.गँरेंटीचं काही माहित नाही.

लहान लहान भांड्यांची गाडी लागलेली असते.तिथे कितीही नाही म्हंटलं तरी माझा जीव घुटमळतोच.मग लहान डीश,चमचे,लायटर,वाट्या असं घेणं होतच़.बाईचा जीव भांड्यात म्हणतात ते काही खोटं नाही.

तसंच बाईचा जीव पर्समध्येही बरं का.कितीही चांगली पर्स खांद्यावर असली तरी पर्सची हातगाडी,दुकान दिसली की माझ्यासारखी बाई तिथे थांबून त्या पर्सची किंमत विचारणारच.लहान वॉलेट,क्लच,मोठ्या लेदर पर्स किती ते प्रकार आणि नमुने.काहीजणी तर मेचिंग पर्ससुद्धा वापरतात.तसंच पुढे गेलं की चपला,सँडल्स,शुज..निरनिराळ्या डिझाइनचे.पर्स मात्र स्वत:ची नीट सांभाळायची.कधी कोण काढून नेईल ते कळायचं पण नाही.

थोडं पुढे गाऊनवाल्या बाया.कॉटनचे बऱ्यापैकी गाऊन मिळतात.नाहीतरी गाऊन हा टिकवण्याचा विषय नव्हे.कितीही चांगला गाऊन असला तरी भांडी घासताना सिंकजवळ उभं राहिलं की पोटाजवळ खराब होतोच.मग तेवढ्या भागाचा रंग उडतो.एप्रन असला तरी बऱ्याचदा तो घालायचं लक्षात रहात नाही.म्हणून मग हे रस्त्यावरचे स्वस्त नी मस्त गाऊन परवडतात पाच सहा महिन्यांनी बदलायचाच तर असतो.शिवाय या शॉपिंगची मजा दुकानातल्या शॉपिंगला येत नाय बघा.अगदी मॉलमधल्या शॉपिंगलाही नाही.कारण इथे त्या बाया आपल्या ओळखीच्या होतात.आवर्जुन हाक मारतात.बरेच दिवसांनी गेलो तर दिसला नाहीत..तब्येत बरी आहे नं असं प्रेमाने विचारतात ते मॉलमध्ये कुठलं विचारायला.शिवाय आपल्या उलुशा खरेदीने त्यांची उलिशी पोटाची खळगी भरते हाही विचार आपण करायला हवा नं.कबुलं आहे मॉलमध्ये स्वस्त मिळतं पण जे अगदीच स्वस्त मिळतं ते मॉलमधून घ्यावं बाकीचं आपलं या गरीब बिचाऱ्या सख्या़कडून घ्यावं.

एकजण गावठी अंडी घेऊन बसतो. सुकी मासळीवालाही आपली टोपली घेऊन बसतो.पण या सुक्या मासळींना गावच्या सुक्या मासळीची तसुभरही चव येत नाही.काही आग्री लोकांच्या पुर्वापार आळ्या आहेत तिथं .पुर्वी संध्याकाळी या आग्री स्त्रिया घराबाहेर चुलीवर पाणी लावून मोठ्यामोठ्या भाकऱ्या थापायच्या व सुके मासे भाजून त्यांच कुट करुन त्याची चटणी जोडीला करायच्या.ह्या आग्री स्त्रियांना दागिन्यांची भारी आवड.एकेकीच मंगळसुत्र हे पोटापर्यंत लांब व इंचभर रुंद तसंच मोठाले कानातले.हळदीचा कार्यक्रम यांच्यात दणक्यात साजरा करतात.पण आत्ता बऱ्याच आग्री लोकांनी आपल्या पुर्वजांच्या जमीनी बिल्डरला विकल्या आहेत व त्याबदल्यात बिल्डरने दिलेल्या फ्लेटमध्ये रहातात.उर्वरित पैशांच्या ह्या मोठ्यामोठ्या गाड्या घेतात.

माघ महिन्यात पुर्वेकडे स्टेशनला गणपती बसतो.तेंव्हा दहा दिवस मोठी जत्रा असते.मी मुद्दाम या जत्रेत फिरते.लोखंडी भिडं,कढया,विळ्या,तवे.. घेऊन काहीजण बसतात.काहीजण पोळपाट लाटणी,रवी,भातुकली..अशा लाकडी वस्तू घेऊन बसतात.काही रेडीमेड ब्लाऊज,साड्या,..तर काहीजण टीवीकव्हर,सोफाकव्हर,टेबल कव्हर,लाँड्री बेग वगैरे घेऊन विकायला बसतात.

कानातले,खड्यांच्या बांगड्या,बिंदी,पैंजण,खड्यांचे नेकलेस..सगळीच इमिटेशन ज्वेलरी रात्रीच्या प्रकाशात डोळे दिपवून टाकते.मोठमोठाले हेलोजनचे फुगे,मोठाले टेडी,छानछान बाहुल्या,गाड्या..लहान मुलांची मजाच असते.शिवाय रिंग टाकायचे,बंदुकीने फुगे मारायचे गेम,जादुचे प्रयोग, वेगवेगळी पाळणी असतात.आंबावडी,रंगीत खाजा व वेगवेगळी मिठाई,पाणीपुरी,डबलरोटीची दुकानं असतात. पण ते कितपत खाण्यायोग्य असतं ते कधी खरेदी न केल्याने माहित नाही.खरंतर आमच्या घरात सगळी जरा गोडाला कमीच.म्हणून आम्ही त्या साईडला जातच नाही.
गणपतीच्या दर्शनाला भली मोठी रांग असते.बाप्पाची आरास फारच विलोभनीय असते.रस्ताभर लायटींग असते.जत्रेला सगळीजणं रात्री बाहेर पडतात.लहान मुलं फारच आतुरतेने या जत्रेची वाट बघतात.आकाशपाळणे,घोडेवाले पाळणे..बरंच काही असतं मुलांसाठी.

बदलापूर पुर्वेला स्टेशनच्या बाजूला नदीचे गोड्या पाण्यातले मासे घेऊन बसतात.मोठमोठे टायगर प्रॉन्स,नदीच्या पाण्यातला बारीक जवळा,शिंपल्या(खुबे),ठिगुर,वाळय,शेंगट्या,काढय,मरळ,म्हळवे,खवळे,दंडाळी,टोळचानके,वाळय,काळुंदरे..हे सर्व गोड्या पाण्यातले मासे सकाळ,संध्याकाळ आदिवासी लोकं घेऊन बसतात.लोकांची ते घेण्यासाठी झुंबड असते.बाया गावठी कोंबडेही टोपलीत घेऊन बसतात.
त्याच्या जरा पुढे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने मच्छीमार्केट बांधून दिलंय.तिथे सगळे मुशी,सुरमई, हलवा,पापलेट,भोंबिल..असे समुद्राच्या खाऱ्या पाण्यातले मासे मिळतात.चार पैसे जास्त द्यावे लागले तरी मासे चांगले मिळतात.

तर असा हा बाजार.बाजारात फिरण्याचं,वस्तू खरेदी करण्यातलं सुख आम्ही ग्रुहिणीच जाणो.😍

——–गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा