बाप्पाशी बट्टी

Written by

गीता गजानन गरुड.
आंब्रड.

#बाप्पाशी_बट्टी

विभाची हल्ली चाळीसी उलटली होती. मुलाचा वाढता अभ्यास ,यजमाननांच्या डोक्यावरील कार्यालयातला ताण हे ती दररोज अनुभवत होती.
दरम्यानच्या काळात तिने टाकलेले फासे उलटे पडले होते. शेअर्समधे झालेलं फार मोठं नुकसान, सततचं अपयश याने ती फार खचत चालली होती.
रात्रीची झोप तिला कधीच सोडून गेली होती.रात्री या कुशीवरुन त्या कुशीवर वळवळत रहायची. उशांचे अभ्रे भिजवत रहायची.
कोणी घरात नसले की एकटीच रडत बसायची. तिचे डोळे क्षीण होत होते. जेवण कमी झाल्याने अशक्तपणा आला होता. एक कर्तव्य म्हणून देवपूजा करत असे. देवारचा तिचा विश्वास दिवसेंदिवस घटत चालला होता. तिच्या नवर्याला हे सारे दिसत होते. तो तिला खूप धीर देई. सगळे चांगले होईल असे म्हणे.
एकदा त्यांच्या ओळखीच्या आजोबांचे निधन झाले. विभा ला फार वाईट वाटले. ती धीर एकवटून आजीला भेटायला गेली. आजींना सगळं नीट होईल. यातून बाहेर पडा. जरा बाहेर फिरा, देवळात जा असा धीर देत होती. तेवढ्यात आजी म्हणाली. माझ्यासमोर गेले गं ते. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दोन वर्षे यांची लहान बाळासारखी काळजी घेतली. या देवाचे मी एवढे उपासतापास केले नी याने माझं असं का केलं? त्या आजीचं एक एक वाक्य विभाचं काळीज चिरत
होतं. आजीला थोडा धीर देऊन ती घरी आली. त्या रात्री तीला सारखी ती आजी आठवत होती नी तिचे डोळे डबडबत होते.
नेट सर्फींग करताना विभाला ब्रह्ममकुमारी शिवानी देवीचा विडिओ दिसला. त्यातही एकाने आजीला पडलेला प्रश्न विचारला होता, की देव माझ्याशी असा का वागला? विभाने तो विडिओ दोनदा पाहिला.
शिवानी देवी म्हणत होत्या, तुम्हाला देवाने एक पाटी दिली नी त्यावर तुमच्या बाळाचं नशीब लिहायला सांगितलं तर तुम्ही शंभर टक्के सगळं चांगलं लिहालं. देव तर आपल्या सगळ्यांची आई आहे. मग तो आपलं नशीब वाईट का लिहिलं. देव असं करणं शक्यच नाही कारण नशीब लिहिणं त्याच्या हातात नसतं. जन्मत: आपण आपले भोग घेऊन आलो असतो व ते भोगावेच लागतात.अगदी परमेश्वरालाही ते चुकले नाहीत.
प्रभु रामचंद्रांनाही वनवास भोगावा लागला तर आपलं काय.
पण देवावरचा विश्वास कितीही संकटे आली तरी ढळू द्यायचा नाही. नियतीने दिलेले आपले भोग आपल्याला भोगावेच लागतात पण परमेश्वर भक्तीने या दु:खातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते, आत्मविश्वास मिळतो. नी मग सगळं सोप्प वाटू लागतं. विभाला हे विडिओ फार आवडू लागले. ती रोज दोन तरी भाग ऐकू लागली. हळूहळू तिचा गेलेला आत्मविश्वास परत जाग्रुत होऊ लागला.
रोज सकाळी लवकर उठून ध्यान करायचे म्हणजे ईश्वराच्या निकट जायचे व मनात सकारात्मक उर्जा भरून घ्यायची.घरातला केर काढतो तसे मनातले वाईट विचार साफ करायचे. कोणीही कितीही आपल्याला वाईट बोलले तरी त्यांच्याबद्दल चांगलाच विचार मनात आणायचा. हे सगळे विचार तिला आवडू
लागले.
विभाच्या मनातली अढी गेली. तिच्या बाप्पाशी तिची परत बट्टी झाली.☺️☺️

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा