बाप्पा येतोयस ना?

Written by

ए बाप्पा बोलणारे
कसला एवढा विचार करतोयस
येतोयस ना तू आमच्याकडे?
रंगीबेरंगी मोदक,चमकणारा मखर
चकचकीत रोषणाई
एकावर एक सुपर फटाके
ददुमदुमणारा ढोल, ताशा
वाट बघतोय तुझी,
बोल की रे बाप्पा येतोयस ना?

बाप्पा – विचार करतोय रे बाळा माझ्या येण्याची उत्सुकता असते तुम्हाला की दहा दिवस गोंधळ घालण्याची उत्सुकता असते?
मी येण्याचा आनंद असतो की नाचगाण्याचा आंनद असतो?

साधा सुधा पण मी बरा दिसतो की रे , इतकी रंगरंगोटी तुमच्या नेत्रसुखाला भावावी यासाठी का?

मी येतो माझ्या भक्तांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला
सुखदुःखाच्या गुजगोष्टी करायला
बावीस तेवीस फूटाच्या उंचीवर नेऊन बसवता मला
डोळ्यात डोळे घालून भक्ताशी बोलू कसा

दोन मिनिटं भक्ताला मलाही नाही बघता येत
ना त्याला माझे चरणस्पर्श करता येत
माझ्याच भेटीला आलेला असतो धापा टाकत
एक सेकंदाचीही रे होत नाही नजरभेट
जावं लागतं त्याला परतून गर्दीतून ढकलत

ढोल ताशा मी नाही रे मागत
मंत्रमुग्ध करणारी गाणीच मला जास्त भावतं
माझ्यापाशी तर मांडतोस ढीग मोदकाचा
बाहेर बसणाऱ्या भुकेल्याला तुकडाही नाहीस देत प्रसादाचा

माझ्यावर जीव ओवाळून टाकतोस,
मला विपरीत कोणाचा स्पर्शही नको म्हणतोस
पण दर्शनाला आलेल्या देवीसमान स्त्रीचा अवमान करतोस

रात्रीच्या अंधारातही असतात माझे डोळे उघडे
दिसत असतो तुमचा नंगा नाच न उडणारे पत्ते
एकीचे बळ वाढावे म्हणून येते माझी स्वारी
पण तुमच्याकडे सारखी कुरघोडीचीच खेळी

माझ्या आशीर्वादासाठी तू भुकेला की पैशासाठी हावरा?
मी आला की मूठभर चढत मांस तुझ्या अंगावर
आवाज वाढवतोस तू गोर गरीबावर

दहा दिवस जपतोस जीवापाड
आणि दहा दिवसांनी लोळत असतात कुठेतरी माझे हात पाय
विटंबना वर विटंबना होते माझी
घेतोस तेव्हा डोळे झाकून

तुझ्याच सोयीने येणे माझे अन तुझ्याच सोयीने आता जाणे झाले
भक्तीचा खऱ्या विसरलास अर्थ
श्रद्धेलाही ना उरली किमत
नको मला तुमचा तामझाम, नको ती चकाकी
नको तो ढोल,ताशा नको फटाके
नको राजेशाही थाट

भक्ताला माझ्या भेटुदे थेट
आशीर्वाद देऊदे त्याला मनभरून
ज्याची श्रद्धा आहे माझ्यावर मनापासून
माझ्याच भक्तीचा बाजार मांडू नका रे
भक्ताला माझ्या डोळे भरून बघूद्या रे
©सरिता सावंत

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा